नवीन लेखन...

भारतीय ‘संविधानाच्या’ निर्मितीत हातभार लावणाऱ्या १५ स्त्रिया

भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी, ( एम. एन. राय यांनी  ‘प्रस्तावित’) केल्या प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ८  प्रमुख समित्या स्थापन करण्यात आल्या. त्यातील एक ‘मसुदा समिती’ ही एक होती.

त्यावेळी, भारतासाठी नवीन संविधान तयार करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी व सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिकव राजनैतिक न्याय, वैचारिक अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य देणाऱ्या आणि समानता प्राप्त करून देण्यासाठी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताची स्वतंत्र राज्य घटना’ निर्वाचित संविधान विधिमंडळाद्वारे’ तयार केली गेली. सदर राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आणली गेली.

या महान संविधानाचे जनक- पितामह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, बी. एन राव, गोपालस्वामी ऐय्यर, राजेंद्र प्रसाद, सच्छितानंद सिन्हा आणि मुखर्जी अशा अनेक दिग्गजांची ‘संविधान विधानसभा समिती’ तयार करण्यात आली. त्याच वेळी संविधान समितीच्या सदस्यांनी चर्च्या करून तिचा स्पष्ट आणि सर्वसमावेशक असा आराखडा तयार केला.

१९१७ पासून भारतातील स्त्री चळवळ अन्यायाविरुद्ध लढा देत होती. या लढाईत भाग घेणाऱ्या आणि भारतीय प्रजासत्ताकाच्या निर्मितीसाठी ज्यांनी आपला ठसा उमटविला अश्या या १५ स्त्रिया राज्य किंवा विभाग प्रतिनिधी म्हणून ‘भारतीय संविधान’ निर्मिती कार्यात सहभागी होण्यासाठी निवडण्यात आल्या. त्या सुधारक, स्वातंत्र्य सेनानी किंवा स्त्रियांच्या अधिकारासाठी चळवळ करणाऱ्या महिला होत्या. त्यांच्यापैकी कोणी कोणी दांडीयात्रेत तुरुंगवास भोगला होता, काहींनी सायमन ककमिशनच्याविरोधात निदर्शने केली होती तर काहींनी अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी, आरक्षणासाठी आणि स्वतंत्र न्यायसंस्थांसाठी आवाज उठवला होता आणि हालअपेष्टा भोगल्या होत्या.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर पुरुष प्रतिनिधी आपल्या स्मरणात आहेत परंतु या १५ महिला सदस्यांच्या महत्वपूर्ण योगदानाचा आपल्याला सहजपणे विसर पडला आहे.

भारतीय ‘संविधानाच्या’ निर्मितीत हातभार लावणाऱ्या अश्या १५ स्त्रियांची अगदी थोडक्यात ही ओळख.

अम्मु स्वामिनाथन (१८९४-१९७८)

अम्मु स्वामिनाथन यांचा जन्म केरळमधील पालघट जिल्ह्यातील उच्च जातीतील हिंदू कुटुंबात झाला. ऍनी बेझन्ट, मार्गारेट कोसीन्स, मालती पटवर्धन, मिसेस दादाभॉय आणि मिसेस अंबुजम्माल याना बरोबर घेऊन त्यांनी १९१७ साली  ‘वूमेन्स इंडिया अससोसिएशन’ ची स्थापना केली. १९४६ मध्ये राज्य विधानसभांच्या मद्रास विधानसभेच्या त्या सदस्य बनल्या. डॉक्टर बी. आर आंबेडकरांच्या संविधान मसुद्यावर २४ नोव्हेंबर १९४९ साली, अत्यंत आशावादी आणि अत्यंत विश्वासपूर्ण अशा अम्मु म्हणाल्या, ” बाह्य जगातील लोकांचा असा समाज आहे की भारतात स्त्रियांना समान अधिकार आणि हक्क नाहीत. पण आता असे स्पष्टपणे म्हणू शकतो की, भारतीय जनतेने आपले ‘संविधान’ स्वतःच बनविले आहे आणि त्यांनी स्वतःच इतर सर्व नागरिकांप्रमाणेच सामान अधिकार दिले आहेत’.

