नवीन लेखन...

झुरळाने काटा काढला! – भाग 3

 

मला खूप बरे वाटले. सकाळपासून मी जाम वैतागलो होता. त्यांचे चांगले शब्द ऐकून वाटले, चला, आज पहिलाच दिवस होता, रोज काही असे होणार नाही. हळूहळू होईल दोस्ती. पण हा माझा विचार किती भ्रामक होता याची चुणूक मला लगेचच दिसून आली.

थोड्या वेळाने गोपाळ आला आणि रजिस्टर घेऊन गोरेसाहेबांना नेऊन दिली. माझे काम पाहून गोरेसाहेब आणि मॅनेजर खूश होणार याची मला शंभर टक्के खात्री होती. त्यामुळे मनातून मी खूप आंनदलो होता. गोरेने रजिस्टर बघितले, एका चिठ्ठीवर काहीतरी खरडून रजिस्टर कुलकर्णीकडे पाठविल्याचे मी पाहिले. चिठ्ठी वाचून कुलकर्णी गालातल्या गालात हसल्याचे मी पाहिले. त्याने रजिस्टर तपासल्यासारखे केले आणि एक चिठ्ठी खरडून त्या रजिस्टरमध्ये ठेवली आणि रजिस्टर मॅनेजरकडे पाठवले. मॅनेजरची केबीन काचेची होती. त्यांच्याकड़े कोणीतरी बसले होते. ते गेल्यावर मॅनेजर साहेबांनी रजिस्टर उघडले. त्यांच्या तोंडावर खूष झाल्याचा भाव मला लांबूनही कळला. पण पुढच्याच क्षणी त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्याचे मला दिसले. मी माझे काम उत्तम केले होते. त्यामुळे मला घाबरायचे काहीच कारण नव्हते. मी ढोमसेबाईंकडे पाहिले. त्यांनी हसून प्रतिसाद दिला पण समोरचा कुलकर्णी आणि पाटील मात्र महत्प्रयासाने हसू दाबत आहेत असे वाटत होते. मला काही कळेना. परंतु थोड्याच वेळात मॅनेजरनी मला बोलावले तेव्हा मी आत गेलो. मॅनेजर रोकडे, हा एक धिप्पाड माणूस होता. उग्र चेहरा आणि गालमिश्या यामुळे तो बँक मॅनेजरपेक्षा एखादा जंटलमन डाकू असावा असे वाटत होते. मी घाब घाबऱ्या त्यांच्या पुढे जाऊन उभा राहिलो. आता मॅनेजरसाहेब आपल्याला शाबासकी देणार असे वाटत असतानाच ते गरजले,

“तुमचंच नाव गावडे का?”

“होय साहेब, मीच गावडे, विलास गावडे.”

“हे तुमचेच काम ना?”

“होय साहेब, मीच लिहिलंय ते.’

“मीऽऽच्या, लिहिल्यऽऽऽ ते ऽऽ! काय लाज वाटतेय का सांगायला काही!”

“साहेब, त्यात कसली लाज? नि मला का लाज वाटावी?”

“करूनच्या सवरून पुन्हा उलटे बोलता? हे, हे तुमचे काम! काय लिहिलंय हे?”

मी पुढे होऊन रजिस्टर उचलले. त्यात एक कागद होता आणि त्यावर लिहिले होते-

‘सखी शेजारिणी तू हसत रहा, हसत रहा,

हास्यात फुले मुंफीत रहा.’

ते वाचून मी तर थक्कच झालो. अगदी हुबेहुब माझंच अक्षर! मी म्हणालो, “साहेब, हे मी लिहिलं नाही!”

‘मग काय मी लिहिलं? हे तुमचंच अक्षर ना?”

“होय साहेब, माझ्याच अक्षरासारखं दिसतंय. पण खरं सांगतो साहेब. हे मी लिहिलेलं नाही. अगदी शपथेवर सांगतो साहेब. हे माझं काम नाही.

पण साहेब भयंकर संतापले होते. त्यानं माझं काही म्हणजे काहीच ऐकून घेतलं नाही. म्हणाले, “गावडे आज तुमचा पहिला दिवस म्हणून तुम्हाला माफ करतो. पुन्हा असले फालतू उद्योग करू नका! जा, चालते व्हा!!” मी जड मुद्रेने अत्यंत अपमानित होऊन बाहेर आलो. खाली मान घालून माझ्या जागेवर बसलो. डोळे भरून आले. समोरचा कुलकर्णी हळू आवाजात शीळ वाजवून गुणगुणत होता. ‘सखे शेजारिणीऽ’ सगळा प्रकार माझ्या ध्यानात आला. हा गोरे कंपूचा डाव होता हे तर उघडच होते.

