नवीन लेखन...

मानवधर्म जगू बघणार्‍या अल्पसंख्य माणसाची कहाणी….



अल्पसंख्य – विजय पाडळकर. ‘अल्पसंख्य’चा शब्दश: अर्थ, संख्येने खूप कमी असलेला. मात्र प्रचलित अर्थ इतका साधा नाही हे आपल्या सर्वांना चांगलंच ठाऊक आहे. त्याला राजकीय, सामाजिक असे अनेक ग्रह-पूर्वग्रह चिकटलेले आहेत. म्हणूनच ह्या नावाची कादंबरी जेव्हा आपल्यासमोर येते तेव्हा मनात कळत-नकळत एक पार्श्वभूमी तयार होते. एखाद्या विशिष्ट धर्माविषयीचं, जमातीविषयीचं कथन ह्यात असणार हे आपण मनोमन जाणलेलं असतं. कथानक जसजसं पुढे सरकत जातं तसतसा ‘अल्पसंख्य’ ह्या शब्दाविषयीचा आपला अंदाज थोडासा चुकतोच. ती कहाणी फक्त ठराविक धर्माची रहात नाही. ती बनून जाते तुमच्या-माझ्या-आपल्यासारख्या सामान्य माणसांची. अशी माणसं, जी कुठल्याही धर्मात-पंथात अडकून रहात नाहीत. त्यांचा धर्म फक्त एकच, मानव-धर्म! 347 पृष्ठांची ही कादंबरी वाचून संपते तेव्हा जाणवतं की अशी माणसं खरोखरच ‘अल्पसंख्य’ असतात.

एक मानवधर्मीय माणूस. सूज्ञ, सुजाण, विचारी, समजूतदार! जर त्याने ‘आपण जसे आहोत तसेच सरळमार्गी वागायचे’ असं ठरवलं, तर प्राप्त परिस्थितीला शरण न जाता तो तसा वागू शकतो का? विविध जाती-धर्म, विविध विचार-प्रणित संघटना, नेतेशाही अशा अनेक बाबतीत अतिसंवेदनशील असलेल्या ह्या देशात प्रवाहपतित न होणं, धर्मनिरपेक्षतेनं जगणं एखाद्याला जमू शकतं का? प्रत्येक वेळी फक्त आपल्या सद्सद्विवेक बुध्दीला प्रमाण मानून, मनाचा कौल घेत, प्रसंगी इतरांच्या मदतीने तो पुढे जाऊ शकतो का? दुसऱ्याला समजून घेत, स्वार्थ-परमार्थ साधत जगण्याचं त्यानं ठरवलं असेल तर तो समाधानाने असा वागू-जगू शकतो का? आपल्या मनात हे आणि असे अनेक प्रश्न निर्माण व्हायला कारणीभूत ठरते, विजय पाडळकर यांची ‘अल्पसंख्य’ ही नव्यानेच प्रकाशित झालेली राजहंस प्रकाशनची कादंबरी!

ही कादंबरी वाचताना मनात जे अनेक प्रश्न निर्माण होतात, ते केवळ इलाही महमूद सुभेदारांचे

न राहता आपलेही बनून जातात. आपणही ह्या समाजव्यवस्थेचाच एक

हिस्सा आहोत, कारण सर्वात प्रथम आपण माणूस आहोत. त्यामुळे त्यांची उत्तरं सर्वस्वी हो किंवा सर्वस्वी नाही अशी ठामपणे देता येत नाहीत. प्रत्येकाने आपण नेमके कोण आहोत, कुठे आहोत, आपलं ध्येय काय आहे, ते पूर्ण करण्यासारखी परिस्थिती वा वातावरण आपल्या आजूबाजूला खरोखरीच आहे का? त्यात बदल घडवून आणणं आपल्याला शक्य आहे का? जर तसं नसेल तर मग प्राप्त परिस्थितीत आपण जास्तीत जास्त चांगलं काय करू शकतो? प्रत्येकाने असा विचार करणं ही काळाची गरज आहे हे आपोआप मनावर ठसतं. कवी मनाच्या, संवेदनशील अन् प्रसंगी कर्तव्य-कठोर बुध्दीने वागणाऱ्या इलाही महमूद सुभेदारची ही कहाणी. केवळ तो जन्मला ती जमात मुस्लीम म्हणून तो मुस्लीम. पण मनाने मात्र पूर्णपणे भारतीय आणि त्यातही महाराष्ट्राशी, मराठी मातीशी एकरूप झालेला शेतकी विषयातील हा पदवीधर. तरूण वयात आपल्या मामांच्या ओळखीने एका राष्ट्रीयीकृत बँकेतील रिकाम्या असलेल्या जागेवर तात्पुरता कारकून म्हणून नोकरीला सुरूवात करतो. हळूहळू तिथल्या कामकाजाची माहिती करून घेत लेखी परीक्षा देतो, नोकरीत कायम होतो. अंगभूत हुशारीवर वेगवेगळ्या हुद्यांवर त्याची बढती होते, अर्थातच निरनिराळ्या शहरांतील शाखांमध्ये बदली होत रहाते. शिवाय विचारांची बैठक मानवल्याने एका ठराविक विचार-प्रणित, भारतातील सर्वात मोठ्या कर्मचारी संघटनेच्या, जबाबदारीच्या पदावर तो एकीकडे काम करत असतो.