त्या १९५२ साली लोकसभेवर तर १९५४ साली राज्यसभेवर निवडून आल्या. १९५९ साली, चित्रपटाच्या महा शौकीन अम्मु ‘फेडेरेशन ऑफ फिल्म सोसायटी’ च्या उपाध्यक्ष्या बनल्या तर सत्यजित रे अध्यक्ष. भारत स्काउट्स अँड गाईड्स’ (१९६०-६५) आणि सेन्सर सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषविले. १९७५ साली, “आंतर राष्ट्रीय महिला वर्षा निमित्त त्यांना, ‘MOTHER OF THE YEAR’ म्हणून गौरविण्यात आले.

दक्षयानी वेलायुधन. (४ जुलै१९१२ ते २०जुलै १९७८)

 दक्षयानी वेलायुधन यांचा जन्म ४ जुलै १९१२ रोजी कोचीनमधील बोलगट्टी बेटावर झाला. त्या काळात, पूलया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, गंभीर अश्या, भेदभावात अडकलेल्या, पददलित,    म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजाचे त्यांनी नेतृत्व केले. ‘पुलया’ समुदायातील, शिक्षण घेणाऱ्या पहिल्या पिढीच्या शिक्षित लोकांध्ये तसेच ‘वरचा कापड’ परिधान करणाऱ्या दलित स्त्रियांमध्ये त्यांची गणना होईल.

१९४५ मध्ये कोचीन विधान परिषदेत सरकारद्वारे त्यांचे नामांकन करण्यात आले. १९४६ मध्ये निवडून आलेली ही पहिली आणि एकमेव महिला होती. विधानभवन मधील, अनुसूचित जमाती समाज संबंधावरील अनेक विषयांवरील चर्च्या आणि वादविवादांमध्ये त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूने ठामपणे उभ्या राहिल्या.

बेगम अजाज रसूल (४ एप्रिल १९०८- १ ऑगस्ट २००१)

१९३७ ते १९४० पर्यंत त्यांनी उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. आणि १९५० ते १९५२ पर्यंत परिषदेच्या विरोधी पक्षाच्यानेत्या म्हणून काम केले. या पदावर पोहोचणारी भारतातील आणि जगातील पहिली मुस्लिम महिला होती. भारताच्या संविधान सभेमध्ये एकमात्र मुस्लिम महिला होती जिने भारताच्या संविधानाचा मसुदा बनवण्यात भाग घेतला.

मालेरकोटला राजा घराण्यातीळ कुटुंबात जन्मलेल्या या स्त्रीने, नवाब अजाज रसूल या तरुण नबाबाशी विवाह केला. विधान भवनाच्या त्या एकमेव मुस्लिम महिला सदस्य होत्या. भारत सरकारच्या १९३५ च्या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर बेगम आणि त्यांचे पती मुस्लिम लीगमध्ये सामील झाले आणि त्यांनी निवडणुकांच्या राजकारणात प्रवेश केला. १९३७ च्या निवडणुकीत त्या उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून आल्या.

१९५० मध्ये भारतातील मुस्लिम लीग भंग पावली आणि बेगम अजाज रसूल या काँग्रेसमध्ये सामील झाल्या. १९५२ मध्ये उत्तर प्रदेश राज्यसभेवर त्यांची निवड झाली १९६९ ते १९९० पर्यंत त्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्य होत्या. १९६९ आणि १९७१ दरम्यान त्या  सामाजिक कल्याण आणि अल्पसंख्यांक मंत्री होत्या. २००० साली त्यांना सामाजिक कार्यातील त्यांच्या योगदानासाठी पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले

त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जमीनदारीची असूनही, जमीनदारी निर्मूलनाची सशक्त समर्थक म्हणून त्यांना ओळखले जात असे. धर्मावर आधारित स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीला त्यांनी जोरदारपणे विरोध केला.

