नवीन लेखन...

नागबळी – Part 3

आम्ही विसरलो, पण नागेश विसरला नव्हता. याचे प्रत्यंतर आम्हाला लवकरच आले. आमच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका होत्या मित्र मंडळाच्या कार्यक्रमाच्या दगदगीतून आम्ही नुकतेच बाहेर पडलो होतो त्यामुळे यावर्षी निवडणुकीत भाग घ्यायचा नाही असे आम्ही ठरवले होते. निवडणुकांच्या धामधुमीत क्लासेस फारसे होत नव्हते. एक दिवस एक तास ऑफ मिळाला. म्हणून सुनीता एकटीच कॅन्टीनमध्ये एका कोपऱ्यात टेबलावर बसली होती. चहाची वाट पहात एक पुस्तक वाचत होती. टेबलावर टक् टक् आवाज झाला तसे तिने पुस्तकातून मान वर करून पाहिले आणि तिला जबरदस्त धक्का बसला! समोर नागेशराव बसला होता! हसून म्हणाला

“काय सुनीताबाई ओळख आहे ना?”

“हो, हो, ओळखलं ना आपण नागेशराव ना?”

“आपण इकडे कसे?” काहीतरी विचारायचं म्हणून सुनीताने विचारले.

“अहो तुमच्या कॉलेजच्या निवडणुका आहेत ना. आमचा एक मित्र उभा आहे. आलो होतो त्याला भेटायला. सुनीताबाई तुम्ही रहा ना उभ्या. आम्ही निवडून आणतो तुम्हाला. सांस्कृतिक मंडळ कार्यक्रम तुम्ही छान कराल.”

“छे छे मी या वर्षीच आलेय. नवीन आहे. पण पुढच्या वर्षी बघेन विचार करुन.”

“चला पुढच्या वर्षी तर पुढच्या वर्षी पण पुढच्या वर्षी नक्की उभ्या रहा. निवडून आणण्याची जबाबदारी आमची.”

सुनीताने बोलणे फारसे न वाढवता त्यांनी जबरदस्तीने पाजलेला चहा घेतला. घरी आल्यावर तिने ही गोष्ट मला सांगितली. जाऊ दे योगायोगाने गाठ पडली आता पुन्हा कशाला तो भेटतोय असे म्हणून मी तिला तो प्रसंग विसरुन जा असे म्हणालो.

आम्ही खूप विसरायचे म्हणालो तरी नागेशराव विसरायला तयार नव्हता. सुनीता त्याच्या मनात भरली आहे हे आम्हाला लवकरच कळून चुकले. काहीतरी निमित्त करुन तो तिला वारंवार भेटू लागला. आणि एक दिवशी तर त्याने तिला चक्क लग्नाची मागणी घातली? आम्ही जाम हादरलो! आता ही गोष्ट गंभीर वळण घेत होती आणि घरात हे सांगणे आवश्यक होतं. नागोबा बिळात घुसू पहात होता.

मी ही गोष्ट आई बाबांच्या कानावर घातली. तसा त्यांना जबरदस्त धक्का बसला!

“सुनील! हे काय सांगतोस? अरे तो नागेशराव केवढा? सुनीता केवढी? तिचे लग्नाचे तरी वय आहे का अजून? आणि ही गोष्ट तुम्ही आत्ता सांगताय आम्हाला? अरे गाढवांनो इतके दिवस गप्प कसे बसलात?

“बाबा आम्हाला तो असे काही करेल असे स्वप्नातही वाटले नाही. त्या कार्यक्रमानंतर आम्ही ही गोष्ट विसरूनही गेलो होतो. पण हा माणूस या थराला जाईल याची आम्हाला काय कल्पना? त्याने जरा आपल्या वयाचा तरी विचार करायला नको का?”

“हे बघ सुनील, झाले ते झाले, हा नागेशराव काय लायकीचा माणूस आहे ते आपल्याला ठाऊक आहे. त्याला एकदम नकार देणे आपल्याला जड जाईल. उद्या पोरीच्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर काय करणार? बरे पोलिसांकडे जावे तर त्याने तसा उघडपणे गुन्हा केलेला नाही. शिवाय पोलिसांकडे त्याच्या ओळखी आहेत. त्याच्या मागे तथाकथित कार्यकर्त्यांची कुमक आहे. त्याचे उपद्रव मूल्य फार आहे. तेव्हा आपल्याला जरा सावधानतेने विचार करावा लागेल?

“बाबा, ते खरे आहे. पण त्याने पुन्हा मला विचारले तर मी काय सांगू?”

“त्याला सांग की मी घरी विचारले तर बाबा म्हणाले की अजून तुझे लग्नाचे वय झालेले नाही शिवाय शिक्षणही पूर्ण व्हायचे आहे तेव्हा तूर्त आमचा लग्नाचा विचार नाही. तोपर्यंत आपल्याला थोडा वेळ मिळेल. आपण ही जागा बदलून दुसरीकडे जाऊ किंवा काहीतरी दुसरा मार्ग निघतोय का बघू!” बाबा म्हणाले.

त्याप्रमाणे पुन्हा जेव्हा नागेशराव भेटला तेव्हा तिने त्याला सांगितले. एकदम नकार नाही हे ऐकून त्याला बरे वाटले. पण त्याने अधूनमधून तिला भेटणे चालूच ठेवले. सुनीताचे स्वास्थ्य नष्ट झाले.

आता काय करायचे? ही जागा मिळाली तीच मुळी योगायोगाने. नवीन जागा लगेच कुठली मिळायला? शिवाय नुकतीच बदली झालेली. त्यामुळे पुन्हा लगेच बदली तरी कशी मिळणार? शिवाय नागेशराव एकतर्फी प्रेमात पडला होता. दुसरीकडे रहायला गेलो तरी तो तिथेही आपला पिच्छा सोडेल याची काय खात्री? कॉलेजही सोडावे लागणार. सुनीताला तर त्या नागोबाचे तोंडही पहाणे नको असे झालेले. तिचे अभ्यासात लक्ष लागेना. प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न! घरातली शांतता आणि आनंद कुठल्या कुठे पळाले. आम्ही सगळे प्रचंड तणावाखाली सापडलो. आईबाबांची आणि माझ्या लाडक्या बहिणीची होणारी कुचंबणा मला असह्य होऊ लागली. आमच्या उबदार आनंदी बिळात हा नागोबा एखाद्या आयत्या बिळातल्या नागोबासारखा शिरून माझ्या लाडक्या बहिणीचे आणि आमचे आनंदी घर बरबाद करायला पाहातो आहे या विचाराने माझ्या अंगाचा अगदी तिळपापड झाला. तरुण रक्त होते. व्यायामाची आवड होती. शरीर कमावले होते. पण या नागोबासमोर शक्तीने नव्हे तर युक्तीने लढावे लागणार होते. याची मला जाणीव होती. संतापाच्या भरात काहीतरी वेडेवाकडे केले तर ते आम्हालाच भारी पडले असते. अगदी थंड डोळ्याने पण काय वाट्टेल ते झाले तरी माझ्या लाडक्या बहिणीला विळखा घालू पहाणाऱ्या या नागोबाचे दात पाडून त्याला जन्माची अद्दल घडवायचीच असे मी मनोमन ठरवले. त्या एकाच विचाराने मी झपाटलो.

–विनायक अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..