नवीन लेखन...

गोष्ट एका ‘ Post ‘ ची

साली एक साधी पोस्ट सुचू नये ?  गणूला आजवर असा कधी प्रश्न पडला नव्हता . आता तुम्हाला ‘हा कोण बुवा , गणू ?’ असा प्रश्न पडला असेल . जर तुमचे फेसबुक असेल तर प्रश्नच नाही . तुम्ही त्याला ओळखत असणारच .! कारण त्याचा फे बु मित्रांची संख्या पावसाळ्यात तुंबलेल्या गटारा  प्रमाणे ओसंडून वाहत आहे .! म्हणून ‘गणूच्या गप्पा ‘ नावाचे पेज सुरु केले . तेही लोकल लोकनेत्याच्या ढेरी प्रमाणे दिवसेंदिवस फुगतच आहे .  शिवाय तो  दहा बारा ग्रुपचा तो ऍडमिन आहे ! यात तुम्ही कोठे तरी असणारच कि !

आता तुमचे फेबु च नसेल (अरेरे … काय दुर्दैवी जीव !) तर त्याची ओळख करून देणे गरजेचं आहे . त्याचे नाव गणू आहे . आणि तो त्या आडबाजूच्या पत्र्याचा खोलीत रहातो . मला इतकीची त्याची ओळख आहे . रात्री दहा नंतर कधी तो ‘डुलत ‘ आला तर , रोज सकाळी शिळ्या पावाच्या तुकड्यासाठी त्याच्या समोर शेपूट तूटस्तोवर हलवणार कुलंगी कुत्रसुद्धा नओळखता अंगावर धावून येत ! शेजारी विचारा . ‘कोण गणू ?ठाव नाय !’ हेच उत्तर येईल . ‘ ऍडमिन दाही ग्रुपचा , ओळखीविना भिकारी ‘ अशी त्याची गल्लीतली अवस्था आहे . असो .

गणूची दिनचर्या मोठी ऐरटाइट असते  . तो सक्काळी पाचला उठतो . ‘कराग्रे वसते —-‘झाले कि लॅपटॉप उघडतो . ‘सुप्रभात ‘ ‘गुड मॉर्निंग ‘ नसता नुसतंच ‘जि एम ‘ मेसेजस एकशे एक जणांना InBox पोठावतो . मग रात्री पाठवलेल्या ‘शुभरात्री ‘ ‘गुड नाईट ‘ ‘स्वीट ड्रीम ‘ च्या प्रत्येक लाईकला Thnx पाठवावे लागते . त्यानंतर आलेल्या न्यूज फीड मधल्या प्रत्येक पोस्टला  एक लाईक , एक बदाम , एक स्मायली टाकतोच टाकतो . या सोशल मीडियावर रिलेशन सांभाळणे खूप गरजेचं आहे . कंटाळून चालत नाही ! मग त्या पोस्टवर ‘क्या बात है !’ ‘ सुपर ‘ ‘कडक ‘ (मागे सासूच्या सेल्फीला -कडक -कॉमेंट गेली होती , तेव्हापासून त्याची बायको माहेरी गेलीयय ! सासू त्याच घर सांभाळतेय असे ऐकीव आहे . !) असल्या कॉमेंट्स , पोस्ट नवाचता टाकून देतो . !  (आयला सगळ्या पोस्टी वाचायला वेळ कुठं हाय ?) मग सकाळचं ‘स्टेट्स अपडेट ‘ करावं लागत . यात ‘चोरी कधी करू नये ‘ ‘ शिव्या कोणा देऊ नये ‘ ‘  सकाळी उठून गरम पाणी प्यावे ‘ ‘ रोज शाळेत जावे ‘ असा उपदेशात्मक फतवा असावा लागतो . म्हणजे वाचणाऱ्याच्या दिवस —-. असो .  मग पेज आणि ग्रुपचा पसारा आवरलाकी ‘GOOD AFTERNOON ‘ची वेळ होते ! पुन्हा सकाळचा एपिसोड रिपीट होतो . हे असं GOOD NIGHT व्हाया GOOD EVENING चालू रहात .रात्रीच्या ‘स्टेट्स अपडेट ‘ ला एखादा किस्सा टाकला कि काम भागून जात  .  मग  शेजारच्या लोकात कधी मिसळणार ,अन लोक कशे ओळखणार कि हाच  ‘गणू ‘ म्हणून . टाईमच नई है बॉस ! क्या करना ?!

