नवीन लेखन...

अमेरिकेतील थॅंक्सगिव्हींग सेल – भाग ५

Thanksgiving Sale in America - Part 5

बर्‍याच दुकानांमधे या सेलसाठी दुकानाची नेहमीची व्यवस्था (arrangement) बदललेली असते. काही दरवाजे बंद केलेले असतात. काही isles देखील बंद केलेल्या असतात. त्यामुळे लोकांचा लोंढा एका ठरावीक दिशेने आणि ठरावीक ठिकाणी वळवता येतो आणि एकंदर गोंधळ थोडा कमी होतो. शिवाय सेलमधल्या सर्व वस्तू एक दोन दिवस आधीपासूनच मांडून ठेवलेल्या असतात. प्रत्येक दुकानामधे विविध कंपन्यांच्या सेल मधे लावलेल्या वस्तू देखील मर्यादित प्रमाणातच असतात. बरेच लोक सेलच्या एक दोन दिवस आधी वेगवेगळ्या स्टोअर्समधे फिरुन आपल्याला हव्या असलेल्या वस्तू नेमक्या कोणत्या isle मधे, कोणत्या शेल्फवर, कुठे ठेवल्या आहेत, ते प्रत्यक्ष बघून येतात. त्यामुळे या अशा अनुभवी व जाणकार लोकांकडे काय काय घ्यायचे आहे त्याची पक्की यादी असते, कोणत्या दुकानात कोणी किती वाजता जायचं याचं प्लॅनिंग असतं आणि प्रत्येक स्टोअरची अंतर्गत मांडणी आणि आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंची नेमकी ठिकाणं असलेला नकाशा असतो. वर्षानुवर्षांचा अनुभव असलेली बुजुर्ग मंडळी अशा जय्यत तयारीनिशी, पहाटेपासून एखाद्या मंदिराच्या दाराशी भाविकांनी भक्तीभावाने गर्दी करावी, तशी थंडी वार्‍याची पर्वा न करता तिष्ठत उभी असतात. मग सहा वाजता स्टोअर्सची दारं उघडली, की ‘हर हर महादेव’ असं ओरडून मावळे जसे किल्याची दारं फोडून मोगलांवर तुटून पडायचे, तसे हे खरेदी बहाद्दर सेलच्या वस्तूंवर तुटून पडतात.

मला आजूबाजूला काय होतंय ते समजायला दोन तीन मिनीटे लागली. तोपर्यंत लोकांनी shopping carts घेऊन, आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या शेल्फसपर्यंत धाव घेऊन, आपल्याला हव्या त्या वस्तूंनी आपापल्या carts भरायला सुरुवात केली होती. कुठे भांबावण्य़ाचा, अडखळण्याचा, कुणाला काही विचारण्याचा प्रश्नच नव्हता. सगळा नकाशा आणि strategy प्रत्येकाच्या डोक्यात पक्की होती. माझ्यासारखे व देशमुखांसारखे त्या स्टोअरमधे पहिल्यांदाच प्रवेश करणारे फारच थोडे असावेत. मी कशी बशी एक shopping cart मिळवली आणि electronics चा विभाग शोधत निघालो. लोकांची गर्दी आणि त्यांच्या carts नी isles भरून गेल्या होत्या. त्यातून वाट काढता काढता, दादर स्टेशनच्या ब्रीजवरून, ऐन गर्दीच्या वेळी गाडी पकडायला चालल्याचा भास होत होता. आपल्या देहयष्टीला न शोभणारी आणि भौतिकशास्त्राचे नियम खोटे पाडणारी चपळाई दाखवत, माणसं शॉपिंग करता करता पळत होती (किंवा पळता पळता शॉपिंग करत होती).

सगळी माणसं एकमेकांना शह, काटशह दिल्याप्रमाणे, एकमेकांना चकवत इकडून तिकडे पळत होती. सगळी धावपळ आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंपर्यंत इतरांच्या आधी लवकरात लवकर पोहोचण्याची होती. सुदैवाने मला एक सेल्सगर्ल लगबगीने बाजूने जाताना दिसली आणि त्या गोंधळात तिचे लक्ष वेधून घेऊन, “DVD players कुठे ठेवले आहेत”, हे विचारण्यात मी यशस्वी ठरलो. तिला लगेच ‘पावनं दुसर्‍या गावचं दिसंतय’ हे लक्षात आलं. दुकानाची दारं उघडून पूर्ण पाच मिनिटं झाली आणि तरीही माझी cart अजूनही रिकामीच आहे, हे बघून तिला बहुतेक माझी दया आली आली असावी. तिने चक्क त्या गर्दीतून वाट काढत, मला DVD players ठेवलेल्या शेल्फपर्यंत पोहोचवलं. तिचे आभार मानून मी उरलेल्या DVD players मधून मला हवा असलेला DVD player उचलला. नंतर पुढच्या दहा पंधरा मिनीटांत आणखीन हव्या असलेल्या दोन तीन वस्तू शोधल्या. देशमुखांचा पत्ता नव्हता. एवढया मोठया दुकानात आणि एवढया गर्दीत त्यांना शोधणं सोपं नव्हतं.

माझं त्या दुकानातलं शॉपिंग संपलं होतं. त्यामुळे मी check out करण्यासाठी एका काऊंटर पुढच्या रांगेत जाऊन उभा राहिलो. एवढयात मला निसर्गाच्या हाकेला ओ देण्याची वेळ आली. पहाटे तासभर थंडीत कुडकुडत उभं राहिल्यामुळे मला आता rest room ला जाण्याची आवश्यकता वाटू लागली होती. त्यामुळे check out रांगेमधला माझा नंबर सोडून मी rest room शोधायला निघालो. इकडे तिकडे शोधता शोधता आणि गर्दीतून माझी cart ढकलत मार्ग काढता काढता, पुन्हा एकदा एक सेल्समन देवदूतासारखा समोर आला. मी त्याला थांबवून, rest room ला जाण्याचा रस्ता विचारला. आजूबाजूची पाच दहा माणसं आपली धावपळ विसरून उभी राहिली आणि त्यांनी आश्चर्याने आपादमस्तक मला न्याहाळून घेतलं. ‘हा कोण अडाणी आता शॉपिंग सोडून rest room शोधत फिरतोय’, असा भाव त्यांच्या चेहर्‍यावरून उतू जात होता. एखादी पूर्ण दिवस भरलेली आणि प्रसुतीच्या वेदना सुरू झालेली बाई देखील अशा वेळी शॉपिंग सोडून हॉस्पिटलमधे जायला तयार होणार नाही, याबद्दल माझी खात्री पटली.

दोन चार मिनिटे मी त्या गोंधळात rest room शोधायची खटपट करून पाहिली. शेवटी तो नाद सोडून मी पुन्हा check out च्या रांगेमधे उभा रहायला गेलो आणि मला माझी चूक समजली. तेवढया त्या चार पाच मिनिटांत माझ्यापुढे जवळजवळ वीस पंचवीस लोकांची रांग तयार झाली होती. असे बारा check out काउंटर्स होते आणि प्रत्येका पुढे अशाच मोठमोठाल्या रांगा लागल्या होत्या. म्हणजे दुकान उघडल्यापासून मोजून पंधरा वीस मिनिटांच्या आत carts भरभरून शॉपिंग करून लोक check out करायला लागले होते. एवढा जीवाचा आटापिटा करून शॉपिंग संपवून बाहेर पडायचं कारण म्हणजे दुसर्‍या दुकानात जाऊन शॉपिंगचा पुढचा टप्पा सुरू करायचा होता.

– डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..