नवीन लेखन...

टाईमपास

माझे पहिलेच जहाज होते. ज्युनियर इंजिनिअर म्हणून जॉईन होऊन पंधरा एक दिवस झाले होते. पहाटे चार ते सकाळी आठ मग एक तास ब्रेक आणि पुन्हा नऊ ते बारा पर्यंत ड्युटी. पुन्हा दुपारी चार ते रात्री आठ पर्यंत अशा प्रकारे वॉच सिस्टीम होती. ज्युनियर इंजिनियरला सेकंड इंजिनियर सोबत त्याच्या वॉच मध्ये ड्युटी वर यावे लागते. पहाटे चार वाजता उठून वॉच करायची वेळ कार्गो लोडींग , डिस्चार्ज तसेच अमेझॉन नदी मध्ये गेल्यावर सतत तीन ते चार दिवस करावे लागत असे . नाहीतर जेव्हा जहाज नांगर टाकून किंवा खोल समुद्रात मार्गक्रमण करत असेल तेव्हा इंजिन आणि इतर सगळे सिस्टिम ऑटो मोड मध्ये टाकून सर्व इंजिनिअर आणि इंजिन क्रू सकाळी 8 ते 5 या वेळेत ड्युटी करत असत. 5 नंतर रात्री 10 ते 11 एक तास राऊंड घेऊन मग संपूर्ण इंजिन आणि इंजिन रूम ऑटो मोड मधे चालत असे. अमेझॉन नदीमध्ये असल्याने तीन दिवस पहाटे 4 ते 8 वॉच मध्ये यावे लागत असे. सकाळी बरोबर साडे तीन वाजता केबिन मध्ये फोनवर वेक अप कॉल येत असे. 12 ते 4 वाला मोटरमन फोन उचलला की पांच साब गुड मॉर्निंग एवढं बोलून ठेवत असे. पहाटे साडे तीन वाजता कसली गुड मॉर्निंग पण जीवावर येऊन सुध्दा उठावे लागे. कधी कधी फोन येऊन गेल्यावर सुध्दा झोप लागायची पण पावणे चार वाजता मोबाईलचा अलार्म वाजला की उठावे लागेच. कदाचित मोबाईल मध्ये अलार्म वाजेल म्हणून वेक अप कॉल येऊन सुध्दा अजून दहा मिनिटे तरी झोपू दे असं वाटतं राहायचं. संध्याकाळी चार ते आठ वॉच संपवून झोपताना दहा तरी वाजायचे पण सकाळी साडेतीन वाजता उठताना अरे यार काय ही जिंदगी आहे अजून दहा मिनिटे तरी झोपू दे मग उठू असे विचार यायचे. मग दहा मिनिटात ब्रश वगैरे आटपून चार ला पाच मिनिट असताना धावतपळत इंजिन रूम गाठून इंजिन कंट्रोल रूम मध्ये प्रवेश करायचा. मग थर्ड इंजिनियर कडून वॉच हॅण्ड ओव्हर करून घ्यायचा. मग झोपेतच डुलत डुलत इंजिन रूम मध्ये सगळ्या मशिनरी, इंजिन आणि फ्युएल टँक लेवल, ऑईल लेवल, टेंपरेचर , प्रेशर, स्टीम आणि पाण्याचे लीक आहेत का बघत फिरायच. चार ते आठ पर्यंत अशी काही झोप आलेली असायची की सांगून सोय नाही. आठ वाजता फोर्थ इंजिनियर आला की पुन्हा त्याच्या कडे वॉच हॅण्ड ओव्हर करताना इंजिन रूम मध्ये काय काय सुरू आहे काय काय बंद केले, कुठला व्हॉल्व खोलला ,कुठला बंद केला अशी सगळी माहिती द्यायची. त्यादिवशी पहाटेचे सवाचार वाजले होते. राऊंड घ्यायला कंट्रोल रुमच्या बाहेर पडत असताना फोर्थ इंजिनियर एकदम लहान तोंड करून आत येताना दिसला. सकाळी आठ वाजता येणारा चार साब सकाळी सकाळी सवा चार वाजता सेकंड इंजिनियर कडे कशाला आला म्हणून आश्चर्य वाटले त्यात थर्ड इंजिनियर बोलून गेला होता की चार साब माझ्यासोबत दोन वाजेपर्यंत ऑइल लीक थांबवण्यासाठी काम करत होता . ब्राझिल मध्ये पहाटे चार म्हणजे आपल्या भारतात साडे आठ तास मागे असल्याने संध्याकाळी साडे सात वाजलेले असतात. फोर्थ इंजिनियर सांगू लागला की त्याची प्रेयसी जिच्याशी त्याला लग्न करायचंय तिच्याशी तो फोनवर तास भर बोलत होता. पण आता उशीर झालाय आणि मी दमलोय दिवसभर काम करून आता मला झोपायला जायचंय सकाळी ड्युटी वर जाण्यासाठी उठावे लागेल एवढं वाक्य बोलल्याने त्याच्या प्रेयसीने त्याला खूप खूप गोष्टी केल्या माझ्याशी लग्न पण करू नकोस माझ्याशी बोलू पण नकोस. माझ्यासोबत एवढे दिवस टाईमपास केलास तेवढा बास झाला. एवढं बोलून तिने फोन कट केला आणि