दुर्गाबाई देशमुख (१५ जुलै १९०९ ते ९ मे १९८१)

दुर्गाबाई देशमुख यांचा जन्म १५ जुलै १९०९ रोजी राजमुंदरी येथे झाला. केवळ वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी आंध्र केसरी टी. प्रकाशम यांच्याबरोबरअसहकाराच्या चळवळीत उडी घेतली. १९३० साली मद्रास शहरातील मिठाच्या सत्याग्रहाच्या चळवळीत त्यांनी हिरहिरीने   भाग घेतला. १९३६ मध्ये त्यांनी आंध्र महिला सभेची स्थापन केली, जी पुढे केवळ एका दशकात मद्रास शहरातील शिक्षण व सामाजिक कल्याणकरी अशीअग्रगण्य संस्था बनली.

महाराष्ट्राला त्यांची सोपी ओळख म्हणजे प्रसिद्ध अर्थ तज्ज्ञ आणि भारताचे केंद्रीय  मंत्रिमंडळ सदस्य श्री  सी. डी. देशमुख यांच्या त्या पत्नी होत.

केंद्रीय सामाजिक कल्याण मंडळ, महिला शिक्षण राष्ट्रीय परिषद, मुलींसाठी राष्ट्रीय समिती आणि महिला शिक्षण संस्था यासारख्या अनेक केंद्रीय संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्याच बरोबर त्या संसद सदस्य आणि नियोजन आयोगाच्या सदस्य होत्या.

दुर्गाबाई मद्रास प्रांतातील संविधान विधानसभेसाठी निवडून आल्या. हिंदीला राष्ट्रीय भाषा म्हणून न्याय देण्यासाठी, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य राखण्यासाठी आणि मानव तस्करीविरोधात

सं-वैधानिक हमी देण्याच्या विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण विषयांवर ‘संविधान मसुदा’ तयार होत असताना हस्तक्षेप करून महत्वाचे आणि मोलाचे योगदान केले

त्या आंध्र एज्युकेशनल सोसायटी, नवी दिल्लीशी देखील संलग्न होत्या. भारतात साक्षरतेच्या प्रचारासाठी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल त्यांना १९७१ मध्ये चौथ्या नेहरू साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले. १९७५ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्या आला.

हंसा जीवराज मेहता, (३ जुलै १८९७ ते ४ एप्रिल १९९५)

बडोद्याचे दिवाण, मनुभाई नंदशंकर मेहता यांच्या कन्या, हंसा यांनी इंग्लंडमध्ये पत्रकारिता आणि समाजशास्त्राचा अभ्यास केला. समाजसुधारक आणि सामाजिक कार्यकर्त्या असतानाच त्या उत्तम शिक्षिका व लेखिकाही होत्या.

गुजराती भाषेत मुलांसाठी त्यांनी अनेक पुस्तके भाषांतरित केली. त्यात गलिव्हर ट्रॅव्हल्स, शेक्सपिअरचे हॅम्लेट, व मर्चंट ऑफ व्हेनिस तसेच वाल्मिकी रामायण यांचा समावेश आहे. गांधीजींच्या संपर्कात आल्या नंतर, परदेशी कपडे, वस्तू, दारू विकणाऱ्या दुकानांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी समिती नेमली व स्वतःसुद्धा हे काम चोखपणे पार पडले. १९२६ साली त्यांची ‘मुंबई स्कूल कमिटी’ साठी निवड झाली आणि १९४५-४६ मध्ये अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.

हैदराबादमध्ये झालेल्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्ष या नात्याने त्यांनी आपल्या भाषणात महिलांच्या अधिकारांची ‘सनद’ जाहीर केली. त्यात स्त्रियांना समान नागरिकत्व, समान शिक्षण व स्वास्थ्य, समान वाटणी, संपत्तीतील समान वाटा, वैवाहिक जीवनात समान अधिकार इत्यादी सर्व गोष्टींचा समावेश केला होता.

१९४५ ते १९६० पर्यंत भारतात एसएनडीटी  महिला विद्यापीठाच्या कुलगुरू,, ऑल इंडिया सेकंडरी बोर्ड ऑफ एजुकेशनच्या सदस्या, इंटर-युनिव्हर्सिटी बोर्ड ऑफ इंडियाच्या अध्यक्षा आणि बड़ौदा महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कुलगुरू अश्या वेगवेगळ्या पदांवर त्यांनी अत्यंत जाबदारीने काम केले आहे. ‘युनेस्कोच्या’ त्या सदस्यही होत्या.