ढोमसेबाई म्हणाल्या, “काय झाले गावडे? साहेब का रागावले? तुम्ही तर छान काम केले होते, मग?”

मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला तेव्हा त्या म्हणाल्या, “गावडे, हे काम त्या कुलकर्त्यांचेच! त्याचेही अक्षर तुमच्यासारखेच सुंदर आहे. शिवाय कोणाच्याही अक्षराची तो हुबेहूब नक्कल करू शकतो. कुलकर्त्यांचे आमच्याकडे लक्ष होतेच पण आम्ही अगदी हळू बोलत होतो. त्यामुळे त्याला काही समजले नाही पण आम्ही काय बोलत असणार हे बहुधा त्याने ओळखले असावे. त्याचे उट्टे त्याने संध्याकाळी काढले. ऑफिस सुटल्यावर नोकरी मिळाल्याच्या आनंदापेक्षा दिवसभराच्या प्रसंगानी मी अत्यंत उदास होऊन बाहेर पडलो. मागून कुलकर्णी आला आणि पाठीवर थाप ठोकून म्हणाला, “काय, आजोबा कुठे राहता?’

“चिंचपोकळीला.” मी म्हणालो.

“अरे वा! मग आम्हाला द्या की कंपनी. आम्ही फास्ट ट्रेनने भांडुप, ठाणा, कल्याणला जातो. चला आमच्याबरोबर.” पाटील म्हणाला.

“नको! नको!! तुम्ही व्हा पुढे. मला फास्ट ट्रेन चालायची नाही. मी जाईन कुर्ला गाडीनं.

‘चला हो, उतरा दादरला आणि जा दुसऱ्या गाडीनं. घरी लवकर जाऊन तरी काय करणार तुम्ही?’ गोरे म्हणाले तसे सगळेच चेकाळले. त्यांनी जबरदस्तीने मला कल्याण फास्टमध्ये कोबंलं आणि दादरपर्यंत माझी यथेच्छ रेवडी उडवली. दादरला उतरल्यावर मला एका भयंकर दिव्यातून गेल्यासारखे वाटले. थोडा वेळ मी एका बाकावर सुन्न होऊन बसलो. दोन गाड्या सोडल्या. समोरच्या टी स्टॉलवर चहा घेतला तेव्हा थोडे बरे वाटले. ढोमसेबाईंवरून सगळ्यांनी माझी भरपूर टिंगल केली होती. गोरे कंपूच्या प्रवासाची रीत म्हणजे गोरे, कुलकर्णी, पाटील यांनी दरवाजाच्या चौकटीला घट्ट पकडून उभे रहायचे आणि बाकीच्यांनी त्यांच्यामागे उभे राहून चढणाऱ्यांना चढू द्यायचे नाही. बाचाबाची करायची, दादागिरी करायची अशी होती. या सर्वात गोरे पुढे. असल्या गँगबरोबर रोज प्रवास या विचारानेच मी कमालीचा भयभीत झालो. इतका की नोकरी सोडून द्यावी असाही विचार माझ्या मनात आला. पण दोन वर्षे वणवण केल्यावर मिळालेली नोकरी सोडून चालणार नव्हते. दोन वर्ष भुऱ्याने काही तक्रार न करता आधार दिला होता. त्याचे उपकार फेडायचे होते. घरी गावी पैसे पाठवणे फार निकडीचे झाले होते. ही नोकरी टिकवणे याशिवाय दुसरा मुळी पर्यायच नव्हता. साहजिकच मी माझे मन आवरले. अपमान तर रोजच गिळायला लागलो. काटा आता खूप खोल रूतला होता. थोड्याच दिवसात मला मुलुंडला या झोपडपट्टीवजा चाळीत खोली मिळाली. आणि आलिया भोगासी असावे सादर, म्हणून दिवस ढकलू लागलो. गोरेसाहेबांची हांजी हांजी करू लागलो. मनातून मात्र रोजच्या रोज त्याला शिव्यांची लाखोली वहात होतो.

-विनायक रा. अत्रे
(‘कथागुच्छ’ या कथासंग्रहातून)

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 88 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..