नवीन लेखन...

गणिताची भीती

तुमचा शाळेतला सगळ्यात नावडता विषय कोणता?’ काही अपवाद वगळता या प्रश्नाचे उत्तर १.गणित आणि २.इतिहास असं मिळतं. गणित हा इतक्या मोठ्या प्रमाणात अप्रिय असण्याचं नेमकं काय कारण असावं? ही आनुवंशिक समस्या आहे की अन्य काही? वैज्ञानिकांनी संशोधने करून शोधलेलं उत्तर मोठं मजेशीर आहे. ते म्हणतात; गणिताची भीती ही प्रामुख्याने आपल्या भोवतालच्या वातावरणातून आपल्यावर लहानपणापासूनच थोपली जाते. कशी? ज्या पालकांना स्वतःला गणित हा विषय अवघड जात होता ते आपल्या पाल्यांनाही या विषयाची सतत भीती घालतात. कित्येकदा तर गणित शिकवणाऱ्या शिक्षकांना स्वतःलाच हा विषय नावडता असल्याने वा शाळेत या विषयात कमी गुण मिळत असल्याने तिटकारा असतो. हे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना गणित शिकवताना कळत- नकळत ‘नीट लक्ष द्या. हे वाटतं तितकं सोपं नाही.’ अशा प्रकारची भीती घालत असतात. याशिवाय परीक्षेच्या पूर्वी येणाऱ्या दडपणाला नीट हाताळता न आल्यामुळे ‘आपल्याला गणित येत नाहीच’ हा समज मनात पक्का बसत जातो आणि परिस्थिती आणखी बिघडते.

आयुर्वेदात ‘शंकाविष’ नावाचा एक प्रकार वर्णन केला आहे. एका अंधाऱ्या खोलीत एखादी दोरी जरी अंगावर पडली तरी सापच पडला आणि तो आपल्याला चावला आहे अशी शंका मनात आल्याने रुग्णात प्रत्यक्ष साप न चावतादेखील सर्पदंशाची लक्षणे अल्पप्रमाणात दिसू लागतात असे या शंकाविषाचे वर्णन आले आहे. इथेही गणिताबाबत हाच प्रकार घडत असतो. आपल्याला आश्चर्य वाटेल पण या साऱ्या लक्षणसमूहांना मिळून मार्क अशक्राफ्ट नामक मानसोपचारतज्ज्ञांनी ‘math anxiety’ असं नामकरण केलेलं असून या समस्येबाबत सल्ला घेण्यास येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

भारतीयांचे गणितातील योगदान हा काही नाविन्यपूर्ण विषय नव्हे. आर्यभट्ट, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त, रुद्रट इथपासून ते श्रीनिवास रामानुजन अय्यंगार वा अगदी वर्तमानातले कित्येक उत्कृष्ट गणिती इथपर्यंतचा प्रचंड इतिहास आपल्याकडे आहे. असं असूनही आज भारतीय विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीती आणि पुढे गणितात नापास होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. कधीकधी ही भीती इतक्या प्रमाणात आढळते की शालेय वा महाविद्यालयीन शिक्षण संपून कित्येक वर्षे लोटली आणि गणित या विषयाशी काही संबंध उरला नसेल तरी रात्रीच्या वेळी गणिताच्या पेपरसंबंधित स्वप्ने पडणे आणि घाबरून जाग येणे यांसारखी लक्षणेदेखील कित्येकांत आढळतात.

गणिताची भीतीपासून दूर राहण्याचे मार्ग:

– सर्वप्रथम शिक्षक आणि पालक यांनी याबाबत सजग राहून कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडून विद्यार्थ्यांना भीती घातली जाणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

– गणितासाठी सततचा सराव अतिशय महत्वाचा ठरतो. ‘असाध्य ते साध्य करीता सायास; कारण अभ्यास तुका म्हणे’ हे गणिताला शतशः लागू होतं. याकरता शाळेपासूनच नियमित सराव महत्वाचा. अगदी पाढे ते बीजगणितीय सूत्रे या साऱ्या गोष्टींना सतत ‘पॉलिश करणे’ गरजेचे.

– परीक्षेच्या आधी किमान अर्धा तास अभ्यास करणे थांबवावे आणि भ्रामरी हा प्राणायाम प्रकार करावा.

– याशिवाय परीक्षेच्या तयारीच्या व प्रत्यक्ष परीक्षेच्या काळात नियमितपणे घेण्यासाठी काही औषधी वा ताण कमी करण्यास नस्य वा शिरोधारा यांबाबत आपल्या जवळील आयुर्वेदीय तज्ज्ञाचा सल्ला आवर्जून घ्यावा.

– गणित हा अवघड विषय आहे ही भीती आजच मनातून काढून टाका आणि पूर्ण आत्मविश्वासाने या विषयाला सामोरे जा.

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

5 May 2017

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..