नवीन लेखन...

हो (ही) आणि नाही (ही) !

यशाबद्दल बोलताना हमखास दोन दावे केले जातात- वाटेवर येणाऱ्या प्रत्येक संधीला हो म्हणाल तर यशस्वी व्हाल ही पहिली विचारसरणी ! याउलट ठामपणे नकार देता आला तर आयुष्यात बरंच काही इप्सित साध्य होऊ शकतं असं मानणारा दुसरा गट!

होकार दिल्याने नवनवी दारे उघडतात,किमान किलकिली होतात, नव्या भेटीगाठी होतात, संधींना तोंड दिले की आपली छुपी क्षमता खुली होते, स्वतःचाच शोध लागतो, आणि बरंच काही अजाणतेपणी हुकण्याच्या ज्या शक्यता असतात, त्या आवर्जून वाट्याला येतात. कर्मसिद्धांतावर विश्वास ठेवणारे असेही मानतात की एखाद्याला आपण मदत करायला होकार दिला तर भविष्यात आपल्यालाही वाट्याला मदत येतेच.

“नकार “गट म्हणतो -यश हवे असेल तर शिस्त हवी,स्वतःच्या जीवनहेतूंबद्दल सुस्पष्टता हवी, वेळेचा जराही अपव्यय करू नये आणि स्वतःची “गुंतवणूक” अशा कामांमध्ये करावी जेथे परतावा (रिटर्न्स) अधिक मिळेल. समोर येईल त्या गोष्टीला स्वीकारले तर आपले व्यवधान चळते, परिणामस्वरूप आपला प्रभाव वितळतो.

कदाचित हे दोन्ही गट प्रसंगानुरूप योग्य असतात. मात्र विचारांती, अनुभवांती असे वाटते की वयाच्या चाळीशीच्या आधी लाभलेल्या संधी, आव्हाने, अडचणी या
साऱ्यांना होकार देऊन सकारात्मकतेने स्वीकारले तर यश मिळते आणि वयाच्या चाळिशीनंतर बऱ्याच गोष्टींना, प्रलोभनांना नाकारले तरीही आपण (वेगळ्या अर्थाने) यशस्वी होऊ शकतो.

जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यांवर आव्हाने स्वीकारणे, त्रासांना सामोरे जाणे, प्रचंड कष्ट करणे (त्या वयात ते शक्य असते) यातूनच विकास आणि वाढ होत असते. त्यामुळे समोर येईल त्याला हो म्हणणे हे एकप्रकारे स्वतःला घडवत जाण्यासारखे असते आणि त्याचा आपल्याला आणि स्वजनांना अभिमानच वाटू शकतो.
जेव्हा आपण शिकत असतो,ठेचकाळत असतो तेव्हा काय शिकायचे आहे,कोणाबरोबर राहायचे आहे, आपल्यातल्या सुप्त क्षमता कोणत्या हे सारे शोध वयाच्या आधीच्या टप्प्यावर लागणे आवश्यक असते. खुल्या मनाने समोर येईल ते शिकत, चुकत, स्वतःवर प्रयोग करत, अगदी वेळ वाया जातो आहे हे जाणविले तरीही मागे न हटता, क्वचित ढोपरं फोडून घेत, पण उंची गाठायची असते. तारुण्यात वेळ गमाविण्याची खंत कमी टोकदार असते आणि बरंच हातात असतं. ट्रायल आणि एरर हा शिकण्याचाच हिस्सा असतो.

तरुण पिढीतील नवे नेतृत्व अशा कमी हाताळलेल्या वाटांवर चालायला उत्सुक असते, जोखिमी अंगावर घ्यायला पुढे सरसावते, इतरांना मदत करायला अनमान करीत नाही आणि भीतीदायक वाटचाल करताना मागेपुढे पाहात नाही.

मात्र केव्हातरी ही गणिते बाजूला सारता यायला हवीत. आयुष्याच्या उत्तरायणात जेव्हा नीतिमूल्ये ठरतात, नातीगोती घट्ट होतात, हवे ते हस्तगत झाले असते अशावेळी आपले प्राधान्यक्रम ( ऊर्जा, स्वास्थ्य, मनोरंजन,छंद इत्यादी) ठरविता आलेच पाहिजेत आणि मुख्य म्हणजे भीड बाजूला ठेवून ” नाही” म्हणता आले पाहिजे. आताही वारंवार हो म्हणणे म्हणजे आपल्या अग्रक्रमांना बाजूला सारणे आणि पर्यायाने मनःस्वास्थ्य गमावण्यासारखे असते. गंमत म्हणजे उत्तरायणात तुमच्या अनुभवांमुळे, यशामुळे बरीच मंडळी तुमच्यावर दावा करायला हक्काने पुढे येत असतात आणि तुमचे नकार अवघड करून टाकत असतात. साऱ्यांनाच तुमचा आधार,मार्गदर्शन,सल्ला,मदत हवी वाटते. हे अतिक्रमण सौम्य, मृदू व्यक्तींना त्रासदायक ठरते. अशा व्यक्ती मग आपल्या सीमारेषा वारंवार पुढे ढकलतात आणि सर्वांनाच “आव-जाव घर तुम्हारा ” अशी वाट मोकळी करून देतात. काहीवेळा आगंतुकांची कामे माझ्या लायकीची आहेत का,मी त्यासाठी माझ्या आयुष्याचा काही तुकडा द्यायचा का हे स्वानुभवावरून ठरवावे लागते आणि ग्रेसफुली नकार देण्याचे कौशल्य (उतारवयातही) शिकावे लागते.
“हो” म्हणणे जितके दरवाजे किलकिले करू शिकते, तितकेच “नाही” म्हणून बंद करता आले तर विचलित न होता स्वतःचे नवे कीर्तिमान स्थापन करता येतात.
” एका गोष्टीला होकार देण्यासाठी इतरांना नकार देणे शिकू या.”

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..