नवीन लेखन...

भेट. अर्थात, गिफ्ट..!

भेट देणाऱ्याच्या दृष्टीने अगदी लहान असलेली ’भेट’, भेट दिलेल्याला काय मिळवून देईल, ते सांगता येत नाही..त्याचे हे दोन किस्से. एक मित्राने सांगीतलेला, तर दुसरा मी स्वत: अनुभवलेला..

आपल्या देशातल्या एका बड्या उद्योगपतींची एक गोष्ट, त्या उद्योगपतीसोबत काम करणाऱ्या त्यांच्या निकटच्या सहकाऱ्याकडून, जे माझे मित्र आहेत, त्यांच्याकडून ऐकली होती.

या उद्योगपतींचा ५०वा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निमंत्रण होतं आणि सहाजिकच मला हा किस्सा ज्या व्यक्तीने सांगीतला त्यांनाही निमंत्रण होतं. आता या व्य्कतीला प्रश्न पडला, की ज्याच्या घरी साक्षात लक्ष्मी पाणीच काय तर धुणी भांडीही करत होती, अशा माणसाला भेट काय द्यावी, हा. या व्यक्तीने थोडा विचार केला आणि एका सुरेखशा पाकिटात काही जुनी नाणी घातली आणि त्या उद्योगपतीला नजर केली..

खरी कमाल दुसऱ्या दिवशी झाली. मला हा किस्सा सांगीतलेल्या व्यक्तीला त्या उद्योगपतीचं तातडीचं बोलावणं आलं. यांना वाटलं, की जुन्या  नाण्यांमुळे तो उद्योगपती खवळला असावा आणि आपल्याला झाडण्यासाठी त्यांने बोलावलं असावं म्हणून. ही व्यक्ती थोडीशी सावधपणेच उद्योगपतीच्या केबिनमधे शिरली आणि अचानक त्या उद्येगपतीने धावत येऊन या व्यक्तीला गच्चा मिठी मारली आणि म्हणाला, “अरे आपने तो मुझे सबसे बढीया तोहफा दिया. इससे अनमोल चीज तो मुझे आज तक किसी ने नही दी..!”

मला हा किस्सा सांगणारी व्यक्ती होती माझे मित्र-गुरू आणि जुन्या मुंबईचे जाणकार, जुने हिन्दी सिनेमा आणि त्यातील अविट गीत-संगीतावर ज्यांचा शब्द अंतिम मानला जातो असे श्री. अरुण पुराणिक.

खरं तर ती मुंबईच्या चोर बाजारात वाट्यावर मिळालेली जुनी नाणी होती. योगायोग असा, की नेमकी ही जुनी नाणी हे उद्योगपती त्यांच्या लहानपणी देशातल्या ज्या एका लहानशा संस्थानात राहात असत, त्या संस्थानची त्या काळची अधिकृत नाणी होती. फाटक्या चड्डीतल्या खिशातल्या याच नाण्यांनी त्या उद्योगपतींनी त्यांच्या लहानपणी लिमलेटच्या गोळ्या आणि फुटाणे विकत घेतले होते. अरुणजींच्या मते त्यांनी त्या उद्योगपतींना जुनी दुर्मिळ नाणी दिली होती, तर त्या उद्योगपतींच्या मते अरुणजींनी त्यांना त्यांचं आख्खं बालपण परत दिलं होतं..भेट देणाऱ्याच्या दृष्टीने अगदी लहान असलेली ’भेट’, भेट दिलेल्याला काय मिळवून देईल, ते सांगता येत नाही..

आता मी अनुभवलेला किस्सा..

आज सकाळीच माझे देवगड निवासी मित्र श्री. मकरंद फाटक यांचा सकाळीच निरोप आला, की त्यांनी माझ्यासाठी ‘देवगड हापूस’ची एक पेटी एस.टी.ने धाडली आहे, ती मी ताब्यात घ्यावी म्हणून. त्यांनी मला पावती नंबर दिला. त्यानंतरच्या काही वेळातच मी बोरीवली एस.टी. डेपोत जाऊन पेटी ताब्यात घेतली आणि घरी आलो.

ही घटना कुणालाही एकदम साधी वाटेल आणि त्याचं एवढं काय कौतुक करायचं, असंही वाटेल. पण असं वाटण्याआधी थांबा, कुणालाही अगदी किरकोळ वाटणारी ही घटना, माझ्यासाठी इतकी लहान नाही..

श्री. मकरंद फाटक यांच्याकडून हे आंबे मला भेट म्हणून मिळालेले आहेत. मला भेट म्हणून काही मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मी बॅंकेत नोकरीला असताना दिवाळीच्या दिवसांत मला ढिगाने भेटी यायच्या, अनेकांना येतात. पण त्या भेटीमागे काहीतरी अपेक्षा दडलेल्या असायच्या आणि भेटीवर गुडाळलेल्या त्या चकचकीत कागदात त्या स्पष्ट दिसायच्या. त्या भेटींमागे ‘गिव्ह ॲंड टेक’ असा रोकडा व्यवहार असायचा, प्रेम वैगेरे तर जवळपासही फिरकायचं धाडस करायचं नाही..खरं तर त्या गोष्टींना ‘भेट’ म्हणण्यापेक्षा ‘टिप’ असं म्हणणं जास्त संयुक्तिक होईल..

