नवीन लेखन...

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – ६/११

  • हेमंत राजोपाध्ये यांच्या प्रतिसादाबद्दल :

हा विचारप्रवर्तक लेख आहे. त्यांनी मुख्य मुद्दे समर्थपणें हाताळलेले आहेत, मी basically  त्यांच्याशी सहमत आहे. केवळ कांहीं गोष्टींचा थोडासा ऊहापोह.

 

  • या विषयाची संगोपांग चर्चा होईल अशी अपेक्षा होती’ ( इति राजोपाध्ये) :

याबद्दल माझें मत मी शेवटी मांडणार आहे. आत्तां  इथें त्याची चर्चा केल्यानें विषयांतर होण्याची भीती आहे.  पहा  परिशिष्ट – (२) .

मात्र, मोरे यांच्या लेखाला प्रतिसाद चांगला ( बराच) मिळाला आहे, असें मला वाटतें.

  • मोरे यांचें मत , की, पाणिनीनें बोली भाषांवर संस्कार करून संस्कृत निर्माण केली ; हें  वास्तव्याला धरून आहे असें राजोपाध्ये यांना वाटतें. पण वस्तुस्थिती तशी नाहीं, याची विस्तृत चर्चा आपण आधीच केलेली आहे.
  • भाषेचें प्रमाणीकरण :
  • भाषेला ( व कोणत्याही कलेला, साहित्याला ) राजाश्रय मिळाला की तिचें उत्थान होतें, तिला प्रतिष्ठा येते. जसें की, जैनांना, व पर्यायानें त्यांनी वापरलेल्या अर्धमागधीला, चंद्रगुप्त मौर्य (त्याच्या आयुष्याचा उत्तरकालीन भाग) व नंतरच्या काळात पश्चिम भारतातील राजे यांनी ;  बौद्धांना व पर्यायानें पालीला, अशोक, कनिष्क ; महाराष्ट्रीला सातवाहन ;  इ.स. च्या सुरुवातीच्या काळात (पुन:प्रस्थापित ) संस्कृतला शुंग व गुप्त वंश ; इ.स. च्या दुसर्‍या सहस्त्रकाच्या सरुवातीच्या काळात मराठीला देवगिरीचे यादव ; असे राजाश्रय लाभले, व त्यामुळे त्यांच्यात साहित्य वगैरे निर्माण झाले, हें खरें आहे. पण आपण जर पाहिलें तर, भाषेमुळे राजाराजांमध्ये युद्धें झालेली नाहींत, ती युद्धें राज्यविस्तार इत्यादी कारणांसाठी होती . जैन व बौद्ध यांचा विचार केला तर, मुख्यत्वें त्यांचा विरोध हा भाषिक नसून, संस्कृतीबद्दल, धार्मिक मतांबद्दल आहे. पूर्वीच्या काळीं जैन साहित्य अर्धमागधी, महाराष्ट्री, तसेच संस्कृतमध्येही दिसतें ;  नंतरच्या काळात कन्नड, व हल्लीच्या काळात हिंदी व गुजरातीमध्ये दिसतें ; यावरून वरील मुद्दा स्पष्ट व्हावा. माझा एक colleague हा पाश्चिमात्य देशांमध्ये पीएच्. डी. पर्यंत शिकलेला असला तरिही अतिशय devout जैन होता/ आहे. त्याच्याशी माझ्या कांहीं वेळा चर्चा झालेल्या आहेत. त्यातून मला जाणवलें तें असें की, हिंदू व जैन philosophy  यांच्यात बेसिकली फरक आहे, व एखाद्या गोष्टीचा विचार हिंदूधर्म ज्याप्रकारें करतो, त्यापेक्षा पूर्णपणें वेगळा ( व कांहीं वेळा पूर्णपणें opposite ही ) विचार  जैनधर्म मांडतो. बौद्धांच्या बाबतीत, बाबासाहेबांनीही दाखवलें आहे की बुद्धाचा ‘धम्म’ कशा प्रकारें भिन्न आहे.  त्यामुळे,  ही भिन्नता, विचारांची होती, philosophy ची होती, मूलत: भाषिक नव्हे, हें ध्यानात घेतलें पाहिजे.