बायको, दोन मुलं, म्हातारे आई-वडिल असा हा कुटुंबवत्सल गृहस्थ. परंतु नोकरीमुळे नाईलाजाने मायेच्या माणसांपासून बाजूला पडलेला. तब्बेत तंदुरूस्त असली तरी वयाची पन्नाशी ओलांडलेली. शरीराच्या बारीक-सारीक कुरबुरी जाणवू लागल्याने कधीतरी वयाचा विचार करणारा.

2001 सालातील मार्चच्या पहिल्या तारखेला तो नांदेडच्या शाखेत ‘अकाऊंटंट’ ह्या नवीन पदावर रुजू होतो. हाताखाली कितीही माणसं काम करत असली तरी शाखाधिकार्‍याच्या अनुपस्थितीत शाखेच्या व्यवहारांची सारी जबाबदारी ह्याच पदाधिकार्‍यावर असते. त्या अर्थाने तोच शाखेचा सर्वेसर्वा. इतक्या वर्षांच्या नोकरीनंतर हे पद म्हणजे काटेरी सिंहासनच असतं याची पूर्णपणे जाणीव असलेला, जबाबदारीचे भान ठेवून काम करणारा हा कादंबरीनायक.

वरवर पाहात अतिशय साधी असणारी ही घटना, कोणत्याही नोकरदार व्यक्तीच्या बाबतीत घडू शकणारी. पण त्यातील प्रत्येक तपशील कसा अन् किती महत्त्वाचा आहे हे आपण जसजसे वाचत रहातो तसतसे आपल्याला जाणवत जाते. ह्या कादंबरीत ह्या सालाचं, ह्या महिन्याचं आणि कादंबरी-नायकाच्या वयाचं महत्त्व नेमकं काय आहे ह्याचा उलगडा होतो.

एकूण तीन खंड आणि उपसंहार अशी ही कादंबरी. पहिल्या खंडाच्या सुरुवातीलाच इलाही महमूद सुभेदारची पार्श्वभूमी सांगितली आहे. त्यानिमित्ताने ह्या विश्वाच्या पसार्‍यात नगण्य भासणारं तरीही महत्त्वपूर्ण ठरणारं माणसाचं अस्तित्व, त्याला एकट्याला फक्त ‘स्व’ च्या बळावर जगू न देता, आजूबाजूच्या परिस्थितीशी, माणसांशी, एकंदरीत सर्वांशीच जोडून घेत जगायला कसं भाग पडतं हे अधोरेखित करतं. कुठलाही क्षण सुटा नसतो, त्याला मागचे-पुढचे अनेक संदर्भ असतात. सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या सार्‍या घटना वाचत असताना आपल्यालाही ते सतत जाणवत रहातं.

सुभेदार मार्चच्या पहिल्या तारखेला नवीन शाखेत आल्यामुळे जणू ‘नवा गडी, नवं राज्य’ सुरू होतं. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील कामांची गर्दी सुभेदारांना लगेचच जाणवू लागते. ती वेळेवर पूर्ण होण्यासाठी अत्यावश्यक असणारं टीमवर्क, त्याच वेळी शाखाधिकार्‍याने रजा घेणं, त्यांची स्वत:ची एका कर्मचारी-संघटनेशी बांधिलकी असल्याने त्याच शाखेतील दुसऱ्या कर्मचारी-संघटनेशी बांधील असणयार्‍या कर्मचारी-वर्गात होणारी हलचल, बँकेच्या रोजच्या कामकाजात घडणारे अनेक घटना-प्रसंग ह्यातून कथानक पुढे सरकत असतं. बँकेतील काऊंटरच्या ‘अलिकडे’ असलेल्या आपल्याला काऊंटरच्या ‘पलिकडे’ चालणार्‍या कामकाजाची सविस्तर माहिती होत रहाते. तिथे काम करणयार्‍या माणसांची कौटुंबिक पार्श्वभूमी, मानसिकता, कामातील गुंतवणूक

अशा अनेक गोष्टी समजतात. तिथल्या कर्मचारी-अधिकारीवर्गांच्या संघटना, त्यांचं कामकाज माहिती होऊ लागतं. तसेच त्यांचे आपापसातील नातेसंबंध, त्यांच्यातील ताण-तणाव,