मित्रांने, श्री. मकरंद फाटकांच्या भेटीमागे अशी कोणतीही अपेक्षा नाही. त्यांनी मला शुद्ध निरपेक्ष प्रेमापोटी दिलेली भेट आहे. भरजरी शालुच्या प्रेमापेक्षा आजीच्या जुनेऱ्यातलं प्रेम जास्त उबदार असते, तसंच कसलाही बटबटीत चकचकीतपणा नसलेल्या साध्याशा जुन्या वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळलेल्या, उबदार गवताच्या कुशीत पहुडलेल्या आंब्यांच्या भेटीचं आहे. मी असं का म्हणतो त्याचं कारण, श्री. मकरंद फाटक यांना मी आजतागायत प्रत्यक्ष भेटलेलो नाही, तिथे आमच्या एकमेंकांकडून काही अपेक्षा असणं तर बहोत दूर की बात है..! त्यांची माझी जी काही ओळख आहे, ती फेसबुकच्या माध्यमातून. मी काहीतरी शब्द खरडतो आणि ते त्यांना आवडतं, हाच आमच्यामधल्या मैत्रीचा न दिसणारा, परंतू दोघांनाही हृदयापासून जाणवणारा बंध..’बंध’ हा शब्द ‘बंधन’असा अर्थ दर्शवत असला तरी, शब्दांचा बंध अधिक मोकळा पैस देणारा असतो, तो असा..

ते आंबे मी कालच चाखले. देवगड हापूसची चव तर अवीटच असते, परंतू त्या चवीवर फाटकांच्या निस्वार्थ प्रेमाचा वर्खही होता. वर्ख असलेली बर्फी चटकन खावीशी वाटते ना, तसंच काहीसं माझं झालं. परंतू त्या चवीपेक्षाही मला जास्त आनंद वाटला, तो त्या आंब्यांचं पार्सल उघडताना. कारण त्या आंब्यांचं पॅकींग करताना त्याला मकरंदजींच्या हाताचा झालेला स्पर्श..! आंबे गुडाळलेल्या त्या वर्तमानपत्राचा घडी मकरंदजींनी घातली असावी, त्यात स्वत:च्या हातांनी, स्वत:च्याच बागेतल्या गवतात ते आंबे हळुवारपणे ठेवले असावेत, पेटीवर स्वत:च्याच हाताने माझं नांव-पत्ता लिहिला असावा..ते सर्व उबदार स्पर्ष मला जाणवत होते. प्रत्यक्ष कधीही न भेटलेले मकरंदजीं माझ्या समोर साक्षात माझा हात धरून उभे आहेत हे मला जाणवत होतं..मला झालेला हा आनंद आंब्यांच्या चवीपेक्षा कैकपटीने मोठा होता..

सुरुवातीच्या किश्श्सातल्या उद्योगपतींचं लहानपण जसं अरुणजींनी त्यांना नकळत बहाल केलं, तसंच मकरंदजींनी या भेटीमुळे माझी उंची वाढवली. अख्खा दिवस मोबाईलवर काही न काही टायपत बसलेला आपला नवऱा (असं बायकोला) आणि बाप (असं पोरांना) नेमकं करतो काय, असा रास्त संशय (बायकोला) आणि शंका (पोरांना) पोरांना असावी अशी मला बरेच दिवस शंका होती. काल मला अनपेक्षीतपणे अनपेक्षीत व्यक्तीकडून मिळालेली हापूस आंब्यांसारखी केशरी-सोनेरी भेट पाहून, त्यांच्या डोळ्यातला संशय (बायकोच्या) आणि शंका (मुलांच्या) जाऊन तिथे कौतुक दिसलं. बायकोला नवरा आणि पोरांना त्यांचा बाप काहीतरी चांगलं करायच्या प्रयत्नात असणार, याचा विश्वास मकरंदजी, तुमच्या भेटीने त्यांना दिला. माझी उंची काही इंचांनी वाढली असं मी म्हणतो, ये याचमुळे..! सुरुवातीच्या अरुणजींचा किस्सा आणि नंतरची मकरंदजींची भेटकथा यांच्यातलं हे सारखेपण..

बऱ्या वाईटाची अपेक्षा करुन केल्या जाणाऱ्या क्रियेला व्यवहार म्हणतात.इथे तो रुक्ष व्यवहार नव्हताच..आजच्या काळात देवालाही काहीतरी चढावा चढवला जातो, तो देवाने त्याच्या कैकपटीने आपल्याला परत द्यावं म्हणून. माणूस तर हल्ली माणसाला काही देण्याचंच विसरलाय. माझं आहे ते देणार नाहीच, उलट तुझंही हिसकावून घेणार, अशी परिस्थिती सर्वत्र पाहायला मिळते, तिथे मकरंदजींना मला काहीतरी द्यावसं वाटलं, त्यांनी ते एका क्षणाचाही विचार न करता दिलं. अविचारी भावनेनं कुणाला तरी काही तरी द्यावसं वाटणं ही क्रियाच किती देखणी आहे..

मकरंदजी तुम्ही वेगळे ठरता ते इथे..! मला भेट दिली म्हणून मी म्हणत नाही, तर मकरंदजी तुमच्या मनातली ही कुणालातरी काहीतरी ‘देण्या’ची भावना तुमच्या मनात परमेश्वराने जन्मजात ठेवलेली आहे, असं मी समजतो. हे ईश्वरी ‘देणं’, तुम्ही आयुष्यभर जपाल याची मला तिळमात्र शंका नाही. ईश्वरी याचसाठी, की ईश्वरही सतत आपल्याला काहीतरी देत असतो. ईश्वर सर्वत्र पोहोचू शकत नसेल कदाचित, म्हणून आपल्यासारखी काही माणसं त्यानं निर्माण केली असावीत असं मी समजतो..आणखी काय लिहू..!!

— नितीन साळुंखे, मुंबई
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..