स्वामी समर्थ आणि इतर अवतारी पुरुषांचा मूक संदेश

अक्कलकोट स्वामींचा आज प्रकटदिन. अक्कलकोटचे स्वामी माझंही श्रद्धास्थान. सात-आठ वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही सर्व मित्र मिळून दरवर्षी अक्कलकोटला जायचो. पण जसजसा मी ‘अवतार’ या विषयावर विचार करायला लागलो, तस तस मला या अवतारांबद्दल एक वेगळीच समज यायला लागली आणि अवतार स्थानांवर जाण्याचं प्रमाण कमी कमी व्हायला लागलं. अगदी अलीकडे, म्हणजे २०१५च्या नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये आम्ही मित्र मिळून अक्कलकोट स्वामीचं प्रकटस्थान मानलं गेलेल्या कर्दळीवनाची यात्रा करून आलो. पण यात्रे मागे आमची श्रद्धेपेक्षा एखादी ॲडव्हेन्चर ट्रीप करण्याचा हेतू जास्त होता..ही यात्रा आम्ही अत्यंत सुलभतेने आणि कोणतेही कष्ट न होता पूर्ण केली..

अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, कणकवलीचे भालचंद्र महाराज किंवा नागडेबाबा इत्यादी कोणत्याही अवतारांबाबत माझा सखोल असा अभ्यास नसला, तरी एक निरीक्षण आहे आणि ते माझ्यापुरतं खरं आहे हे मला पटलेलं आहे. अर्थात, माझं मत आपल्याला मान्य असायलाच हवं, असा काही माझा आग्रह नाही. मला या अवतारी पुरुषांबद्दल काय वाटतं ते मी या लेखात मांडायचा प्रत्न केला आहे. या लेखातून कोणाच्या भावना दुखावाव्यात असा माझा हेतू नाही.

स्वामीसमर्थ काय किंवा साईबाबा काय किंवा गजानन महाराज काय आणि भालचंद्र महाराज काय, ह्या सर्व अवतारांचा जन्म आणि नंतरचं त्याचं प्रकटीकरण वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं आहे. स्वामी समर्थ कार्दळीवनात प्रकटले आणि नंतर देशभर फिरत फिरत सोलापूर नजीकच्या मंगळवेढ्यात येऊन स्थिरावले आणि नंतर पुढं अक्कलकोटात येऊन ते अवतारी पुरुष म्हणून मान्यता पावले. तर साई बाबांच्या जन्माबाबत ठोस माहिती नसली तरी ते महाराष्ट्रातल्या पाथरी गावातल्या भुसारी कुटुंबात जन्मले असे म्हणतात. मात्र ते साईबाबा म्हणून मान्यता पावले ते शिर्डी येथे आल्यानंतर. शेगावच्या गजानन महाराजांच्या जन्माबाबातही ठोस माहिती उपलब्ध नाही मात्र ते ही ‘गजानन महाराज’ म्हणून प्रसिद्धीस आले ते शेगावी आल्यानंतरच. कणकवलीच्या भालचंद्र महाराजांचा जन्म बऱ्यापैकी माहित आहे, मात्र ते महाराज म्हणून मान्यता पावले ते कणकवलीत आल्यावर. या कथा सर्वाना माहित आहेत.

मला आपलं लक्ष वेधून घ्यायचं आहे, ते या सर्व विभूतींच्या अवतारी असण्याबद्दलची लोकांची खात्री पटली त्या पूर्वीच्या त्यांच्या अवस्थेकडे. यातील बहुतेक सर्वच अवतारी पुरुषांकडे ते गावाच्या बाहेर किंवा जंगलात, भिकारी किंवा फकिराच्या वेशात, उकिरड्यावर, गांवात भिक्षा मागताना किंवा वेड्यासारखे वागताना लोकांचं त्यांच्याकडे लक्ष गेलेले त्यांच्या चरित्रात लिहिलेलं लक्षात येतं..नेमका हाच मुद्दा मला विचार करण्यासारखा वाटतो.

श्रीस्वामी समर्थ मंगळवेढे गावांत प्रकट झाले. ते रानात वास्तव्य करीत. क्वचित गावात येत. ते गांवात आले, की कुणीतरी त्यांना भोजन देत असे. मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्रीस्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर ह्या ठिकाणी वास्तव्य करून अक्कलकोट येथे आले, त्या वेळी तीन दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते अशी माहिती त्यांच्या चरित्रात मिळते. पुढे स्वामींचे भक्त म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या चोळाप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले अशीही माहिती मिळते. चोळाप्पांच्या घरातील मंडळी त्यांनी ‘एक वेडा घरात आणून ठेवला आहे’ असे म्हणत. तर साईबाबां अंगात लांब पांढरी कफनी, काखेत सटका, हातात टमरेल. डोक्यास घट्ट बांधलेले फडके व पाय अनवाणी अश्या फकिराच्या वेशात चांदभाईना जंगलात सापडले. त्यांच्यासोबत बाबा शिर्डीत आले. शिर्डीतही ते भिक्षा मागण्यासाठी फिरत असत अशी माहिती उपलब्ध आहे. श्री गजानन महाराज हे त्यांच्या ऐन तारुण्यात प्रथमतः वऱ्हाडातील शेगावी दिसले. ते प्रथम दिसले त्यावेळी ते एका मठाबाहेर पडलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात होते आणि गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिट होते असा उल्लेख आहे. पुढे गोविंद महाराज टाकळीकर बेफाम असलेल्या घोड्याच्या चौपायांत श्री गजानन महाराज निजत असत अशीही माहिती मिळते. भालचंद्र महाराजांचीही अशीच काहीशी कथा आहे..