कमला चौधरी (२० फेब्रुवारी १९०८ -????)

कमला चौधरी यांचा जन्म लखनौच्या श्रीमंत कुटुंबात झाला. प्रसिद्ध जिल्हाधिकारी राय मनोहर दयाळ ह्यांच्या त्या कन्या होत. तरीसुद्धा शिक्षण पुढे चालू ठेवण्यासाठी त्या काळी त्यांना प्रखर संघर्ष करावा लागला.

घरातील साम्राज्यशाही विषयीच्या एकनिष्ठांपासून दूर जाऊन त्या राष्ट्रीय समितीमध्ये सामील झाल्या. १९३० मध्ये महात्मा गांधी यांनी सुरु केलेल्या ‘सिव्हिक डीस-ओबिडियन्स’ (Civic Disobedience) चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ५४ व्य सत्राच्या त्या उपाध्यक्ष होत्या आणि सत्तरीच्या  दशकाच्या उत्तरार्धात त्या लोकसभा सदस्य म्हणून निवडून आल्या. खादी आणि ग्रामोद्योग यांच्या विस्तारासाठी त्यांनी सदैव प्रयत्न केले. त्या प्रसिद्ध ‘फ़िकशन रायटर’, (‘कल्पित कथा’) लेखिका होत्या.

त्यांचे, उन्माद, पिकनिक, यात्रा, बेलपत्र सारखे अनेक कथा संग्रह प्रसिद्ध आहेत. ह्या कथांमधून शेतकऱ्यांची पिळवणूक, विधवांची वाईट परिस्थिती अश्या सामाजिक प्रश्नांना त्यांनी त्या काळात सुद्धा रोखठोक वाचा फोडली. ‘

लीला रॉय (२ ऑक्टोबर १९००- ११ जून १९७०)

लीला रॉय यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०० साली आसामध्ये गोलपारा येथे झाला. त्यांचे वडील उप न्यायाधीश होते आणि राष्ट्रवादी चळवळीबद्दल त्यांना कमालीची  सहानुभूती होती. १९२१ मध्ये बेथून कॉलेजमधून त्या पदवीधर झाल्या आणि’ ‘ अखिल भारतीय बंगाल महिला मताधिकार’ समितीच्या’  सचिव बनल्या आणि महिलांच्या अधिकारांची मागणी करण्यासाठी त्यांनी अनेक बैठका आयोजित केल्या.

१९२३ मध्ये अनेक मित्र-मैत्रीणीच्या साहाय्याने त्यांनी  बंडखोर अशा ‘दीपाली संघाची’  आणि  अनेक कार्यशाळांची स्थापना केली कि ज्या राजकीय चर्चाचे केंद्र बनल्या. ज्या मध्ये अनेक नावाजलेल्या नेत्यांनी भाग घेतला. त्याच्यानंतर, १९२६मध्ये, ढाका आणि कलकत्ता येथील महिला विद्यार्थ्यांच्या  ‘ छातरी’  संघाची’ स्थापना केली. ढाका महिला सत्याग्रह संघाची’ स्थापना करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. या सर्वानी ‘ मिठावर लादलेल्या कराविरुद्ध’  उभारलेल्या चळवळीत त्यांनीसक्रिय भाग घेतला. रवींद्रनाथ टागोरांचे आशीर्वाद लाभलेल्या  ‘जयश्री’ नावाच्या एका नियतकालिकाच्या त्या संपादिका बनल्या. ढाका विद्यापीठात विद्यार्थिनींना प्रवेश नव्हता, तरीही कुलगुरूंकडे विशेष मागणी करून त्यांनी तेथून ‘एम. ए. ‘ पदवी मिळवली.

१९३७ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि बंगाल महिला प्रांतीय काँग्रेसची स्थापना केली.   सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या ‘ महिला उपसमितीच्या’ त्या सदस्य बनल्या. सुभाषचंद्र बोस जेंव्हा १९४० मध्ये तुरुंगात गेले तेव्हा त्यांना ‘फॉरवर्डब्लॉक वीकली’ च्या संपादिका म्हणून नामांकित करण्यात आले.

