नवीन लेखन...

त्रिमोतींची ओटी

काय ग सखी, कशी आहेस ? बरी आहेस ना गं? नाही आपलं सगळं कसं अगदी मर्जीप्रमाणे चालय, कसं मस्त, मनाजोगे, स्वच्छंदी आयुष्य भेटलं बग आपल्याला. बाबांची लाडकी परी झालोय, आईची सोनपरी , नवऱ्याची पट राणी झालोय अगदी.

सगळं मिळवलंय आपण ! रडलो, लढलो , भांडलो सगळं सगळं केलं बग तेव्हा जाऊन आज हे दिवस जगतोय, होना गं !
आज एक अनुभव आला, चांगला होता वाईट होता काही समजलं नाही बग , बस विचार करायला भाग पाडणारा अनुभव ठरला तो.

आज तुझ्या माझ्यासारखीच एक सखी, दिसायला सुंदर होती.राहणीमान पाहून तर डोळेच दिपावतील, छान वाटले तिला पाहून . तिचे ते बेधडक , कोणाचीही तमा न बाळगता बोलणे ऐकुन तर भान हरपले. सकाळच्या वेळी गर्दी होती, आजूबाजूला खूप सारी माणसं, माणसं म्हटले की स्त्रीवर्ग, पुरुष वर्ग, वृद्ध आणि पर्यायाने लहान मुले, यांची वातावरणाची कसली अगदी कसलीच पर्वा न करता आपल्या या आगावू सखीने स्वत: स्त्री असूनही समोरील स्त्री वर शब्दरूपी फुलांचा वर्षाव केला, नाजूक गुलाबी ओठांनी गोड आवाजात , गोड म्हणजे साखर किंवा गुळासारखा गोड नाही हं ,औषधी गुळवेलीसारख्या गोड चवीच्या आवाजाचा असा जो सडा पाडला की तो आमच्या कानांवर पडताच क्षणी कानाच्या पापुद्र्यांनी स्वभवती अंथरूण टाकलें आणि पांघरूण घेऊन डोळ्यांनाही मिटवून घेण्याची चेतावणी दिली.
खरं सांगू का, मी काही पुण्याची नाही.

हस ग थोडंसं, चिमूटभर गंमत केली. गोड बोलून, कारले चारून, गुळाचा ढेप चारल्याचा आव नाही गं आणायचा मला.
थोडीशी कानउघडणी करायची आहे बघ, बस एवढंच काय ते !

९० मध्ये स्त्री वर्ग स्वस्वातंत्र्यासाठी खूप झटला आहे, अजूनही झटतोच आहे. देवचक्र नाही, मनुष्यचक्र आहे हे ,शेवट चांगलाच असावा असे काही नासते यांत.

भेटलं बरं स्वातंत्र्य, मुलींना शिक्षण मिळाले, घरात किंमत, प्रेम मिळाले. सगळ्याच नाही पण काही सखींना हे सुख मिळाले हे नक्की. चांगले काही झाले की प्रवाहासोबत वाईटही येतेच.

हल्ली मुलींना पुरुषांसोबत बरोबरी करायची फारच घाई झाली आहे . १००% पैकी ३०% स्त्री वर्ग भरकटताना नजरेस पडतोय. पुरुषांशी त्यांच्या कर्तृत्वामध्ये, शौर्यामध्ये, हुषारीमध्ये , कर्तव्यदक्षतेमध्ये बरोबरी करणे हे बाजूला राहून गेलंय. याउलट पुरुषांप्रमाणे वावरणे, उठणे , बसणे आणि यापलिकडे जाऊन हद्द म्हणजे शिवीगाळ करणे आणि अर्वाच बोलणे यात बरोबरी करताना मुली दिसतायत. सुधारित शिक्षण पद्धतीमुळे, कायद्यांमुळे पुरुष देखील बोलण्याच्या पद्धतीवर अभ्यास करताना , स्त्रीला समान दर्जा देताना, कुटुंबाप्रती कर्तव्यांचं पालन करतांना दिसत आहे. पुरुषांचं पुरुषत्व मार्गावर आणता आणता स्त्री स्त्रित्वाची ओळख विसरलेय की, तिने ती बाजूला ठेवले हेच कळेनासं झालंय.
सखी तू शिकतेय, कमवते अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व काही करतेय याचं विशेष कौतुक वाटते हे खरे. पण समाजात वावरताना येणाऱ्या अडचणींना सामोरं जातांना तू तुझ्या जिभेवरची सरस्वती, हातातली अन्नपूर्णा, शरीरांत वास करणारी लक्ष्मी यांना कशी बरं विसरतेस ? हो, माहीत आहे , रोजच्या जीवनात रोज त्याच त्याच कटकटींना सामोरं जाताना थोडा तोल घसरतो पण तोल हा सावरण्यासाठी असतो ना गं हे विसरून कसं बरं चालेल?
पक्ष्यांच्या थव्यात घार गिरकी घेणार आहे म्हणून काही पक्षी तिला सोबत घेत नाही, ते त्यांचं उडण थांबवत नाही.
घसरणार पाऊल सावर! परंपरा, संस्कार आणि मर्यादा यांचं समीकरण तु स्वतः आहेस हे लक्ष्यात असुदे. तूं जग, हवं तस जग , पिंजऱ्यातून निसटलेला पाखरासारखी जग पण पिंजरयामधल्या पिल्लांना विसरू नको. संस्कारांची , प्रेमाची आणि मातृत्वाची अशा त्रिमोतींची पुढी कमरेला खोचून ठेव. आपण जे रुजवू , पेरु तेच उद्या उगवणार आहे. या सोन साखळी मधून उद्याचा समाज घडणार आहे.

एक शेवटची विनंती आहे सखी, पूर्वजांची पुण्याई स्मरून, सुवासिनींची ओटी भरताना आठवणीने त्या मध्ये संस्कारांचे डोरले विणायला, मातृत्वाचा मळवट भरायला आणि मर्यादांचे पैंजण घालायला विसरू नको.स्त्रीनेच स्त्रित्वाची ओळख जपली पहिजे हाच शृंगार शोभेल हो तिजवर.
(यावर रचलेल्या काही काव्य ओवी)

प्रेम , जिव्हाळा, मातृत्वाचा,
त्रीलोकाचा संगम तूं,
का गं चिरडतेस ओळख आपलीं,
स्त्री सामर्थ्याची जनकही तूं !

बेलगाम स्वातंत्र्य आलें पदराला,
पदर विसरूनी गेलीं तूं,
संस्कारांची प्रसूती केलीस,
विटंबनाही केलीस तूं !

लाज मानेला, लचक कमरेला,
दुर्गामातेचा अंक्षही तूं,
शतक बदलले , काळ बदलला,
लाजेलाही लाजवलेस तूं !

जगत जगाची कारभारीन,
भुमातेचा कंठमनी तूं,
सारेच सोडूनी वाऱ्यावरती,
वादळ बनुनी का वावरते तूं ?

– कु. श्वेता काशिनाथ संकपाळ

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..