नवीन लेखन...

अमेरिकेतील थॅंक्सगिव्हींग सेल – भाग ३

Thanksgiving Sale in America - Part 3

आमच्यासारखंच आणखीन एक कुटुंब, गुर्जरांच्या घरी येऊन डेरे दाखल झालं होतं. माधवराव आणि नलिनीबाई देशमुख हे साधारण पन्नास पंचावन्नच्या आसपासचं जोडपं आणि नितीन व निकीता ही त्यांची मुलं. देशमुख कुटुंबदेखील आमच्यासारखंच नवशिकं! त्यांचा देखील हा थॅंक्सगिव्हींगचा पहिलाच सेल. गुर्जरांनी तीन चार वर्ष अमेरिकेत काढली असल्यामुळे ते अनुभवी झाले होते. त्यामुळे ओघानेच नेतृत्वाची जबाबदारी अनुपमाकडे आली. “प्लॅनिंग पक्कं पाहिजे” तिने अनुभवाचे बोल ऐकवले.

आम्ही सगळेजण fliers बघण्यात गर्क झालो होतो. मोठमोठया स्टोअर्सचे तर सात आठ पानी fliers होते. त्यात चपलांपासून लॅपटॉप पर्यंत आणि बार्बी डॉल पासून बेडरूम मधल्या फर्निचर पर्यंत, सार्‍या गोष्टींच्या रंगीबेरंगी आकर्षक जाहिराती होत्या. काय बघू आणि काय नको ते समजेनासं झालं होतं. शेवटी मी चक्क एका कागदावर वेगवेगळ्या स्टोअर्सची यादी केली, त्यांच्यापुढे ते ऑफर करत असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या DVD – VCR players ची मॉडेल्स, त्यांच्या किंमती, त्या प्रत्येकाचा rebate, rebate वजा करता येणारी रक्कम असं एक मोठं कोष्टक तयार केलं. एक दीड तासाची मेहनत झाली पण निदान काय घ्यायचं आहे, हे तरी नक्की झालं.

गुर्जरांच्या दिवाणखान्याला एखाद्या युद्धकालीन नियंत्रण कक्षाचे (war office) स्वरूप आले होते. वर्तमानपत्रांचा आणि fliers चा पसारा, त्यात आपल्याला हवे असलेले नेमके पान शोधण्यासाठी प्रत्येकाची चाललेली धडपड, आरडा ओरडा, कॅलक्युलेटरवर किंमती व rebates चे कॅलक्युलेशन, असा सगळा गोंधळ चालला होता. “अगं बाई, तू कॅलक्युलेशन करू नकोस. चुकीचं कॅलक्युलेशन करशील आणि आपण भलतंच मॉडेल घेऊन येऊ”. “एवढं काही येता जाता माझं मॅथेमॅटिक्स काढायला नकोय” असे खटकेबाज प्रेमळ संवाद सुरू होते.

तासा दीडतासाच्या धुमश्चक्री नंतर, आमचे DVD – VCR player चे मॉडेल ठरले. कोणत्या स्टोअर मधून, कोणते मॉडेल, किती किंमतीला, वगैरे तपशील पक्के झाले. एवढयात अनुपमाने गुगली टाकला, “तुम्ही DVD –VCR player चे एकत्रित मॉडेल बघताय मग दोघांची वेगवेगळी मॉडेल्स का बघत नाही? ” झालं! परत मारामारी सुरू ! मग मी DVD players ची मॉडेल्स आणि मृणालने VCR players ची मॉडेल्स बघायला सुरुवात केली. पण शेवटी हा खटाटोप कामी आला. कारण DVD players आणि VCR players वेगवेगळे घेतले तर त्यांची किंमत DVD-VCR players च्या मॉडेल्स पेक्षा कमी होती. प्रत्यक्ष युद्धावर जाण्यापूर्वीच आपली व्यूह रचना यशस्वी होतेय हे बघून आम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या.

देशमुख कुटुंब मात्र अजूनही भांबावलेलंच होतं. नक्की काय घ्यावं याचा त्यांचा विचार काही पक्का होत नव्हता, आणि आता तर एवढया जाहिराती आणि fliers पाहून ते आणखीनच चक्रावून गेले होते. “बघा बघा जरा त्यांच्याकडे, शिका काही तरी व्यवस्थितपणा ” नलिनीबाई माधवरावांना बोलल्या. “अगं त्यांचं काय, ते ठरवूनच आले होते DVD-VCR player घ्यायचं म्हणून, इथे येऊन त्यांना फक्त मॉडेल निवडायचं होतं. तुझं कुठे काय घ्यायचंय ते ठरतंय काय? पन्नास गोष्टीत जीव अडकलेला तुझा ”. शेवटी बर्‍याच हाणामारीनंतर देशमुख कुटुंबाची देखील यादी तयार झाली.

रात्री जेवणं झाल्यावर पुढच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली. पहिल्यांदा कोण कोण जाणार हे ठरवायला हवं होतं. श्रीयुत गुर्जरांना एवढया पहाटे थंडीत कुडकुडत खरेदीला जाण्यात इंटरेस्ट नव्हता म्हणून आणि आमचा मुलगा सिद्धार्थ लहान म्हणून, त्या दोघांनी घरीच झोपून रहायचं असं ठरवलं. मग किती गाडया न्यायच्या आणि कोण कोणाबरोबर कोणाच्या गाडीतून कुठे जाणार याचं प्लॅनिंग सुरू झालं. नशीबाने दुकानं एकमेकांपासून फार लांब लांब नव्हती. परंतु विकत घ्यायच्या वस्तू बर्‍याच होत्या आणि त्या वेगवेगळ्या दुकानांतून घ्यायच्या होत्या. त्यामुळे कोणी किती वाजतां कोणत्या दुकानाच्या रांगेत उभे रहायचं, तिथलं शॉपिंग संपलं की पुढे कुठच्या दुकानात जायचं वगैरे बारकावे भरपूर होते.

“आपण बाबांना एका दुकानाच्या रांगेत उभं करू आणि आपण पुढच्या दुकानात जाऊ” देशमुखांच्या कन्येनं सुचवून बघितलं. “तुझ्या बाबांना आणि एकटं ? झालं कल्याण! त्यांना ख्रिसमस येईपर्यंत एक देखील वस्तू मिळायची नाही. नुसते गोल गोल फिरत राहतील दुकानभर.” नलिनीबाईंनी तो प्रस्ताव तात्काळ हाणून पाडला. मग मी, माधवराव आणि त्यांचा मुलगा, आम्ही एकत्र एके ठिकाणी जावे आणि सर्व बायकांनी एका ठिकाणी जावे, असा एक विचार पुढे आला. पण तीन चार जणांनी एकाच रांगेत उभं राहण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी उभं राहणं अधिक शहाणपणाचं आहे असं अनुपमाचं मत पडलं. अर्थात तिच्या मताला अनुभवाचं वजन असल्यामुळे ते लगेच मान्यही झालं. शेवटी मी आणि माधवराव एके ठिकाणी आणि बाकी सर्वजण दुसर्‍या दोन ठिकाणी विखरून उभं राहण्याचा प्लॅन सर्वांनुमते संमत झाला.

– डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..