भारत सोडण्यापूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस, लीला रॉय आणि त्यांचे पती यांना पक्षाचा पूर्ण ताबा दिला. महात्मा गांधींच्या आदेशानुसार त्यांनी१९४७ मध्ये भारत – पाकिस्तान फाळणीच्या वेळी झालेल्या हिंसक दंगलीत पीडा ग्रस्तांना मदत करण्यासाठी स्वतंत्र केंद्र उभारले आणि नौखालीत अडकलेल्या ४०० महिलांची सुटका केली.

१९६० मध्ये फॉरवर्ड-ब्लॉक व ‘प्रजा सोशालिस्ट पार्टी’ यांच्या विलीनीकरण नंतर ‘फॉरवर्ड-ब्लॉक (सुभाषिस्ट)’ या नवीन पक्षाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. . परंतु कार्य करण्याची पद्धत न रुचल्यामुळे त्यांनी अध्यक्षपद सोडले.   अशा होत्या या ‘ संसदीय विधानसभा मंडळाच्या’ सदस्या ‘लीला रॉय’.

मालतीदेवी चौधरी (२६ जुलै १९०४- १५ मार्च १९९८)

मालती चौधरी यांचा जन्म १९०४ मध्ये ‘पूर्व बंगाल’ (आता बांगलादेश) मधील एक प्रतिष्ठित कुटुंबात झाला. बॅरिस्टर कुमुद नाथ सेन हे त्यांचे वडील. १९२१ साली वयाच्या केवळ १६ व्व्या वर्षी मालती चौधरी यांना गुरुदेव रवींद्र नाथ टागोर ह्यांच्या शांतिनिकेतनात पाठवण्यात आले, जिथे त्यांना विश्व-भारतीमध्ये प्रवेश मिळाला. तिथेच त्यांच्यासाठी नवी राजकीय क्षितिजे खुली झाली आणि त्यांना आंतरराष्ट्रीय नाव लौकिक आणि कीर्ती मिळालेल्या विद्वानांना भेटण्याची संधी मिळाली.   त्यांनी ओरिसात स्थलांतर केले. उसाची लागवड करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांना त्यांनी मदत केली. तसेच त्या परिसरातील गावांमधून त्यांनी प्रौढ शिक्षणाचे वर्ग चालू केले. ओरिसात बाजीराव छात्रावासाची स्थापना केली कि जिथे स्वातंत्र्य सेनानींच्या मुलांची, वर्गीकृत जाती- जमाती आणि इतर मागासलेल्या वर्गातील मुलांच्या शिक्षणाची सोय होईल. महात्मा गांधींच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर झाल्यामुळे, त्यांनी, त्यांच्या पतीसमवेत मिठाच्या सत्याग्रहात उडी घेतली. अनेक वेळा तुरुंगात गेल्यानंतर, आपल्या सहकैद्याना शिक्षण देण्यास सुरवात केली.

१९३३ साली त्यांनी ‘उत्कल काँग्रेस समाजवादी संघाची’ स्थापना केली. त्या मार्क्सवादी विचारांच्या पुढारी होत्या. १९३४, मध्ये त्या ओडीसातील प्रसिद्ध “पदयात्रेमध्ये” गांधीजींच्याबरोबर सामील झाल्या. गरीब शेतकऱ्यांना सावकार आणि जमीनदार यांच्यापासून वाचविण्यासाठी त्यांनी ‘क्रिसक’ आंदोलन केले. १९४६ पासून त्या ‘संविधान विधान मंडळ’ समितीच्या सदस्या होत्या. अस्पृश्यता, सरंजामशाही, अंधश्रद्धा आणि निरक्षरता यांच्या विरुद्ध त्यांनी केलेली, संघर्ष यात्रा ओरिसातील समाज बदलण्यास कारणीभूत ठरली. तरीसुद्धा इंदिरा गांधींनी आणलेल्या ‘आणीबाणीला’ त्यांनी विरोध केल्यामुळे शेवटी त्यांना तुरूंगात टाकण्यात आले.

