नवीन लेखन...

देवमाशांचा माग

देवमासे वर्षभराच्या काळात आपल्या वास्तव्याची जागा बदलत असतात. त्यांच्या वास्तव्याच्या जागेत होणारा हा बदल वेगवेगळ्या कारणांसाठी असू शकतो. काही जातींचे देवमासे हे उन्हाळ्याच्या काळात, जिथे खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं अशा किनाऱ्यापासून दूरच्या ठिकाणी जातात; तर थंडीच्या दिवसात ते प्रजोत्पादनाच्या दृष्टीनं अनुकूल असणाऱ्या किनारी भागात राहतात. हवामानबदलामुळे विविध ठिकाणच्या खाद्याच्या उपलब्धतेवरही परिणाम घडून येतो आहे. त्यामुळे देवमाशांना खाद्य मिळवण्याच्या जागा बदलाव्या लागत आहेत. देवमाशांच्या या स्थलांतराचा अभ्यास, त्यांच्या प्रजाती-जातीच्या अभ्यासाबरोबरच हवामानबदलाच्या अभ्यासाच्या दृष्टीनंही महत्त्वाचा ठरतो. परंतु देवमाशांचं स्थलांतर हे दूरदूरच्या सागरी प्रदेशात होत असल्यानं, देवमाशांचा आकार प्रचंड असूनही त्यांचा माग काढणं, हे कठीण ठरलं आहे. मात्र संशोधकांनी आता एका वेगळ्याच पद्धतीद्वारे, ‘सदर्न राइट व्हेल’ या जातीतील देवमाशांचा माग यशस्वीरीत्या काढला आहे. ओरेगन स्टेट युनिव्हर्सिटी या विद्यापीठातील सोलिन डेर्विल आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचं हे सदर्न राइट व्हेलवरचं संशोधन, ‘प्रोसिडिंग्ज ऑफ दी नॅशनल अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सेस’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.

देवमाशांचा आहार असलेले क्रील, कोपेपॉड व इतर जलचर सजीव ज्या अन्नसाखळीचा भाग आहेत, त्या अन्नसाखळीचा प्लवक हा सूक्ष्मजीव एक प्राथमिक घटक आहे. त्यामुळे प्लवकांतील मूलद्रव्यांची वैशिष्ट्यं ही देवमाशासारख्या सजीवांतही उतरतात. प्लवकांतील कार्बन आणि नायट्रोजनच्या समस्थानिकांचं (एकमेकांसापेक्ष) प्रमाण हे प्रत्येक ठिकाणी काहीसं वेगळं असतं. (समस्थानिक म्हणजे एकाच मूलद्रव्याचे वेगवेगळा अणुभार असणारे अणू.) त्यामुळे, एखाद्या ठिकाणी वास्तव्याला असताना, देवमाशाच्या शरीरातील कार्बन आणि नायट्रोजनच्या समस्थानिकांचं प्रमाण हे त्या परिसरातील त्याच्या आहारातल्या आणि पर्यायानं त्या परिसरात आढळणाऱ्या प्लवकांतल्या समस्थानिकांच्या प्रमाणासारखं असणं अपेक्षित आहे. सदर्न राइट व्हेलच्या बाबतीत त्याच्या अन्नग्रहणातून शरीरात शिरलेली मूलद्रव्यं सुमारे सहा महिन्यांनी त्याच्या त्वचेतील ऊतींपर्यंत पोचतात. त्यामुळे देवमाशाच्या त्वचेचा नमुना घेतल्यास, त्यातील समस्थानिकांच्या प्रमाणावरून हा देवमासा सहा महिन्यांपूर्वी कुठे वावरत होता, याची माहिती मिळणं अपेक्षित आहे. सोलिन डेर्विल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनात याच तर्कशास्त्राचा वापर केला.

