देवपूजा, अभिषेक आणि रिसायकलींग

God, Abhishek and Recycling

एका शनिवारी सकाळी देवळात गेलो होतो. मुद्दाम सांगायचं कारण म्हणजे नित्यनियमाने मी काही देवळात जात नाही. जेव्हा जमतं तेव्हा जातो.

ठाण्याला हायवेवर एक छान, छोटंसं मंदिर आहे. अक्षरश: सगळ्या देवांच्या मूर्ती तिथे आहेत. ज्याची ज्या देवावर श्रद्धा त्या देवाचं दर्शन त्याला या मंदिरात मिळतं. मी काही अमूक एका देवाचा भक्त वगैरे काही नाही. सगळेच देव सारखे. कोणाचीही पूजा करा.. भक्ती करा… रिझल्ट एकच असं मला तरी वाटतं. पण तरीही आपल्याकडे प्रत्येक देवाला कोणतातरी वार नेमून दिलाय त्यामुळे सहाजिकच त्या त्या देवाचं दर्शन त्या त्या वारी घेण्याची प्रथा आहे.

मी आस्तिक आहे पण धर्मवेडा नाही. मी नास्तिक नाही पण अतिरेकी सेक्युलरही नाही. कम्युनिस्ट आणि समाजवादी तर नक्कीच नाही. पण आज देवळात जे काही जाणंवलं ते विचार करायला लावणारं होतं. त्यामुळेच जास्तीत जास्त लोकांनी त्यावर विचार करावा म्हणून माझं मत मांडतोय. ज्याला त्याला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. त्यामुळे ज्यांना हे पटत नाही त्यांनी उगाच स्वत:च्या जीवाला त्रास करुन घेऊ नये.

शनिवारची सकाळ. हनुमानाचं मंदिर. त्यात शनीचीही मूर्ती. लोकांची मोठी गर्दी. मंदिराच्या दरवाज्यातच पानांचा हार, तेलाची वाटी, फुलं वगैरे विकणार्‍याचं दुकान. लोक त्याच्याकडून या सगळ्या वस्तू घेतायत. पुढे मंदिरात शिरतायत. एका बाजूला हनुमान आणि शनिदेवाच्या मोठ्या मूर्ती. दुसर्‍या बाजूला हनुमानाची आणखी एक मूर्ती. डावीकडच्या हनुमानाजवळ शनीदेव असल्याने स्त्रीयांना तिथे जायला बंदी. उजवीकडचा हनुमान स्त्रीयांसाठी. असो.

हनुमान आणि शनिदेवांच्या मूर्तींवर अगदी डोक्यापासून पायापर्यंत तेलाच्या वाट्या आणि बाटल्या उपड्या केल्या जातायत. एका देवळात दिवसभरात हजारएक जणांनी एक-एक वाटी तेलाचा अभिषेक केला तरी शंभर लिटर तेल वापरलं जातं. तेल ओघळून खाली येतंय. कुठे जातंय ते कळायला मार्ग नाही.

दोनच शक्यता…. एकतर कुठेतरी वाहून जात असावं. कुठेतरी म्हणजे कुठे? माहित नाही. दुसरी शक्यता म्हणजे कुठेतरी जमा केलं जात असावं. पहिली शक्यता अगदीच धूसर. म्हणजे दुसरी शक्यताच असणार. म्हणजेच भक्तांनी श्रद्धेने वाहिलेलं तेल….. बाटली, बादली, पिंप वगैरेमध्ये गोळा केलं जात असावं. त्याचं पुढे काय होत असेल?

एकतर कुणाच्या घरी जात असावं. थोडंफार गाळून, शुद्ध करुन वापरलं जात असावं.. किंवा परत दुकानात जाऊन नव्या भक्ताकडून पुन्हा त्या बिचार्‍या हनुमान आणि शनिदेवांच्या शरीरावर पडत असावं. हे किती वेळा चालत असावं? किती दिवस तेच तेल पुन्हा पुन्हा रिसायकल होत असावं? कळायला काहीच मार्ग नाही.

मला वाटतं.. कळायला मार्ग नाही असं म्हणून आपणच आपली घोर फसवणूक करुन घेतो. आपल्याला नक्की माहित असतं की या तेलाचं रिसायकलिंग होतंय. देवळातल्या देवळात पुन्हापुन्हा रिसायकल झालेलं एकवेळ परवडेल. पण एक भयानक विचार मनात आला.. हेच रिसायकल झालेलं तेल एकाद्या वडापाववाल्याच्या गाडीवरचे वडे तळायला वापरलं जात असेल तर? फरसाण किंवा वेफर्सच्या फॅक्टरीत पोहोचत असेल तर?

त्याच देवळाच्या बाहेर भिकार्‍यांची आणि गरीब मुलांची गर्दी. रुपया दोन रुपये त्यांना मिळाले तर हवे आहेत. “मुलं ही देवाघरची फुलं” हे वापरुन गुळगुळीत झालेलं वाक्य. पण देवाच्या दगडी मूर्तीवर तेलाच्या बाटल्या उपड्या करणार्‍या तथाकथित भक्तांना या देवाघरच्या फुलांपेक्षा दगडी मूर्ती जास्त महत्त्वाची वाटते. दोन रुपयात त्या बिचार्‍या मुलाला चार बिस्किटं खायला मिळाली असती त्याऐवजी आपण “राष्ट्रीय संपत्ती”चा श्रद्धेच्या नावाखाली अपव्यय करतोय हे लक्षात कधी येणार?

असो. भक्तांची श्रद्धा. त्याला आपण काय करणार?

एका देवळात एका शनिवारी रिसायकल होणार्‍या तेल, फुलं, नारळ वगैरेची आर्थिक उलाढाल बघाल तर थक्क व्हाल. एका शनिवारी एका देवळात किमान १०० लिटर तेल वापरलं गेलं आणि रिसायकल झालं तर देशभरात किती लिटर तेल वाया जात असावं? आणि त्यावर किती जण “माया” कमवत असावेत? हीच गोष्ट दूध, फुलं यांचीसुद्धा !!

मात्र तेव्हापासुन मी एक गोष्ट माझ्यापुरती ठरवली आणि शक्य तिथे ती अमलात आणायचा प्रयत्न करतोय. देवाला तेल, फुलं, हार वगैरे अर्पण करण्याऐवजी तेच पैसे दानपेटीमध्ये टाकायचे किंवा देवळाबाहेर बसलेल्या लहान मुले, अपंग किंवा वृद्धांना बिस्किटे वगैरे देण्यासाठी वापरायचे. आता यातही कोणीतरी म्हणेल की यामुळे त्यांना बसल्याबसल्या खायची सवय लागते वगैरे. पण रिसायकल होणारं तेल, नारळ, फुलं यापेक्षा त्यांचं पोट भरणं बरं असं मला तरी वाटतं. आणि अगदी तसंच वाटलं तर त्यांना थेट पैसे देण्याऐवजी त्यांच्यासाठी काम करणार्‍या एखाद्या मान्यवर संस्थेला द्या.

तुम्हाला काय वाटतं?

— निनाद अरविंद प्रधान Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…