पूर्णिमा बनर्जी (१९११ – १९५१)

पूर्णिमा बॅनर्जी ह्या स्वातंत्र्य सेनानी व १९४६ ते १९५० या काळात, संविधान विधान मंडळ समितीच्या सदस्या होत्या. त्या  सुप्रसिद्ध स्वातंत्र्य सेनानी, अरुणा असफ अली यांच्या कनिष्ठ भगिनी. अलाहाबाद मधील भारतीय काँग्रेस कमिटीच्या त्या सदस्या होत्या.

१९३० आणि ४० च्या दशकाच्या उत्तरार्धांत त्या  स्वातंत्र्य चळवळीत आघाडीवर होत्या. या काळात स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणाऱ्या महिलांचे एक चांगलेच जाळे विणले गेले होते. त्यांच्यापैकी त्या एक होत्या. शहर समितीच्या सचिव म्हणून कामगार संघटना, किसान बैठक आयोजित करण्याची मुख्य जबाबचारी त्यांच्यावर होती.

त्यांच्या भाषणांमधील अनेक पैलूंमधली महत्वाचा पैलू म्हणजे  समाजवादी विचारधारेबद्दल  त्यांची  दृढ वचनबद्धता! उण्यापुऱ्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी केलेली कामगिरी निश्चितच वंदनीय आहे.

राजकुमारी अमृत कौर (२ फेब्रुवारी १८८९ – ६ फेब्रुवारी १९६४)

राजकुमारी अमृत कौर यांचा जन्म २ फेब्रुवारी १८८९ रोजी राजघराण्यात झाला. शालेय शिक्षण इंग्लंडमध्ये झाले होते, तर महाविद्यालयीन शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात. इंग्लंडमध्ये. शिक्षण पूर्ण केल्यानंतर परत आल्यानंतर महात्मा गांधींचा वैचारिक प्रभाव त्यांच्यावर पडला. जालियनवाला-बाग हत्याकांडामुळे भारताला स्वातंत्र्याची गरज आहे याची त्यांना खात्री पटली आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी भाग घ्यायला सुरवात केली.

‘ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायंसिस’ आणि ‘इंडियन रेड क्रॉसच्या’ त्या अध्यक्ष्या होत्या. ऑल इंडिया ‘वूमनस कॉन्फरेन्सच्या त्या प्रथम सचिव व नंतर अध्यक्ष झाल्या. ‘दांडी मार्च’ सत्याग्रहात त्यांनी तुरुंगवास पत्करला. पुढील १६ वर्षे, अमीर उमरावांच्या घराणातल्या असून सुद्धा त्यांनी गांधीजींच्या आश्रमात खडतर आयुष्य घालविले.

रेणुका रे (१९०४-१९९७)

‘रेणुका रे’, या आयसीएस ऑफिसर सतीश चंद्र मुखरजी यांच्या कन्या होत. त्या समाजसेविका आणि अखिल भारतीय महिला-परिषदेच्या सदस्य होत्या. रेणुकानी लंडनमधील  लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ मधून ‘बी. ए. ची पदवी संपादन केली.

१९३४ मध्ये ‘ अखिल भारतीय महिला काउंसिलच्या’ सचिव बनल्या. ‘भारतीय स्त्रियांच्या कायदेशीर अपंगत्वाची’ कागदपत्रे त्यांनी सभेत सादर केली. भारतीय स्त्रियांची स्थिती जगात सर्वाधिक अन्यायकारक आहे असे सांगताना त्यांनी एक समान वैयक्तिक कायद्याची’ मागणी केली.

१९४३ ते १९४६ त्या विधानसभा, संविधान सभा आणि अस्थायी (तात्पुरत्या) संसदेच्या सदस्य होत्या. त्यांनी १९५२- ५७ पश्चिम बंगाल विधानसभेत पुनर्वसनमंत्री म्हणून काम केले. त्या ‘मालदा’ लोकसभेच्या सदस्य होत्या.