सोलिन डेर्विल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपलं हे संशोधन, दक्षिण गोलार्धातील तीस अक्षांशांपासून ते अंटार्क्टिका खंडापर्यंतच्या सागरात, विविध ठिकाणी आढळणाऱ्या सदर्न राइट व्हेलवर केंद्रित केलं. आपल्या संशोधनासाठी त्यांनी सदर्न राइट व्हेल या देवमाशांच्या त्वचेच्या, सात ठिकाणांहून गोळा केलेल्या एकूण सुमारे एक हजार नमुन्यांचा वापर केला. हे नमुने सन १९९४ ते २०२० या काळात, अर्जेंटिना, ब्राझिल, न्यूझिलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिआ, या देशांच्या परिसरातून जुलै ते ऑक्टोबर, या महिन्यांत गोळा केले गेले होते. दक्षिण गोलार्धातील या थंडीच्या काळात हे देवमासे प्रजोत्पादनासाठी काही ठरावीक ठिकाणी एकत्र येत असल्यानं, या काळात देवमाशांच्या त्वचेचे नमुने मिळवणं सोपं जातं. यांतील काही नमुने हे देवमाशांनी कात टाकल्यानंतर मागे सोडलेल्या कातडीतून घेतले गेले होते, तर काही नमुने प्रत्यक्ष मिळवले गेले होते. नमुने प्रत्यक्ष मिळवण्यासाठी त्या देवमाशावर एक विशिष्ट प्रकारचा छोटासा बाण मारला जातो. हा बाण जेव्हा देवमाशाच्या त्वचेवर आदळतो, तेव्हा त्या त्वचेचा अगदी छोटासा तुकडा त्या बाणाच्या पुढच्या भागात अडकतो. हा बाण देवमाशाच्या त्वचेवर आदळून पाण्यात पडतो व तरंगू लागतो. समुद्राच्या पाण्यावर तरंगणारा हा बाण छोटंसं जाळं टाकून ताब्यात घेतला  जातो. या बाणात अडकलेल्या त्वचेच्या तुकड्याचं त्यानंतर प्रयोगशाळेत विश्लेषण केलं जातं.

सोलिन डेर्विल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनासाठी ‘मोबी’ नावाच्या एका प्रारूपावरून दक्षिण गोलार्धातील सागरांतल्या विविध ठिकाणच्या प्लवकांतील कार्बन आणि नायट्रोजनच्या समस्थानिकांचं प्रमाण जाणून घेतलं. त्याचबरोबर या संशोधकांनी देवमाशांच्या त्वचेच्या गोळा केल्या गेलेल्या एक हजार नमुन्यांतील, कार्बन आणि नायट्रोजन या मूलद्रव्यांच्या याच समस्थानिकांचं प्रमाण प्रयोगशाळेतील विश्लेषणाद्वारे शोधून काढलं. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणच्या प्लवकांतील व देवमाशाच्या त्वचेतील, विविध समस्थानिकांच्या एकमेकांसापेक्ष प्रमाणाची त्यांनी तुलना केली. या तुलनेवरून, त्वचेचा नमुना घेतलेला प्रत्येक देवमासा, त्वचेचा नमुना घेण्याच्या सहा महिन्यांच्या अगोदर कुठे वावरला होता ते समजू शकलं. देवमाशांच्या त्वचेचे हे नमुने गेल्या सुमारे तीन दशकांतल्या वेगवेगळ्या काळातले असल्यानं, या देवमाशांचा गेल्या तीन दशकांतील प्रवासही या संशोधकांना समजू शकला. या सुमारे तीन दशकांवर आधारलेल्या निष्कर्षांनुसार, जुलै ते ऑक्टोबर या काळात प्रजोत्पादनासाठी दक्षिणेकडील भागात एकत्र येणारे हे देवमासे, फेब्रुवारी ते एप्रिल या काळात दक्षिण गोलार्धातील चाळीस अक्षांशांच्या आसपास म्हणजे अंटार्क्टिकापासून दूरच्या समुद्रात वावरत असल्याचं दिसून आलं. या काळात ते आपल्या आहारावर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे या प्रदेशातील परिस्थिती देवमाशांना खाद्य मिळण्याच्या दृष्टीनं स्थिर असल्याचं, या तीस वर्षांच्या कालावधीतील देवमाशांच्या वास्तव्यावरून स्पष्ट झालं आहे.

