नवीन लेखन...

वरची ब

गावातले आमचे जुने कौलारू घर दोन माळ्याचे आहे. आमच्या त्या घरात माझ्या दोन काकांचे आणि आमचे असे तीन कुटुंब एकत्र राहायचे. शेतावरच्या घरात मोठा काका तर गावात अजुन एका घरात आणखीन एका काकाचे कुटुंब. आम्ही ज्या घरात राहायचो त्या घराच्या तळमजल्यावर आम्ही आणि दोन नंबर काकाचे कुटुंब तर वरच्या माळ्यावर तीन नंबर काकाचे कुटुंब.
वरच्या माळ्यावर जो काका राहायचा त्याला आम्ही वरचा बाबा म्हणायचो आणि काकुला वरची ब. खरं म्हणजे आमच्या आगरी समाजात आणि विशेष करून कल्याण आणि भिवंडी परिसरात आईला ब म्हणूनच हाक मारली जाते. मोठ्या काकुला मोठी ब , तर लहान काकु ला बारकी ब, आणि स्वतःच्या आईला फक्त ब या नावाने हाक मारली जायची.
आगरी भाषेत म्हातारा आणि म्हातारीला, डोकरा आणि डोकरी बोललं जाते. घरात आजी असेल तर तिला आजी ऐवजी डोकरी ब अशा नावाने संबोधले जायचे.

थोडक्यात जेवढ्या पण ब होत्या त्या अशिक्षित होत्या. घरात ब ऐवजी आई तेव्हा व्हायची जेव्हा ती स्त्री शिकलेली असायची. आता तर आई ऐवजी आमच्यात पण मम्मा झाल्यात आणि त्यामुळे ब हा शब्द आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

आमचा वरचा काका ज्याला आम्ही वरचा बाबा म्हणायचो तो रंगाने खूप सावळा होता, अंगाने शिडशिडीत आणि उंच होता. त्याचे शिक्षण चौथी की पाचवी पर्यंतच झाले होते, त्याचे नांव प्रधान होते. आमची वरची ब अशिक्षित आहे तिचे नांव कृष्णा बाई. तिचा एक डोळा तिच्या लहानपणापासून एका अपघातात निकामी झालेला आहे. तिला तेव्हापासून फक्त एकाच डोळ्याने दिसते. आजमितीला आमच्या वरच्या ब चे वय पंच्याएंशीच्या पुढे असावे. पण ही म्हातारी पंच्याएंशीची कसली साठीचीच असली पाहिजे असं कोणीही तिला बघितल्यावर बोलल्या शिवाय राहणार नाही.

तिचे नांव कृष्णाबाई असले तरी आमची आजी आणि गावातल्या तिच्या वयाच्या इतर बायका तिला किठना या नावाने हाक मारायच्या. मला कळायला लागल्यावर मी याबद्दल माझ्या आईला विचारले तर तिने सांगितले कृष्णाबाई या नावाचा अपभ्रंश होत होत किठना बाई असं तिचं नाव पडले गेले असावं अशी आईने माझी समजुत घातली.
आमचा वरचा बाबा खुप दारु प्यायचा आणि जुगार सुद्धा खेळायचा.

दारू आणि जुगाराच्या व्यसना मुळे तो आमच्या वरच्या ब ला खुप त्रास द्यायचा. तिला शिव्या द्यायचा, मारायचा पण आमची वरची ब सगळं सहन करायची. त्याला दोन्ही वेळचे जेवण तेही त्याच्या आवडीचे स्वतः करून घालायची.
वरच्या ब ने आमच्या वरच्या बाबाचे जेवढे सोसले आहे आणि तरीही त्याचे एव्हढे सोहळे पुरवले आहेत की कोणाला सांगून पटणार नाही.

पंधरा एक वर्षांपूर्वी गणपती गेल्यानंतर काही दिवसांनी आमचा वरचा बाबा जुगार खेळायला गेला होता, गावातल्या एका क्लब मध्ये त्याला बघितले गेले त्यादिवशी खुप जोराचा पाऊस पडत होता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा वरचा बाबा घरी परत आलाच नाही.

सगळीकडे शोधाशोध केली पण वरचा बाबा काही सापडला नाही. जवळपासचे सगळे हॉस्पिटल, शवागरे,पोलिस स्टेशन आमच्या कल्याण चे खाडी किनारे सगळीकडे त्याचा शोध घेतला पण वरचा बाबा किंवा त्याचे प्रेत काही मिळाले नाही.

वरच्या ब ने सगळ्यांना सांगितले जोपर्यंत त्याचे प्रेत मिळत नाही तोपर्यंत तो मेला आहे असं मी मानणार नाही.
तिच्या या मानण्यावर ती जवळपास आठ नऊ वर्ष ठाम राहिली. शेवटी माझ्या चुलत भावाने कोर्टाकडून नऊ दहा वर्ष उलटून गेल्यावर आमच्या वरच्या बाबाला रीतसर मृत घोषित करवून घेतले. तरीही आमची वरची ब तो जिवंत असेल या आशेत होती , तो परत येईल या अपेक्षेत होती.

