नवीन लेखन...

विषारी पत्रे

पोस्टातून विशिष्ट व्यक्तीला विषारी पत्र पाठवायची अतिरेक्यांची शक्कल तशी काही नवी नाही, परंतु ते विष जैवरासायनिक स्वरूपातले ‘रिसिन’ असेल, तर त्या ‘विषप्रयोगा’चे गंभीर परिणाम होऊ शकतात.

काही वर्षांपूर्वी  एकाच महिन्यात दहा विषारी पत्रे दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या निवडक महत्त्वाच्या व्यक्तींना पाठवली होती. ही विषारी पत्रे अधिक जहाल विषाने माखलेली होती. या विषाचे नाव होते ‘रिसिन’. हे विष स्टीलमार्क नामक संशोधकाने १८८८ साली शोधून काढले. या गोष्टीला २०१३ साली सव्वाशे वर्ष पूर्ण झाली आहेत. दहशतवादी हे रसायन वापरून कोणाचा तरी बळी घेतील, असा सुरक्षा अधिकाऱ्यांनी अंदाज केलेला होताच. २०१० सालीच अशा प्रकारची पत्रे कशी काळजीपूर्वक उघडायची यासंबंधीचे प्रशिक्षण त्यांनी अध्यक्ष ओबामा यांच्या कचेरीतील कर्मचाऱ्यांना दिलेले होते. परिणामी, कोणतीही अनुचित गोष्ट घडली नाही, हे सुदैवच म्हणायचे.

विशिष्ट व्यक्ती हेरून कुणीही विषाने भारलेले टपाल, पार्सल किंवा एखादी भेटवस्तू पाठवून आपला कुटिल हेतू साध्य करू शकते. यामुळे फार मोठा मानवी संहार होईल असे नाही. दहशत हेच ज्यांचे उद्दिष्ट आहे, त्यांना मात्र या कपटी पद्धतीने मर्यादित हेतू साध्य करता येतो. सध्याच्या काळात रिसिन हे रासायनिक आणि जैविक, असे दोन्ही प्रकारचे अस्त्र मानले जातेय.

काय आहे हे रसायन?

‘रिसिन’ हा रासायनिक पदार्थ एरंडेलाच्या बियांमध्ये सापडतो. या झाडाचे शास्त्रीय नाव ‘रिसिनस कम्युनिस’ असे आहे. एरंडाचे झाड कुठेही सहजपणे वाढते. त्याला खास प्रकारची जमीन, खत किंवा पाणी लागत नाही. ते भरड जमिनीतही रुजते. या झाडाचे खूप उपयोग आहेत. विशेषतः एरंडेल तेलाचे खूप महत्त्वपूर्ण उपयोग आहेत. बायोडिझेलची निर्मिती करण्यासाठी हे तेल ‘कच्चा माल’ म्हणून उपयुक्त ठरते. हे तेल एरंडेलच्या बियांपासून काढतात.

पन्नास-साठ वर्षांपूर्वी शालेय मुला-मुलींना कोठा साफ करण्यासाठी चहा किंवा दुधातून शनिवारी रात्री एक मोठा चमचाभर एरंडेल तेल दिले जायचे. कधीकधी त्यासाठी सक्ती केली जायची. त्या तेलाचा विपरित परिणाम झाल्याचे मात्र एकही उदाहरण ऐकिवात नाही. याचा अर्थ रिसिन हे मुख्यत्वे करून बियांच्या चोथ्यात किंवा ‘पेन्डी’ मध्ये शिल्लक राहत असणार. असा चोथा जर काही वेळा ८० अंश सेल्सियस तापमानात ठेवला तर त्यातील विषारीपणा निघून जातो. कारण, रिसिन हे एक प्रथिन असून उष्णता दिल्यास त्याची जैविक प्रक्रिया करण्याची क्षमता संपुष्टात येते.

