नवीन लेखन...

सरताज अझीझची धमकी आणि भारताची अणुबॉम्ब क्षेपणास्त्र क्षमता

भारत हा सुपरपॉवर असल्यासारखा वागत असून अण्वस्त्रधारी पाकिस्तानला स्वतःचे रक्षण कसे करायचे हे चांगले माहित आहे असे विधान पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरण व सुरक्षा विषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी आताच केले. पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांना भारतातील गुप्तचर यंत्रणा रॉचा पाठिंबा असल्याचे पुरावेही आमच्याकडे आहेत.भारत – पाकिस्तानमधील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चा रद्द झाल्यानंतर हे विधान केले गेले. नरेंद्र मोदी भारताला उपखंडातील महासत्ता समजत असून पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश आहे हे त्यांनी विसरु नये असा इशारा त्यांनी भारताला दिला. याचा भारताकरता अर्थ काय होतो.?

आज भारत-चीन किंवा भारत पाकिस्तान युद्ध तीन पातळीवर होऊ शकते. पहिली पातळी म्हणजे दहशतवाद्यांशी घुसखोरी करून. सध्या चीन पाकिस्तानच्या मदतीने काश्मीरमध्ये गडबड करत आहे. मध्य भारतामध्ये पसरलेल्या माओवाद्यांना आर्थिक आणि शस्त्रस्त्रांची मदत करत आहे. हे युद्ध जिंकण्याकरिता वेगळ्या प्रकारची शस्त्रे आणि लष्करी डावपेचाची गरज आहे ते आपण लवकरात लवकर जिंकायला पाहिजे.

दुसरी पातळी पारंपारिक युद्ध
भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९४७, १९६५, १९७१ आणि १९९९ साली युद्ध झाले व चीनशी १९६२ साली युद्ध झाले. अशा प्रकारचे युद्ध आता पुन्हा २०२० ते २०२५ मध्ये सीमावादामुळे चीनशी युद्ध होऊ शकते. सध्या आपली शस्त्रे जुनाट आहेत, दारुगोळा कमी आहे, सीमेवर रस्ते आणि रेल्वे लाईनची कमतरता आहे. सरकारने यावर अनेक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. पारंपरिक युद्धामध्ये आपली त्रुटी पुढच्या १० ते १५ वर्षांमध्ये पूर्णपणे भरुन निघू शकते. देशाने पारंपारिक युद्धाची तयारी लवकरात लवकर पुर्ण करायला हवी.

तिसरी पातळी क्षेपणास्त्र अणु युद्ध
क्षेपणास्त्र अणु युद्ध केव्हा होईल याचा अंदाज बांधणे सोपे नाही. १९४५ नंतर अणुबॉम्बचा वापर जगात कोठेही झाला नाही. तरीही पाकिस्तान आणि चीनकडून वेळोवेळी मिळणार्‍या धमक्यांमुळे आपल्याला अणुयुद्धाकरिता आणि क्षेपणास्त्र युद्धाकरिता तयारी करणे महत्त्वाचे आहे. अणुबॉम्ब टाकण्याकरिता दोन गोष्टींची गरज असते. एक म्हणजे अणुबॉम्ब आणि दुसरे म्हणजे त्याला घेऊन जाणारे वाहन (कॅरिअर). आकाशातून अणुबॉम्ब टाकण्याकरिता आपल्या हवाईदलात सुखोई आणि मिराज अशी विमाने सध्या आहेत. सध्यापुरती तरी ती पुरेशी आहेत.
मात्र पाणबुडीतून अणूबॉम्ब टाकण्याकरिता जी क्षमता लागते ती आपल्याकडे नाही. ही क्षमता येण्याकरिता अजून १०-१५ वर्षे लागू शकतात. जमिनीवरुन क्षेपणास्त्र फायर करण्याकरिता आपल्याकडे पृथ्वी आणि अग्नी हे दोन क्षेपणास्त्र आहेत. पृथ्वी क्षेपणास्त्राचा पल्ला १०० ते ७५० किलामीटर आहे. सध्या हे भारतीय सैन्यामध्ये कार्यरत आहे.

पाकिस्तान चीन अणुबॉम्ब क्षेपणास्त्र परिस्थिती
आज पाकिस्तानमध्ये १०० ते १२० अणुबॉम्ब असावेत. याशिवाय त्यांच्याकडे शाहीन आणि घौरी हे चीन आणि नॉर्थ कोरियाच्या मदतीने तयार केलेली क्षेपणास्त्रे आहेत. शाहीन२ चा पल्ला हा २५०० किलोमीटरच्या आसपास आहे आणि घौरी २ चा पल्ला हा १८०० किलोमीटरच्या आसपास आहे. यामुळे मध्यभारतापर्यंतची लक्ष्य ही पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र पल्ल्यामध्ये आहेत. सध्या पाकिस्तान नासिर नावाचे ६० किलोमीटर पल्ल्याचे एक क्षेपणास्त्र तयार करत आहे. याचा वापर पारंपरिक युद्धात करता येईल.
चीनकडे असलेल्या अणुबॉम्बची संख्या ही २५० च्या आसपास असावी. चीनकडे विमानातून फायर करणारी क्षेपणास्त्रे, जमिनीवरुन फायर करणारी क्षेपणास्त्रे आणि समुद्रातून किंवा पाणबुडीतून फायर करणारी क्षेपणास्त्रेही आहेत. अणुबॉम्बच्या लढाईमध्ये याला ट्रायेड असे म्हटले जाते. शक्तीशाली देशांकडे जमिनीवरुन, पाण्यामधून आणि आकाशातून फायर करण्याची क्षमता असते. ही क्षमता चीनकडे आहे.

