नवीन लेखन...

ब्लॅकमेलिंग!

कामगार-मालक, मालक-नोकर, उत्पादक-ठााहक हे संघर्ष टोकाची भूमिका घेऊन कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. कारण वरकरणी संघर्ष दोन बाजूंमध्ये दिसत असला तरी वस्तुत: त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. दोघांचेही हित परस्परांशी निगडित असते. त्यामुळे एकाचा पराभव दुसऱ्याचा विजय ठरू शकत नाही. उलट असे पाहण्यात आले आहे की जिथे असे संघर्ष नसतात किंवा त्यांचे स्वरूप अतिशय किरकोळ असते त्या उद्योगाची, पर्यायाने त्या उद्योगाशी निगडित सगळ्यांचीच भरभराट होत असते.

जपानमध्ये एकदा बुट तयार करणाऱ्या कारखान्याच्या कामगारांचा व्यवस्थापनाशी संघर्ष निर्माण झाला. कामगारांच्या काही मागण्या होत्या, व्यवस्थापनाला त्या मान्य नव्हत्या. त्यावेळी कामगारांनी निषेधाचा मार्ग म्हणून त्या कारखान्यात केवळ एकाच पायाचे बुट तयार केले. कामगारांच्या या अभिनव आंदोलनामुळे व्यवस्थापनाला अखेर त्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी लागली. त्या कामगारांनी आपले काम बंद केले नाही, ज्या उद्योगाच्या जोरावर आपले पोट चालत आहे तो बंद पडू दिला नाही, कामाचे तास वाया जाऊ दिले नाही, तेवढाच वेळ आणि तितकेच काम केले. आपण काम बंद ठेवले तर शेवटी त्याचा सर्वाधिक वाईट परिणाम आपल्यालाच भोगावा लागेल याची त्या कामगारांना जाणीव होती. कारखाना बंद पडला असता तर तो मालक उपाशी मरणार नव्हता, उपासमार कामगारांचीच झाली असती. या सगळ्या गोष्टींची जाणीव बाळगत त्या कामगारांनी अभिनव पद्धतीने आपली मागणी लावून धरली. आपल्याकडे अशीच परिस्थिती निर्माण झाली तर ‘युनियन’च्या जोरावर आपला नेतेगिरीचा धंदा करणारे कामगार नेते सरळ संप पुकारतात, उत्पादन ठप्प पाडतात, वेळप्रसंगी हिंसाचाराचा मार्ग अवलंबिल्या जातो, कारखान्याची जाळपोळ केली जाते आणि या युनियनचा किंवा कामगार नेत्यांचा धाक इतका प्रचंड असतो की बऱ्याच कामगारांना इच

