वैशालीतला उपमा आणि सुदाम्याचे पोहे

शनिवारवाडा, सिंहगड, म्हात्रे पूल, बिडकरची मिसळ या प्रमाणेच वैशाली हे पुणेकरांचे एक अत्यंत आदरांचे स्थान आहे. वैशालीतला उपमा खात आणि फर्ग्युसन वर नजर ठेवीत कित्येकांनी तारुण्यात बहार आणली. अशांनी वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे स्वाभाविक आहे पण एका तीन वर्षाच्या मुलाने वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे जरा जास्तच होते. दादरला माझ्या मैत्रीणीच्या बहिणीचे लग्न होते. मुलाकडली मंडळी पुण्यातली होती. सकाळी नाष्टा सुरु होता. एक साधारण तीन वर्षाचा मुलगा रडत होता. मी त्या मुलाच्या आईला विचारले

“मुलगा का रडतो आहे?”
“भूक लागली त्याला.”
“उपमा तयार आहे द्या त्याला”
“तो खात नाही असला उपमा, त्याला फक्त वैशालीतलाच उपमा हवा.”

तीन वर्षाच पोरग ते त्याला चड्डीत शी झाली ते धड कळत नाही त्याला काय वैशालीच्या उपम्याची चव कळते? दोन थोबाडीत लावा खाईल गपपुप असा हिंसक विचार माझ्या मनात आला. पुढचा वरपक्ष म्हणून मी गप्प बसलो. माझ्या मैत्रीणीचा भाऊ अशी बिकट परिस्थिती हाताळण्यात तरबेज होता. तो आत गेला आणि एका प्लेटमधे उपमा घेउन आला.
“घे बेटा खा. तुझ्यासाठी खास वैशालीतून उपमा आणलाय.”

त्या मुलाने दादरमधे तो उपमा पुण्यातल्या वैशालीतला उपमा समजून खाल्ला. अभिमानासाठी पुणे जरी बदनाम झाले असले तरी इतरही काही कमी नाही. मटण खाणार तर सावजीचे, मिसळ खाणार तर मामलेदाराची, बिर्याणी खाणार तर पॅराडाइसची असा अभिमान दाखविणारे प्रत्येक शहरात असतात किंबहुना प्रत्येक शहराची आपली अभिमानाची जागा असते. माझी मैत्रीण सुद्धा काही कमी नव्हती. मी तिला विचारले.

“अग जेवणात मेनु काय आहे?”
“अरे मेनु काय विचारतो परांजपेचे कॅटरींग आहे.”

“परांजपेंचे कॅटरिंग असले म्हणजे मेनु विचारायचा नसतो असा काही नियम आहे का?” असल्या तार्किक प्रश्नांना अशा लोकांच्या लेखी काही किंमत नसते. हि मंडळी त्यांच्याच विश्वात हरविलेली असतात.

काय म्हटले यापेक्षा कुणीसे म्हटले याला अधिक महत्व आहे हे पुल उपरोधाने सांगून गेले पण लोक तेच खर माणून चालतात. पुलंच्या नावांचा वापर करुन कित्येकानी आपली पोळी शेकून घेतली. आजही व्हाटस अॅपवर अर्धे विनोद आणि कविता पुलंच्या नावाने खपविले जातात. असे का होते व्यक्तीच्या कलेपेक्षा त्या व्यक्तीचे नांव का मोठे होते. कलेकडे ती कला कुणाची आहे यापेक्षा त्याकडे एक कला म्हणून का पाहिले जात नाही? मी काही फार मोठा अभ्यासक वगैरे नाही परंतु मला जे नमुने भेटले त्यावरुन मला साधारणतः दोन कारणे दिसली. पहिले कारण म्हणजे जोखीम नको. साधा एखादा मराठी सिनेमा बघायचे घ्या. मराठी मनुष्य जेवढा लग्न करताना विचार करीत नाही तेवढा विचार मराठी सिनेमा बघायला जायच्या आधी करतो. सिनेमागृहात तीन तास सिनेमा बघण्यात त्याला अनोळखी व्यक्तीसोबत आयुष्य काढण्यापेक्षा जास्त जोखीम वाटते. कसा आहे, कॉमेडी आहे कि सिरियस, कोण आहेत, कुठे रिव्हू आला आहे का? वगैरे वगैरे. तीच गोष्ट पुस्तक वाचण्याची शंभर दोनशेचे पुस्तक घ्या, आठवडा वेळ घालवून वाचा मग पुस्तक चांगले निघाले नाही तर. त्या वेळात आम्ही आमच्या घरावर एक मजला चढवला असता. जोखीम टाळण्यासाठी मग नावांचा आधार घेतला जातो. समीक्षक, ब्लॉगर हि मंडळी असली जोखीम पत्करुन कुणाचे नाव मोठे करण्यात यशस्वी झाली असतात आणि स्वतःचे पोट सुद्धा भरत असतात.

