काळवंडलेला राष्ट्राभिमान !

अतिरेक्यांच्या कारवायांमुळेच तर आपल्याला आपल्या संयमाची कसोटी पाहता येते, आपल्या अंत:करणाची विशालता, आपल्या हृदयात वास करीत असलेली क्षमाशीलता अशा हल्ल्यांमुळेच तर जगासमोर येते. समोर युद्धाला उभे ठाकले ते सगळे माझे आप्तेष्ट आहेत, कुणी भाऊ आहे, कुणी काका आहे, कुणी मामा आहे, मी त्यांच्यावर शस्त्र कसे चालवू म्हणून शस्त्र टाकून खाली बसलेल्या अर्जुनाला कान धरून उभे करीत ते इथे उभे आहेत ते तुझे शत्रू म्हणून आणि शत्रूचा नि:पात करणे हाच क्षत्रिय धर्म आहे, तू तुझ्या धर्माचे पालन कर, बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको, असे सांगणारा श्रीकृष्ण याच भारत देशात होऊन गेला, हे सांगण्याचीही लाज वाटावी इतका आमचा राष्ट्राभिमान काळवंडला आहे.

एखादे राष्ट्र जन्माला येते, आपले अस्तित्व टिकवून ठेवते आणि प्रयत्नांती वैभवाला पोहचते, ते कशाच्या जोरावर? त्या राष्ट्रात राहणार्‍या लोकांची उद्यमशिलता, कष्ट करण्याची तयारी, संकटाचा सामना करण्याचे धैर्य या सगळ्या गोष्टी त्यासाठी कारणीभूत असतात; परंतु या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी असतो तो प्रखर राष्ट्रवाद! हा देश माझा आहे, या देशाचे संरक्षण करण्याची, हा देश समृद्ध करण्याची, या देशाची अस्मिता जतन करण्याची जबाबदारी माझी आहे, ही भावना म्हणजेच राष्ट्रवाद! ज्या देशांमध्ये हा राष्ट्रवाद प्रखर असतो, त्या देशांचा विकास कुणी रोखू शकत नाही आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे त्या देशांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कुणी करीत नाही.

देशाची सीमा सुरक्षित असेल तरच देशात शांतता नांदते आणि शांतता असेल तरच विकास साधला जाऊ शकतो आणि याच पृष्ठभूमीवर सगळ्यात महत्त्वाचे ठरतात ते देशाचे नेते किंवा देशाचा कारभार चालविण्याची, देशाचे धोरण निश्चित करण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते लोक! “राजा कालस्य कारणम्” असे एक वचन संस्कृतमध्ये आहे. आता या राजाची जागा सरकारांनी घेतली आहे, त्यामुळे या सरकारची नीती आणि नियती कशी आहे, यावरच देशाचे भवितव्य अवलंबून असते. यासंदर्भात आपल्या देशाचा विचार केला असता जे चित्र समोर येते, ते खचितच निराशा करणारे आहे. अलीकडील काळात राजकीय चर्चांमध्ये वर्तमान सरकारच्या संदर्भात “पॉलिसी पॅरेलेसिस” हा शब्दप्रयोग नेहमी होत होता. खरे तर हा धोरण लकवा नावाचा आजार आजचा नाही. हा देश स्वतंत्र झाला तेव्हापासूनच धोरणांच्या बाबतीत लकवाग्रस्त आहे. स्वत:चे काही उभे करण्यापेक्षा ब्रिटिशांकडून जे काही मिळाले, त्यावरच हा देश अधिक अवलंबून राहिला. आम्ही ब्रिटिशांचे कायदे घेतले, काही कायदे तर अगदी दीडशे वर्षे जुने आहेत, आम्ही त्यांच्या परंपरा घेतल्या, आम्ही त्यांचे शिष्टाचार जसेच्या तसे घेतले, एवढेच नव्हे तर आम्ही त्यांची