तर असा हा क्षणा क्षणाला पोस्ट लिहणारा , पोष्ट पहाणारा (वाचणारा नाही !), पोष्टात लोळणारा (लोळणारा कसला ?लडबडलेला ) पोस्टर बॉय , याला  रात्रीच ‘स्टेट्स अपडेट ‘करायला पोस्ट सुचुनये ? आज सुर्य दक्षिणेला उगवला का ? कि मुंग्यांना डायबिटीज झाला ! तो एक वेळ होईलही , पण गणूची पोस्ट चुकायची नाही ! बर याच्या पोस्ट कायम डबल पॉझिटिव्ह (++) ! भलेहीघटना  खरी नसेल पण त्यावरील पोस्ट पॉझिटिव्हच पाहिजे ! कारण हे जग , भुक्कड , बेकूफ , मूर्ख लोकांनी भरलेलं आहे . याना समजावणे , मायेने गोंजारने ,सुधारणे ,चांगल्या मार्गावर आणणे , यासाठी त्यांना रोज ज्ञानामृत पाजणे (क्या हुवा ?बच्चा रो रहा था !-ग्राईप वाटर दिया क्या ?), हे आपले नैतिक ,सामाजिक , आणि जागतिक सुद्धा कर्तव्य आहे या भावनेतूनच, नाहीतर कर्तव्य कठोर होऊन तोंडाला फेस येवस्तोर तो फेसबुकवर   लिहीत असतो . याला तुमचा ,माझा आणि गणूचाही इलाज नाही !

असा हा गणू आज हताश झालाय . याचे ‘पोष्टिक जीवन ‘ सम्पूस्टात ‘ येणार का ? मग या जगाचं कस होणार ? याला (जगाला कि गणूला ? पुणेकरांचा सवाल ! ) वाली कोण ? कोण शिकवणार सकारात्मकता ?या दिन दुबळ्यांना कोणाचा आधार ? जगबुडी -जगबुडी ती काय  वेगळी असते ?

पण असे होणार नाही ! परमेश्वर दयाळू आहे !. थोड्या वेळा पूर्वीच गणू परळी परभणी पॅसेंजरने ,गच्च भरलेल्या थर्डकलास (हल्ली यालाच II म्हणतात )डबड्यातून एक पायावर उभाराहून वैतागी प्रवास करून आला होता . स्टेशन पासून ते सरस्वती नगर पर्यंत त्याला तंगडतोड करावी लागली होती .  घरा समोरच्या तंगड्या पसरून उघड्या बंब बसलेल्या  म्हाताऱ्या माधवाने ‘बरेआहेत का ? ‘ असा सहानभूतीचा प्रश्न सोडाच ,पण तसा भाव सुद्धा चेहऱ्यावर दाखवला नाही !  याच अनुभवावर त्याने पोस्ट लिहिलीय . ती खालील प्रमाणे .

