नवीन लेखन...

गाण्याच्या कहाण्या – एक मोहब्बतवालं गाणं

आपण प्रेमात का पडतो ?, याला जस नेमकं उत्तर देता येत नाही ,तसेच एखाद गाणं आपल्याला का आवडते  ? ,याचेही उत्तर कधी कधी सापडत नाही . बस ,ऐकायला आवडत !असेच एक गाणं आहे ,जे मला आवडत . आणि हि आवड गेल्या  पन्नास वर्षा पासून कायम आहे !

‘ कजरा मोहब्बत वाला , अखियोंमे ऐसा डाला ,
कजरे ने लेली मेरी जान ,हाय रे मै तेरे कुर्बान ‘

हे गाणं आहे ‘किस्मत ‘ सिनेमातलं . तसे पाहायला गेलं तर काय आहे या गाण्यात ?ना हळुवार भावना , ना दर्द भरी दास्तां ,ना इमोशन , ना कसला फिलॉसफीकल संदेश ! आहे ती , निखळ करमणूक ! मस्त लाईट मूड असावा ,त्यात हे गाणं लावावं आणि मनसोक्त धिंगाणा करावा . गंभीर प्रकृतीच्या लोकांसाठी हे थिल्लर किंवा उडाणटप्पू  गाणं ,पण आमचं ‘दिल तो पागल है ‘ त्याला आवडत हे  ‘मोहब्बतवाल ‘गाणं .

१९६८ साली हे गाणं  एस . एच . बिहारी यांनी  ‘किस्मत ‘ साठी लिहलं . सिनेमात हे एक स्टेज परफॉर्मन्स गाणं . गुंडाना चकमा देण्यासाठी बबिता आणि बिश्वजित एका थेटर मध्ये घुसतात . दोन कलावंतांची गठडी वळून ,त्यांचा पोशाखात स्टेज वर गाणं म्हणतात अशी काहीशी कॉमिक सिच्युएशन या गाण्यासाठी वापरली आहे . त्यात कहर ,बबिता पुरुषाच्या आणि बिश्वजीत स्त्री वेषात स्टेज वर धडकतात !

बबिता (पुरुष वेशातील ) साठी आशा भोसले आणि बिश्वजीत (स्त्री वेशातील ) साठी शमशाद बेगम गायल्या आहेत . संगीतकार आहेत ओ . पी . नय्यर . ओ . पी . ,आशा आणि शमशाद बेगम अफलातून कॉम्बिनेशन , धमाक्याची गॅरंटी !

ओ . पी . म्हणजे क्रांतिकारी  हिंदी सिनेसंगीतकारा पैकी एक , पहिले गुलाम हैदर , दुसरे सी . रामचंद्र , तिसरे ओ . पी . नय्यर ( चौथे आर .डी . बर्मन आणि पाचवा ए . आर . रहमान ! ) ! त्याकाळी दिग्गज लता मंगेशकरां शिवाय आपली कारकीर्द यशस्वी करणारा अवलिया ! मला शास्त्रीय संगीतातलं ओ कि ठो कळत नाही असे उघडपणे सांगणारा संगीतकार ! तरी ‘ फागुन ‘ मधील सर्व गाणी ‘पिलू ‘रंगात पेलणारा किमयागार !, ‘ऱ्हिदम किंग ‘ !, हिंदी सिनेमाचा अनाभिषिक्त ‘ठेके ‘दार ! या बंडखोर माणसासाठी स्वतंत्र लिहावं लागेल . असो . त्याचा संगीतातल हे ठुमकेदार गाणं . मना बरोबर पायालाही नाचवणार !

बिहारींच्या शब्दांना आणि ओ . पी . च्या चालीला आवाजाच्या गोफणीतून रसिकांना घायाळकरणारा ‘मारा ‘ केलाय आशा भोसले आणि शमशाद बेगम यांनी . आशा भोसले आणि ओ . पी . अनोखं मिश्रण . आशा भोसले ओ . पी . साठी भरपूर गायल्या आहेत . भरपूर म्हणजे किती ? तब्बल एकशे पासष्ठ सोलो आणि एकशे चौरेंचाळीस डुएट ! ओ . पी .च्या गाण्याला काय हवं हे त्यांना सांगायची जरूर नसायची ! त्याचा या गाण्यात प्रत्यय येतोच . आशा ओ . पी .साठी शेवटची गायली ,ते १९७३सालच्या ‘टॅक्सी ड्रॉयव्हर ‘ मध्ये .