भारताची अणुबॉम्ब क्षेपणास्त्र क्षमता
भारताकडे ९० ते ११० अणुबॉम्ब असावेत, जे सध्याच्या गरजेला पुरेसे आहेत. अणुबॉम्ब जमिनीवरुन फायर करण्याकरिता वाहने पृथ्वी १,२,(३५० कि मी), अग्नी १ आणि अग्नी २ (२००० किमी), अग्नी ३(३०००कि मी) शस्त्र म्हणून भारतीय सैन्यात या सामील झालेले आहेत. अग्नी ४ (४००० किमी) ची मागच्या वर्षी टेस्ट करण्यात आली होती. ते भारतीय सैन्यात येण्याकरिता २-३ वर्षे लागू शकतात. जमिनीवरुन फायर करण्याकरिता अग्नी ५ च्या रुपाने (५००० किलोमीटर) शस्त्र म्हणून सैन्यात येण्याकरिता अजून सुद्धा ५-७ वर्षे लागू शकतात.

थोडक्यात आज आपल्याकडे जी क्षेपणास्त्रे आहेत त्याच्या मदतीने आपण पाकिस्तानशी युद्ध करण्याकरिता पूर्णपणे सक्षम आहोत. मात्र चीनशी अणुबॉम्ब युद्ध करण्याकरिता अजून आपल्याकडे पुरेशी क्षेपणास्त्रे नाहीत.(Inter Continental Ballistic Missile{ICBM}) अग्नी ५ च्या परिक्षेमुळे ही गरज आता पुर्ण होण्याची शक्यता आहे. अग्नी ४ आणि अग्नी ५ यांचे उरलेले जे संशोधन आपल्या शास्त्रज्ञांनी लवकरात लवकर पूर्ण करावे आणि ही क्षेपणास्त्रे शस्त्र म्हणून भारतीय सैन्याला लवकरात लवकर मिळावीत. कमीत कमी अणूबॉम्ब आणि क्षेपणास्त्रे (Minimum Deterrence) तयार करावी. ९०-१०० अणूबॉम्ब आणि २५-३० अग्नी क्षेपणास्त्रांची आपल्याला गरज असू शकते.

शांतता हवी पण लढाईकरता सदैव तयार रहाणे जरुरी
जगात कुठेही युद्ध होऊ नये, सर्वत्र शांतता, सलोख्याचे वातावरण असावे हा विचार आदर्शवादी असला तरी प्रत्यक्ष व्यवहारात तसे घडत नसते. जगात सध्या विविध ठिकाणी २१ हून अधिक युद्धे सुरू असून त्यामागे धार्मिक, आर्थिक, राजकीय अशी अनेक कारणे आहेत. संरक्षणदृष्ट्या अत्यंत प्रबळ असलेल्या राष्ट्रावर दुसरी राष्ट्रे सहसा आक्रमण करण्यास धजावत नाहीत. दुर्बल राष्ट्राला स्वत:चा आवाज नसतो.

चीन आणि पाकिस्तानशी युद्ध करण्याकरिता आपल्या देशाला आपले सगळ्या प्रकारचे लष्करी सामर्थ्य वाढवणे जरुरी आहे. पण गेली १० वर्षे सैन्याचे आधुनिकीकरण पूर्णपणे थांबले होते. आपण लष्करी तयारीत चीनच्या मागे आहोत.

ताकद वापरण्याची मानसिकता राष्ट्रीय नेतृत्वाकडे असणे जरुरी
अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्र असणे ही एक बाब झाली, पण त्यांचा वापर करण्याची मानसिकता असणे ही एक अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी आपल्या राष्ट्रीय स्तरावर असलेल्या नेतृत्वाला हे क्षेपणास्त्र कुठे केव्हा आणि कधी वापरायची या युद्ध शास्त्राचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कारण पाकिस्तान आणि चीन क्षेपणास्त्रांचा वापर करू अशा धमक्या देउन आपली अनेक वेळा दमदाटी करत असतात. म्हणून अशाप्रकारच्या तीनही युद्धाची माहिती ही आपल्या नेतृत्वाला असणे गरजेचे आहे. सगळ्या प्रकारची क्षेपणास्त्रे आणि अणुबॉम्ब कधी आणि केव्हा वापरायचे याकरिता सुद्धा मानसिक तयारी करुन ठेवणे हे गरजेचे आहे. भारतीय सैन्य अशा लढाईकरिता नेहमीच तयार असतेच. पण आपले राजकीय नेतृत्व अशा प्रकारची लढाई झाली तर तयार असेल का?

आपल्याला शांतता हवी आहे. पण आर्य चाणाक्याने म्हट्ल्या प्रमाणे आपण लढाईकरता सदैव तयार रहाणे जरुरी आहे. पहिले, दुसरे महायुद्ध असो वा शीतयुद्ध किंवा शीतयुद्धानंतरच्या कालखंडामध्ये एक गोष्ट सिद्ध झाली आहे. ती म्हणजे जे राष्ट्र विज्ञान-तंत्रज्ञानाच्या संशोधनात अग्रेसर आहे, ज्या राष्ट्राची अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत आहे तसेच शस्त्रास्त्रे व संरक्षण सामर्थ्याच्या दृष्टीने जे राष्ट्र प्रबळ आहे, त्या देशाकडे साहजिकच जगाचे पुढारपण येते.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..