भाषादेखील घेतली. ब्रिटिशांचे राहणीमान आमच्यासाठी आदर्श ठरले. भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशात गळाबंद कोट, त्यावर टाय का घातला जातो, या प्रश्नाचे साधे उत्तर गोरे साहेब तसे घालतात म्हणून हेच आहे. ब्रिटिश लोकांची सत्ता या देशावर उणीपुरी दीडशे वर्षे होती, या दीडशे वर्षांमध्ये त्यांनी आमच्यावर इतका प्रभाव टाकला, की त्यापूर्वीची हजारो वर्षांची परंपरा, हजारो वर्षांचा इतिहास, संस्कृती पार मोडकळीस आली! ब्रिटिशांनी भारतीय जनमानसाचे आणि विशेष करून ब्रिटिशांच्या प्रेमात पडलेल्या तत्कालीन भारतीय नेत्यांचे असे काही “ब्रेन वॉशिंग” केले, की पाश्चात्त्य विचार, पाश्चात्त्य संस्कृती म्हणजे आधुनिक, पुढारलेली आणि भारतीय विचार, इथली संस्कृती कालबाह्य असा ठाम समज या लोकांचा झाला. हे जे वैचारिक प्रदूषण ब्रिटिशांनी इथे करून ठेवले, त्याचीच मोठी किंमत आता आपण चुकवित आहोत. भारतीयांना भारतीय संस्कृतीपासून तोडणे, इथल्या विचारांशी, इथल्या मूल्यांशी जुळलेली त्यांची नाळ तोडणे ब्रिटिशांना राजकीय दृष्टीने गरजेचे वाटले. अस्मिताभंजन हा जो काही प्रकार असतो, तो ब्रिटिशांनी अगदी सूक्ष्म पातळीवर आणि खूप व्यापक प्रमाणात केला, दुर्दैवाने तो परिणामकारक ठरला. त्यामुळे आपल्या मातीच्या, आपल्या संस्कृतीच्या, आपल्या परंपरेच्या ओढीतून जो राष्ट्रवाद जन्माला येतो आणि प्रखर होतो, तोच मुळी लकवाग्रस्त झाला.

चीनने १९६२ साली अचानक आक्रमण करून आपली हजारो चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेली भूमी बळकावली. ती जमीन आजही आपल्याला परत मिळविता आलेली नाही. त्यावेळी यासंदर्भात संसदेत चर्चा झाली तेव्हा आपल्या माननीय पंतप्रधानांनी ज्या भूमीवर गवताचे पातेही उगवत नाही, त्या जमिनीबद्दल एवढा आक्रोश का, असे म्हटले होते. कदाचित चीनची लष्करी ताकद आपल्यापेक्षा खूप अधिक आहे, त्यामुळे या मुद्यावरून पुन्हा संघर्ष विकत घेतला, तर आपले नुकसानच होईल, हा विचार त्यामागे असू शकतो; परंतु पाकिस्तानच्या बाबतीत काय? पाकिस्तानने अवैधपणे बळकावलेल्या “आझाद काश्मीर” च्या संदर्भात आपली काय भूमिका आहे? तो भाग आजही आपण आपल्या नकाशात आपला म्हणून दाखवितो आणि त्या भागाचे प्रतिनिधित्व करणार्‍या आमदारांसाठी आजही जम्मू-काश्मीर विधानसभेत जागा राखून ठेवलेल्या आहेत, त्या नेहमी रिकाम्याच राहतात, हा भाग वेगळा! आझाद काश्मीर हा जर आपलाच भाग असेल, तर आपण तो पाकिस्तानच्या तावडीतून मुक्त का करीत नाही? ते तर फार दूर राहिले, उलट सध्या भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मीरचे पाकमध्ये विलीनीकरण करण्याच्या बाता करणार्‍या किंवा काश्मीरला स्वतंत्र करण्याचे स्वप्न रंगविणार्‍या अतिरेकी संघटनांसोबत आमचे सरकार वाटाघाटी करते, हे कशाचे द्योतक म्हणायचे? कारगिलच्या युद्धात भारताचे जवळपास दीड हजार जवान शहीद