संशोधकांना रिसिन सूक्ष्म प्रमाणात तेलामध्ये सापडले असले, तरी ते घातक ठरलेले नाही. नंतर त्याचे कारण कळले. ते म्हणजे रिसिन हे तेलात विरघळत नाही, पण पाण्यात विरघळते. एरंडेल तेल हे पोटातून लवकरात लवकर बाहेर पडते. साहजिकच, त्यात अतिसूक्ष्म प्रमाणात असू शकणारे रिसिन हे शरीरात भिनायच्या आतच बाहेर पडते. हे जेव्हा काहीशा शुद्ध स्वरूपात असतं, तेव्हा ते जास्त घातक ठरते. टपाल उघडताना जर रिसिन अंगावरील वस्त्रावर पडले असेल तर ते वस्त्र नष्ट करणेच योग्य ठरते. हे विष जर हुंगल्यामुळे श्वसनमार्गात गेले, तर जिवावर बेतते. आपल्या शरीरातील पेशी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रथिनांची निर्मिती करत असतात. शरीराच्या अस्तित्वासाठी ती प्रथिने अत्यावश्यक असतात. पेशींच्या अंतर्गत भागात रायबोसम नावाची एक जटिल यंत्रणा प्रथिनांची निर्मिती करत असते. रिसिन हे पदार्थ जर पोटात गेला तर विविध प्रकारच्या पेशींमध्ये प्रवेश करतो. त्याचा घातक परिणाम दिसून यायला सहा ते बारा तास लागतात. पोट दुखू लागते, ताप चढतो आणि नंतर ओकारी येते. अन्नावरील वासना उडते. खोकलाही होतो. पुढील काही वेळात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागते. याला इंग्रजीत ‘डीहायड्रेशन’ म्हणतात. त्याचा अनिष्ट परिणाम मूत्रपिंड आणि यकृत यांच्या कार्यावर होतो.

रिसिनची भुकटी जर हुंगली आणि ती काही प्रमाणात श्वसनमार्गातून शोषली गेली, तर त्याचे परिणाम बरेच लवकर, म्हणजे चार ते सहा तासातच दिसून येतात. श्वास घ्यायला त्रास होतो. छाती भरून आल्यासारखी वाटते, कारण छातीत द्रवपदार्थ साचू लागतो. अशा रीतीने श्वसनमार्ग निकामी होऊ लागतो. ही लक्षणे नेहमीच्या सर्दी-पडशापेक्षा निराळी असतात. रिसिन या विषाचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो आणि व्यक्ती साधारणतः तीन ते चार दिवसात मृत्युमुखी पडते. या विषाची सुमारे ५०० मायक्रोग्रॅम (अर्धा मिलिग्रॅम) भुकटी शरीरात गेली तरी त्या व्यक्तीचा प्राण जाऊ शकतो. पोटॅशिअम सायनाइडपेक्षा रिसिन एक हजार पट जास्त विषारी आहे. एखाद्या टाचणीच्या टोकावर जेवढे रिसिन मावेल, तेवढेदेखील जीवघेणे ठरू शकते.

रिसिन हे पोटात, श्वसनमार्गात, डोळ्यांत की रक्तभिसरण संस्थेत किती गेलेय, यावर त्या व्यक्तीचे भवितव्य अवलंबून असते. सुदैवाने रिसिन हे संसर्गजन्य नसते आणि त्याची साथ अशी नसते.

रिसिनचा एक घातक प्रयोग लंडनमध्ये ७ सप्टेंबर, १९७८ रोजी करण्यात आला होता. जॉर्जी मार्कोव्ह नावाचा एक बल्गेरियन गुप्तहेर वाटलू पुलावरून जात असताना अचानक एका व्यक्तीने त्याच्या समोर येऊन छत्रीच्या साहाय्याने त्याला जोरदार इजा केली. त्या छत्रीच्या टोकात एक छोटी कुपी होती. त्या कुपीत विषारी भुकटी होती. त्याचा प्रादुर्भाव जॉर्जीला झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच्या जखमेचे रासायनिक पृथक्करण केल्यावर रिसिनचा घातक प्रयोग त्याच्यावर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या हल्ल्यानंतर चार दिवसांनी त्याचा प्राण गेला. त्यानंतर रिसिनचे असे घातक प्रयोग रशिया (चेचन्या), ब्रिटन आणि अमेरिकेत बऱ्याच वेळा करण्यात आले आहेत. अनेक वेळा पोस्टातून नियोजित व्यक्तीला रिसिनने माखवलेले पत्र पाठवूनं कुटिल हेतू साध्य करायचा प्रयत्न केला गेलाय.

रिसिनचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीने त्वरित अंगावरले कपडे बदलावेत आणि अंग स्वच्छ धुवावे, विशेषतः डोळे धुणे गरजेचे असते. यामुळे जर अन्यत्र कुठे रिसिनची भुकटी पडली असेल, तर त्याची बाधा होऊन रुग्णाची तब्येत अधिक खराब होत नाही. यानंतर वैद्यकीय सल्ला ताबडतोब घ्यावा आणि योग्य ती उपचारपद्धती सुरू करावी. रिसिनचा विषारीपणा कमी करणारे रसायन अद्याप माहिती झालेले नाही. (याला इंग्रजीत ‘अँटिडोट’ म्हणतात). तथापि अमेरिकेतील संशोधक त्यासाठी प्रयत्नशील आहेत.

रिसिनच्या बाधेवर उपाय म्हणजे शरीरात गेलेले रिसिन लवकरात लवकर बाहेर कसे काढता येईल, याचा विचार करणे उचित ठरते. मात्र, ते ओकारीमार्फत बाहेर काढू नये. दुसरे म्हणजे ज्या पदार्थाला रिसिन रासायनिकदृष्ट्या ‘बांधले’ जाईल, किंवा निदान कायिकदृष्ट्या ‘पकडले’ जाईल असा पदार्थ पोटात घ्यायला द्यायचा. कोळशाची क्रियाशील भुकटी (अॅक्टिव्हेटेड चारकोलची अत्यंत बारीक दळलेली पूड) जर पोटात घ्यायला दिली, तर त्यावर रिसिन रासायनिक दृष्ट्या चिकटून बसते. अशा परिस्थितीत रिसिन काहीही विपरीत (अनावश्यक) प्रक्रिया करायला मोकळे नसते. त्याची जैविक प्रक्रिया करण्याची तीव्रता (क्षमता) कमी किंवा नष्ट झालेली असते. अशा उपचारामुळे रिसिनग्रस्तरुग्ण बराचसा सुधारायला मदत होते. त्याचे प्राणही वाचतात.

जीवसृष्टीमधील बहुतेक पेशींच्या आत रायबोसम नावाची एक यंत्रणा असते. त्यामुळे प्रथिनांची निर्मिती होते. प्रथिने तयार होण्याच्या प्रक्रिया खूप गुंतागुंतीच्या असतात. प्रथिनांशिवाय जीवसृष्टी निर्माण होत नाही. या रायबोसमच्या कार्यप्रणालीवर रिसिनचा परिणाम होतो. रिसिन हे मूलतः प्रथिन आहे. त्याचे दोन प्रकार संभवतात. ते म्हणजे टाइप १ आणि टाइप २. टाईप १ म्हणजे ‘आरटीए’ म्हणजे रिसिन ए साखळी’ (चेन), टाइप बी म्हणजे ‘आरटीबी’ म्हणजे ‘रिसिन बी साखळी’. टाईप १ मध्ये प्रथिनाची फक्त एक (अ) साखळी असते, तर टाइप २ मध्ये अ आणि ब अशा दोन साखळ्या असतात. याला ‘आरआयपी’ (रायबोसम इनअॅक्टिव्हेटिंग प्रोटीन) म्हणतात. अ आणि ब या दोन्ही प्रथिनांची लांबी साधारण सारखीच आहे. टाइप २ चे रिसिन हे विषारी आहे. कारण, रायबोसमच्या आत प्रवेश होण्यासाठी दोन्ही साखळ्या अत्यावश्यक असतात.