्छा नसतानाही त्यांच्या मागे फरफटत जावे लागते. कारखाना बंद राहिला तर उत्पादन ठप्प होईल आणि उत्पादनच नसेल तर स्वत:च्या खिशातून कामगारांचे पगार भरण्यासाठी मालकाने धर्मादाय संस्था उघडलेली नाही, हे ध्यानात घ्यायला कुणी तयारच नसते. शेवटी केवळ मालकाच्या पैशावर एखादा उद्योग उभा होत नाही तर त्या उद्योगात काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराचा घाम, त्याचे कष्ट त्या उद्योगाच्या उभारणीत तेवढेच मोलाचे असतात. त्या उद्योगातून मालकाला लाभ होत असला तरी त्यासोबतच या कामगारांचेही पोट भरत असते. अशावेळी सगळ्यांनी हा उद्योग, हा कारखाना आपला आहे हे समजून त्याच्या वाढीसाठी प्रयत्न करायचे असतात. काही तणावाचे, संघर्षाचे प्रसंग निर्माण झाले तरी सामोपचाराने त्यातून मार्ग काढणे गरजेचे असते. प्रत्येक घरात असे संघर्षाचे प्रसंग येत असतात, पण म्हणून कुणी त्या घराच्या भिंती पाडत नसते; परंतु अत्यंत क्षुल्लक कारणावरून टोकाची भूमिका घेणाऱ्या काही कामगारांना आणि त्यांच्या नेत्यांना या साध्या समजुतीच्या गोष्टी कळत नाहीत. कळत नाहीत म्हणण्यापेक्षा नेतेगिरीचा धंदा चालावा म्हणून त्या समजून घेण्याची त्यांची तयारीच नसते. त्यांच्या नेतेगिरीची हौस फिटते, परंतु जीव मात्र कामगारांचा जातो. मुंबईत एकेकाळी संपसम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दत्ता सामंतांनी तरी शेवटी काय साध्य केले? कामगार युनियनच्या जोरावर दत्ता सामंतांनी उभ्या केलेल्या दहशतीमुळे अनेक उद्योजकांनी आपल्या उद्योगालाच टाळे लावले. नुकसान कुणाचे झाले? गिरण्यांच्या मालकांनी आपल्या गिरण्या बंद करून जमिनी कोट्यवधीचा नफा कमावित बिल्डर्स लोकांना विकल्या आणि त्या गिरण्यांच्या आधारे पोट भरणाऱ्या कामगारांची कुटुंबे देशोधडीला लागली. दत्ता सामंतांनी अख्खे गिरणगाव ओसाड करून टाकले. आज गिरणगावात त्या गिरण्यांच्या जागी टोलेजंग इमारती, मॉल्स कुठेतरी झोपडपट्टीत हलाखीचे जीणे जगणाऱ्या कामगारांना वाकुल्या दाखवित उभ्या आहेत. लढवय्या कामगारनेता म्हणून ओळखले जाणारे जॉर्ज फर्नांडिसदेखील रेल्वेचा चक्का जाम करण्यासाठी (कु)प्रसिद्ध होते. आज तेही थकलेत आणि त्यांची आंदोलनेही थकलीत, कदाचित त्यामुळेच आज रेल्वे ‘रूळावर’ धावत आहे. कधी नव्हे ते आता रेल्वे चक्क नफ्यात आहे. जॉर्ज फर्नांडिसचा वारसा चालविणारा एखादा नेता उदयास आला असता तर ही रेल्वे कधीच नफ्यात येऊ शकली नसती. सांगायचे तात्पर्य हेच की कोणताही संघर्ष, विशेषत: कामगार-मालक, मालक-नोकर, उत्पादक-ठााहक हे संघर्ष टोकाची भूमिका घेऊन कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. कारण वरकरणी संघर्ष दोन बाजूंमध्ये दिसत असला तरी वस्तुत: त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. दोघांचेही हित परस्परांशी निगडित असते. त्यामुळे एकाचा पराभव दुसऱ्याचा विजय ठरू शकत नाही. उलट असे पाहण्यात आले आहे की जिथे असे संघर्ष नसतात किंवा त्यांचे स्वरूप अतिशय किरकोळ असते त्या उद्योगाची, पर्यायाने त्या उद्योगाशी निगडित सगळ्यांचीच भरभराट होत असते. अर्थात कोणत्याही उद्योगात, व्यवसायात संघर्ष नसावेतच ही अपेक्षाही थोडी अवास्तव आहे. खऱ्या अर्थाने समाजवाद हा केवळ पुस्तकी आदर्श आहे. समाजवाद सत्यात उतरू शकत नाही. मालक-नोकर, व्यवस्थापन-कामगार असे संघर्ष निर्माण होतच राहणार; फत्त* अपेक्षा ही आहे की या संघर्षाने गंभीर स्वरूप धारण करू नये. झाडाला लागलेल्या आंब्याच्या वाटणीवरून संघर्ष व्हावा; परंतु त्याचे पर्यवसान ते झाडच मुळासकट उपटून टाकण्यात होऊ नये. तसे झाले तर शेवटी सगळ्यांच्याच हाती शून्य राहील. दुर्दैवाने काही लोक ही बाब समजून घेण्यास तयारच नसतात. आपल्या मागण्या संबंधितांसमोर मांडण्याच्या, त्या मंजूर करून घेण्याच्या दोन पद्धती असतात. त्यापैकी पहिल्या पद्धतीचे उदाहरण सुरुवातीलाच म्हणजेच मालकाचे किंवा उद्योगाचे नुकसान न करता मालकाला खुश करून किंवा आपल्या कामातील कौशल्य दाखवून आपल्या कामाचा मोबदला वाढवून मिळू शकतो. आपल्याकडे मात्र दंडेलशाही पद्धत वापरली जाते. झुंडशाही करीत मालकाच्या छाताडावर बसून हाती कायद्याचा चाकू घेऊन मागण्या मान्य करून घेण्याची ही दुसरी पद्धत आपल्याकडे प्रचलित आहे. याच पद्धतीने गिरणगाव ओसाड झाले, याच पद्धतीने लाखो

कामगारांना आज देशोधडीला लावले; परंतु तरीही अनुभवाने शहाणे होण्यास आम्ही तयार नाही.