या गाण्याची दुसरी गायिका आहे शमशाद बेगम . थोडासा ‘रफ ‘ आवाज ,पुरुषी थाटाचा वाटावा असा . ह्या गाण्यात बिश्वजीतला तो फिट बसलाय ! ती अशीच स्त्री वेशातील शम्मीकपूर साठी पण गायलीय ‘ब्लफ मास्टर ‘ मध्ये ! ओ . पी. ना जसे गाण्यातले काही कळत नव्हते ,तसेच शमशाद बेगमला पण गाण्याचे रीतसर शिक्षण नव्हते ! गाण्याची आवड होती . शमशाद बेगमच्या एक गुण म्हणा किंवा वैशिष्ट्य म्हणा होते . संगीतकार कोणीही असो ,सहगायक कितीही दिग्गज असो , हि आपला ‘ बिन्धास ‘ आवाजात ,टेचात गाऊन जायची ! या गाण्याच्या वेळेस तिने वयाची चाळीशी पार केली होती , आणि आशा भोसले त्यामानाने कोवळी होती . या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस ओ  . पी . शमशाद बेगमवर जाम खूष होता . ‘देखो , कैसे आशा से टक्कर दे राही है ! ‘ असे कौतुकाने म्हणाला होता . तिचा आवाज होताच तसा .  काही नायिका ‘हॉट ‘सिनेमुळे पडद्याला ‘आग ‘ लावतात असे म्हटले जाते . पण ‘आवरा ‘मधील शमशाद बेगमच्या आवाजातील -एक ,दोन ,तीन ,आज मोसम है रंगीन –या गाण्याने अख्खे थेटर पेटलं असेल ! (मी हे गाणे यु ट्यूब वर पहिले –भन्नाट !)

हे गाणं बबिता आणि विश्वजितवर चित्रित केलाय . स्त्री वेशातील बिश्वजीत काय थुई-थुई नाचलाय ! वा !. पुरुष वेशातील बबिता गोड दिसते ,पण काही शॉट मध्ये बिश्वजीतने तिला ‘खाऊन ‘ टाकलंय !

या गाण्यात आशा भोसले आणि शमशाद बेगम च्या आवाजा बरोबरच हार्मोनियमचा पण सुंदर  वापर करून घेतला आहे . हा छोटुकला हार्मोनियमचा पीस ,गाण्याचा ब्युटी स्पॉट होऊन गेलाय !

२०११ सालच्या ‘तन्नू वेड्स मन्नू ‘ मध्ये हे गाणं  उचललंय . एका गोष्टीचे समाधान वाटले कि हे ‘जशे त्या तशे ‘उचललंय , त्याच अभद्र रिमिक्स केलेलं नाही . त्रेचाळीस वर्षा नंतरही या गाण्यातील ‘लय आणि गोडवा ‘ कालबाह्या वाटत नाही , पूर्वी इतकाच तो टवटवीत आहे ! या ‘तन्नू वेड्स मन्नू ‘तल्या गाण्याचेहि एक वैशिष्ट्य आहे , कंगनाचा अफलातून परफार्मन्स ! काय एनर्जी लावून वेड्या सारखी नाचलीय ! झकास ! हे  गाणे  तिच्या (अभिनयाच्या )प्रेमात पडण्यासाठी, एक अजून कारण देऊन गेलाय ,किमान माझ्या साठी तरी !
मग ,पहाणारना हे गाणं ? कि फक्त ऐकणार ? दोन्हीतही करमणूक आहे येव्हड मात्र नक्की .

सिनेमा ——किस्मत (१९६८)
गीत ———एस . एच . बिहारी
संगीत ——ओ  . पी . नय्यर
गायकी —–आशा भोसले , शमशाद बेगम

— सु र कुलकर्णी 

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye . 

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..