शेवटी काही वर्षांपुर्वी आता आमचा वरचा बाबा काही परत येणार नाही, त्याचे काहीतरी बरे वाईट झाले असणार, त्याचे अंतिम संस्कार तर आपल्याला करायला मिळाले नाहीत निदान त्याच्या नावाने अंतिम विधी तरी उरकून घेऊ या आणि त्याच्या आत्म्याला मुक्त करू या , अशा प्रकारे वरच्या ब ची समजूत घातली गेली.

आमची वरची ब अशिक्षित आणि अडाणी होती पण ती खूप फिरायची. अगदी भारतभर फिरायची ते सुद्धा वरच्या बाबाला सोबत घेऊन. वरचा बाबा असताना 2005 ची की 2006 ची गोष्ट आहे. एक दिवशी माझ्या मोबाईल वर कॉल आला होता. नंबर दिल्लीचा होता पलीकडून आमच्या वरच्या ब चा आवाज, बाला मी ब बोलताव , आमी दोघंच जना मेट्रो मध्ये बसून आल्याव, एकावल्या बाहेरशा एस टी डी मधल्या तुला फोन लावून झेतला .
आईला सांग ब बरी हाये,बाबा पन बरा हं, उंद्या आमी आग्र्याला जाव, चल आता ठेवताव.

आम्ही तेव्हा दादरला रेल्वे पोलीस कॉलनी मध्ये राहायला होतो, वरची ब आणि बाबा दिल्लीला फिरायला गेले होते याची थोडी कल्पना होती. पण वरच्या ब ने तिच्या छोट्याशा डायरीत माझ्याकडुन माझा मोबाईल नंबर माझ्याच कडून कधीतरी लिहून घेतला होता आणि त्या दिवशी एस टी डी बूथ मधुन कोणाला तरी लावायला लावला होता.
इथपर्यंत ठीक होते, पण संपूर्ण भारतात पहिल्यांदाच दिल्लीची मेट्रो सुरू होउन जेमतेम काही वर्ष झाली होती. त्यात माझ्या वरच्या ब ज्या ग्रुप सोबत गेली होती ते काही कुठल्या टूर किंवा ट्रॅव्हल्स कंपनीकडून गेले नव्हते.
वरच्या ब ला काही वाचता येत नव्हते की लिहिता येत नव्हते तरीपण तिने वरच्या बाबाला दिल्लीतल्या मेट्रोची सफर घडवून आणली होती.

अशा या आमच्या वरच्या ब ने तिच्या महिला मंडळासोबत एकदा विमान प्रवास सुद्धा केला आहे.
वरचा बाबा असताना त्याचं दारूचे व्यसन पुरवायला, बाहेर कुठे फिरायला जाण्यासाठी आमची वरची ब कोणाकडे हात पसरत नव्हती, कोणाकडे म्हणजे अगदी तिच्या मुलाकडे सुद्धा. वरचा बाबा आणि ब दोघेही शेती करायचे त्यातून जे काही मिळतील त्यातील काही पैसे ब बाजूला काढून ठेवायची. वरची ब अगदी राब राब राबत असे, दसऱ्यासाठी सातारा किंवा जेजुरी हून झेंडूची फुले आणून गावात विकायची. तिला कुठल्याही कामाची लाज वाटत नाही. पूर्वी आमचा दुधाचा व्यवसाय होता, दहा बारा म्हशी असायच्या, त्यांच्यासाठी चारा कापून आणणे, म्हशींचे शेण काढणे , गोवऱ्या थापणे आणि भातशेतीसाठी लागणारी अशी सगळी मेहनतीची कामं वरची ब करायची.
वरच्या ब ला एकाच डोळ्याने दिसते याचे मला लहान असताना खूप वाईट वाटायचे. तिला एका डोळ्याने कसं दिसत असेल याचा अनुभव घेण्यासाठी मी माझा एक डोळा मिटून पाच दहा मिनिटं इकडे तिकडे फिरायचो मग तिला जाऊन विचारायचो, ब तू एका डोळ्याने कसं सगळं बघते.

ती तिचा हात माझ्या डोक्यावरून मायेने फिरवायची आणि बोलायची देवाने एक डोला तरी दिले ना मना, त्येन मना सगला दिसतं रं माझ्या ल्येका.

आमची वरची ब मी लहान असताना मला कडेवर घेऊन अख्खा गाव फिरवायची, आता माझ्या मुलीला कडेवर घेतल्यावर तिला बोलायची, मग तुझ्या बापासला पण मीच कडेवर उचलून फिरवायची झे.

