नवीन लेखन...

तुम्ही बदल घडवू शकता !

नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानाचे महत्व सगळ्यांनी सांगूनही कित्येक लोक त्यापासून दूर राहिले. त्यातील काही लोक पूर्णपणे आत्मकेंद्रित होते हे गृहीत धरले तरी काही लोकांनी असा सूर काढला की काय करणार कोणीच लायक उमेदवार नव्हता म्हणून आम्हाला मतदान करता आले नाही. आता ही पळवाट म्हणून काढणारे किती व खरेच असा विचार करुन मत न देणारे किती हा संशोधनाचा विषय होईल. पण मग मत न देऊन तरी हा प्रश्न सुटणार आहे का? चांगले उमेदवार नाहित म्हणून मत द्यायचे नाही आणि मग पुन्हा लोकांशी देणे घेणे नसण्यार्‍या प्रतिनिधींकडे सत्ता सोपवायची हेच चालू ठेवायचे का? माझ्या ‘लढा किंवा झोप काढा ’ या लेखात म्हटल्याप्रमाणे हाही एक स्वातंत्र्यलढाच आहे. या लेखात आपण दुसर्‍या पर्यायाचा विचार करू.

तसे बघायला गेले तर आपण चांगल्या गोष्टीचा विचका करायला नेहमीच तत्पर असतो. आपल्याला सोईस्कर असा अर्थ लावून मोकळे होतो. निष्काम कर्मयोग याचा अर्थ काम न करण्याचा कर्मयोग असा घेतला जातो. स्थितप्रज्ञ याचा अर्थ सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करणे असा घेतला जातो मग तो अपघात असो वा अबलेवरचा अत्याचार. त्यामुळे मतदानाच्या बाबतीतही वर सांगितल्याप्रमाणे आपण हात वर करून मोकळे होतो. पण याहि परिस्थितीत बदल घडवून आणण्यासारखं आपण काहितरी करू शकतो. कसे ते पहा.

अगदी अलिकडेच घटनेतील एक तरतूद काही लोकांच्या लक्षात आली ती म्हणजे नकारात्मक मतांचा अधिकार. आता ही तरतूद खरे म्हणजे पुर्वीपासून आहे पण तिकडे कोणीच लक्ष दिले नव्हते. या तरतुदीनुसार तुम्ही तुमचे ‘कोणताही उमेदवार लायक नाही’ हे मत नोंदवू शकता. जर या पर्यायाला एखाद्या मतदारसंघात बहुमत मिळाले तर तेथील निवडणूक रद्द होते व पुन्हा नवीन उमेदवार उभे करावे लागतात. काही मतदारसंघात याचा झटका बसल्यास राजकीय पक्षांना सुध्दा चांगलेच उमेदवार द्यावे लागतील.

आता यावर कोणी अशी शंका घेईल की सध्याची त्याची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे आणि त्यात आपले मत गुप्त राहात नाही. एकदम मान्य. मग यावर उपाय काय? माझ्या मते आपण खालील उपाय करून बघायला हरकत नाही.

तुमच्या सोसायटीच्या बर्‍याच सभासदांनी मिळून एक अर्ज तयार करायचा. पुढील निवडणुकीसाठी घटनेतील तरतुदीप्रमाणे नकारात्मक मतदानाच्या बटणाची सोय आम्हाला मशीनवर करून द्यावी अशी त्यात विनंती करायची. हा अर्ज स्थानिक निवडणूक अधिकार्‍याकडे नेऊन द्यायचा. त्यानंतर ठराविक काळाने त्याची चौकशी करायची. जर काही काळाने तुम्हाला उत्तर मिळाले नाही तर माहितीच्या अधिकारात त्याचे उत्तर मागायचा पर्याय आहेच पण बहुधा ती वेळच येणार नाही. जेव्हा निवडणूक आयोगाच्या लक्षात येईल की जनतेला हा अधिकार हवा आहे तेव्हा तेही याचा सकारात्मक विचार करतील. सुदैवाने आजच्या नकारात्मक परिस्थितीतही आयोग खुपच चांगले काम करत आहे. आपल्या परीने निवडणुका चांगल्या प्रकारे पार पडाव्यात यासाठी ते अतिशय मेहनत घेतात. पण त्यांनाही शेवटी चौकटीतच काम करावे लागते हे विसरून चालणार नाही. त्यामुळे चांगले उमेदवार निवडीचे स्वातंत्र्य ते नाही देऊ शकले तरी नकारात्मक मतदानाचा अधिकार ते नक्कीच देतील असा विश्वास वाटतो.

समजा हा घटनात्मक अधिकार आहे की नाही याबद्दल शंका असेल तर तुमच्यापैकी जे वकील असतील किंवा तुमच्या ओळखीचे असतील ते आपल्या कामातुन वेळ काढून जनहित याचिकेद्वारे ते माहित करुन घेऊ शकतील.

यावर आणखी एक हरकत म्हणजे दुसर्‍या निवडणुकीचा खर्च आपल्याला करावा लागेल. पण तुमच्या दृष्टीने लायक नसलेला लोकप्रतिनिधी निवडून आल्यास त्या निवडणुकीचा खर्च वाया गेल्यातच जमा असताना अशा खर्चाबद्दल गळा काढण्यात काय अर्थ आहे? उलटपक्षी चांगला उमेदवार निवडण्याची संधी आपल्याला लगेच मिळेल. पुन्हा पाच वर्षे वाट पहायची गरज नाही.

पण शेवटी या सगळ्यासाठीसुध्दा घराबाहेर पडून काम करायची तयारी हवीच, नाही का?

— कालिदास वांजपे

Avatar
About कालिदास वांजपे 11 Articles
कालिदास वांजपे हे प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी असून ते वित्तपुरवठा, कायदेशीर कागदपत्रांचे ड्राफ्टिंग आणि कंपनी लॉ या विषयात सल्ला सेवा देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..