
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।।
सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थक्षेत्र समुद्रसपाटीपासून २६०० फूट इंच असून तेथील भवानी मातेचे मंदिर बालाघाट डोंगराच्या कडेपठारावर वसले आहे. या डोंगराचे पुराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी होते. कालांतराने या स्थानी थिंथेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचपूर झाले. नंतर तुळजा भवानीच्या नावाने लोक तुळजापूर म्हणू लागले,
कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनुभूती रूपसंपन्न असून पतिव्रता होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण कर्दम ऋषींनी लवकरच इहलोकीची यात्रा संपविल्यामुळे अनुभूतीने सती जाण्याचा निश्चय केला; परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतीबरोबर सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही सोडून ती मेरु पर्वतानजीक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली आणि तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. तिची तपश्चर्या चालू असताना कुकर नावाचा राक्षस तिथे आला आणि अनुभूतीला पाहून तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लुब्ध झाला. त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने अनुभूतीला स्पर्श करताक्षणीच तिची समाधी भंग पावली. राक्षसाने काही अनुचित प्रकार करू नये म्हणून तिने आदिशक्तीचा धावा करून तिला त्वरित येण्याचे पाचारण केले. यासाठी की शक्तीने या राक्षसाच्या तावडीतून आपली सुटका करावी आणि खरोखरच देवी भवानीच्या रूपाने त्वरित धावून आली. तिने राक्षसाशी युद्ध पुकारले. राक्षसही महिषाचे रूप घेऊन देवीचे अंगावर धावून येताक्षणीच तिने त्रिशुळाने त्याचे शीर धडापासून वेगळे केले. ही भवानी देवी अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे तुळजा असे नामकरण झाले.
भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरल्यानंतर महाद्वार लागते. त्यावरील शिल्प हेमाडपंती असून तिथे नारदमूर्तीचे दर्शन घडते. पुढे गेल्यानंतर कल्लोळ तीर्थ लागते. देवी इथे आल्यानंतर ब्रह्मदेवाने जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली, तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तीर्थास धाऊन आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला. यास्तव या तीर्थास ‘कल्लोळ तीर्थ’ म्हणतात. या तीर्थापासून समोरच गोमुख तीर्थ लागते. त्यातून सतत शीतल स्वच्छ पाण्याची जलधारा पडत असते. त्याच्या अलीकडे गणेश मंदिर असून निंबाळकर दरवाजा लागतो. दरवाजा ओलांडून आत गेले असता मातेचे मंदिर दृष्टीस पडते. मंदिराच्या दर्शनी बाजूस होमकुंड असून त्यावर शिखर बांधले आहे. मंदिराचा सभामंडप सोळाखांबी असून पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे.
गाभाऱ्याचे मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरुढ झालेली भवानी देवीची मूर्ती काळ्या शाळीग्राम शिळेची असून तिने विविध शस्त्रे धारण केली आहेत. देवीने एका डाव्या हाताने महिषासुराची शेंडी धरली असून उजव्या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशूळ खुपसला आहे. तिच्या उजव्या पायाखाली महिषासुर व डाव्या बाजूला सिंह आणि पुराण सांगणारी मार्केडेय ऋषीची मूर्ती दिसते. देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र आणि डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला आहे. गाभाऱ्याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे. आश्विन शुद्ध पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी व भाद्रपद वद्य अष्टमी ते अमावास्या अशी देवीची तीन शयन वर्षे ठरली असून इतर वेळी ती अष्टौप्रहर जागृत असते.
सभामंडप ओलांडून गेल्यावर पूर्वेला भवानी शंकराची वरदमूर्ती. शंकराचे स्वयंभू पिंड, पाठीमागे नंदी, नंदीवर भवानी शंकराचा मुखवटा व त्यावर पंचनागाचा उभारलेला फणा आणि सतत तेवत असणारा नंदादीप दृष्टीला पडतो. मंदिराचे परिसरात श्रीनृसिंह, खंडेराय, चिंतामणी या देवतांच्या मूर्ती असून मंदिराचे दक्षिणेस यमाई देवी व ईशान्येस मातंगी देवीचे मंदिर लागते. आजुबाजूला भारतीबुवा, गरीबनाथबुवा आणि अरण्यबुवांचे पुरातन मठ आहेत.
देवीची आणखी एक कथा सांगितली जाते ती अशी की, रामवरदायिनीची मूर्ती तुळजापूरच्या ईशान्य दिशेस दत्तारण्य स्वामींच्या मठाजवळील मंदिरात आहे. देवी अष्टभूजा असून तिच्या आठ हातात विविध प्रकारची शस्त्रे असून ती अलंकारांनी सुशोभित झालेली आहे. डोक्यावर शिवलिंग असून ती तुकाई या नावाने ओळखली जाते. रावणाने सीतेचे हरण केल्यामुळे दुःखीकष्टी होऊन प्रभू रामचंद्र सीतेचा शोध घेत असता कैलास पर्वतावर ध्यानस्थ झालेले शिवशंकर प्रभू रामचंद्राचे स्मरण करीत होते, ते पाहून पार्वतीने विचारले, ‘सीतेसाठी विलाप करणाऱ्या रामाचे का स्मरण करता? ‘ शिवशंकर म्हणाले, ‘श्रीराम परब्रह्माचे रूप आहे’ खरोखरच श्रीराम तसे आहेत का हे पाहण्यासाठी पार्वतीने सीतेचे रूप घेऊन ती श्रीरामासमोर उभी राहिली असता ते म्हणाले, ‘तू का आई आहेस? ‘ तेव्हा श्रीरामाची महती समजल्यामुळे पार्वतीने आपले खरे रूप प्रगट करून एका शिळेवर उभे राहून श्रीरामाला आशीर्वाद दिला आणि रावणाने सीतेला लंकेत पळवून नेल्याचे सांगितले व ती गुप्त झाली. श्रीरामाने पार्वतीला तू का आई असे म्हटल्यामुळे देवीचे नाव ‘तुकाई’ असे रुढ झाले.