टायटल — ‘  यात्रा हि यात्रा ‘

—-आज परळीसच रेल्वे  लेट झाली  होती . तुफ्फान गर्दी ,  प्लॅटफॉर्म प्रवाश्यांनी  दुथड्या वाहत होता . गाडीत  बसायलाच , काय उभे राहायला पण जागा  मिळणार नाही हे दिसत होते . डौलात ती रेल्वे नामक महाराणी फलाटाला उभी राहिली . मी इंजिन पासून ते गार्डच्या डब्ब्या पर्यंत कोठे कमी गर्दी आहे ते पहात होतो . तेव्हड्यात .
“अहो मिस्टर , गणुजी “अशी हाक ऐकू अली . कोण कोमल कोकिळे समान मधुर लालकर ! ती एक ललना होती . अहाहा , काय ते सौंदर्य . गोल चेहरा ,गोरा पान रंग , निरागस भाव ! एकदम बर्फीचा तुकडाच ! खिडकी जवळून बोलताना  येणारी उंची पर्फुमची ‘ मेह्क  ‘पागल करून टाकणारी होती ! ( हे वाक्य लिहिताना  डुकराच्या सडक्या मासा सारखा वास मारणाऱ्या , खेटून उभा असलेल्या म्हाताऱ्याची आठवण झाली .  )
“याना या . तुमच्या साठी मघाशीच सीट धरून ठेवली आहे . खिडकी जवळची ! तुम्हाला आवाज दिला पण तुमचे लक्षच नव्हते . आता परत फिरून आलात तेव्हा पुन्हा हाक मारली .”  ‘नेकी और पूछ पूछ ‘. मी ‘एक्सयूज मी ,एक्सक्यूज मी ‘ करत त्या डब्ब्यात घसलो .
“तुम्ही मला कसे ओळखता ? आपण कधी भेटल्याचे स्मरत नाही !” मी हाश हूश करत मी खिडकी जवळच्या जागेवर बसत विचारले .  ( ‘ मुडद्या ,पुन्ना चप्पलीचा पाय पायावर दिलासा तर खेटरानं बडवीन !’ , गर्दीत मागे उभारलेली गंगाखेडची हडळ चेकाळली होती ! )बघा मी मघापासून ‘मला बसायला जागा मिळणार ‘असे घोकत होतोच . माणसाने कायम पॉझिटिव्ह विचार करावा . त्या मुळेच तर मला खिडकी जवळची जागा मिळाली ! वर बर्फीचा सहवास !
“अहो ,तुम्हाला कोण ओळखत नाही ? कित्ती फेमस आहेत ! मी तुमची फेसबुक फ्रेंड आहे , तुमचे पेज लाईक करते ,अन तुमच्या आठ ग्रुप मध्ये पण मेम्बर आहे ! मला न तुमच्या सगळ्या पोस्ट आवडतात . कित्ती -कित्ती पॉझेटिव्ह लिहिता ! कसे काय जमत हो तुम्हाला ?”तिच्या तोंडून कौतुक ऐकताना मला लाजल्या सारखे झाले . ( ‘ काय ते ध्यान ? मघापासून डोळे फाडून बघतंय ! वयाची नाय तर जनाची , जनाची नायतर मनाची तरी लाज बाळगावी माणसानं ! शंभर फुटावरची कॉलेजातली सनकाडी !झिरो फिगर !)
“थँक्स “मी
“हा बेसनाचा लाडू आणि चिवडा घ्या . नाही म्हणायचं नाही हा ! मी कुकरी क्लास मध्ये शिकून केलाय ! खा आणि कॉमेंट द्या !” तोंडाचा चंबू , तिचा आग्रह , आणि पोटातली भूक . तीच मन मोडवेना ! चिवड्याची फकि मारली . बेहतरी ! अशी चव उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच चाखत होतो .
“अप्रतिम ! अ -प्र -ती -म  !!!”
लाडू पण सुपर टेस्ट . पण आमच्या आईच्या हातची चव याला नाही .
“लाडू , कसा आहे ?”
” एकदम, कडक !”
“काय ?”
” म्हणजे मस्त ,झकास , या लाडूवर आपण तर बुवा, फिदा ! ”
(मायला ,खिसा कापला कायकि ! हात आरपार गेलाय ! भुकेनं आतडं गळ्यात आलाय . दोन रुपड्याचे खारेमुरे घ्यावे म्हणलं तर पैसा नाही ! आता बोंबलत घरापर्यंत तंगडतोड आहेतच ! )
तेव्हड्यात परभणी आलेच . किती लवकर आले नाही परभणी ! थोडा अजून वेळ लागला असता तरी चालले असते , तितकाच या बर्फीचा सहवास लाभला असता ! जाऊ द्या . जितकं नशिबी असत तितकंच मिळत असत . त्यातच समाधान आणि आनंद मानावा ! नाही का ?
“बाय , पुन्हा भेटू .”म्हणून तिचा निरोप घेतला . गोड हसरा ,हात हलवतांनाचा , तिचा चेहरा नजरे समोरून हालत नव्हता !
जड अंतःकरणाने स्टेशन बाहेर पडलोतर ,समोर खंडू ! आमचा रिक्षेवाला !
” या ,साहेब तुमचीच वाट पहात होतो ! कालच ‘परलीस जातोय ‘ ,तुम्ही बोलले होतेना ? म्हणून मग बाकी सवारी घेतल्या नाहीत तुमचीच वाट बघत बसलोय ! ”
“अरे देवच पावला , बरे झाले तू आलास ! “यालाच म्हणतात नशीब .
मी घरा समोर रिक्षातून उतरलो . खंडू नको नको म्हणत असताना त्याला बळे बळेच  शंभरची नोट दिली . तो वर शेजारचे माधवराव धावतच आले .
“अहो गणुजी  या या !आज पुन्हा गाडी लेट झाली वाटत ! केव्हाचा  तुमची वाट पहातोय . ” असे काहीसे बोलत त्यांनी मला घरात नेले . मोठा मायाळू माणूस हो !
” आग गणुजी आलेत ! पान घे वाढून ! भुकेले असतील ! ” त्यांनी घरात आवाज दिला .
“गणुजी ,तुम्ही फ्रेश व्हा . गरमागरम मुगाची खिचडी आहे ! चारघास खाऊन घ्या ! “मग काय ?हात धून वाफाळलेल्या खिचडीवर आडवा हात मारला !’ अन्न हे परब्रम्ह आहे ‘ याची प्रचिती नव्याने अली . अन्नदाता सुखी भाव ! मनातून आपोआप आशिष बाहेर पडला . शुभरात्री !—–

चला पोस्ट तर  संपली , आता सकाळ पर्यंत निवांत ! रिकाम्या पोटात टमरेलभर पाणी लोटून , गणू चवाळ्यावर कलंडला . त्याला चटकन झोप लागली . त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते .

— सु र कुलकर्णी .

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye . 

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..