नवीन लेखन...

विठू ‘माउली’ च्या अंगणातील दोन अश्वत्थ – दांडेकर आणि देगलूरकर !

 

विठ्ठलाला आणि “माउलीं “ना अभिप्रेत असलेला वारकरी जीवनप्रवाह साक्षात जगणारे दोन कैवल्यधर्मी म्हणजे वै. मामासाहेब दांडेकर आणि वै. धुंडामहाराज देगलूरकर ! त्यांच्या उल्लेखाविना ही “वारी” कायमच अपुरी राहील. दोघेही आयुष्यभर “ज्ञानेश्वरी” जगत राहिले.एक ज्ञानमार्गाचे बोट धरून विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिप्रामाण्यवाद सिद्ध करीत राहिला तर दुसऱ्याने भक्तिमार्ग चोखाळला. गंतव्य एकच होते आणि अंतिमतः ज्ञानेश्वरीने ते गाठायला मदत केली.

काय आहे हा वारकरी जीवनप्रवाह ?

वारकरी म्हणजे हरि आणि हर यांचे अद्वैत. वारकऱ्यांनी कायम आत्मानुभूतीला महत्त्व दिले. त्यामुळे वारकरी संप्रदाय जातिधर्माच्या पलीकडे गेला. परिणामस्वरूप महाराष्ट्रातील प्रत्येक जातीत संत निर्माण झाले. वारकरी विचारसरणीने संत परंपरा आणि ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यामुळे भागवत, गीता व उपनिषदे ह्यांतील तत्त्वज्ञान जनसामान्यांना कळेल अशा मराठी भाषेत सुबोध व सुलभ रीतीने उपलब्ध झाले. संतांच्या अभंगांमुळे आत्मसाक्षात्काराची वाट उजळून निघाली. वारकरी परंपरेने समाजाभिमुखता आणि राष्ट्रप्रेम अंगिकारले आहे आणि त्याला कारणीभूत आहे, संतांनी केलेली मराठी मनाची मशागत ! त्यामुळे वारकरी जीवनप्रवाह महाराष्ट्राच्या रक्तात भिनला आणि येथील वास्तव्याचा अविभाज्य घटक बनला. ज्ञानोबा माउलीचे हे आपल्यावर न फिटणारे ऋण आहे. त्याची अंशतः परतफेड करण्याचे कार्य दांडेकर आणि देगलूरकर यांनी केले.

मामासाहेबांना भारतीय तत्वज्ञानाचा परिचय करून दिला विष्णुपंत जोगांनी ! त्याच्याशी पाश्चात्त तत्वज्ञान जोडून घेता यावे म्हणून सोनोपंत दांडेकरांनी एम ए ला वेस्टर्न फिलासॉफी हा विषय अभ्यासाला घेतला. जोग महाराजांबरोबरच गुरुदेव रानडे यांच्यासारखी आत्मज्ञानी विभूती त्यांच्या वाट्याला येणं ही दैवी घटना मानायला हवी. ज्ञानेश्वर माउली दृश्य रूपात या दोघांमुळे मामासाहेबांना भेटली आणि अश्वत्थाची सळसळ गहिरी झाली.

तत्त्वज्ञान समजून सांगणे हा जीवनाचा प्राधान्यक्रम मामासाहेबांनी स्वीकारला. तत्त्वज्ञान कोण व कसे सांगत आहे ह्यावर ते तत्त्वज्ञान समाज स्वीकारणार किंवा नाही हे आजच्या जमान्यात ठरत असते. स्वतः उच्च विद्याविभूषित, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याने मामासाहेबांनी हे कार्य सुरु केले. “ज्ञानेश्वर आणि प्लेटो “असं आत्मानुभवावर आधारित पुस्तक त्यांनी लिहिले. मात्र त्यांना  पारंपरिक,अल्पशिक्षित वारकऱ्यांचा विसर पडला नाही. फेटा, गंध, नियमित वारी, खेडेगावात जाऊन कीर्तने-प्रवचने या रूपात त्यांनी समाजाचा दुसरा स्तर सांभाळला. या बहुपेडी रुपामुळे सोनोपंत दांडेकर सर्व घटकांसाठी वंदनीय ठरले.

मामासाहेबांचा तत्वज्ञान विषयातील अधिकार दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी जाहीरपणे मान्य केला आहे –

१) मुंबई राज्याचे गव्हर्नर लेस्ली विल्सन – Here is an outstanding practical philosopher of your college.