पेशीमध्ये प्रवेश करण्यासाठी रिसिनची अ ही साखळी पेशीच्या बाह्य भागात ‘बांधली’ जाते. नंतर ब ही साखळी पेशीच्या अंतर्गत भागातील ‘सायटोसोल’ मध्ये (पेशीद्रवात) रायबोसमचे कार्य थोपवण्यासाठी प्रवेश करते. रिसिनचा एक रेणू एका मिनिटात सुमारे १५०० रायबोसमचे कार्य कायमचे थांबवू शकतो. यामुळे ती पेशी नाश पावते, बार्ली किंवा गव्हामध्ये देखील काही प्रमाणात रिसिन आहे. तथापि, अशा प्रकारच्या धान्यातील रिसिन हे फक्त अ साखळीचे असते. अ साखळी (बहुतांशी) बिनविषारी आहे. अशा बऱ्याच धान्यात ब साखळी नसतेच. साहजिकच, ही धान्ये एरंडेलच्या बियांमधील रिसिनसारखी विषारी नाहीत. त्याचा आपण खाद्यान्नात समावेश करतोच. रिसिनसंबंधी अशा बऱ्याच प्रतिकूल गोष्टी जरी असल्या, तरी त्यात काही औषध म्हणून उपयुक्त गुणधर्म आहेत. विशेषतः काही प्रकारच्या कर्करोगावर किंवा एड्सवर त्यापासून औषधे बनवता येतात. त्यावर संशोधन चालू आहे.

पोस्टामार्फत रिसिनप्रमाणे अजून एक रसायन पाठवून एखाद्या व्यक्तीचा बळी घेता येतो. ते म्हणजे अँथ्रक्स, परंतु हे विष वनस्पतिजन्य नाही. ते बॅसिलस अँथ्रेसिस या जीवाणूमार्फत मिळते. मात्र, हे विष रिसिनइतके जालीम नाही. शिवाय, यावर अमेरिकन संशोधकांनी एक लस शोधून काढली आहे. अमेरिकेतील टपाल कचेऱ्यांमध्ये संभाव्य ‘विषाची परीक्षा’ करणारी आटोपशीर यंत्रणाही असतेच. तेथील एका शालेय विद्यार्थ्याने विषाने माखलेल्या संशयित पत्राचा धोका कमी किंवा नष्ट करण्याची सोपी युक्ती शोधून काढली आहे. अशा पत्रावर एक फडके ठेवून त्यावर तापलेली इस्त्री फिरवायची. यामुळे रिसिन हे प्रथिनयुक्त विष किंवा अॅग्रॅक्ससारख्या जीवाणूंच्या बीजाणूंची (स्पोअर्सची) जैविक शक्ती नष्ट होईल. त्यासंबंधीचे निष्कर्ष त्याने ‘द जर्नल ऑफ मेडिकल टॉक्सिकॉलॉजी’ मध्ये प्रकाशित केले.

भारतात या दोन्ही विषांचा उपयोग करून दहशतवादी त्यांचा कार्यभाग उरकू शकतात. ही दोन्ही विषे सहजासहजी मिळवता येत नाहीत. शिवाय, ती पुरेशा प्रमाणात तयार करता येत नाहीत. त्यामुळे ‘सार्वजनिक भीती’ पसरवण्याचे काहीच कारण नाही. तथापि, अशा प्रकारच्या संभाव्य कुटिल आणि भ्याड हल्ल्याची माहिती आपल्याकडे असेल तर आपण अशा प्रसंगी सावध राहून योग्य ती काळजी घेऊ शकतो. यामुळे नाहक होणारी प्राणहानीदेखील टळू शकेल आणि दहशतवाद्यांचाही डाव उधळून लावता येईल.

‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका’ वरून.

– डॉ. अनिल लचके.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..