मैत्री, प्रसंगानुरूप कसकसे बदलत राहतात हेही जाणवू लागतं. आपल्याही नकळत आपण बँकेतील एक नोकरदार बनून जातो. सुभेदारांना ह्या नवीन गावात वेगवेगळ्या वयोगटातील, वेगवेगळ्या विचारांची माणसं भेटतात. इतक्या वर्षांच्या अनुभवांनंतर आपल्याला कुटुंबाशिवाय एकट्यानेच रहायचंय तर त्या सर्वांना समजून घेत, त्यांच्यात स्वत:ला सामावून घेण्याला काही पर्यायच नसतो हे ते जाणून असतात. यथावकाश समविचारी, समछंदी असे मित्र भेटतात. त्यांच्यातील आपल्याला पसंत असलेला स्वभाव-विशेष मान्य करून, बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा समंजसपणा त्यांच्यात असतो. तरीपण आपलं इथलं वास्तव्य फारसं सुखावह होणार की नाही ही शंका त्यांना ह्या शाखेत आल्याच्या सुरूवातीपासूनच सतावू लागलेली असते. मात्र अठ्ठावीस वर्षांच्या नोकर
ीत वेगवेगळ्या अधिकारी-पदांवर, आठ निरनिराळ्या शहरांतील शाखांमध्ये काम केल्यानंतर येणारी विचारांची परिपक्वता त्यांना ह्या शंकेपासून परावृत्त करत असते. चांगलं अन् वाईट असं सर्वकाही आपल्या वाट्याला येणार हे ते जाणून असतात. कामकाजात स्वत:ला गुंतवून घेऊन ते ह्या विचारांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत असतात. शिवाय पन्नाशीच्या वयातील शारीरिक बदलही जाणवू लागलेले असतात. म्हणजे दम लागणं, थकवा वाटणं, भावनाविवश होणं, रागाने चट्कन उत्तेजित होणं. बायकांना ज्याप्रमाणे मेनोपॉज आणि त्याचे तन-मनावर होणारे भले-बुरे परिणाम मान्य करायचे असतात त्याचप्रमाणे पुरूषांनादेखील अँड्रोपॉज असतोच की!

अचानक एके दिवशी ज्या गोष्टीविषयी इतक्या वर्षांत आजवर कधीच विचार केलेला नसतो ती गोष्ट, म्हणजेच त्यांची जात आणि धर्म, अनपेक्षितपणे महत्त्वाची ठरते. तिकडे अमेरिकेतील ट्विन-टॉवरवर विमान-हल्ले होतात आणि इकडे सुभेदारांच्या जगण्याचे सारे संदर्भच बदलून जातात. ‘मानवधर्म हीच फक्त माझी जात आहे’ हे मनाला समजावत ते स्वत: जरी वागत – वावरत असले तरी, इतरांच्या बदललेल्या नजरा त्यांना अस्वस्थ करत राहतात. त्यांची ‘ना घर का ना घाट का’ अशी विचित्र मनोवस्था होते. इतकी वर्षं ज्या कर्मचारी संघटनेशी एकरूप होऊन गेलो तिथल्या सहकार्‍यांच्या वागणुकीतील बदल त्यांना असह्य होत रहातो. त्याच भरात ते त्या कर्मचारी संघटनेचा राजीनामा देतात. बदललेल्या समीकरणांमुळे त्यांच्या मनाचा गोंधळ उडालेला असतो. दुसर्‍या संघटनेची माणसं त्यांच्या ह्या द्विधा मन:स्थितीचा फायदा घेऊ पाहतात आणि त्यांना आपल्याकडे खेचू लागतात. अशा परिस्थितीत आता ते नेमकं काय करणार ह्याविषयी आपल्याला उत्सुकता वाटत रहाते. ते दिलेला राजीनामा परत घेऊन आपल्या मूळ संघटनेकडे परततात का? की विरोधी संघटनेचं बोलावणं मान्य करतात? की कुठल्याच संघटनेशी बांधून घेण्याचं नाकारतात ?

