नवीन लेखन...

शब्द, अक्षर, भाषा : कृपया ‘चारोळी’ म्हणूं नका

चार ओळींच्या काव्याला ‘चारोळी’ म्हणून संबोधण्याची पद्धत गेली कांहीं वर्षें बळावली आहे. कुण्या कवीनें तें नांव चार ओळींच्या (विनोदी व हलक्याफुलक्या) कवितेला दिलें, व योगायोगानें तेंच नांव मराठीत रूढ झाले. चारोळी म्हणजे अर्थातच, ‘चार ओळी’ . तसेंच, चारोळी हा पदार्थ बदाम-पिस्ते-काजू यांच्यासारखा सुका मेवा. खाण्याच्या अनेक पदार्थांमध्ये चारोळी वापरतात. त्या संदर्भातील अर्थ , काव्याचें ‘चारोळी’ हें नामाभिधान करतांना , त्या कवीच्या होता की काय, नकळे.

हलक्याफुलक्या काव्याला ‘चारोळी’ हें नांव चालून गेलें ; पण गंभीर किंवा चिंतनपर, विचारप्रवर्तक  काव्याचें काय ? मला तरी अशा प्रकारच्या काव्याला ‘चारोळी’ जें नांव अयोग्य ( अन्.सूटेबल् ) वाटतें ; खरें तर तें  जरा ‘थिल्लर’च वाटतें . ( ‘चारोळी’ या नांवावर प्रेम असणार्‍यांनो, माफ करा).

संस्कृतमध्ये चार ओळींच्या काव्याला एक नांव आहे ‘चतुष्पदी’. जयदेवाच्या गीत-गोविंद मधील ‘अष्टपदी’ प्रसिद्ध आहे ; आणि अर्थात् तें आठ-आठ ओळींचें काव्य आहे. तसेंच, ‘चतुष्पदी’ हें चार ओळींचें काव्य आहे. वामनपंडितानें संस्कृत श्लोकांचें मराठीकरण करतांना अशा अनेक चतुष्पद्या रचलेल्या आहेत. कांहीं छंदातील पद्य हे चार पंक्तींचें असतें ( म्हणजेच, ती चतुष्पदी असते), जसें रामरक्षेतील कांहीं श्लोक. श्लोक हे दोन ओळींचे  किंवा चार ओळींचे असूं शकतात. ‘गाथा सप्तशती’ या महाराष्ट्री भाषेमधील पद्य साधारणतया दोन ओळींचें आहे, म्हणजेच ती द्विपदी आहे. गाथा सप्तशतीच्या मराठी पद्यानुवादात कवी राजा बढे यांनी दोन ओळींच्या काव्याच्या भाषांतरात कांहीं ठिकाणी द्विपदी तर कांहीं ठिकाणी चतुष्पदी वापरलेली आहे.

चार ओळींच्या काव्याला संस्कृतात आणखी एक नांव आहे, व तें म्हणजे ‘मुक्तक’. चतुष्पदीतील काव्य   चार-चार ओळींचें असलें तरी, एक चतुष्पदी दुसरीशी लिंक्ड्-अप् असूंही शकते. पण मुक्तक हें मात्र चार ओळींचें स्वतंत्र काव्य असतें ( जशी ‘चारोळी’ असते, तसेंच) ; एका मुक्तकाचा दुसर्‍याशी संबंध नसतो.

जपानीतील तीन ओळींचा प्रत्येक ‘हायकू’ स्वतंत्र असतो, तसेंच हें . मराठीत हायकूला ‘हायकू’ हेंच अभिधान आहे.

फारसीतही चार ओळींचें काव्य आहे, ‘रुबाई’, उदा. उमर खय्यामच्या रुबाया. रुबाई  चार ओळींचें स्वतंत्र काव्य आहे. रुबाई हें नांव , व त्या प्रकारचें काव्य,  फारसीतून उर्दूत आले. आतां मराठीतही रुबाई लिहिली जाते, व तिला ‘रुबाई’च म्हणतात.

हल्ली दोन ओळींच्या, उर्दू-फारसीच्या धर्तीवर लिहिलेल्या ‘शेर’ ला मराठीत कांहीं लोक ‘द्विपदी’  म्हणूं लागले आहेत. मात्र, ‘शेर’ हें नांव मराठीत अधिक प्रचलित आहे.

कवी अनिल यांनी जें दहा ओळींचें काव्य लिहिलें, तें गझलपेक्षा वेगळें होतें, म्हणून त्यांनी त्याला ‘दशपदी’असें संबोधलें. जशी अष्टपदी, तशी दशपदी.

मध्ययुगीन हिंदीतही चार ओळींचें काव्य आहे ‘चौपाई’. त्याचा अर्थ स्पष्ट आहे. जो अर्थ ‘चतुष्पदी’ या नांवाचा, तोच अर्थ ‘चौपाई’ या नांवाचा. चौपाई स्वतंत्रही असूं शकते, किंवा लिंक्ड्-अप् सुद्धा ( जसें तुलसीदासांचें रामचरितनमानस) . रुबाईसुद्धा हिंदीत रुबाई या नांवानेंच ओळखली जाते.