झाले. तत्कालीन सरकारने हवाई दलाला सीमा ओलांडण्याची परवानगी दिली असती, तर ही प्रचंड प्राणहानी सहज टाळता आली असती; परंतु आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीचा भंग करण्याची परवानगी नाकारण्यात आली आणि त्यामुळेच आपल्या जवानांचा मोठ्या प्रमाणात बळी गेला. ही परवानगी नाकारण्याचे कारण काय होते? तुमच्या सीमेत आपले अतिरेकी आणि सैन्य घुसविताना पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय हद्दीचा भंग होईल वगैरे विचार केला होता का? तुमच्या हद्दीत येऊन त्यांनी पक्के बंकर्स बांधले, चौक्या स्थापन केल्या, तेव्हा आंतरराष्ट्रीय दबाव किंवा सामंजस्य वगैरे कुठे गेले होते? आपल्या षंढपणाला तत्त्वज्ञानाचा मुलामा देण्याची ही जी वृत्ती आहे, त्यामागचे कारण एकच आहे आणि ते म्हणजे या राष्ट्रात प्रखर राष्ट्रवाद कधी जन्माला आला नाही किंवा येऊ दिला गेला नाही. आज जगातील सर्वाधिक लाचार देश म्हणून कदाचित भारत ओळखला जात असावा, त्यामागचे कारणच हे आहे. मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला, ४८ तास अतिरेक्यांचा नंगा नाच मुंबईत सुरू होता, पावणेदोनशे निरपराध लोक मारले गेले, करकरे, साळसकर, कामटे, उन्नीकृष्णनसारखे कर्तबगार अधिकारी शहीद झाले, काय केले आपल्या सरकारने? पाकिस्तानचा अत्यंत कडक शब्दात निषेध? भारताने लगेच उठून पाकिस्तानवर आक्रमण करायला हवे होते, ही कोणाचीच अपेक्षा नव्हती आणि तसे कधी झालेही नसते, कारण भारत म्हणजे इस्त्राएल किंवा अमेरिका नाही; परंतु किमान जोपर्यंत भारतात मारले गेलेल्या पावणेदोनशे निरपराध नागरिकांच्या मृत्यूचा हिशेब चुकता होत नाही, जोपर्यंत या कटात सामील असलेल्या सगळ्या अतिरेक्यांना पाक सरकार फासावर लटकवित नाही, तोपर्यंत पाकिस्तानसोबतचे सगळे संबंध विच्छेद करण्याची स्वाभिमानी घोषणा भारत सरकार करू शकले असते. भारताने केले काय, तर दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेली द्विपक्षीय चर्चा बंद केली. अहो, विचारतो कोण तुमच्या चर्चेला? इकडे तुम्हाला चर्चेत गुंतवून ठेवायचे आणि तिकडे अतिरेक्यांना भारतात घुसवायचे, ही त्यांची रणनीती आहे. कारगिलच्यावेळी तेच झाले होते. इकडे वाजपेयी आणि नवाझ शरीफ एकमेकांच्या गळ्यात गळे घालत होते आणि तिकडे मुशर्रफच्या फौजा कारगिलमध्ये पक्के सिमेंट बंकर बांधत होत्या. आपल्या लाचारीची परिसीमा इतकी आहे, की मुंबई हल्ल्यानंतर थोडे दिवस मातम मनविल्यावर भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानसोबत मधुर संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले. पुढाकार पाकिस्तानने नव्हे, तर भारताने घेतला. क्रिकेट म्हणजे तर या लाचारीचा सेतूच आहे. विश्वचषकातील भारत-पाक सामना पाहायला पाकी पंतप्रधानांना भारताने आमंत्रण दिले. भारताचे पंतप्रधानांसह झाडून सगळे नेते त्या सामन्याला उपस्थित