प्रदूषण (२२)- आषाढस्य प्रथम दिवसे

आषाढच्या मेघाने खाली वाकून जमिनीवर बघितले धुळीच्या आवरणा खाली दिसत होत्या गगनचुंबी ईमारती. आकाशात तेजाबी धूर ओकणाऱ्या असंख्य फैक्ट्ररीज व लाखोंच्या संख्येने रस्त्यावर धावणारी वाहने विषाक्त धूर सोडणारी. एक काळी रेखा हि त्याला दिसली, बहुतेक हीच यमुना असावी. मेघाला यक्षाने भरतखंडाच्या  राजधानीचे केलेले वर्णन आठवले. मेघाला प्रश्न पडला इथे खालचे काहीच व्यवस्थित दिसत नाही. अश्या परिस्थितीत यक्षप्रियाला शोधणार तरी कसे? आषाढच्या मेघाने जोरदार वर्षाव करून वातावरण स्वच्छ करण्याचा निश्चय केला.

आकाशात विजेचा कडकडाट झाला. जोरात पाऊस सुरु झाला. आषाढचा पहिला पाऊस. धुळीने माघलेल्या वृक्ष-वल्लरी अमृताच्या नव्हे तर तेजाबी पावसात भिजल्या. हिरवी पाने काळी पडली. चातकाने चोंच उघडली. मृगाचे दोन थेंब, अमृताचे नव्हे तेजाबी पाणी, त्याच्या पोटात गेले. तो जमिनीवर येऊन पडला. काही क्षणात तडफडत-तडफडत तो कालवश झाला. तहान भागविण्यासाठी रस्त्यावर साचलेले पाणी पिऊन अनेक पक्षी, कोकिळा, साळुंकी, चिमण्या तडफडत-तडफडत मेल्या.

आकाशात विजेचा कडकडाट ऐकून यक्षप्रियेचा आनंद गगनात मावेना. आषाढचा मेघ घेऊन येणार होता तिच्या प्रियकराचा संदेश. ती धावत पळत इमारतीच्या गच्ची वर पोहचली. तिने वर आकाशात बघितले, भला मोठा काळाकुट्ट मेघ  दिसला. आकाशात चमकणाऱ्या विजेला पाहून तिला वाटले, बहुतेक मला शोधण्यासाठीच या विजा चमकतात आहे. तिला प्रियकराचे बोलणे आठवले, प्रिये तू अंधारात हि विद्युतलते समान सुंदर दिसते. साक्षात रंभाच जणू. दिव्याची काय गरज. प्रियकराची आठवण येताच स्त्री सुलभ लज्जा तिच्या गालावर पसरली. ती अधिकच सुंदर दिसू लागली. काही क्षणात जोरात पाऊस सुरु झाला. ती आज पहिल्यांदाच आषाढच्या पावसात मनसोक्त भिजली. पण हे काय अचानक तिच्या अंगाची लाही-लाही होऊ लागली. असहनीय पीडा, आपला चेहरा जळतो आहे, असे तिला वाटले. ती कसेबसे आपल्या कक्षात आली. दर्पणात बघितले. तेजाबी पाण्याने तिच्या चेहऱ्यावर व शरीरावर जागो-जागी अनेक घाव केले होते. तिचा चेहरा तेजाबी पाण्यामुळे जळाळा होता. दर्पणात स्वतचा चेहरा बघून ती किंचाळली. अनेक चित्र-विचित्र विचारांचे वादळ तिच्या मनात उठले. आपला कुरूप चेहरा पाहून प्रियकराच्या मनात काय विचार येतील. त्याचे माझ्यावर पूर्ववत प्रेम राहील का? त्याने मला सोडून दिले तर. अखेर तिने कठोर निर्णय घेतला.

पाऊस थांबला. वातावरण स्वच्छ झाले. पण खालील जमिनीवरचे दृश्य बघून आषाढच्या मेघाने धसकाच घेतला. वृक्ष-लता  तेजाबी पाण्याने जळून काळ्या पडलेल्या होत्या. अनेक पक्षी मृत झालेले दिसले. अरेSरे! माझ्या उदारातले अमृत समान पाणी वातावरणात पसरलेल्या तेजाबी धुळीत मिसळून विष समान झाले. अचानक त्याला यक्षप्रियेची आठवण आली, तीही प्रियकराच्या संदेशासाठी गच्चीवर आली असेल. मेघाने खाली चहूकडे पहिले.  एका इमारती कडे मेघाचे लक्ष गेले, बहुतेक यक्षाने वर्णन केलेली हीच ती इमारत. पण ईमारती खाली एवढी भीड का?  एक स्त्री रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली होती. तिचा चेहरा नुकताच तेजाबी पावसात भिजल्यामुळे कुरूप झालेला होता. लोक कुजबुज करत होते, हिचा नवरा परदेशी गेलेला आणि हिला पावसात भिजायला हौस. माहित नव्हते का हिला, सरकारने आधीच पावसापासून सावधान राहण्याचा अलर्ट दिला होता. एवढ्या टीवी, रेडियो वर घोषणा होतात. ऐकल्या नव्हत्या का हिने. एक म्हणाला सौंदर्य नष्ट झाल्यावर जगणार तरी कशी? आणिक कुणी म्हणाला आपण सर्वच या विषाक्त वातावरणात हळू-हळू रोज मरतो आहे. कुणालाच चिंता नाही. राजाच जवाबदार आहे, हिच्या मृत्यूला. जमलेले लोक सरकार विरोधात घोषणा देऊ लागले.

आषाढच्या मेघ वरून सर्व काही बघत होता. यक्षप्रियेचा असा अंत पाहून त्याला अतीव दुख झाले. या सर्वाला आपणच जवाबदार आहोत, असे त्याला वाटले. आता परतताना रामगिरी वर यक्षप्रियेचा संदेशाची वाट पाहणाऱ्या यक्षाला काय सांगणार. काही क्षण मेघ तिथेच थबकला. मनात विचार आला उदरातील पाणी घेऊन परत फिरावे व समुद्रात रिकामे करावे.  पण त्याला वरूण राजाचा आदेश आठवला. जमिनीवर काय घडत आहे, याची चिंता न करत दिलेले पूर्वनिर्धारित कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. मेघ दोन अश्रू गाळुन पुढच्या प्रवासाला निघाला.

— विवेक पटाईत About विवेक पटाईत 189 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सिंधूदुर्गाच्या संरंक्षणासाठी बांधलेला किल्ले पद्मगड

सिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान ओळखून शिवरायांनी याच्या संरक्षणासाठी मालवणच्या सागरतीरावर ...

डोंबिवलीतील ग्रंथालय व वाचनालये

सुशिक्षितांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवलीत अनेक समृद्ध ग्रंथालये आणि ...

बिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापुर

कोल्हापुर शहराच्या महाद्वार रस्त्यावर हे मंदिर आहे. याला बिनखांबी गणेश ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवतीचा किल्ला

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे असलेला निवतीचा हा किल्ला पर्यटकापासून बराच दूर आहे ...

Loading…