दुसरे म्हणजे स्वतःची खोटी प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न. माझा कसा अभ्यास आहे किंवा माझी रसिकता कशी पोहचलेली आहे हे दाखवून देण्याचा फुकाचा अट्टहास. अशी मंडळी त्या नावांशी तुलना करुन सतत कुणाला तरी झोडून काढीत असतात. मी असल काही ऐकतच नाही रे मी फक्त जगजीत ऐकतो, तू काही सांगू नको हल्लीच्या लेखकांच मी तुला सांगतो पुल गेल्यापासून मराठीत विनोदाला दर्जाच उरला नाही, किशोरकुमार म्हणजे किशोरकुमार बाकी सारे नकलाकार, अरे कचोरी खायची असेल तर शेगावलाच जायचे नाहीतर खाउच नये. वीस रुपयाची कचोरी खायला पाचशे रुपयाचे टिकिट काढून मुंबईहून शेगावला जाणे परवडनार आहे का? हे असे काही होणार नाही हे त्यालाही माहीत असते आपल्यालाही, याच भांडवलावर अशांची रसिकता पोसलेली असते. यांना फार कळत असेही नाही. एकदा एका टिव्हीवरील कार्यक्रमात शंकर महादेवन यांनी मन उधाण वाऱ्याचे गायले. एक लगेच सुरु झाला कचरा करतात रे ही मंडळी आपल्या गाण्यांचा, ओरीजनल काय गायल होतं. मूळ गायक कोण आहे हे माहीत नसते पण प्रतिक्रिया मात्र जोरात ठोकून देतात.

खर म्हणजे काही नांवे इतकी मोठी असतात कि त्या नावांची गुलामगिरी मनुष्य आनंदाने आयुष्यभर पत्करेल परंतु त्यांच्या कलाकृतीचा आस्वाद घेताना इतरांना का जोडे हाणायचे. मुळात कोणत्याही कलाकृतीचा आनंद घेताना ती कलाकृती काय आहे कशी आहे हा विचार करुन तिचा आनंद घ्यायला हवा. ही अमुक एका व्यक्तीची कलाकृती म्हणून न बघता त्याकडे एक कलाकृती म्हणून बघून त्याचा आस्वाद घ्यायला हवा. प्रत्यक्षात मात्र तुम्हा आम्हा सर्वाचीच गत त्या तीन वर्षाच्या मुलासारखी झालेली असते. उपम्याचीच काय रव्याची सुद्धा चव धड कळत नाही पण हट्ट मात्र वैशालीतलाच उपमा हवा हा असतो. त्या सुदाम्याच्या पोह्याची पुरचुंडी उघडून त्यातल्या पोह्याची चव चाखल्याशिवाय त्यात विश्व निर्माण करायची ताकत आहे हे कळणारे कसे? कृष्णाने जर द्वारकादास मिठाईवाला किंवा हस्तीनापूरी पोहे हे असेच पोहे किंना मिठाई खाणार असा आग्रह ठेवला असता तर त्याला सुदाम्याच्या पोह्यातली दुर्मिळ चव कधी कळली असती का? त्या चकचकीत दुनियेत पुरचुंडीला स्थाम नव्हते ते दिले ते कृष्णाने. सुदाम्याचे पोहे हे नाव अमर झाले. जी नावे व्हायची ती होउन गेली आता उद्याची नावे घडवायची असेल तर सुदाम्याच्या पोह्यात दडलेल्या नावीन्याचा ध्यास घ्यायला हवा. हे सांगायला, लिहायला जितके सोपे तितके प्रत्यक्ष आचरणात आणायला कठीण आहे. माझी तर नेहमीच गल्लत होत असते. तेंव्हा मी मनाशी ठरवतो वैशालीतला उपमा खा, मनसोक्त खा पण त्यासोबत अधूनमधून त्या सुदाम्याच्या पोह्याची पुरचुंडी उघडून बघ, एखाद्या वेळेला काही वेगळीच चव सापडेल आणि आयुष्यभराची ठेव देउन जाईल.

— मित्रहो
https://mitraho.wordpress.com/

Avatar
About मित्रहो 7 Articles
“मित्रहो” (mitraho.wordpress.com)
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…