नंतर स्विच ऑफ करून ठेवला. फोर्थ इंजिनियर रडवेला होऊन सांगत होता हिच्या घरात खूप बंधन असल्याने ती घरा बाहेर असेल ती वेळ साधण्यासाठी आपण रात्रभर जागून फोन करायचा. तिच्या घरच्या बंधंनामुळे ती रस्त्यात जाता येता दिसेल तेवढीच किंवा सोसायटीत एखाद्या कार्यक्रमात समोरासमोर भेट होईल तेवढंच. बाकी सगळ्या प्रेमाच्या गोष्टी आणि आणाभाका फोनवरच. घरी असताना चार चार तास फोनवर बोलायला मिळायचे पण आता जहाजावर कसं शक्य आहे. बरं या सर्व गोष्टींची तिला कल्पना पण आहे. इथे गर्मीत घाम गाळून ताण तणावाच्या कामात घरापासून लांब राहून आपण भावी आयुष्याची स्वप्ने रंगवायची. डोळ्यात साठवलेले तिचे हसणे लाजणे पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर आणायचे. समुद्र खवळला की शांत होईपर्यंत तहान भूक आणि झोप विसरून निमूटपणे गरगरणार डोकं दोन्ही हातात धरून बसून राहायचं. काल तुम्ही पाहिलंत ना ऑइल लीक झाल्यामुळे किती काम करावे लागले जिने चढ उतार करून सगळ्या मशीनची पुन्हा सेटिंग करून मला वर जायला रात्रीचे दोन वाजले पण माझा बर्थडे आणि मला तिच्याकडून विश मिळावे म्हणून मीच तिला फोन करायचा. आपण कोणत्या परिस्थितीत काम करतो, अलार्म वाजला किंवा इंजिन रूम मधून कॉल आल्यावर जेवणाच्या ताटावरून जेवण सोडून कसं धावतपळत जातो आणि तासन तास इंजिन रूमच्या चाळीस अंश तापमानात प्रॉब्लेम सॉल्व करत बसतो, मिळेल ते गोड मानून खातो. ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो ज्यांच्याकडून प्रेमाचे व कौतुकाचे दोन शब्द ऐकायला मिळतील म्हणून कानात प्राण आणून ठेवतो आणि तिकडून बास झाला टाईमपास असे ऐकायला मिळाल्यावर कितीही दमलो भागलो तरी झोप कशी लागेल ते सांगा. सेकंड इंजिनियर त्याचे ऐकून त्याला एवढंच म्हणाला तू एक काम कर तिने फोन कट केला असा विचार न करता तिचा फोन बॅटरी लो होऊन स्विच ऑफ झाला असेल असे समजून आता पुन्हा एकदा फोन ट्राय कर आणि मग शांतपणे झोप. सकाळी आठ वाजता न येता दुपारी बारा कामावर ये. पहाटे सव्वा चार वाजता रडवेला होऊन आलेला फोर्थ इंजिनियर दुपारी बारा वाजता पुन्हा नेहमी प्रमाणे हसत हसत कामावर आला. त्याच्या प्रेयसीने फोन कट केला होता की स्विच ऑफ झाला होता ते त्याचं त्यालाच माहिती होतं. सेकंड इंजिनियर दुपारी जेवताना बोलला आपल्याला कोणी समजून घेण्यापेक्षा आपण स्वतःच स्वतःची समजूत घातली तरच जहाजावर आपला टाइम लवकर लवकर पास होत राहील. मी पण मग रात्री आठचा वॉच संपवून व जेणेकरून भारतीय वेळेनुसार दुपारी तिला फोन रिसिव्ह करून माझ्या सोबत फोनवर दोन शब्द बोलायला मिळतील म्हणून कॉलिंग कार्ड चा नंबर घेऊन सॅटेलाईट फोनवर नंबर ट्राय करत होतो. जहाजावर सॅटेलाईट फोन असल्याने आपल्याला कोणाचे फोन येत नाहीत त्यामुळे आपणच फोन करायचा एका मिनिटासाठी एक अमेरिकन डॉलर मोजायचा. जुनियर इंजिनियर असताना जहाजावर कोणी कोणी 800 ते 1000 usd फक्त सॅटेलाईट फोनवर बोलण्यासाठी खर्च करायचे. हाच खर्च आता दहा पटीने कमी झालाय. स्मार्ट फोन तर नव्हतेच तेव्हा आणि सिमकार्ड पण मिळतं नसत. आता स्मार्ट फोन, वाय फाय, मोबाईल सिग्नल, नेट, फेसबुक आणि व्हाट्सअँप, व्हिडीओ कॉल आल्यामुळे, जहाजावर टाइम लवकर जातोय एवढं नक्की.

© प्रथम रामदास म्हात्रे 
मरीन इंजिनियर 
B. E. (mech), DIM
कोन, भिवंडी, ठाणे

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 184 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..