व्हॉईस गुरु- दिपक वेलणकर

काही माणसं आपल्या काही खास कारणासाठी लक्षात राहतात. कधी त्यांच्या व्यक्तीमत्वासाठी तर कधी अनोख्या आवाज शैलीमुळे. आवाज आणि बोलणं तेव्हाच प्रभावी ठरतं ज्यावेळी भाषा, उच्चार आणि आत्मविश्वासाची जोड असते आणि अशी माणसं हमखास चारचौघात सहाजिकच आपली छाप पाडून जातात.

आवाजाच्या क्षेत्रातलं प्रभावी व्यक्तीमत्वं, ज्यांनी माध्यम तसेच मनोरंजनाच्या क्षेत्रात आपली मोहोर उमटवलेली, अशीच एक व्यक्ती म्हणजे दिपक वेलणकर. आकाशवाणी, दूरदर्शन, नाटक, मालिका, डबिंग, सूत्रसंचालन आणि व्हॉईस ओव्हर मुळे त्यांनी आवाजाच्या प्रभावी विश्वात स्वत:ची अनोखी ओळख आत्तापर्यंत निर्माण केली आहे. ”लहानपणापासूनच रेडिओ ऐकण्याची हौस आणि छंद. तेव्हा आपणही याच क्षेत्रात काहीतरी करावं असं वाटत असे” असं दिपक वेलणकर सांगतात. त्यासाठी आवाज आणि संवाद कलेतले निपुण आणि जाणकार अशोक रानडे यांच्याकडे रितसर मार्गदर्शन घेत या क्षेत्रात त्यांनी पदार्पण केलं. सोबतच वाचन, चिंतन, मनन या गुणांमुळे आवाज क्षेत्रात खुपच फायदा झाल्याचंही ते सांगतात. पण सुरुवात आकाशवाणीतून झाल्यामुळे निश्चितच प्रगतीसाठी खुप उपयोग झाला, असंही ते आवर्जून सांगतात.

वेलणकरांच्या कारकिर्दीची सुरुवात ही आकाशवाणीच्या कामगार सभा या कार्यक्रमासाठीच्या नैमितिक उदघोषक या पदापासून झाल्यामुळे जबाबदारी सोबतच प्रयोगशील वृत्तीही वाढीस लागली. आणि हळूहळू ”इलेक्ट्रॉनिक माध्यम” जसजसं विस्तारत गेलं तसं या क्षेत्रात काम करण्याची त्यांची आवड तसेच जिद्दही वाढतच गेली. रितसर आवाजाचा रियाज, त्याचबरोबर प्रचंड मेहनत करण्याच्या क्षमतेमुळेच आज दिपक वेलणकर हे नाव माध्यम क्षेत्रात यशस्वी ठरलंय. पण फक्त पडद्यामागे न राहता दूरचित्रवाणीवर वृत्तनिवेदक म्हणूनही वेलणकर यांनी आपल्या सहज ओघवत्या तसंच आगळी वेगळी शैली निर्माण करत वृत्तनिवेदनात आणि सूत्रसंचलनात नाव प्रस्थापित केलं. म्हणूनच ”वृत्तनिवेदक – दिपक वेलणकर” असं ऐकताक्षणीच डोळ्यासमोर येतं एक भारदस्त व्यक्तीमत्वं ज्यांना आवाजाची अनमोल देणगी आहे, ज्यात अनोखेपण लपलंय हेच मनात आल्यावाचून राहत नाही. अभिनयाची लहानपणापासूनच आवड असलेल्या दिपक वेलणकर यांनी नाटकांमध्ये, मालिकांमधूनही आपल्यातल्या अभिनयाची अदाकारी दाखवत त्यामध्येही आवाजाचं योग्य ताळतंत्र जपलंय. अभिनयाच्या वेगवेगळ्या प्रांतात आवाजाची पातळी किती असावी याची योग्य जाण असल्यानं त्यांच्या भूमिकाही यशस्वी ठरल्यात. तसंच जाहिरातीतल्या प्रत्येक पात्राची मानसिकता समजून घेत त्यानुसार आवाजासाठी डबिंग केल्यानं जाहिरातीतला आशय प्रेक्षकांपर्यंत अगदी समर्थपणे पोहोचतो, असे त्यांचे मत आहे.

याव्यतिरिक्त लेखन, भाषांतरं यांसारख्या विषयात दिपक वेलणकरांनी प्रभुत्व मिळवलंय. विविध वृत्तपत्रांमधून लेखन आणि एकूणच पत्रकारितेतसुध्दा त्यांनी भरीव योगदान दिलेलं आहे.

आज मनोरंजन आणि करमणूक अशा दोन्ही कलेच्या क्षेत्रात यशस्वी घोडदौड प्राप्त केल्यावर या क्षेत्रात करिअर करु इच्छिणार्‍या तरुण पिढीला तसंच विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शनाचं मोलाचं कार्य त्यांनी हाती घेतलंय. अगदी शास्त्रोक्त पध्दतीने सर्वच वयोगटातील, वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना कार्यात यशस्वीतेसाठी आत्मविश्वासासोबतच प्रभावी बोलणंही कसं असायला पाहिजे इथपर्यंत सर्व शिक्षण आज वेलणकर आपल्या कार्यशाळेतून देत असतात. वृत्तवाहिन्या तसेच नामवंत कंपन्यातील अधिकारी अशा अनेक व्यक्ती त्यांच्या मार्गदर्शनामुळे यशस्वी झालेत.

दिपक वेलणकरांना त्यांच्या आवाजाविषयी विचारले असता ते म्हणतात, ”माझ्या आवाजाला प्रभावी बनवण्यासाठी मी गुरुजींच्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्व बाबींचं पालन करत गेलो. आवाजाला अनोखं बनवण्यात त्यावर विविध व्यायाम प्रकार आणि इतर संस्कार केले. जसं शरीराला सुदृढ बनवण्यासाठी योग्य आहार-विहाराची गरज असते तसेच आवाजाला योग्य पैलू पाडले की त्यात निराळेपण येतं.”

आज पंचवीस वर्षानंतरही आवाजाच्या क्षेत्रात आणि अभिनय पत्रकारितेत एक आदर्श शिक्षक म्हणून दिपक वेलणकरांनी माध्यम क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलंय आणि आपले आवाज क्षेत्रातले ”मेन्टॉर” अशोक रानडे यांनी दिलेले धडे अगदी पुढच्या पिढी पर्यंत पोहोचवायचं काम वेलणकर अगदी चोख करत आहेत. त्यामुळे सर्वार्थाने आपल्या आवाजाचं नाणं खणखणीतपणे वाजवणारे ”दिपक वेलणकर” हे माध्यम विश्वातले ”व्हॉईस गुरु” ठरतात.

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

1 Comment on व्हॉईस गुरु- दिपक वेलणकर

  1. हरी ओम सागर मालाडकर, ‘व्होईस गुरु श्री दीपक वेलणकारांची’ मुलाखत आवडली. आपलेही सर्व लेख छान असतात. त्यांचे मुंबईत ऑफिस कुठे आहे? मोबाईल नंबर आणि पत्ता मिळाला तर भेट घेता येईल. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…