नवीन लेखन...

ये रेशमी जुल्फे

मुमताजसाठी शहाजहानने ताजमहाल बांधला, हे इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं होतं. आमच्या पिढीनं हिंदी चित्रपटातील मुमताजसाठी, आपापल्या हृदयालाच ‘ताजमहाल’ केलेलं होतं…

१९४७ साली जन्माला आलेल्या या अपऱ्या नाकाच्या मुमताजने लहानपणापासूनच चित्रपटात काम करायला सुरुवात केली. ‘गहरा दाग’ चित्रपटातील हिरोच्या बहिणीच्या भूमिकेपासून तिची खरी कारकिर्द सुरु झाली. इतर छोट्या मोठ्या भूमिका करताना, दारासिंगच्या सोळा ‘स्टंट’ चित्रपटात, तिने त्याला मोलाची साथ दिली.

‘सूरज’, ‘सेहरा’, ‘ब्रम्हचारी’, ‘पत्थर के सनम’, ‘मेरे सनम’, ‘आदमी और इन्सान’, ‘हमराज’, ‘काजल’, ‘गौरी’, ‘सावन की घटा’ इत्यादी चित्रपटातून तिने सहाय्यक भूमिका केल्या.

चंद्रकांत काकोडकर या मराठी लेखकाच्या ‘निलांबरी’ कथेवरुन, तयार झालेल्या ‘दो रास्ते’ या चित्रपटाने तिचं आयुष्यच बदलून टाकलं. राज खोसला यांचं दिग्दर्शन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं सुमधुर संगीत, आनंद बक्षी यांची अवीट गोडीची गाणी हे ‘दो रास्ते’च्या यशाचं गमक होतं. राजेश खन्ना व मुमताज या दोघांच्या, याच चित्रपटापासून जुळलेल्या केमिस्ट्रीने यानंतरचे त्यांचे नऊही चित्रपट सुपरडुपर हिट ठरले.

खूप उशीराने गणपतीच्या दिवसांत जेव्हा ‘दो रास्ते’ चित्रपट पाहिला, तेव्हा मी आठवीत होतो. चित्रपट तर आवडलाच, त्यातूनही ‘ये रेशमी जुल्फे…’ हे गाणं डोक्यात ‘फिट्ट’ बसलं. दाढीवाला राजेश खन्ना व पंजाबी ड्रेसमधील मुमताज त्या वयात जाम आवडली होती.

‘खिलौना’ या गाजलेल्या चित्रपटातील तिच्या लक्षवेधी भूमिकेबद्दल तिला फिल्मफेअरचा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तिने दिलीप कुमार बरोबर ‘राम और श्याम’ चित्रपटात काम केले व देव आनंद बरोबर ‘हरे राम हरे कृष्ण’ व ‘तेरे मेरे सपने’ चित्रपटात काम केले, मात्र राज कपूर बरोबर तिला‌ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली नाही.

शम्मी कपूरने तिच्याबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी तिने करियरचा महत्त्व देऊन, त्याला स्पष्ट नकार दिला. संजय खान, फिरोज खान देखील तिच्यासाठी असेच आतुर होते.

‘अपराध’ चित्रपटात फिरोज खान सोबत ती फारच सुंदर दिसली आहे. ‘हरे राम हरे कृष्ण’ चित्रपटात ती खरोखरची नेपाळी मुलगी भासली. या चित्रपटाच्या यशाने तिला भरपूर प्रसिद्धी मिळाली.

राजेश खन्ना बरोबरचे तिचे ‘रोटी’, ‘आप की कसम’, ‘अपना देश’, ‘सच्चा झूठा’, ‘दुष्मन’ हे चित्रपट मी पुन्हा पुन्हा पाहिले. जितेंद्र बरोबरचे ‘जिगरी दोस्त’, ‘हिम्मत’, ‘रूप तेरा मस्ताना’ फार आवडले.

कधी ती गांव की छोरी, कधी बायस्कोप दाखविणारी अल्लड तरूणी, कधी मजबूर तवायफ तर कधी ती सालस पत्नी झाली. कधी प्रेमिका तर कधी बिंधास्त टपोरी झाली. प्रेक्षकांनी तिला प्रत्येक भूमिकेत आनंदाने स्वीकारले. १९७७ च्या ‘आईना’ चित्रपटानंतर तिने चित्रसंन्यास घेतला व मयूर मधवानी याच्याशी लग्न करुन ती लंडनमध्ये स्थायिक झाली. तिला दोन मुली आहेत. तिच्या मोठ्या मुलीचे फिरोज खानचा मुलगा, फरदीनशी लग्न झालेलं आहे.

तेरा वर्षांनंतर तिने ‘आंधिया’ या चित्रपटातून पुनरागमन केलं. मात्र तो फारसा यशस्वी न झाल्याने ती पुन्हा लंडनला गेली.

वयाच्या त्रेपन्नव्या वर्षी तिला कॅन्सरने ग्रासले. वेळीच उपचार करुन ती त्यातून सुखरूप बाहेर पडली. आज तिने पंचाहत्ताराव्या वर्षांत पदार्पण केलं आहे. तिला तिच्या एकूण सिने कारकिर्दीबद्दल समाधान आहे. कोणत्याही मुलाखतीत तिने कुणाबद्दलही तक्रार किंवा खेद व्यक्त केलेला नाही.

पंच्याहत्तर वर्षांच्या आयुष्यात तिने दहा वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची हवा निर्माण केली होती. शंभराहून अधिक चित्रपटांतून तिने आपला वेगळा, ठसा उमटवला होता…

पूर्वी रविवारी सकाळी दूरदर्शनवरील ‘रंगोली’ कार्यक्रमात तिचं एक जरी गाणं पाहिलं तरी संपूर्ण दिवस आनंदात जायचा.. आता मात्र या भरमसाठ चॅनेल्सच्या गर्दीत ‘दूरदर्शन’ हरवून गेलंय.. कधी रिमोटने चॅनेल बदलताना, अचानक ‘ये रेशमी जुल्फे..’ गाण्यातील मुमताज दिसली की, माझ्या काळजाचा ठोका चुकतो…

© सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

३१-७-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..