नवीन लेखन...

आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीला जलसमाधी

आपल्या देशात काय चालले आहे? काश्मीरमधील पूंछ या सीमावर्ती भागात पाकिस्तानी लष्कराचा गोळीबार चालु आहे. भारताने शस्त्रसंधी तोडल्याचा आव आणून त्याचा निषेध करणारा ठराव पाकिस्तानी संसदेमध्ये संमत झाला. १६ ऑगस्टला तब्बल १० वर्षांनंतर पाकिस्तानी सैन्याकडून कारगिल व द्रास भागामध्ये शस्त्रसंधीचा भंग केला. १७ ऑगस्टला दाऊद इब्राहिम या कुख्यात गुंडाचा प्रमुख हस्तक आणि लष्कर-ए-तोयबासाठी काम करणारा म्होरक्या सय्यद अब्दुल करीम ऊर्फ टुण्डा याला भारत-नेपाळ सीमेवर अटक करण्यात आली. या घटना थेट देशाच्या संरक्षणव्यवस्थेशी संबंधित होत्या.

अरुणाचल प्रदेशात २० किलोमीटर घुसखोरी केलेल्या चिनी सैनिकांना भारतीय जवानांनी पिटाळल्याची बाब एका “व्हिडिओ’ द्वारे उघड झाली आहे. घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण इंग्रजी वृत्तवाहिनी टाइम्स नाऊने २२ ऑगस्टला प्रसारित केले. अरुणाचल प्रदेशच्या चागलागाम भागात १३ ऑगस्टला घुसखोरी करून दोन दिवस मुक्काम केलेल्या चिनी सैनिकांची भारतीय जवानांनी मानगूट धरली. हे जवान सैन्याच्या आसाम रायफ़ल युनिटचे होते. सैन्याच्या मेजर हुद्याच्या अधिकार्यानी जे धैर्य दाखवले, ते आपले राजकिय नेते चिन बाबत का दाखवु शकत नाही? त्यांनी चिनी तुकडीतील सैनिकांना पकडले. मग चिनी सैनिकांनी “सॉरी’ म्हणत माघार घेतली.

गेली १० वर्षे ही भारतीय संरक्षण दलांसाठी वाया गेलेले दशक मानले जाते. नौदलासाठी, या काळामध्ये सर्व नवीन प्रस्ताव तयार होते. मात्र त्यावर निर्णय झाले नाहीत. आताही ‘आयएनएस सिंधुरक्षक’ मध्ये झालेल्या स्फोटांनंतर तिने सागरतळ गाठला तेव्हा तिच्यासह एकूण १४ पाणबुडय़ाच भारताकडे होत्या. ती संख्या १३ वर आली. गरज किमान २० पाणबुडींची आहे. आणि खात्रीपूर्ण आवश्यकतेसाठी त्यांची संख्या ३० असणे आवश्यक आहे.

पाणबुडींची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव ८४ सालापासून असून आजही आपण त्यांची नियुक्त संख्या गेल्या २९ वर्षांमध्ये गाठू शकलेलो नाही. कारण नवीन पाणबुडय़ा विकत घेण्याचा वेग अतिशय कमी असून, पाणबुडय़ा निवृत्त होण्याचा वेग अधिक आहे. नव्या पाणबुडय़ा दाखल होण्याचा वेग मोठय़ा प्रमाणावर वाढवावा लागेल. देशाच्या अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघाले आहे. हे त्या मागचे एक कारण आहे. बाकी देशपातळीवर मोठे निर्णय घेणे थाबंले आहे.

आयएनएस सिंधुरक्षक डिसेंबर १९९७ मध्ये नौदलात दाखल
आयएनएस सिंधुरक्षक’ ही रशियन बनावटीची ‘किलो’ वर्गातील पाणबुडी रशियातील गोदीत तयार झाल्यानंतर, डिसेंबर १९९७ मध्ये भारतीय नौदलात दाखल झाली. ‘किलो’ या गटातील १४ पाणबुडय़ा भारताच्या ताफ्यात आहेत. डिझेलवर चालणार्‍या या पाणबुडय़ा लढाऊ जहाजे आणि पाणबुडय़ाविरोधी मोहिमेसाठी वापरल्या जातात. त्याचबरोबर पाण्यातून जमिनीवर २०० किलोमीटपर्यंत मारा करतील अशी क्षेपणास्त्रे डागण्याचीही या पाणबुडीची क्षमता होती. यापूर्वी सिंधुरक्षक विशाखापट्टणम येथे असताना २०१० मध्ये तिच्यावर अपघात घडला होता. त्यावेळी बॅटरी विभागातील स्फोटामुळे एक कर्मचारी ठार तर दोघे जखमी झाले होते. यानंतर सिंधुरक्षकला दुरुस्ती आणि आधुनिकीकरणासाठी अडीच वर्षे रशियातील गोदीत पाठवण्यात आले. एप्रिल २०१३ मध्ये सिंधुरक्षक पुन्हा भारतीय नौदलात परतली .आधुनिकीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या पाणबुडीच्या वेगवेगळ्या चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या. त्यामुळे पुढील दहा वर्षे ही पाणबुडी नौदलाच्या सेवेत कार्यक्षमपणे काम करेल अशी अपेक्षा होती. ४८० कोटी रुपये या आधुनिकीकरणावर खर्ची पडले, जे तिच्या मुळ किमतीपेक्षा दिडपट जास्त आहे.

नौदलाचा अपघातांचा इतिहास
भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस सिंधुरक्षक’ या पाणबुडीला अपघाती जलसमाधी मिळाल्यानंतर याआधी नौदलातील अपघाती घटनांकडे एक दृष्टिक्षेप टाकला तर अनेक दुर्घटना समोर येतात. अशा अपघातामुळे देशाचे हजारो कोटींचे नुकसान तर होतेच, पण नवीन जहाजे आणण्याकरता अनेक वर्षे लागतात. यामुळे आपले सुरक्षाकवच कमजोर होते.