मला या लेखातून या महापुरुषांच्या अवतारी असण्याबद्दल कोणतीही शंका उपस्थित करायची नाही. परंतु हे सर्व अवतारी पुरुष, जे साधारणत: एकाच अवस्थेत असताना लोकांना सापडले, ती अवस्था मात्र मला विचार करायला भाग पडते. माझ्या अल्पमतीने मला विचार करता यातून एकाच गोष्ट समजते, ती म्हणजे हे सर्व अवतारी पुरुष एकाच संदेश देतात आणि तो म्हणजे ‘गोरगरीब, विपन्न, परिस्थितीमुळे भिकाऱ्यासारख्या राहणाऱ्या, भुकेलेल्या लोकांची सेवा करावी’ हा.

या अवतारी पुरुषांची अपेक्षा लोकांनी त्यांना देव बनवून त्यांची पुजा करावी अशी मुळीच नसावी. तर त्यांच्यासारख्या अवस्थेत राहाणाऱ्या लोकांची सेवा करावी, अशी असावी. या सर्वांनी एकाच संदेश दिला आहे तो म्हणजे समाजाच्या अन्त्योदायासाठी प्रयत्न करणे. यातील एकही पुरुष जात-धर्म मानणारा नव्हता हे लक्षात घेतले, म्हणजे आपण तसे अनुयायांनी वागावे हे ही त्यांना अपेक्षित असावे. त्यांची पुर्वावस्था लोकांना हेच सुचवू पाहतेय असं मला वातं. परंतु आपण मात्र त्यांना देव बनवल. त्यांना सोन्याच्या सिंहासनावर बसवलं आणि पैशांच्या राशी त्यांच्यापुढे नेऊन ओतू लागलो, ज्याची त्यांना मुळीच आवश्यकता नव्हती आणि नाही. हेच पैसे किंवा ह्या साधनांनी समाजातील तळागाळातील, उपेक्षीत आणि दुर्लक्षित लोकांना मदत करा असा संदेश हे सर्व अवतारी पुरुष देऊ पाहाताहेत, परंतु आपण मात्र भल्यामोठ्या देणग्या देऊन आपल्या नांवाची पावती किंवा एखादी संगमरवरी पाटी या महाराजांच्या देवळाच्या पायरीशी लावून अमर व्हायचा प्रयत्न करत आहोत. लाखो खर्च करून आपण पालख्या काढतोय, भंडारे उधळतोय, जो चारी ठाव जेवतोय त्यालाच पुन्हा जेवू घालतोय आणि त्याच वेळेस मंडपाबाहेर बसलेल्या एखाद्या भिकाऱ्यास उष्ट्या पत्रावळ्या देतोय. परिसरातल्या एखाद्या गरीब परंतु हुशार विद्यार्थ्याच शिक्षण पैशामुळे अडतंय किंवा जवळ पैसे नसल्यामुळे एखाद्यावर आवश्यक ते उपचार करता येत नाहीत याकडे, पालखी आणि भंडाऱ्यात भान हरपलेल्यांचं फार लक्ष आहे असं दिसून येत नाही. अर्थात या अवतारी पुरुषांच्या नांवाने सुरु असलेळ्या काही संस्था हे काम करीत आहेत, नाही असं नाही परंतू ते पुरेसं नाही.

या अवतारी पुरुषांचे परमभक्त म्हणवणारांनी समाजातील आपल्या आजुबाजूच्या गरजूंना आपल्याला जमेल तशी मदत करायला हवी. समाजातील आपल्याच शेजारच्या दारिद्रीनारायणाची सेवा करायला घेतली की मग अक्कलकोट स्वामी किंवा साईबाबा किंवा गजानन महाराज किंवा नागडेबाबांची सेवा केल्यासारखंच आहे, हे ज्या दिवशी आपल्याला कळेल, त्या दिवशी ह्या अवतारी पुरुषांची पूजा बांधल्याचं खरं पुण्य आपल्याला मिळेल… ’जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो अपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ या अभंगाच्या ओळीतील नेमका अर्थ लक्षात येतो. आपल्या जवळच्या रंजल्या-गांजलेल्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी जरी आपण मदत करु शकलो, तरी त्या पुरुषांची सेवा होईल..!!

आज स्वामींचा प्रकटदिन..या निमित्ताने स्वामींनी दिलेल्या वरील संदेशाची मला उजळणी करावीशी वाटली..

—  नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 362 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…