नवीन लेखन...

श्री चीनची अद्वितीय सम्राज्ञी वू झाओ

श्री चीनची अद्वितीय सम्राज्ञी

चीनच्या इतिहासात इ.स. ६६० मध्ये वू झाओ ही विलक्षण व्यक्तिमत्त्वाची स्त्री सम्राज्ञीपदावर विराजमान होऊन गेली. वू झाओपूर्वी किंवा नंतरही चीन देशात कुणा स्त्रीला सम्राज्ञीपद लाभले नाही. त्यामुळेच चीनची एकमेव सम्राज्ञी असे वू झाओला म्हटले जाते.

चीनच्या इतिहासातच काय पण जगाच्या इतिहासात वू झाओसारखी राज्यकर्ती वा सम्राज्ञी कुणा देशाच्या सिंहासनावर विराजमान झालेली नसावी. अशी सम्राज्ञी कुणी पाहिलीही नसेल.

सातव्या शतकातील चीनमधील राजघराण्यावर प्रभुत्व मिळविण्यासाठी दुर्दम्य पोलादी इच्छाशक्ती आणि जबरदस्त अहंकार या गुण व अवगुणांचा समतोल राखणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची आवश्यकता होती. वू झाओला असे व्यक्तिमत्व प्राप्त झालेले होते. पुरुषसत्ताक जगात जेव्हा एखाद्या स्त्रीला सम्राज्ञी म्हणून पद जिंकायचे असते तेव्हा तिच्या व्यक्तिमत्त्वात परस्परविरोधी गुण-अवगुण पुरेपूर भरलेले असणे आवश्यकच असावे.

वू झाओचे पूर्वायुष्य पाहिल्यास ती सम्राज्ञीपदावर कशी पोहोचू शकली याचे आश्चर्य वाटते. घरंदाजपणाचा, शिक्षणाचा आणि संस्कारांचा अभावच असलेले पूर्वायुष्य वू झाओच्या नशिबी आलेले होते. वयाच्या चौदाव्या वर्षी ती कोण होती? चीनचा तत्कालीन सम्राट ताई त्सुंगच्या दरबारातील शंभर रखेल्यांपैकी किंवा अंगवस्त्रांपैकी एक, एवढीच भूमिका वयाच्या चौदाव्या वर्षी व झाओला करावी लागली होती!

शंभर रखेल्यांपैकी एक असली तरी वू झाओ शंभरजणींत उठून दिसावी अशी सुंदर होती! सौंदर्याची देवदत्त देणगीच तिला नुसती लाभलेली नव्हती, तर अत्यंत चलाख बुद्धी, विलक्षण महत्त्वाकांक्षा आणि उद्योगशीलता हे गुण घेऊन ती जन्मास आली होती. सत्ता, संपत्ती, द्वेष आणि आकर्षक वेषभूषा म्हणजे पराक्रमी शक्तिमान पुरुषाची नजर आणि हृदय काबीज करण्याचे मौल्यवान भांडवलच असते, हे वू झाओ जाणत असावी. त्यामुळेच तिच्या आयुष्यात आलेली प्रत्येक संधी तिने खेचूनच घेतली. मार्गात आलेल्या प्रतिकूल गोष्टी अल्पकाळातच अनुकूल करून घेतल्या.

चिनी सम्राट ताई त्सुंग याच्या दरबारातील प्रथम क्रमांकाची रखेली म्हणून स्थान मिळविण्याची तिची पहिली महत्त्वाकांक्षा असावी. त्या दृष्टीने वू झाओने अनेक खेळी खेळल्या असाव्यात. तिची सर्वात चलाख खेळी म्हणजे सम्राटपुत्र काओ त्सुंग याचे हृदय काबीज करणे! तिला नशिबाची साथही चांगली लाभली. सम्राटपुत्राप्रमाणे नशीबही तिच्यावर फिदा झाले असावे. कारण काही वर्षांतच सम्राट ताई त्सुंगचे निधन झाले आणि त्याचा पुत्र आणि वू झाओचा प्रियकर सिंहासनावर विराजमान झाला.

