नवीन लेखन...

टुटानखामूनचा खंजीर

टुटानखामून हा इ.स.पूर्व चौदाव्या शतकात होऊन गेलेला इजिप्तमधला फेरो. फेरो म्हणजे राजा. प्राचीन इजिप्तमधील अठराव्या राजवटीतील हा फेरो अतिशय अल्पायुषी ठरला. त्याला वयाच्या विशीतच मृत्यू आला. तरीही टुटानखामूनला इजिप्तच्या प्राचीन इतिहासात वेगळंच स्थान लाभलं आहे. याचं कारण म्हणजे  इजिप्तमध्ये लक्झॉर येथे, १९२०च्या दशकात अत्यंत सुस्थितीत सापडलेलं टुटानखामूनचं थडगं. या थडग्यात ममीच्या स्वरूपात जतन केलेलं त्याचं शव होतं. ही ममी सोन्याच्या शवपेटीत तर ठेवलेली होतीच, परंतु त्याचबरोबर ती सोन्याच्या मुखवट्यासह सोन्याच्या इतर अनेक वस्तूंनी मढवलेली होती. टुटानखामूनच्या या थडग्यात विविध प्राण्यांच्या प्रतिकृती, दागिने, नक्षीकाम केलेल्या पेट्या, रथाचे भाग, जहाजाचे भाग, अशा त्या काळच्या सुमारे पाच हजार पारंपरिक वस्तू सापडल्या. टुटानखामूनच्या थडग्याच्या या शोधामुळे इतिहासकारांना इजिप्तमधील पुरातन संस्कृतीची जवळून ओळख होण्यास मोठी मदत झाली.

टुटानखामूनच्या शवपेटीच्या आत ज्या वस्तू सापडल्या, त्यात दोन खंजीर होते. या दोन्ही खंजिरांच्या मुठी सोन्याच्या आहेत आणि त्यावर सुंदर कलाकुसर केलेली आहे. यातल्या एका खंजिराचं पातं सोन्याचं आहे, तर दुसऱ्या खंजिराचं पातं लोखंडाचं आहे. यांतील लोखंडी खंजिराची एकूण लांबी ही सुमारे चौतीस सेंटिमीटर इतकी आहे. या खंजिराचं लोखंडी पातं हे अतिशय काळजीपूर्वक घडवलेलं आहे. इतकंच नव्हे तर, जवळजवळ साडेतीन हजार वर्षं उलटूनही ते गंजलेलं नाही. या खंजिरानं संशोधकांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. कारण इजिप्तला सोन्याची ओळख ही टुटानखामूनच्या काळाच्या बऱ्याच पूर्वी झाली असली, तरी लोखंडाची ओळख होण्यासाठी अजून दोन-तीन शतकांचा काळ जायचा होता. सोनं हे रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असल्यानं, ते निसर्गात शुद्ध स्वरूपात सापडतं. धातूच्या स्वरूपातल्या लोखंडाची निर्मिती करण्यासाठी मात्र विशिष्ट रासायनिक क्रिया घडवून आणण्याची गरज असते. या रासायनिक क्रियांची इजिप्तमधील लोकांना टुटानखामूनच्या काळात ओळख नव्हती. ‘मग लोखंडाचं पातं असणारा हा खंजीर टुटानखामूनकडे आला कसा?’, या प्रश्नानं संशोधकांना कित्येक वर्षं बुचकळ्यात टाकलं होतं. हे कोडं आता सुटलं आहे. हे कोडं सुटायला सुरुवात झाली ती अगदी अलीकडे. २०१०च्या दशकात…

एके काळी ऐतिहासिक आणि दुर्मिळ वस्तूंचं रासायनिक विश्लेषण करणं, हे एक कठीण काम होतं. कारण अशा वस्तूंचं विश्लेषण हे, त्या वस्तुवर कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता, करावं लागतं. अन्यथा ती वस्तू खराब होते. त्यामुळे अशा वस्तुंच्या रासायनिक विश्लेषणासाठी विशेष साधनांचा वापर करावा लागतो. क्ष-किरणांचा वापर करून, असं निर्धोक रासायनिक विश्लेषण करणं शक्य असतं. क्ष-किरणांच्या वापरावर आधारलेल्या साधनांचा रासायनिक विश्लेषणासाठी पूर्वीही वापर केला जायचा. परंतु, पूर्वीच्या काळी या साधनांचं स्वरूप मोठं आणि अवजड असायचं. त्यामुळे ही साधनं सहजपणे इकडे-तिकडे नेणं, हे शक्य नसायचं व त्यांच्या वापरावर खूपच मर्यादा येत असत.

