नवीन लेखन...

विकसित देशांकडून ई-कचर्‍याचं डंपींग

मनुष्यप्राण्याच्या आधुनिक चैनीच्या जीवनशैलीमुळे सध्या जगभरातल्या पर्यावरणाच्या समस्या वाढत आहेत. यातील सर्वात मोठी समस्या आहे, ई-कचर्‍याची, ज्यामुळे जगभरात आरोग्य आणि पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत आहेत. या ई-कचर्‍याचं प्रमाण भारतासारख्या विकसनशील देशांत बरेच जास्त आहे. मात्र ई-कच-याची ही समस्या केवळ भारतातच नाही, तर अन्य अनेक देशांमध्येही परिस्थिती गंभीर होत आहे. अमेरिकेसारखे विकसित देश आपल्याकडचा ई-कचरा बिनधास्तपणे भारत, चीन आणि पाकिस्तानसारख्या आशियाई देशांमध्ये निर्यात करतात. हे विकसनशील देश ई-कचर्‍यासाठी सर्वाधिक सुरक्षित डंपिंग क्षेत्र मानले जातात आणि त्यामुळेच या देशांमध्ये परिस्थिती अधिक बिकट आहे.

अमेरिकेत प्रत्येक घरात दरवर्षी छोटी-मोठी जवळजवळ २० ते २५ उपकरणं खरेदी केली जातात. बिघडलेली उपकरणं दुरुस्त करुन वापरण्याची पद्धत तिथे जवळजवळ नाहीच. “वापरा आणि टाकून द्या” (Use and Throw) ही त्यांची संस्कृती आहे. त्या देशामध्ये १० टक्के लोक दरवर्षी मोबाइल बदलतात आणि जुना मोबाइल कचर्‍यामध्ये फेकून देतात. यावरून केवळ मोबाईलद्वारेच अमेरिकेमध्ये दरवर्षी किती ई-कचरा निर्माण होतो याचा येऊ शकेल.
विकसित देश त्यांच्याकडचा ई-कचरा गरीब देशांना विकतात. या ई-कच-यामध्ये अनेक प्रकारची रासायनिक तत्त्वं असतात. त्यामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरण या दोन्हीचं मोठं नुकसान होऊ शकतं. दूरदर्शन संच आणि जुन्या कॉम्प्युटरमध्ये वापरण्यात आलेली सीआरटी (कॅथोड रे टय़ुब) रिसायकल करणं अवघड असतं. या कचर्‍यामध्ये शिसं, पारा असे घातक घटकही असतात. ई-कचरा संपूर्णपणे नष्ट करणं सोपं काम नाही कारण त्यात प्लॅस्टिक आणि अनेक प्रकारच्या धातूंनी बनलेले पदार्थ असतात.
भंगारवाले हा कचरा अ‍ॅसिडमध्ये बुडवून किंवा जाळून त्यातून सोनं-चांदी, प्लॅटिनम आणि अन्य धातू वगैरे वेगळे काढतात. मात्र यावेळी विषारी धूर निघतो आणि तो आरोग्य आणि पर्यावरणाला फार घातक असतो. ई-कचर्‍यातून मिळणार्‍या या अनेक घटकांच्या मोहाने विकसनशील देश आपल्या देशातील समस्यांकडे दुर्लक्ष करून ई-कचरा आयात करतात. भारतात तर अशा कचर्‍यावर प्रतिबंध घालण्यासाठी बनवलेला कचरा व्यवस्थापन कायदा धाब्यावर बसवून अनेक मोठ्या औद्योगिक घराण्यांनी त्याची आयात सुरू ठेवली आहे.
अमेरिका, जपान, चीन आणि तैवानसारखे देश मोबाइल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, टीव्ही, मायक्रोचिप्स, सीडी इत्यादी खराब झाल्यानंतर ते पूर्व आशियातील काही देशांमध्ये पाठवून देतात. त्यामध्ये भारताचं नाव सर्वात वर आहे. अमेरिका आपल्याकडील ८० टक्के ई-कचरा चीन, मलेशिया, भारत, केनिया आणि आफ्रिकेसारख्या देशांमध्ये पाठवतो. सध्याच्या काळात इलेक्ट्रॉनिक क्रांतीमुळे सर्वसामान्य लोकांचं इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर अवलंबून रहाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. दुसरीकडे ई-कचर्‍यामुळे निर्माण होणार्‍या धोक्यांनी संपूर्ण दक्षिण पूर्व आशियातील देशांची चिंता वाढली आहे.
विकसित देशांमधील या ई-कचर्‍याचा भारत हा सर्वात मोठा ग्राहक आहे. मोबाइल फोन, लॅपटॉप, टेलिव्हिजन आणि खराब झालेल्या कॉम्प्युटरमुळे मोठं संकट निर्माण झालं आहे. या संकटापासून दूर रहाण्यासाठी काही ठोस प्रयत्न न झाल्यास येणारा भविष्यकाळ धोकादायक आहे हे निश्चित !!!

— निनाद अरविंद प्रधान

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..