‘सिंधुरक्षक’ च्या दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल चार आठवड्यात अपेक्षित आहे. राष्ट्रीय सुरक्षा व गुपितांचा बागुलबुवा दाखवून कटू सत्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करता कामा नये. यापूर्वी नौदल गोदीतच आयएनएस ‘विंध्यगिरी’ ला आगीमुळे जलसमाधी मिळाली. या अपघाताचा नेमका काय धडा घेतला, हे देशाला कळायला हवे. ‘सिंधुरक्षक’ मध्ये नौदलाचे तीन अधिकारी व १५ नौसैनिक शत्रूला पाणी चारण्याऐवजी आपल्याच बंदरात असे संकटात सापडावेत, याव्यतिरिक्त दुसरे दुर्दैव कोणते?

नौदलतळ कारवारमध्ये स्थलांतरित करण्याची गरज
आपली एक अद्ययावत क्षेपणास्त्रसज्ज पाणबुडी अचानक आग लागून तडकाफडकी नष्ट होते हा निव्वळ योगायोग कसा मानावा? आयएनएस सिंधुरक्षक ‘ पाणबुडीच्या दुर्घटनेमुळे मुंबईच्या नौदल गोदीतील कोंडी व त्यामुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या युद्धनौकांचा सतत बाहेरच्या जगाशी येणारा संपर्क या दोन मुख्य समस्या अधोरेखित झाल्या आहेत. अडीचशे वर्षांहून अधिक जुन्या नौदल गोदीमध्ये सकाळी हजारो कामगार गोदीत प्रवेश करतात. काही कामांवर कंत्राटी कामगार घेतले जातात .त्यांच्यावर वचक ठेवणे कठीण असते. ओळखपत्रांसाठी लागणारे पुरावे बनावट प्रकारचे आणून कुणीही यात घुसखोरी करू शकतो.

प्रत्यक्ष गोदीमध्ये साऊथ ब्रेक वॉटर हा धक्का विविध युद्धनौकांच्या तसेच पाणबुड्यांच्या बंदरातील विरामासाठी उपयोगात येतो. या ठिकाणी विशिष्ट समारंभाच्या वेळी जेव्हा अनेक युद्धनौका मुंबई बंदरात येतात , तेव्हा नौका स्वतंत्रपणे उभ्या करण्यास जागेचा तुटवडा असतो. साहजिकच एकाला एक नौका बांधून ठेवण्यावाचून गत्यंतर नसते. कोणतेही संकट आल्यास अशा वेळी धोका वाढतो.

नौदल गोदीच्या सभोवती सध्या नागरी बोटींची वर्दळही वाढलेली आहे. प्रवासी लाँच, जेएनपीटी व मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदीत येणारी व्यापारी जहाजे, बूचर आयलंडकडे येणारी तेलवाहू जहाजे व या सर्व जहाजांना खेचणार्‍या टगबोटी यांची प्रचंड वर्दळ नौदल गोदीसमोरूनच सुरू असते. अशा प्रकारे मुंबईची नौदल गोदी कायमच बाहेरच्या आगंतुक वर्दळीच्या जगाला खुली असते.

कोणत्याही युद्धनौकेवरील शस्त्र , दारुगोळ्याचा स्फोट झाल्यास अपरिमित हानी होऊ शकते. वाढत्या वर्दळीचा विचार करूनच भारतीय नौदलाने कारवार येथे ऑपरेशन सी-बर्ड नावाने मोठ्या गोदीचा प्रकल्प सुरू केला व आयएनएस कदंबा असे त्याचे नामकरण करण्यात आले. तेथे अनेक नौकांच्या सुक्या गोदीसाठी शिप लिफ्टची सुविधाही तयार केली. मात्र अजून हा प्रकल्प पूर्णत्वाने कार्यरत झाला नसल्याने युद्धनौका तेथे स्थलांतरित झालेल्या नाहीत. ऑपरेशन सी-बर्ड लवकर पूर्ण करुन महत्वाच्या युद्धनौका तिथे लवकर स्थलांतरित केल्या जाव्या.

नौसेनेची पाण्बुडी क्षमता कधी वाढणार ?
अनेक वर्षांमध्ये पाणबुडी निर्मितीच्या क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज सातत्याने व्यक्त झाल्यानंतरही त्याकडे दुर्लक्षच झाले आहे. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर करता भारतीय नौदलाकडे कमीत कमी २० पाणबुडय़ा असणे सामरिकदृष्टय़ा आवश्यक आहे. आश्वासक परिस्थितीसाठी ३० पाणबुडय़ा आवश्यक आहेत. पण प्रत्यक्षात केवळ १४ पाणबुडय़ा आहेत. पाकिस्तान आणि चीन या दोघांनीही पाणबुडी निर्मितीमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. अकुला वर्गातील दोन पाणबुडय़ा पाकिस्तानने तयारही केल्या. पण भारताने करार करुन अनेक वर्षे उलटल्यानंतरही स्कॉर्पिअन पाणबुडय़ा नौदलात केव्हा दाखल होणार त्या बाबत भारतीय नौदल ठोस सांगू शकत नाही. चीननेही स्वतंत्रपणे पाणबुडी निर्मितीच्या दिशेने यशस्वी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. ते तंत्रज्ञान पाकिस्तानला हस्तांतरण करण्याचा करारही मध्यंतरी दोन राष्ट्रांमध्ये झाला. पण भारत आहे तिथेच आहे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..