फारसीतून विविध काव्यप्रकार रेख्ता (उर्दू) मध्ये आले, तेव्हां तिनेंही त्यांची फारसी नांवेंच स्वीकारली. एवढेच काय,  पण फारसीत जेव्हां अरबी काव्यप्रकार आले, (जसें की, क़ता, क़सीदा, मसनवी, नात, वगैरे), तेव्हां फारसीनेंही अरबी नांवें स्वीकारली.

काव्यप्रकारांचा विचार केल्यास, इटालियन व इंग्रजीतील ‘सॉनेट’ याला मिळताजुळता शब्द ‘सुनीत’ हा मराठीत प्रचलित झालेला आहे. ग़ज़ल या फारसी-उर्दू प्रकाराला मराठीत ‘गझल’ हेंच नामाभिधान आहे. हिंदीत कांहीं कवींनी ( जसें की, नीरज), ग़ज़लसाठी ‘गीतिका’ वगैरे शब्द रूढ करायचें प्रयत्न केले, पण ते रुजले नाहींत, व हिंदीत आजही या काव्याला ‘ग़ज़ल’ असेंच म्हणतात. गझल जेव्हां टर्किश  भाषेमध्ये गेली, तेव्हां त्या भाषेनेंही गझल हेंच नांव स्वीकारले.

संस्कृतमधील ‘श्लोक’ या प्रकाराला मराठीत व हिंदीतही श्लोक असेंच म्हणतात. ‘दोहा’ हा हिंदी काव्यप्रकार उर्दूमध्ये गेला, तेव्यां त्याला उर्दूतही ‘दोहा’ असेंच म्हणूं लागले. चार ओळींच्या पद्याला हिंदीत ‘मुक्तक’ असेंच म्हणतात . ( रुबाई व मुक्तक यांच्या यमकपद्धतीत फरक आहे) .

इंग्रजीनेंही इटालियन भाषेतून चौदा ओळींचा  ‘सॉनेट’ हा काव्यप्रकार घेतला, तेव्हां त्याला तेंच नांव दिलें. पुढे तर, या चौदा ओळींमध्ये कसें विभाजन करायचें, ही पद्धत इटालियनपेक्षा इंग्रजीत भिन्न झाली ; तरीपण इंग्रजीनें काव्याचें नांव न बदलतां, ‘सॉनेट’ हेंच नांव चालूं ठेवलें. हायकू, रुबाई, गझल, वगैरे परभाषेतून आयात केलेल्या काव्यप्रकारांचेंही नांव इंग्रजीनें बदललें नाहीं.

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा विचार केला तर, हिंदीतील ख़याल ( ख्याल या नांवानें) , अस्ताई (म्हणजे स्थायी), अंतरा ; तसेंच ध्रुपद, धमार, ठुमरी, चैती ( चैत = चैत्र ) , होरी ( होळी), टप्पा, तराना ( तराणा), बंदिश, वगैरे शब्दही मराठीत तसेच ( सेऽम् )  वापरले जातात.  अस्ताई शब्दाची तर गंमत आहे. हिंदीभाषी लोक ‘स्थाई‘ असा प्रकारच्या शब्दाचा उच्चार करतांना त्याला आधी ‘अ’ जोडून उच्चार करतात, म्हणून तें ‘अस्ताई’. मराठीत अशी ‘अ’ जोडायची पद्धत नाहीं, तरीही मराठीत आपण संगीताच्या संदर्भात, ‘अस्ताई’ हा शब्दच वापरतो. काव्याच्या संदर्भात ‘ध्रुवपद’ व ‘कडवें’ हे शब्द वापरले जातात ; मात्र संगीतात, ‘अस्ताई’ व ‘अंतरा’ हे शब्दच मराठीत वापरले जातात.

या सर्व पार्श्वभूमीवर, असें म्हणावेसें वाटतें की, जर ‘शेर’, ‘रुबाई’,  गझल, ‘हायकू’ , अस्ताई, ठुमरी, वगैरे  त्या त्या भाषांमधील शब्द मराठीतही वापरले जातात, तर मग चार ओळींच्या ‘मुक्तका’ला मराठीत ‘चारोळी’ असें नांव देऊन ‘अन्.डिग्निफाय्’ करण्याचें कारण काय ? खरें तर, पूर्वी मराठीतही अशा काव्याला ‘मुक्तक’ म्हणत असत व तसें अभिधान मी स्वत: जुन्या मराठी काव्यांमध्ये वाचलेलें आहे.

गेल्या कांहीं दशकांमध्येच हें ‘चारोळी’ नांव रूढ झालें. विनोदी  ‘गझल’ला जसें ‘हझल’ हें नांव आहे, तसें एक वेळ विनोदी व हलक्याफुलक्या चतुष्पद्यांना ‘चारोळी’ म्हटलें तर तें चालण्यांसारखें आहे. पण,  कमीत कमी ( अॅट-लीस्ट ), गंभीर, चितनपर,  विचारप्रवर्तक ( रुबाईव्यतिरिक्त) चतुष्पदीला ,  ‘चारोळी’ हें खटकणारें नांव न वापरतां, चार ओळींच्या काव्याला ‘चतुष्पदी’ किंवा  ‘मुक्तक’ असेच नांव आपण मराठीत चालूं ठेवूं या.

सुभाष स. नाईक
Ph-Res- 022-26105365
M- 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com , www.snehalatanaik.com

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..