जनकोजी दरेकर नावाचा तेली बुन्हऱ्हाणनगर येथे रहात होता. तो परोपकारी वृत्तीचा असून भवानी देवीचा निस्सीम भक्त होता यामुळेच की काय देवीने त्याला दर्शन देऊन इच्छित वर मागण्यास सांगितले असता तो म्हणाला, “माते, मी पाठविलेल्या पालखीतून तू शिलंगण खेळत जावेस आणि पलंगावर निद्रा करावी. ” देवीने त्याची इच्छा पूर्ण केल्यामुळे जनकोजी प्रतिवर्षी पलंग व पालखी घेऊन तुळजापुरी येऊ लागला. ही प्रथा आजही सुरू आहे.
देवी भवानीची पूजा दिवसातून चार वेळा होते. सकाळी केल्या जाणाऱ्या पूजेला चरणतीर्थ, दुपारच्या महापूजेला पंचामृती पूजा संध्याकाळी धुपारतीने केलेली पूजा आणि रात्रीच्या पूजेला प्रक्षाळण असे म्हणतात. प्रत्येक मंगळवारी मंगल वाद्यांच्या निनादात देवीचा छबिना काढण्याचा प्रघात आहे. भवानी मातेचे विविध प्रकारचे सोन्या-मोत्यांचे आणि हिऱ्यांचे अलंकार असून ते चैत्र शुद्ध एक, श्रावण शुद्ध सहा, भाद्रपद शुद्ध आठ, आश्विन शुद्ध पाच, कार्तिक शुद्ध एक या दिवशी तसेच मकरसंक्रांत आणि रथसप्तमीला मातेला घालण्यात येतात. मातेची सालंकृत पूजा पाहिली असता डोळ्याचे पारणे फिटते.
देवीच्या सर्व उत्सवात नवरात्रोत्सवाला अधिक महत्त्व आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत हा उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा केला जातो. प्रतिपदेच्या दिवशी गावचा कुंभार तीन घट (घागरी) आणून गोमुख तीर्थाजवळ ठेवतो. मग सेवेकरी ते घट वाजत-गाजत खाली आणतात. पहिला घट सभामंडपात ईशान्य दिशेला ठेवला जातो. दुसरा घट देवासमोरच्या शिवमंदिरातील त्रिशुळाच्या ओवरीत आणि तिसरा घट मातंगी देवीच्या मंदिरात स्थापला जातो. नंतर सप्तशतीचे पाठ व नवचंडीचे हवन सुरू होते. खंडेनवमीस पूर्णाहुती होते. शिलंगणाचा सोहळा अपूर्व असतो, त्याचप्रमाणे दसरा सण देखील उत्साहाने साजरा केला जातो.
सोळाव्या शतकातील संत एकनाथ महाराजांचे भवानी देवी स्फूर्तिस्थान होते. भोसले घराण्याची भवानी देवी कुलस्वामिनी असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची देवीवर गाढ श्रद्धा होती. देवीच्या कृपाप्रसादानेच त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले. एकनाथांचे भावार्थ रामायण त्र्यंबकराजाँचा बाळबोध आणि श्रीधर स्वामींच्या रामविजय ग्रंथात तुळजापूरचे उल्लेख आले आहेत.
तुळजापूर हे. क्षेत्र साडेतीन पीठांपैकी एक असून तुळजा-भवानी माता भुक्तीमुक्तीप्रदायिनी आहे. भक्तांना संकटमुक्त करणारी, पराक्रमी पुरुषांना सामर्थ्य देणारी, दुष्टांना यमसदनी धाडणारी, स्त्रियांचे पावित्र्य अबाधित राखणारी जगज्जननी म्हणून ओळखली जाते. देवीचा नवस फेडण्यासाठी महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक आदि प्रांतातील हजारो भाविक दरवर्षी पायी अनवाणी दंडवत घालीत तुळजापुरी येतात. मंदिरात कुंकवाचा सडा शिंपडणे देवीच्या मूर्तीला दही-दुधाने अभ्यंग स्नान घालणे, वेणीदान करून कवड्याची माळ गळ्यात घालणे, परडी भरून जोगवा मागणे, ओटी भरणे आणि जागरण-गोंधळद्वारा देवीची स्तुती करणे हे सर्व प्रकार इथे पहावयास मिळतात. भवानी मातेचे भक्त हिंदुस्थानातच नव्हे तर परदेशातही आहेत. विशेष म्हणजे समर्थ रामदासस्वामींची देखील ही कुलदेवता असून तिच्यावरील श्रद्धा व्यक्त करताना ते म्हणतात,
देखिली तुळजामाता । निवालो अंतरी सुखे ।
तुटली सर्वही चिंता । थोर आधार वाटला ।
आघात संकटी वारी । निवारी दुष्ट दुर्जना ।
संकटी भरवसा मोठा । तात्काळ काम होतसे ॥
Leave a Reply