काओ त्सुंग या सम्राटाचे प्रेम एक रखेली म्हणून वू झाओला लाभलेले होते. परंतु प्रथेप्रमाणे अनेक रखेल्या दरबारात होत्याच. वू झाओला आपला उज्ज्वल भविष्यकाळ दिसत असतानाच वर्तमानातील अडथळेही दिसत होते. तिने आपल्या प्रेमाची अशी काही जादूची कांडी फिरवली, की काओ त्सुंग या नव्या सम्राटाने दरबारातील सर्व रखेल्यांचा निरोपच घेतला. त्या सर्व रखेल्यांना बोटीत बसवून चर्चमध्ये राहण्यासाठी पाठविण्यात आले!

वू झाओपासून काओ त्सुंगला एक पुत्र झाला. त्यामुळे पहिल्या क्रमांकाची रखेली असलेली वू झाओ सम्राटास त्याच्या सम्राज्ञीपेक्षांही अधिक प्रिय वाटू लागली. वू झाओच्या बलवत्तर नशिबामुळे सम्राज्ञी ही निपुत्रिक होती!

उच्चपदस्थ होण्यासाठी पुरुषांचा वापर करण्याची चाल वू झाओ मोठ्या चलाखीने खेळली होती. अशा खेळी खेळणाऱ्या अनेक स्त्रिया आजही देशोदेशी दिसतात. परंतु प्राचीन चीनमध्ये वू झाओची खेळी तिच्या जन्मजात बुद्धिमत्तेची व महत्त्वाकांक्षी स्वभावाची द्योतकच होती. त्या काळात स्वबळावर यश मिळवण्याची संधी स्त्रियांना चीनमध्ये उपलब्ध नव्हती हे ध्यानात घ्यायला हवे. असे असूनही प्राप्त संधीचा लाभ उठवून चीनच्या आणि आंतरराष्ट्रीय इतिहासाच्या भिंतीवर आपले नाव वू झाओने अनंतकाळासाठी कोरून ठेवले आहे.

वू झाओने सहजासहजी यश मिळविलेले नव्हते. अनेक अडचणींना तिला तोंड द्यावे लागले होते. सम्राज्ञीने आणि दरबारातील क्रमांक एकच्या रखेलीने वू झाओचा विलक्षण द्वेष केलेला होता. तिच्याविरुद्ध कटकारस्थानेही रचली गेली होती. परंतु सम्राटाला जिंकून वू झाओने शत्रूपक्षास तुरुंगाची हवा चाखायला लावून शेवटी त्यांना ठार मारण्यात येईल, हेही पाहिले होते. काट्याने काटा काढण्यात वू झाओ पटाईत होती.

अखेरीस शांत वृत्तीने सर्व शत्रूंचा निःपात करून आपल्या वयाच्या एकतिसाव्या वाढदिवसाला तिने सम्राज्ञीपद मिळविले होते.

वू झाओच्या स्वभावाचे एक फार मोठे वैशिष्ट्य होते. स्त्री स्वभावाविरुद्ध पट्टीच्या आतल्या गाठीच्या राजकारणी पुरुषाप्रमाणे तिचा स्वभाव असावा. त्यामुळे स्वतःच्या समस्या ती चव्हाट्यावर मांडत नसे. आपल्या शत्रूंविषयी वा अडथळ्यांविषयी वा समस्यांविषयी ती कुणाशीही चर्चा करीत नसे. जर एखादी कुणी व्यक्ती किंवा तिच्या कुटुंबातील वा नोकर माणसांतीलही कुणी व्यक्ती तिच्या महत्त्वाकांक्षेच्या मार्गात आडवी आली तर वू झाओ ती व्यक्ती कायमची अदृश्य होईल हे पाहत असे. त्यासाठी तिची स्वतः तःची खास संयोजन पद्धती होती!

इ.स. ६६० मध्ये वू झाओला प्रिय असणारा परंतु बेताचीच बुद्धी असणारा तिचा पती असलेला सम्राट पोलिओग्रस्त झाला. क्षणाचाही विलंब न लावता सम्राज्ञीपदाचा मुकुट आपल्या मस्तकी चढवून ती चीन देशाच्या सिंहासनावर आरूढ झाली.