२) माजी राष्ट्रपती व भारतीय तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक सर्वपल्ली राधाकृष्णन – I see nothing less in Prof Dandekar, a true follower of my friend Gururdev Ranade, a great philosopher of today.

त्यांनी पंढरीची वारी कधीच चुकविली नाही.वारकर्‍यांचे प्रबोधन, अंधश्रद्धांचे निर्मूलन, धर्मग्रंथांचे सादरीकरण, कीर्तनसंस्थेचे पुनरुज्जीवन, लोकशिक्षण हे त्यांच्या वारीचे हेतू होते.

विद्यादान, ज्ञानप्रसार व समाजसेवा हेच आपले जीवितकार्य मानून ते अखेरपर्यंत कार्यरत होते. भक्तिमार्गाला त्यांनी शास्त्रशुद्ध मार्गाने अधिक विस्तृत, चैतन्यदायी रूप दिले.

तत्त्वज्ञान, अध्यात्म हे विषय जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य सोनोपंतांनी जन्मभर केले. त्यांनी सोन्याचा पिंपळ प्रत्येक वारकर्‍याच्या अंगणात लावला, असे म्हटले जाते. १८९६ पासून ते १९६८ पर्यंत इहलोकात त्यांनी ही पताका मिरवली. या वाटचालीत ते समाजाभिमुख राहिले, अनेक संस्थांचा कारभार चालविला, व्यवहारात कोठेही कमी पडले नाही आणि तरीही दैनंदिनीत कोठेही रुक्षपणा, अंधश्रद्धा येऊ दिली नाही.

श्रीक्षेत्र आळंदी येथे जोगमहाराजांनी १९१७ साली स्थापन केलेली ‘वारकरी शिक्षण संस्था” महाराजांच्या निर्वाणानंतर सोनोपंतांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत अनेक वर्षें समर्थपणे सांभाळली. त्या संस्थेतून अनेक कीर्तनकार-प्रवचनकार निर्माण केले.हे त्यांचे कार्य महाकाय आहे. समाजाचे “शिक्षक” निर्माण करणारी ही संस्था ! तिला त्यांनी कालानुरूप आकार दिला आणि तिचे संदर्भ जिवंत ठेवले.

सार्थ ज्ञानेश्वरीचे प्रकाशन हे सोनोपंतांचे महत्त्वाचे योगदान होय. या ग्रंथाला त्यांनी लिहिलेली अभ्यासपूर्ण प्रस्तावना स्वतंत्र ग्रंथाच्या तोडीची आहे. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या ज्ञानेश्वरीच्या राजवाडे संशोधित प्रतीच्या संपादनातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. या समितीने ज्ञानेश्वरीची संशोधित आवृत्ती तयार केली. तिला सोनोपंतांची १५० पानांची प्रस्तावना असून ती सोनोपंतांची ज्ञानेश्वरी म्हणून प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त त्यांनी संत-साहित्य संशोधित करून शुद्ध स्वरूपात लोकांपुढे ठेवले. ज्ञानदेव आणि प्लेटो, ईश्वरवाद, अध्यात्मवादाची मूलतत्त्वे, अभंग-संकीर्तन—भाग १,२,३, ज्ञानदेव चरित्र, वारकरी पंथाचा इतिहास, गीतेच्या श्लोकावर प्रवचने, जोग महाराजांचे चरित्र इ. मौलिक ग्रंथ लिहिले. तसेच अनेक ग्रंथांचे संपादनही केले.

दस्तुरखुद्ध धुंडामहाराज देगलूरकर यांनी सोनोपंतांचे वर्णन एका ओवीत केले आहे –

मार्गाधारे वर्तावे! विश्व मोहरे लावावे! अलौकिक नोहावे! लोकांप्रती!!

सोनोपंतांनी ह्या ओवीतील प्रत्येक शब्द आचरणात आणून दाखवला आहे.

१९०५ साली जन्मलेल्या धुंडा महाराजांनी ही “वारी ” मामासाहेबांनंतर १९९२ पर्यंत अखंड ठेवली. वारकरी संप्रदायाचे विचार रुजवण्यासाठी विसाव्या शतकात धुंडा महाराज आणि प्राचार्य मामा दांडेकर यांनी संपूर्ण भारतभर अव्याहतपणे भ्रमण केले.