सरोजिनी नायडू (१३ फेब्रुवारी १८३९- २ मार्च १९४९)

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्या, प्रभावी वक्त्या, व कवयित्री. हैदराबाद येथील सुसंस्कृत, साधनव सुशिक्षित कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांना ‘नाईटेन्गएल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्र जाते.

त्यांचा महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, गोपाल कृष्ण गोखले अशा दिग्गज नेत्यांशी एनेकविध कारणांनी परिचय झाला. त्यांच्या आचार-विचारांकडे आकर्षित होऊन त्यांनी ‘होमरूल लीग साठी हिंदुस्थानभर दौरा काढला. आपल्या भाषणातून त्यांनी तरुणांचे कल्याण, श्रमप्रतिष्ठा, स्त्री स्वातंत्र्य व राष्ट्रवाद यांचा पुरस्कारकेला. हदराबाद येथील प्लेगच्या साथीत, अतिशय परिश्रम घेऊन जनतेला सर्वतोपरी मदत केली. विविध चळवळीत काँग्रेसच्या ध्येयधोरणानुसार प्रसार आणि प्रचार केला.

गांधीजींच्या मृत्यूनंतर त्यांनी मुंबईत वास्तव्य करण्याचे ठरवले. मुंबई महापालिकेत सभासद म्हणून निवडून आल्या व प्रांतीय काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या.

सुचेता कृपलानी (१९०८- १९७४)

सुचेता कृपलानी माहेरच्या सुचेता मुझुमदार.   त्यांचा जन्म २५ जून१९०८ मध्ये अंबाला येथे झाला. सुचेता कृपलानी ह्या स्वतंत्र भारतातील पहिल्या स्त्री मुख्यमंत्री होत.

१९४२ च्या ‘भारत छोडो’  आंदोलनातील त्यांची भूमिका विशेष करून लक्ष्यात ठेवली जाते. संसदेमध्ये ‘वंदेमातरम’,   गाण्याचा पहिला मान त्यांना मिळाला होता. त्या स्वातंत्र्य सेनानी आणि राजकारणी म्हणून प्रसिद्ध पावल्या.

महात्मा गांधींच्या बरोबर अहिंसेच्या वाटेवर त्यांनी वाटचाल केली. इतरां प्रमाणेच तुरुंगवासच नुसता भोगला नाही तर सहकारी तुरुंगात असताना त्यांनी कॉन्रेसच्या महिला विभागाच्या साहाय्याने पोलिसांपासून लपत लपत २ वर्षे आंदोलनाला मदत केली. . मुलींना संरक्षणासाठी, लाठी व हत्यार चालविण्याचे शिक्षण त्यांनी दिले.

विजयालक्ष्मी पंडित (१९ ऑगस्ट – १ डिसेंबर १९९०)

विजयालक्ष्मी पंडित या मोतीलाल नेहरू यांच्या कन्या तर जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी होत्या. राजकारणात असताना त्यांची भेट अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या रणजीत पंडित यांच्याशी झाली व प्रेमविवाहानंतर त्या स्वरूप नेहरूंच्या विजयालक्ष्मी पंडित झाल्या.

भारतीय संविधान सभांच्या १५ महिलांमध्ये त्यांचा समावेश आहे.

विजयालक्ष्मी पंडित या संसदपटू आणि उत्तम वक्त्या म्हणून प्रसिद्ध होत्या. तब्बल २१ विद्यापीठांनी त्यांना ‘डॉक्टरेट’ ही पदवी देऊन गौरविले. महाराष्ट्राच्या राज्यपाल

म्हणून त्यांनी १९६२- ६४ पर्यंत काम केले. त्या १९५३ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या महिला ‘अध्यक्ष’ बनल्या. . पुढे फुलपुर मतदार संघातून खासदार म्हणून त्या निवडून आल्या.

१९३९ मध्ये, सर्व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांप्रमाणेच, विजया लक्ष्मी पंडित यांनी सुद्धा, भारताने ‘द्वितीय-विश्व युद्धात’सहभागी होण्याच्या ब्रिटिश सरकारच्या घोषणेचा निषेध केला. सप्टेंबर १९५३ मध्ये युनाइटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या अध्यक्षपदी निवडून आलेली पहिली भारतीय आणि पहिली आशियाई महिला म्हणून नियुक्त होण्याचा मान त्यांना मिळाला.