मध्य-युगातही युरोपीयांची ‘क्रूसेडस्’ या नांवानें मध्य-पूर्वेत मुस्लिमांशी जी युद्धें झाली, ती भाषिक नव्हती, ती धर्माधिष्ठित होती.

तेव्हां,  हल्लीहल्लीपर्यंत तरी, हें धर्माधिष्ठित, तत्वज्ञानाधिष्ठित (philosophy) असेंच राजकारण होते. जेव्हांपासून भारतात भाषावार-प्रांतरचना झाली तेव्हांपासून राजकारण भाषाधिष्ठित  बनले (अपवाद कदाचित तमिळनाडुचा. आणि तमिळांच्याही राजकारणाचा उगम,    १८ व्या -१९ व्या शतकातील  ‘आर्य-आक्रमण’ हा अयोग्य सिद्धांत आहे, हेंही आपण पाहिलें).  पाकिस्तान-निर्माण  हाही धर्माशी संबंधित प्रश्न केला गेला, भाषिक नव्हे, संस्कृतसंबंधी तर नव्हेच नव्हे.

  • पुणें येथें पूर्वी पेशवे यांची राजवट असल्यामुळे, तेथें सांस्कृतिक-राजकीय-अधिसत्तेचे व भाषाव्यवहाराचें केंद्र होतें, म्हणून तेथील भाषा ही प्रमाणित भाषा झाली असें राजोपाध्ये यांचें म्हणणें आहे. (अर्थात्, त्यांनी पेशव्यांचा नांवानिशी उल्लेख केला नाहीं, पण अर्थ स्पष्ट आहे). त्यांनी mention केलेला घटक, हा एक फॅक्टर असूं शकतो, हें खरें.

इतिहासाचार्य राजवाडे सांगतात त्याप्रमाणें,  (त्यांच्या काळीं) पुण्याची मराठी ही  ‘नागर अथवा शिष्ट मराठी’ ( जिला राजोपाध्ये ‘प्रमाण-मराठी’ म्हणतात), समजली जात होती. त्याच्या ३०० वर्षें आधी पैठणची ‘ब्राह्मणी’ मराठी ही प्रमाण-मराठी समजली जात असे; व ७०० वर्षांपूर्वी, (म्हणजे, ज्ञानेश्वरांच्या काळीं) देवगिरीच्या भोवतालच्या प्रदेशातील ‘ब्राह्मणी’ मराठी  ही  प्रमाण-मराठी समजली जात असे.

आपल्याला ज्ञानेश्वरीची आज जी प्रत दिसते, ती एकनाथकालीन ‘प्रमाण-मराठी’मध्ये आहे. पण इतिहासाचार्य राजवाडे यांना पाटांगण-बीड येथें एक ज्ञानेश्वरकालीन ज्ञानेश्वरी सापडली, जी ज्ञानदेवांच्या काळानंतरच्या दोनचार दशकांमधील आहे. (श्री. माडगांवकर यांना सुध्दा अशीच त्या काळची आणखी एक प्रत मिळाली होती). त्या प्रतींची भाषा अर्थातच  ज्ञानेश्वरकालीन ‘प्रमाण-भाषा’ आहे. एकनाथांच्या काळापर्यंत  प्रमाण-भाषेचें रूप बदललें होतें, म्हणून त्यांना ज्ञानेश्वरीचें तत्कालीन भाषेत पुनर्लेखन करावे लागलें.

( हल्लीच्या काळातही, असें उदाहरण दिसतें. वरदा प्रकाशनचे भावे यांनी बर्‍याच जुन्या मराठी पुस्तकांचें पुनर्मुद्रण केले, त्यावेळी त्यांनी बदललेल्या भाषिक रूपांप्रमाणे,  जुन्या-मराठीचें आधुनिककालीन मराठीत पुनर्लेखन केलें. )