वरची ब आपल्या बोलण्याने कोणाला काय वाटेल याचा कधीच विचार करत नाही, तिला कोणाही बद्दल जे वाटेल ते ती मागचा पुढचा विचार न करता बोलून मोकळी होते. आपले मत मांडल्या शिवाय तिला चैन पडत नाही. कोणाला आवडो वा न आवडो, कोणाला चांगले वाटो नाहीतर राग येवो मनात कोणाबद्दल काहीच ठेवायचे नाही, जे काही असेल ते बोलून मोकळं व्हायचं.

तिच्या या सवयी मुळे घरात अजूनही भांडणे होतात. तिच्यामुळे भांडणे झाली तरी ती सगळं विसरून पुन्हा हाक मारायला हजर असते. जुन्या म्हणी वापरून नावं ठेवण्यात आणि सहज बोलता बोलता कोणालाही टोमणा मारण्यात तिचा हात कोणीही धरू शकणार नाही.

सुनेने आपला मुलगा जेवल्या शिवाय जेवू नये हे सुनेला सांगण्या साठी, ज्या बायका नवऱ्याच्या अगोदर जेवतात त्या पुढच्या जन्मात मांजर बनतात अशा शब्दात ती तिच्या आणि इतरांच्या सुनांना टोमणा मारते.
वरची ब कोण कसं बोललं किंवा कसे वागते याची नक्कल करायला सुद्धा मागे पुढे बघत नाही. कोणाच्याही वागण्या बोलण्याची ती अशी नक्कल करते की सगळे हसून हसून लोट पोट होउन जातात.
माझी जहाजावरली नोकरी तिला काही पटत नाही, जहाजावरुन परत आलो की तिचं एकच म्हणणं असतं. बाला आता नको रं जाव परत.

माझ्या विरुद्ध गावातील काही लोकांनी खोटी पोलिस केस दाखल केली होती. आमच्या वरच्या ब ने आठ दिवस सकाळ संध्याकाळी सतत त्या लोकांना आमच्या जुन्या घराच्या समोर असलेल्या चावडीवरुन हात वारे करून शिव्यांची लाखोली वाहिली. माझ्यावर खोटी केस करणाऱ्यांवर अब्रु नुकसानीचा दाव्यातून कोर्टात जेव्हा कधी ना कधी न्याय मिळेल तेव्हा मिळेल. पण वरच्या ब ने मला सगळ्या गावासमोर रोज आठ दिवस न्याय मिळवून दिला. शेवटी तिला सांगावं लागलं ब आता बास कर त्या लोकांनी जनाची आणि मनाची पण सोडली आहे त्यांना काही फरक पडणार नाही. पण वयाचे पंच्याएंशी वर्ष उलटून गेल्यावरही आपल्या घरातील मुलावर खोटं करणाऱ्यांच्या विरुद्ध तिच्या मनातील खदखद आणि चीड तिने अशा प्रकारे व्यक्त केलीच.

माझ्या आई मध्ये आणि वरच्या ब मध्ये कमीत कमी वीस वर्षांचे तरी अंतर असेल पण वरच्या ब ने आईला कधी अपशब्द वापरला नाही, ती अशिक्षित आणि माझी आई ग्रॅज्यूएट पण दोघींच्या नात्यात शिक्षण आडवे आले नाही.
मी लहान असताना मला कडेवर घेऊन फिरवणे, मायेने डोक्यावरून हात फिरवून कडकडा बोटं मोडणे, चुलितल्या निखाऱ्यांवर लाल मिरच्या उतरवून दृष्ट काढणे, दिवाळीला कानात तेल घालुन, ईडा पिडा टळो म्हणून फुक मारणे. बाहेर तिर्थ क्षेत्री फिरायला गेल्यावर आवर्जून काही ना काही वस्तू आणणार. आमच्या कुटुंबात कितीही भांडणं झाली, वाद झाले तरीही आमच्या वरच्या ब चा तिच्या ईतर पुतण्यांपेक्षा फक्त माझ्यावरच सगळ्यात जास्त जीव अजुनही आहे. तिला मला काही पटवून द्यायचे असले की अक रं माझ्या ल्येका, असं बोलुन मला इमोशनली ब्लॅकमेल करायची पद्धत अजुनही ती वापरते.

अशिक्षित असुनही आमच्या वरच्या ब मध्ये जो आत्मविश्वास आहे , जी प्रबळ इच्छाशक्ती आहे , परिस्थितीला तोंड देण्याचे जे सामर्थ्य आहे ते मात्र अफाट आहे. वरची ब आमच्या घरातील पॉझीटीव्ह एनर्जीचा सोर्स आहे.
–प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनिअर
B.E.(mech),DIM,DME.
कोन, भिवंडी,ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..