सम्राज्ञीपदावर येताच वू झाओने पहिल्याप्रथम कोरियाच्या दिशेने चाल करून समुद्रमार्गे कोरियावर आक्रमण करण्याचा आदेश आपल्या सैन्याला दिला. इतकेच नव्हे, तर कोरियाचा प्रदेश चीनला जोडूनही घेतला!

वू झाओ ही उत्तम प्रशासक होती. स्त्री असूनही भावनाविवशता तिला ठाऊक नव्हती. स्वभावाने ती कठोर निर्दयीच होती. निर्णय घेण्याची क्षमता व दूरदृष्टी तिच्याजवळ होती. तिच्या राज्यात चीनला दीर्घकाळ शांतीचा काळ लाभला होता. तिने अनेक लोकप्रिय आणि लोकोपयोगी गोष्टी केल्या. सरकारी यंत्रणेत सुधारणा घडविल्या. नवीन रुग्णालये निर्माण केली. मानसिक रुग्णांसाठी मानसोपचार केंद्रांची स्थापना केली. राजधानीत नवीन इमारती उभारल्या.

वू झाओला आर्थिक दृष्टिकोनही असावा आणि कलादृष्टीही असावी. तिने आपल्या राज्यातील करांचा दर कमी करून रयतेला दिलासा दिला. कला, काव्य आणि संस्कृतीचा विकास व्हावा म्हणून धोरण आखले.

स्त्री – स्वातंत्र्याबाबत वू झाओने स्वतःचा दृष्टिकोन प्रस्थापित केल्याचे जाणवते. स्त्री-संस्कृतीची पातळी उंचावण्यासाठी जे जास्तीत जास्त उत्तम करणे शक्य होते ते वू झाओने स्त्री म्हणून नेतृत्व करून केले. तिच्या कारकिर्दीपर्यंत चीनमध्ये फक्त पुरुषप्रधान असाच सत्तारचनेचा ढाचा होता; परंतु हा ढाचा बदलून वू झाओने मातृसत्ताक राज्यपद्धतीचा ढाचा अंमलात आणला होता.

चीनच्या इतिहासातील वू झाओचा काळ मुलींच्या दृष्टीने प्रगतीचाच होता. स्त्रियांना मुक्तता होती किंवा स्त्री-स्वातंत्र्य त्या काळात होते, असे आपल्याला म्हणता येणार नाही. तरीही, उच्च वर्गात जन्मलेल्या मुलींना कलाविषयक शिक्षण शाळांतून दिले जात होते. त्याचप्रमाणे चित्रकला, संगीत आणि साहित्य या कलांची जोपासना करण्यास त्या मुलींना समाजमान्यता होती.

चीन देशात हजार-बाराशे वर्षांपूर्वीपासून अगदी १९२५ पर्यंत (सुन यत्सेन या चीनच्या राष्ट्रपित्याने बेकायदेशीर ठरवीपर्यंत) मुलगी दोन वर्षांची झाली की तिची आई तिच्या पावलांची हाडे दगडाने ठेचून मोडून त्यांची वाढ खुंटवून तिची पावले बुटात बांधून ठेवीत असे. हाताची मूठ वळावी तसे पावलांचे मुटकुळे तयार व्हायचे! नखे वाढत राहायची. ती सलायची. मुटकुळ्यात घुसायची. जखमा व्हायच्या. पायातून रक्त-पू वाहायचा. हे सारे सौंदर्याचे लक्षण म्हणून करायचे ! तीन इंची पाय म्हणजे सौंदर्याची सीमा मानली जायची. थ्री इंच गोल्डन लिली असा कौतुकाचा किताब दिला जायचा. हे पाय पुरुषांना कधीच दिसत नसत! रात्री झोपतानाही पट्ट्या बांधलेल्याच! आवळून बांधलेल्या या पायांवर विणकाम केलेले चढाव घालण्यात येत. असे चिमणे चिमुकले पाय कुरवाळणे चिनी पुरुषांना फार आवडायचे!

मात्र वू झाओच्या राज्यात स्त्रियांना कलोपासना करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात होते. स्त्रियांची सुंदर पावले बुटांत बांधण्याच्या अमानुष परंपरेस सौंदर्यद्योतक म्हणण्याची अर्धवट शहाणपणाची शक्ती असलेला पुरुषवर्ग वू झाओच्या कारकिर्दीत तरी नसावा!

(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..