ऍनी मेस्केरेन (१९०२-१९६३)

‘ऍनी मेस्केरेन’,  यांचा जन्म केरळमधील तिरुवनंतपुरम मधील लॅटिन कॅथोलिक कुटुंबात झाला. ‘त्रावणकोर राज्य’ काँग्रेसमध्ये सामील होणारी ती पहिली महिला होती आणि त्रावणकोर राज्य काँग्रेस कार्यकारणी समितीची ती पहिली महिला सदस्य. भारतीय स्वातंत्र्यासाठी व एकीकरणासाठी लढणाऱ्या त्रावणकोर राज्यातील नेत्यांपैकी त्या एक उत्साही नेत्या होत्या.   स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे ‘१९३९ -४७’ या कालावधीत राजकीय कार्यात प्रत्यक्ष सहभागी झाल्यामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. ऍनी मॅस्केरेन आणि तिच्या सहयोगींच्या मालमत्तेवर आणि जीवनावर ब्रिटिशांनी सतत हल्ले केले. मस्करेन १९५१ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्या लोकसभेसाठी निवडून आल्या होत्या. केरळमधील त्या पहिल्या महिला खासदार होत्या आणि निवडून आलेल्या  १० लोकसभा खासदारांपैकी त्या एक होत्या. १९४९-५० दरम्यान आरोग्य आणि ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी काम केले होते.

त्यांच्या राजकीय जीवनातील आणखी एक महत्वाचे वळण देणारी गोष्ट म्हणजे आपल्या राज्याच्या  इतिहासातील आणि इतर अनेक संस्थानिक राज्यांत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी विजय सिंह पाथिक आणि शेख मोहम्मद अब्दुल्ला यांच्यासारख्या इतर नेत्यांसह आपल्या राज्याला भारतात सामील होण्याच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावली.

इतर कामाबरोबरच विशेष करून, संविधानाचे कलम ३०६ (बी), ज्यात सर्व राज्यांना केंद्रीय सरकारच्या धोरणानुसार आचरण करण्याचा आग्रह त्यांनी धरला.

‘संविधान सभेत’ सामील झाल्यानंतर, त्यांनी सभागृहापुढे सर्व सदस्य आणि वक्त्यांना, अभिवादन केले, आणि त्या म्हणाल्या,   “या सभागृहातील ज्या थोड्या काही महिला आहेत त्यांच्या  वतीने, मी अशी आशा व्यक्त करते कि आपले मत व्यक्त करण्यासाठी आम्हाला पुरेसे संरक्षण आणि संधी दिल्या जातील”. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे संविधान भवनात त्यांनी आपली छाप पाडली. अशा होत्या ‘ऍनी मेस्केरेन’.

अशा या १५ कर्तबगार स्त्रिया, ज्यांनी त्या काळात अत्यंत प्रगतीशील, मानवतावादी आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात हातभार लावला.

भारताच्या कानाकोपऱ्यातून, प्रांतांमधून, विविध स्तरांमधून जाती-धर्माची बंधने झुगारून स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी स्त्री शक्तीचे दर्शन घडविले.

“जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले” या तुकारामाच्या उक्तीनुसार त्यांची कृती होती. स्त्रीशक्तीचा संघर्षमय जीवनाचे प्रतिबिंब ‘भारतीय संविधानात’ उमटलेले दिसते.

आणि म्हणूनच सर्व भारतीयांचा आकांक्षाचा तो हुंकार आहे.

— सौ. वासंती अनिल गोखले 

लोकमान्य सेवासंघ, विले पार्ले पूर्व, ज्येष्ठ नागरिकांची ‘दिलासा’ शाखेतर्फे सादरीकरण

  • कार्यक्रम संकल्पना आणि सादरीकरण- डॉ. रश्मी फडणवीस
  • संहिता आणि सादरीकरण- वासंती गोखले
  • सादरीकरण सहभाग- मीरा पेंडसे, जोसना कोरगावकर आणि प्रियंवदा पाताडे
Vasanti Anil Gokhale
vasantigokhale@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..