गेल्या काही दशकांत मात्र, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या विकासामुळे या साधनांचा आकार तर लहान झाला आहेच आणि त्याचबरोबर त्यांची संवेदनशीलताही वाढली आहे. त्यामुळे वस्तूवर कोणताही परिणाम न होऊ देता, त्या वस्तूचं अत्यंत अचूक रासायनिक विश्लेषण करणं शक्य झालं आहे. ज्या वस्तूचं रासायनिक विश्लेषण करायचं आहे, त्या वस्तूवर क्ष-किरणांचा झोत सोडला जातो. त्या वस्तूतील विविध मूलद्रव्यं हे क्ष-किरण शोषून घेतात व शोषून घेतलेले क्ष-किरण पुनः दुसऱ्या लहरलांबीच्या स्वरूपात उत्सर्जित करतात. या पुनः उत्सर्जित केलेल्या क्ष-किरणांच्या लहरलांबीवरून व तीव्रतेवरून त्या वस्तूतील विविध मूलद्रव्यांचा व त्यांच्या प्रमाणाचा शोध घेता येतो. आता कायरो येथील इजिप्शिअन म्यूझिअममध्ये ठेवलेल्या, टुटानखामूनच्या या खंजिरावरचं संशोधन मुख्यतः याच तंत्राद्वारे केलं गेलं.

टुटानखामूनच्या खंजिरावरच्या संशोधनाचा पहिला महत्त्वाचा टप्पा गाठला गेला तो, इटलीतील ‘पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटी ऑफ मिलान’ या विद्यापीठातील डॅनिएला कोमेल्ली आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या संशोधनाद्वारे. क्ष-किरणांच्या साहाय्यानं केल्या गेलेल्या, खंजिराच्या पात्याच्या रासायनिक विश्लेषणातून, या धातूचा प्रमुख घटक हा लोखंड असल्याचं नक्की झालं. या लोखंडाबरोबरच त्यात, निकेल (सुमारे अकरा टक्के) आणि कोबाल्ट (सुमारे अर्धा टक्का) हे धातूही आहेत. लोखंडातील निकेल आणि कोबाल्टचं असं प्रमाण, अंतराळातून पृथ्वीवर आदळणाऱ्या लोहयुक्त अशनींत आढळतं. डॅनिएला कोमेल्ली आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी त्यानंतर, या खंजिराच्या रासायनिक जडणघडणीची, ७६ लोहयुक्त अशनींच्या जडणघडणीशी तुलना केली. त्यावरून या खंजिराचं पातं हे लोहयुक्त अशनीपासून बनवलं असल्याचं नक्की झालं. डॅनिएला कोमेल्ली आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचं हे संशोधन ’मिटिऑरिटिक्स अँड प्लॅनेटरी सायन्स’ या शोधपत्रिकेत २०१६ साली प्रकाशित झालं.

टुटानखामूनच्या ममीबरोबर सापडलेला हा खंजीर अशनीपासून बनलेला आहे हे नक्की झाल्यानंतर, जपानमधील ‘शिबा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेतील ताकाफुमी मात्सुई आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पुढचं संशोधन हाती घेतलं. आता हे पातं कोणत्या प्रकारच्या अशनीपासून घडवलं, कोणत्या तापामानाला घडवलं, कुठे घडवलं, या प्रश्नांची उत्तरं शोधायची होती. त्यासाठी ताकाफुमी मात्सुई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, या पात्याच्या संपूर्ण पृष्ठभागाचं क्ष-किरणांद्वारे अधिक काटेकोरपणे रासायनिक विश्लेषण केलं. या रासायनिक विश्लेषणाला त्यांनी, उच्च दर्जाच्या सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे केलेल्या दृश्य स्वरूपाच्या निरीक्षणाचीही जोड दिली. या पात्यावर दिसणाऱ्या काळसर ठिपक्यांच्या विश्लेषणातून त्यांना या ठिपक्यांत, लोह व गंधक यापासून तयार झालेल्या ट्रॉइलाइट या खनिजाचं अस्तित्व दिसून आलं. लोहयुक्त अशनींत हे खनिज नेहमीच आढळतं. पात्याच्या पृष्ठभागावरील विविध ठिकाणचं विविध मूलद्रव्यांचं प्रमाण आणि सूक्ष्मदर्शक यंत्राखाली दिसणारं पात्याच्या पृष्ठभागाचं स्वरूप, यावरून हे पातं ऑक्टाहेड्राइट या प्रकारच्या लोहयुक्त अशनीपासून तयार केलं गेलं असल्याचा निष्कर्ष निघाला. खंजिराचं पातं तयार करण्यासाठी प्रथम लोखंड तापवलं जातं आणि त्यानंतर या तापलेल्या लोखंडावर ठोके मारून त्याला पातळ केलं जातं. ऑक्टाहेड्राइटपासून तयार केलेलं, टुटानखामूनच्या या खंजिराचं पातं घडवण्यासाठी ९५० अंश सेल्सियसच्या खालचं तापमान पुरेसं होतं.