  • आपण पुणें व देवगिरीचा संबंध राज्यकर्त्यांशी जोडूं शकतो, पण पैठणचा नव्हे. पैठणचा संबंध, धर्म व संस्कृतीशी आणि विद्वज्जनांच्या वास्तव्याशी जोडलेला आहे.
  • हिंदीचें पहा. बनारस-अलाहाबादची हिंदी ही प्रमाण-हिंदी ( हिंदीत ‘मानक हिंदी ’ असा शब्दप्रयोग आहे) मानली जाते ; आणि, दोन्हींमध्ये आपसात कांहीं फरक असला, तर त्या दोघींमध्ये बनारसची हिंदी  ही प्रमाण. याचें स्पष्टीकरण काय ?  तें राजकीय तर खासच नव्हे.      तें कारण धर्मपरंपरेशी निगडित आहे. काशी व प्रयाग (अलाहाबाद) यांना हिंदु धर्मात महत्व आहे. त्याचा हा परिणाम म्हणायला हवा. या महत्वामुळे, अनेकानेक विद्वान पिढ्यान्-पिढ्या तेथें वास्तव्याला होते. त्यांच्या ज्ञानामुळे, त्यांची भाषा ही ‘प्रमाणित’ मानली गेली.
  • पुण्याची भाषा ही प्रमाण-भाषा मानली जात ‘होती ’. पण हल्लीचे जे व्याकरणाचे नियम सरकारनें १९६० च्या दशकापासून लागू केलेले आहेत, (उदा. अनुच्चारित अनुस्वार हटवणें) , त्याचा प्रचार-पुरस्कार हा विदर्भात (वि. भि. कोलते यांच्याकडून) झालेला आहे , व संयुक्त- महाराष्ट्राचें निर्माण होण्यापूर्वीच विदर्भ साहित्य संघानें तसें resolution पास करून त्याचा अवलंबही सुरूं केलेला होता . (पूर्वी नागपुर मध्यप्रदेशमध्ये होतें).  (संयुक्त) महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यावर, महाराष्ट्र सरकारनें, साहित्य महामंडळ स्थापून, त्यांच्या कमिटीला याविषयी नियम प्रस्थापित करायला सांगितलें, व त्यांच्या recommendation प्रमाणें  नवीन नियम लागू केले.   या ‘नवीन’ सरकारप्रणित ‘प्रमाणीकरणा’मागे , ‘राजकारण’  हें कारण मला तरी दिसत नाहीं. सामाजिक बाबींमुळे, भाषेचें ‘सरलीकरण’ करणें , हें तें कारण आहे. (त्याच्या योग्यायोग्यतेची चर्चा इथें अभिप्रेत नाहीं).
  • राजोपाध्ये यांनी स्पर्श केलेल्या अन्य मुद्यांचा आपण आधीच परामर्श घेतलेला आहे, त्यामुळे त्यांची पुनरुक्ती नको.
  • भाषेबद्दल, अन्य संदर्भात चर्चा पुढेही केलेली आहे.
  • पकिस्तानच्या अंतर्गत फाळणीबद्दल राजोपाध्ये यांनी मांडलेलें मत basically योग्य आहे. तेथें बंगाली भाषा या गोष्टीला सांस्कृतिक व राजकीय संदर्भ प्राप्त झाला हें खरें; पण त्याचबरोबर,  पूर्व-पाकिस्तानची  इकॉनॉमिकल व इतर सर्व दृष्टीनें गळचेपी होत होती हें अधिक महत्वाचें. आजही, पाकिस्तानात, सिंधी, बलुची वगैरे लोक असंतुष्ट आहेतच, आणि त्याचें कारण भाषिक असण्यापेक्षाही जास्त सामाजिक आहे, डेव्हपलमेंटशी संबंधित आहे, इकॉनॉमिकल आहे .
  • संस्कृत भाषा श्रेष्ठ आहे, पण तिला आतां राष्ट्रभाषा बनवतां येणार नाहीं, हे बरोबर आहे. कदाचित तें होऊं शकलें असतें तर १९४७ ते १९५० या काळातच. (तें आपण आधी पाहिलेंच आहे). पण आतां भाषिक राजकारणामुळे, तो चान्स नाहीं. सरकारमान्य एक भाषा असें मात्र तिचें स्वरूप ठेवावें, हें उचित आहे.

(पुढे चालू )

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

सांताक्रुझ (प), मुंबई.  Santacruz (W), Mumbai.

Ph-Res-(022)-26105365.  M – 9869002126

eMail   : vistainfin@yahoo.co.in

Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

 

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..