खरेतर उद्योग, व्यवसाय, नोकरी अशा कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी आपली पात्रताच इतकी मोठी करून ठेवायला हवी की त्यांनी आपल्या मागण्या समोर करताच मालक किंवा वरिष्ठांना ताबडतोब त्या मान्य करणे भाग पडावे; परंतु अशी पात्रता असणाऱ्यांची संख्या खूप कमी असते आणि ज्यांची पात्रता नसते तेच आणि काही खालच्या कर्मचाऱ्याची दिशाभूल करून व त्यांनाही आपल्या सोबत ओढून मग दंडेलशाहीने आपल्या मागण्या मान्य करून घेत असतात. ही पद्धत योग्य नाही. त्यातून केवळ नुकसान आणि नुकसानच संभवते. मालकाला धडा शिकविण्याच्या नादात आपल्याच घरावर निखारा ठेवल्या जातो. त्यांच्या नेत्यांचे काही जात नाही. एक उद्योग बंद पाडला की ते दुसरा बंद पाडण्याच्या कामगिरीवर निघतात. एखादा उद्योग, व्यवसाय, कारखाना सुरळीत चालू ठेवण्यासाठी खंडणी वसूल करणाऱ्या कामगार नेत्यांची आपल्याकडे कमतरता नाही. या खंडणीबहाद्दर कामगार नेत्यांनीच उद्योजकांचे आणि त्यांच्यासोबतच काहीही दोष नसलेल्या गरीब कामगारांचे जीणे दुष्कर केले आहे. दुर्दैवाने आपल्याकडचे कायदेही अशा लोकांच्या दादागिरीला खतपाणी घालण्याचे काम करतात. तिकडे चीनमध्ये पहा, सगळ्या उद्योगांवर, व्यवसायांवर, कारखान्यांवर केवळ कामगारांचीच मालकी हे
तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कम्युनिस्ट चीनने या तत्त्वज्ञानामुळे आपला देश खड्ड्यात जाऊ पाहत आहे हे लक्षात येताच ‘यू टर्न’ घेत कायदेच बदलून टाकले. तिथला कामगार आता दिवसाचे बारा तास काम करतो आणि एका विशिष्ट मुदतीत त्याने त्या कामात कौशल्य प्राप्त केले नाही तर सरळ त्याची हकालपट्टी केली जाते. आंदोलने, संप यासारखी थेरं तिथे चालत नाही आणि म्हणूनच आज चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेला टक्कर देऊ पाहत आहे. खुली अर्थव्यवस्था स्वीकारलेली असूनही आपल्याकडचे कायद मात्र चालत्या गाडीची खीळ काढणाऱ्यांचेच संरक्षण करतात. कायद्यातील या त्रुटीचा गैरफायदा घेत व्यवस्थापनाला अडचणीत आणण्यासाठी संपाचे हत्यार सर्रास वापरले जाऊ लागले तेव्हा सर्वोच्च न्यायालयानेच कुठलाही संप किंवा बंद बेकायदेशीर असल्याचे ठणकावून सांगितले. अर्थात त्यानंतरही संपाच्या माध्यमातून वेठीस धरण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. मुळात काही अपवाद वगळता सगळ्याच क्षेत्रातील कामगार संघटनांचे संप, आंदोलन हे प्रकार पात्रता नसलेल्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्यासाठी केलेले ‘ब्लॅकमेलिंग’ असते. योग्य, लायक माणसांची उणीव ही कायमस्वरूपी समस्या असल्याने प्रत्येक क्षेत्रात या ‘ब्लॅकमेलिंग’ला व्यवस्थापन किंवा मालकांना बळी पडावे लागते. या ‘ब्लॅकमेलिंग’मुळेच भारतातील औद्योगिक विकास मंदावला आहे. खंडणीबहाद्दर अकर्तृत्ववान कामगार नेते आणि भ्रष्टाचारी सरकारी अधिकारी या राहू-केतूंना निष्प्रभ करण्याची ताकद जोपर्यंत इथल्या व्यवस्थेत निर्माण होत नाही तोपर्यंत तरी जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहण्याचा अधिकार भारताला नाही!

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..