टुटानखामूनच्या या खंजिराचं लोखंडी पातं हे मुठीवर चिकटून राहण्यासाठी ज्या लेपाचा वापर केला होता, त्या लेपाचंही ताकाफुमी मात्सुई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रासायनिक विश्लेषण केलं. या लेपात त्यांना कॅल्शियम हे मूलद्रव्य सापडलं. हे लोखंडी पातं सोन्याच्या मुठीला चिकटवण्यासाठी चुना वा जिप्सम या पदार्थांचा वापर केला असल्याचं, हे कॅल्शिअम सुचवत होतं. परंतु जिप्सममध्ये गंधक असतं. या लेपात गंधकाचा पूर्ण अभाव होता. म्हणजे ही मूठ चिकटवण्यासाठी चुन्याचाच वापर केला गेला असावा. मात्र इजिप्तमध्ये चुन्याचा वापर टॉलेमींच्या राजवटीत, म्हणजे इ.स.पूर्व चवथ्या शतकानंतर सुरू झाला. याचा अर्थ हा खंजीर इजिप्तमध्ये नव्हे, तर इतरत्र कुठे तरी तयार केला गेला होता.

इजिप्तविषयक एका पुरातन लिखाणात असा उल्लेख आहे की, मितान्नी या (आजच्या सिरिआत असणाऱ्या) राज्याच्या राजाकडून, सोन्याची मूठ असलेला एक लोखंडी खंजीर टुटानखामूनच्या आजोबांना भेट दिला गेला होता. कदाचित हाच तो खंजीर असल्याची शक्यता ताकाफुमी मात्सुई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या या संशोधनात व्यक्त केली आहे. ताकाफुमी मात्सुई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं टुटानखामूनच्या खंजिरावरचं हे सर्व संशोधन, ’मिटिऑरिटिक्स अँड प्लॅनेटरी सायन्स’ या शोधपत्रिकेत नुकतंच प्रसिद्ध झालं आहे.

लोखंडाचा सर्वसाधारण वापर हा जरी इजिप्तमध्ये यानंतर तीन शतकांनंतर म्हणजे इ.स.पूर्व १००० या काळाच्या आसपास सुरू झाला असला, तरी त्या अगोदरच्या काळातील इजिप्तमधील लोकांना हा धातू नवा नव्हता. या धातूचा उगम आकाशात होत असल्याची त्यांना पूर्ण कल्पना होती. म्हणूनच अशनीपासून मिळालेल्या या लोखंडाचा, ‘आकाशातला धातू’ असा उल्लेख इजिप्तच्या पुरातन काळच्या लिखाणात केला गेल्याचं आढळतं. आकाशातून क्वचित कधितरी येणारा हा धातू अतिशय दुर्मिळ असल्यानं, तो सोन्यापेक्षाही खूपच महाग होता. टुटानखामूनच्या खंजिराच्या पात्याप्रमाणेच, त्याच्या थडग्यातील इतर काही वस्तूसुद्धा या मौल्यवान ‘आकाशातील धातू’पासून म्हणजे अशनीपासून तयार केल्या गेल्याची शक्यता संशोधकांना वाटते आहे. त्यामुळे या इतर वस्तूंच्या रासायनिक विश्लेषणाचं कामही काही काळातच संशोधकांकडून हाती घेतलं जाईल हे नक्की!

चित्रवाणीः https://www.youtube.com/embed/eWOywH8OnII?rel=0

— डॉ. राजीव चिटणीस.

छायाचित्र सौजन्य:Egyptian Museum, Cairo / Daniela Comelli, et al, James St. John / flickr.com, The New York Times / Wikimedia.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..