जेमतेम आठ-दहा महिन्यांच्या कालावधीतील हा घटनापट. तपशीलवार वर्णनं, सुयोग्य संस्कृत श्लोक, उर्दू शायरी, मराठी काव्य ह्यांचा प्रसंगोचित वापर ही ह्या कादंबरीची वैशिष्ठ्यं. प्रत्येक खंडाची सुरुवातच अशा सूचक काव्याने केली आहे. त्यामुळे त्या-त्या खंडात घडणाऱ्या घटनांचं सार नेमकेपणाने व्यक्त झालं आहे. ‘जे आहे, जसं आहे’ तसंच्या तसं मांडलेलं आहे. एका संवेदनशील मनाची घालमेल यथोचित शब्दांच्या वापराने छान वर्णन केलेली आहे. विशेषकरून काही ठराविक प्रसंग. जसं की, धुळवडीच्या दिवशी घरी परततानाचा प्रसंग, कलेक्टरबरोबरच्या मिटींगमध्ये झालेली शाब्दिक लढाई, दंगलीमुळे तीन दिवसांसाठी गावाला अचानक निघून जाण्याने नोकरीतील तांत्तिक अडचणींवरून उठलेलं वादळ, गावाहून परत आल्यानंतर घडणाऱ्या व अस्वस्थचित्त करणाऱ्या घटना आणि त्यामुळे कर्मचारी-संघटनेचा राजीनामा देणं, हे सारे प्रसंग परिणामकारक शब्दांत वर्णन केले आहेत. ते वाचताना आपणही त्यात गंतून जातो. नकळत आपणच सुभेदारांच्या भूमिकेत शिरतो, त्यांच्या विचारांचा प्रामाणिकपणा आपल्याला मनापासून पटतो.

विजय पाडळकरांची ‘आस्वादक समीक्षक’ अशी एक अतिशय चांगली ओळख आपल्या मनात रुजलेली आहे. ‘मृगजळाची तळी’, ‘वाटेवरले सोबती’, ‘सिनेमाचे दिवस पुन्हा’, ‘चंद्रावेगळं चांदणं’ अशा पुस्तकांतून सामान्य वाचकाला समजण्यास कठीण वाटणार्‍या अनेक साहित्यकृती त्यांनी सोप्या करून सांगितल्या आहेत, त्यांचा आस्वाद घ्यायला शिकवलं आहे. इतरांच्या साहित्यकृती, चित्रपट समजावून देण्याची, कठीण गोष्ट सोप्पी करून सांगण्याची त्यांची सवय स्वत:ची पहिलीच मोठी कलाकृती निर्माण करतानाही तशीच कायम असल्याचं सतत जाणवत असतं. ती इतक्या साऱ्या बारकाव्यांनिशी लिहिण्याची खरोखरीच गरज आहे का असा प्रश्न मनात येतो. Between the lines वाचण्याचं वाचकाचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं गेलं आहे असं वाटू लागतं. उदा. पृष्ठ क्र. 235 वरील मन चिंती ते वैरी न चिंती, पृष्ठ क्र. 251 वरील नींद की गोली. वाचकांच्या चाणाक्षपणावर विसंबून ह्या आणि अशा काही गोष्टी सोडून देता आल्या असत्या तर बरं झालं असतं असं वाटल्यावाचून रहावलं नाही. शिवाय इतरही काही गोष्टींतले तपशील वगळले असते तरी कथानकाच्या प्रभावीपणात फारसा फरक पडला नसता. संतोकसिंगच्या धाब्याचं वर्णन, पेपरवाला ठरवताना त्याच्याशी होणारं संभाषण, मित्रांबरोबर धुळवड साजरी करतानाचं वर्णन, कंधारकरांशी माक्र्सवाद, अमेरिकन सरकारची मानसिकता, इ. विषयांवर झालेली चर्चा, ट्वीन-टॉवरवरील हल्ल्यांनंतर वेगवेगळ्या वृत्तपत्रांतून लिहिलेली संपादकीयं, इ. हे सारं टाळून कादंबरी अजून सुबक झाली असती असं वाटलं.

छपाईच्या चुकाही नजरेस येतात, वाचनात नकळत व्यत्यय आणतात. सेप्टेंबर (पृष्ठ क्र. 204), पाकीट आपल्या बँकेत ठेवले (पृष्ठ क्र. 213), रात्री दहा वाजेपासून… (पृष्ठ क्र. 255) बँकेसारख्या आपल्या खूप ओळखीच्या ठिकाणाची, त्यातील अंतर्गत घडामोडींविषयी सखोल माहिती देत एका वेगळ्या जगात घेऊन जाणारी ही कादंबरी. आपल्या स्वत:विषयी, आपण जगतो आहोत त्या आपल्या आजूबाजूच्या जगाविषयी भान आणण्यास विचार-प्रवृत्त करणारी, आपले प्रश्न बाजूला न सारता त्याकडे डोळसपणे बघायला लावणारी!

चित्रा राजेन्द्र जोशी. 33, स्वाती, तारांगण, पोखरण रोड क्र.1, ठाणे (प.) 400606.दूरध्वनी क्र. घर – 022 25336994 / भ्रमणध्वनी – 9987021009

chitra_goody@yahoo.com

chitrarjoshi@gmail.com

लोकसत्ता – लोकरंग पुरवणी – पुस्तकांचे पान – ०१.०२.२००९ रोजी प्रथम प्रकाशित पुस्तक परिचय

— चित्रा राजेंद्र जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..