सोलिन डेर्विल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या तीन दशकांच्या अभ्यासाबरोबरच आपल्या संशोधनाद्वारे या देवमाशांच्या, अगोदरच्या दोन शतकांतील वास्तव्याचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला. हा अभ्यास प्रत्यक्ष नमुन्यांवर आधारलेला नव्हता, तर तो पूर्वीच्या नोंदींवर आधारलेला होता. या अभ्यासात या संशोधकांनी, १७९२ सालापासून ते १९१२ सालापर्यंतच्या एकूण १२० वर्षांतील, देवमाशांची शिकार करणाऱ्या विविध अमेरिकन जहाजांच्या सुमारे तेविसशे नोंदी तपासल्या. कारण या काळात मोठ्या प्रमाणावर – सुमारे दीड लाख – देवमाशांची हत्या झाली होती; तसंच यांतील बहुतेक देवमासे हे सदर्न राइट व्हेल याच जातीचे होते. याबरोबरच या संशोधकांनी १९६१ ते १९६८ या काळातल्या, रशिअन व्यावसायिकांद्वारे या प्रदेशात केल्या गेलेल्या देवमाशांच्या शिकारीच्या सुमारे पावणेतीनशे नोंदींचाही आढावा घेतला. या सर्व काळातल्या नोंदीवरून, सदर्न राइट व्हेलची संख्या पूर्वी कोणत्या काळात कुठे अधिक असायची, याचा या संशोधकांना अंदाज बांधता आला. आश्चर्य म्हणजे पूर्वीचे तसंच आजचे देवमासेही दक्षिण गोलार्धातील चाळीस अक्षांशांच्या आसपासच्या प्रदेशात, उन्हाळ्यात तितक्याच प्रमाणात वावरत असल्याचं संशोधकांना दिसून आलं. याचा अर्थ या चाळीस अक्षांशांच्या परिसरातील परिस्थिती देवमाशांच्या दृष्टीनं दीर्घ काळ अनुकूल राहिली असावी.

देवमाशांच्या या चाळीस अक्षांशांच्या परिसरातील अन्न मिळवण्याच्या जागांव्यतिरिक्त दक्षिणेकडेही त्यांच्या खाद्य मिळवण्याच्या जागा आहेत. या जागांच्या बाबतीत मात्र, भूतकाळाच्या तुलनेत या जागांचा वापर कमी झाल्याचं दिसून आलं आहे. अटलांटिक महासागरातील दक्षिणेकडील आणि हिंदी महासागरातील नैऋत्येकडील देवमासे आता दक्षिण ध्रुवाजवळच्या प्रदेशात पूर्वीच्या तुलनेत कमी वेळा जात असल्याचे निष्कर्ष या संशोधकांनी काढले आहेत. देवमाशांचा महत्त्वाचा आहार असणाऱ्या क्रील, कोपेपॉड यासारख्या सजीवांची या भागातील उपलब्धता ही हवामानबदलामुळे घटत असल्याची शक्यता हे संशोधक व्यक्त करतात. मात्र दक्षिण अंटलांटिक आणि नैऋत्य हिंदी महासागरातील देवमाशांनी जरी अंटार्क्टिकाकडे फिरकणं कमी केलं असलं तरी, प्रशांत महासागराच्या नैऋत्य भागातले सदर्न राइट व्हेल मात्र याला अपवाद ठरले आहेत. हे देवमासे वर्षातील काही काळ ध्रुवीय प्रदेशाच्या दिशेनं मोठ्या प्रमाणात कूच करीत असल्याचं दिसून आलं आहे. कदाचित या काळात, इथल्या समुद्रातील मोजक्या ठिकाणी त्यांना अधिक प्रमाणात खाद्य उपलब्ध होत असावं.

सोलिन डेर्विल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ऐतिहासिक नोंदी आणि रासायनिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीवरून सदर्न राइट व्हेल या देवमाशांचा माग काढला आहे. या पद्धतीवरून सदर्न राइट व्हेल हे देवमासे वर्षभरातील कोणत्या काळात कुठे वावरतात, त्यांच्या या विविध ठिकाणच्या वावरात कालानुरूप कसा बदल होत गेला आहे, हे स्पष्ट झालं आहे. देवमाशांचा माग काढण्याची ही पद्धत देवमाशांच्या इतर जातींचा, तसंच इतर काही सागरी प्राण्यांचा माग काढण्यास उपयुक्त ठरणारी आहे. आणि अशा प्रकारच्या अभ्यासातूनच हवामानबदलाचा सागरी प्राण्यांवर व सागरी परिसंस्थांवर होणारा परिणाम स्पष्ट होणार आहे!

(छायाचित्र सौजन्य :Marcia Fargnoli /University of Liège/Australian Antarctic Programme-Stephen Brookes/Fisheries and Oceans Canada)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..