नवीन लेखन...

किशोर मासिकाची पन्नास वर्ष

किशोर मासिकाचा पहिला अंक पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे १४ नोव्हेंबर १९७१ रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जन्मदिनी प्रकाशित झाला. या पहिल्या अंकाच्या मुखपृष्ठावर नेहरूंचं चित्र काढलं होतं प्रसिद्ध चित्रकार मुरलीधर आचरेकर यांनी. या पहिल्या अंकातील लेखकांची नुसती नावं पाहिली तरी सुद्धा मराठीतले किती श्रेष्ठ साहित्यिक ‘किशोर’मध्ये लिहित होते, याची कल्पना येऊ शकते. आणि ही लेखकमंडळी जमवण्याचं श्रेय अर्थातच अंकाचे संपादक वसंत शिरवाडकर यांना द्यावे लागेल.

पु. ल. देशपांडे यांच्या गांधीजी आणि नेहरू यांच्यावरील लेखाने अंकाची सुरुवात होते. गोष्टींचा जो विभाग आहे त्यातली पहिली गोष्ट दुर्गा भागवत यांची आहे. ‘रानझाडांची जुनी गोष्ट’ असं त्यांच्या गोष्टीचं नाव आहे. पंढरीनाथ रेगे यांची ‘शेंडेफळ’, वसंत सबनीस यांची ‘पिसाळलेला हत्ती आणि विषारी साप’ अशा इतर गोष्टी आहेत. व्यंकटेश माडगूळकरांची बागेत येणाऱ्या शिंपी पक्षाची गोष्ट गुंतवून ठेवणारी आहे. प्रभाशंकर कवडी यांच्या चित्रकथेचं नाव आहे – बोलके खांब.

कवितांच्या विभागात कुसुमाग्रज, शंकर रामाणी, प्रकाश कामतीकर, मंगेश पाडगावकर, मनोहर शहाणे, ज्योत्सना देवधर अशी नामावली आहे. बलसागर भारत होवो, हे साने गुरुजींचं गीतही छापलं आहे.

शास्त्रज्ञांच्या नवलकथांमध्ये रमेश के. सहस्त्रबुद्धे यांनी अनेक रंजक किस्से सांगितले आहेत, त्यामध्ये टाइपरायटरचा शोध आणि पी. पी. जीवनसत्त्वासंदर्भातील माहिती विशेष उल्लेखनीय आहे. रा. वि. सोवनी यांनी रेडिओ आणि टीव्हीचे काम कसे चालते याची माहिती दिली आहे. शिवाय डोक्याला शॉट देणारी कोडीसुद्धा आहेत.

‘आजचे लोकप्रिय क्रिकेटपटू’ अशा शीर्षकाचा लेख बाळ ज. पंडित यांनी लिहिला असून त्यामध्ये सुनील गावसकर, बिशनसिंग बेदी, वेंकटरमन, एकनाथ सोलकर, अजित वाडेकर, चंद्रशेखर यांच्याबद्दल लिहिले आहे. ‘आमार सोनार बांगला’ या लेखात श्रीपाद जोशी यांनी बांगलादेशच्या मुक्तीसंग्रामाची पार्श्वभूमी सविस्तरपणे कथन केली आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामार्फत ‘किशोर’ची निर्मिती झाली, ती मूळ संकल्पना होती, तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांची. ” जगात ज्ञान -विज्ञानाचा पसारा सारखा वाढत आहे. आपल्या शाळांच्या चार भिंतीच्या आड पाठयपुस्तकातून तुम्हाला जे काही मिळते, त्यापेक्षा कितीतरी अधिक नित्य नवे ज्ञान तुम्हाला गुरुजींनी द्यावयाचे आहे. तुम्हालाही शोधावयाचे, मिळवायचे आहे. तुमच्या बुद्धीला,तरल अशा कल्पनाशक्तीला आणि जिज्ञासेला सतत काहीतरी हवे असते. काहीतरी अद्भुतरम्य पाहावे, ऐकावे याकडे तुमचे मन सारखे झेपावते. ह्या तुमच्या सर्वांगाने, सर्वांशाने फुलण्याच्या काळात तुम्हाला काही मदत करता आल्यास ती करण्याचा `किशोर`चा विचार आहे. तुमच्या मनाची स्वाभाविक गरज उत्तमरीतीने भागविणारे साहित्य तुम्हाला विपुलतेने दिले पाहिजे. रुचतील असे विषय सहज समजेल अशा भाषेत मांडता आले पाहिजेत. आकर्षक आणि उद्बोधक चित्रे, सुबक अक्षररचना आणि वाचनसुलभता ही मुलांच्या मासिकाची वैशिष्ट्ये होत. अशा प्रकारच्या नियतकालिकाची आज जरुरी आहे. या दृष्टीने पाठ्यपुस्तक मंडळाचा हा प्रयत्न आहे.” अशी भूमिका यावेळी मधुकरराव चौधरी यांनी मांडली होती.

‘किशोर’च्या वर्धापनदिनानिमित्त विद्यमान संपादक किरण इंदू केंद्रे यांनी त्यासंदर्भातील फेसबुक पोस्ट लिहून ‘किशोर’च्या पहिल्या अंकाला उजाळा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार किशोरच्या पहिल्या अंकाच्या प्रती शाळेत मोफत वाटण्यात आल्या आणि विद्यार्थी – शिक्षकांच्या प्रतिक्रिया अजमावण्यात आल्या.

`किशोर`चे नियमित प्रकाशन जानेवारी १९७२ पासून सुरू झाले. पहिल्यांदा १० हजार प्रती छापण्यात आल्या. सहा महिन्यानंतर `किशोर`ची विक्री दरमहा २५ ते ३० हजार प्रती आणि दिवाळी अंक ३५ ते ४० हजार प्रतींपर्यंत गेली. आजघडीला दरमहा सरासरी ७५ हजार प्रती वितरित होतात.

महाराष्ट्रात सरकारकडून चालवलेल्या पाच उत्तम गोष्टींची यादी करायची ठरली तर त्यात किशोर मासिकाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. सलग ४८ वर्षे अशी सुंदर गोष्ट चालवणे हेच मुळात कौतुकास्पद आहे. ‘किशोर’ने मराठी मुलांच्या अनेक पिढ्या संस्कारित केल्या. एवढ्या दीर्घ प्रवासात चढउतार असणे स्वाभाविकच आहे. कधी त्याचा तोंडावळा शहरी बनल्यासारखा वाटला. कधी केवळ प्रबोधन वाटले. परंतु अलीकडे किरण इंदू केंद्रे यांनी संपादक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर ‘किशोर’ सर्वसमावेशक बनू लागले आहे. त्याची वाचनीयता वाढू लागली आहे. प्रबोधनाची कास सोडलेली नाही, परंतु त्यातील रंजनमूल्यही त्यांनी हरवू दिलेले नाही. हा तोल सांभाळणे खूप जिकिरीचे असते. एक वर्षांनी किशोर सुवर्णमहोत्सव साजरा करेल. तूर्तास `किशोर`ला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा !!

(किशोर मासिकाच्या वेबसाइटवर हा पहिला संपूर्ण अंक उपलब्ध आहे. http://kishor.ebalbharati.in/Archive/ )

— विजय चोरमारे.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..