झाले. सगळीकडे कसे “फिल गूड” वातावरण होते. नशीब एवढेच म्हणायचे, की पाकी पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी करकरे, कामटे किंवा साळसकर या शहिदांच्या विधवांना बोलाविण्याची शक्कल कुणाच्या डोक्यात आली नाही, अन्यथा सद्भावना प्रस्थापित करण्यासाठी हा उपायदेखील करून पाहता आला असता. ती चूक आता दुरुस्त करता येऊ शकते. चार-पाच वर्षांनंतर पाकिस्तानी क्रिकेट संघ भारताच्या दौर्‍यावर येत आहे. दोन्ही देशांमधील वातावरण तणावग्रस्त होते म्हणून इतकी वर्षे हा दौरा झाला नव्हता, आता कदाचित तणाव कमी झाला असेल, जुन्या जखमांवर खपल्या धरल्या असतील, पाकिस्तान नामक कुत्र्याचे शेपूट सरळ झाल्याचा साक्षात्कार आपल्या सरकारला झाला असेल, त्यामुळे क्रिकेटच्या माध्यमातूनच या दोन्ही देशांतील वैरभाव नष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपले सरकार करू पाहत असेल आणि तसे असेल, तर या संघाचे भारताच्या सीमेवर या सगळ्या शहिदांच्या विधवांकडून “रेड कार्पेट” स्वागत व्हायला हवे. आमचे दातृत्व, आमची क्षमाशीलता, आमचे अंत:करण किती विशाल आहे, हे जगाला दाखविण्यासाठी आणि विशेष करून पाकिस्तानच्या मनावर ते बिंबविण्यासाठी हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. काल मुंबईवर तुम्ही जसा हल्ला केला, तसा उद्या दिल्ली, कोलकता, चेन्नई किंवा अन्य कोणत्याही शहरांवर केला, अगदी या सगळ्या शहरांवर एकाचवेळी केला तरी आमची सहनशीलता तुम्ही नष्ट करू शकत नाही, आमची क्षमाशीलता तुम्ही ढासळवू शकत नाही, तुमच्या प्रती आमच्या अंत:करणात असलेले प्रेम असल्या क्षुद्र कारवायांमुळे तसूभरही कमी होणार नाही, हा संदेश आपण पाकिस्तानला द्यायला हवा. त्यांच्या खेळाडूंचे जसे आपण स्वागत करणार आहोत, तसे खरे तर तिकडून येणार्‍या अतिरेक्यांचेही करायला हवे. त्या अतिरेक्यांच्या कारवायांमुळेच तर आपल्याला आपल्या संयमाची कसोटी पाहता येते, आपल्या अंत:करणाची विशालता, आपल्या हृदयात वास करीत असलेली क्षमाशीलता अशा हल्ल्यांमुळेच तर जगासमोर येते. समोर युद्धाला उभे ठाकले ते सगळे माझे आप्तेष्ट आहेत, कुणी भाऊ आहे, कुणी काका आहे, कुणी मामा आहे, मी त्यांच्यावर शस्त्र कसा चालवू म्हणून शस्त्र टाकून खाली बसलेल्या अर्जुनाला कान धरून उभे करीत ते इथे उभे आहेत ते तुझे शत्रू म्हणून आणि शत्रूचा नि:पात करणे हाच क्षत्रिय धर्म आहे, तू तुझ्या धर्माचे पालन कर, बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको, असे सांगणारा श्रीकृष्ण याच भारत देशात होऊन गेला, हे सांगण्याचीही लाज वाटावी इतका आमचा राष्ट्राभिमान काळवंडला आहे.

जुने प्रहार वाचण्याकरिता:फेसबुकवर प्रकाश पोहरे टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: prakash.pgp@gmail.com
Mobile No. ९१-९८२२५९३९२१

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…