पारायण, चिंतन, मनन, प्रबोधन, प्रवचन, कीर्तन, वारी, चातुर्मास आणि प्रवास एवढेच धुंडामहाराजांचे जीवन होते. त्यांनी ‘हरिपाठविवरण अथवा भक्तिशास्त्र’ हा ग्रंथ लिहिला. मामासाहेब दांडेकरांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत  महाराजांच्या अथांग व्यासंगाचे दर्शन घडत असल्याचे सांगितले आहे. नंतर त्यांनी दीडशे पानांचा ‘संतवचनामृत’ हा ग्रंथ लिहिला. ‘हा ग्रंथ म्हणजे भक्तिप्रेमानंद चाखणाऱ्या विद्वान पंडितांना मेजवानीच आहे’ असा अभिप्राय मामासाहेब दांडेकरांनी दिला आहे.

धुंडा महाराज हा चालता फिरता ज्ञानकोश होते. जीवनाचे प्रयोजन त्यांना समजले होते आणि ते त्यांच्या बोलण्यात, वागण्यात, लेखनात आणि कृतीत सहज सापडायचे.  एका मुलाखतीत ते  म्हणाले – ” ज्ञानोबा- तुकोबांनी स्थापिलेल्या विद्यापीठाच्या सेवेत मी आहे. त्या सेवेतून रिटायर होता येत नाही.”

धुंडा महाराजांच्या एकसष्ठीनिमित्त मामासाहेबांनी त्यांचा गौरव करण्यासाठी ‘ज्ञानेश्वरी सेवा गौरव”  सोहोळा आयोजित केला. त्यावेळी महाराज सहज बोलून गेले, ‘धोंडयावर सोन्याचे दडपण आले!”

धुंडा महाराजांनी संत साहित्यावर मौलिक स्वरूपाचे लेखन करून त्यांच्या कीर्तन-प्रवचनातून पंचाहत्तर वर्षे संपूर्ण भारतात वारकरी संप्रदायाचे विचार रुजवले. पुणे विद्यापीठातर्फे धुंडा महाराजांचा सत्कार आयोजित करण्यात आला. त्यावेळी महाराज म्हणाले, “विद्यावंतांच्या नगरीतल्या विद्यापीठाने माझा सन्मान केला तो यासाठी की मी गेली सत्तर-बहात्तर वर्षं  ज्ञानेश्वरीची प्रवचने करतो. जनजागरण करतो. पण खरे सांगू का? मी जी ज्ञानेश्वरी सांगतो ती मला कळली म्हणून सांगत नाही, तर स्वत:ला ज्ञानेश्वरी कळावी म्हणून सांगत राहिलो. माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी जशी मला ती कळू दिली तशी मी ती सांगितली. ‘बोलविले बोल ज्ञानदेवे |’ यात माझे कर्तृत्व काय! तरी मोठ्या मनाच्या पुणे विद्यापीठाने माझा गौरव केला.”

धुंडा महाराज स्वत: ज्ञानेश्वरी जगले. “नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी | एक तरी ओवी अनुभवावी” या उक्तीप्रमाणे ज्ञानेश्वरीतील अद्वैत विचार महाराजांच्या आचरणात होता. पुण्यातील पानशेत प्रलयप्रसंगी मामासाहेबांना महाराजांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाचशे रूपयाचा चेक दिला. भावाच्या मृत्यूच्या दु:खात असूनही धुंडा महाराज कर्तव्य विसरले नाहीत. नंतर मामांचे पत्र आले, त्या पत्रात मामांनी लिहिले, ‘एवढ्या दु:खातही आपण मदत केली. परमार्थ पचवल्याशिवाय मनाची अशी स्थिती होत नाही.’

देशाला अध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या पंढरपूर विद्यापीठाचे धुंडा महाराज देगलूरकर कुलपती होते. उतारवयातही त्यांचा ज्ञानयज्ञ सुरु होता. प्रवचन आणि प्रबोधन यासाठी मिळेल त्या वाहनाने आणि वेळप्रसंगी पायी त्यांनी प्रवास केला. विचारलं की महाराज म्हणत, ‘श्रोत्यांच्या हजारो डोळयांनी माऊली माझ्याकडे बघत असते व माझे ऐकत असते.’

धुंडा महाराजांनी देगलूर ते पंढरपूर आषाढी पदयात्रेला सुरु केली आणि पासष्टाव्या वर्षांपर्यंत ती निष्ठेने चालू ठेवली. महाराज चातुर्मासात चार महिने पंढरपुरी विठुरायाच्या दरबारात व्रतस्थपणे सेवा करत असत.

१९९२ साली हा अश्वत्थही शांत झाला.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 343 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..