नवीन लेखन...

भय इथले संपत नाही

लाओ त्से हा चीनी तत्त्वज्ञ म्हणतो आपण जितका लांब प्रवास करावा, तितकं आपल्याला कमी कमी कळत जातं. हे आपण लक्षातच घेत नाही आणि इथेच आपलं भय वाढीला लागते. जग जितकं पचवावं – रिचवावं तितकंच नेमकं अंगी लागतं. वृद्ध हा शब्दच संस्कृत भाषेत ज्ञानी या अर्थानं आलेला आहे.


रशियन चित्रपट आहे द रिटर्न नावाचा. यात वडील अनेक वर्षांनी घरी आले आहेत, पण मुलांना लहानपणापासून ते माहीतच नाहीत. मग मुलांना आपल्या वडिलांचीच अडचण होऊ लागते कारण त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा संकोच होऊ लागतो. मुलं आपल्या भरकटलेल्या बापाला माफ करायला तयार होत नाहीत. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध चित्रकार रेंब्राचे ‘द रिटर्न ऑफ द प्रॉडिगल सन’ या चित्राचा विचार करायला हवा. यात नादान,  बेजबाबदार मुलगा वडिलांची सगळी संपत्ती उधळून घरी येतो आणि अगदी गुडघ्यावर वाकून वडिलांची क्षमा मागतो. वडील पण भावव्याकुळ होऊन त्याला मिठीत घेतात आणि माफही करतात. बाप भरकटलेल्या मुलाला चटकन माफ करू शकतात पण मुले मात्र कठोर असतात ती भरकटलेल्या बापाला सहज माफ करत नाहीत.

बाप म्हातारा झाला तरीही बापच असतो. वस्तुतः आपण स्वतःला निखळपणे ओळखतच नाही. त्यातल्या त्यात एकच गोष्ट आपल्याला ठाऊक असते की आपण जीवंत आहोत, आणि आपल्याला त्याची जाणीव आहे. म्हातारपण आल्यावर वेळ पुरत नाही. भोवतालची सर्व जबाबदारी स्वतःवरच आहे आणि जगात दुसरी लायक माणसं नाहीतच हा समज वाढीला लागतो. लाओ त्से हा चीनी तत्त्वज्ञ म्हणतो आपण जितका लांब प्रवास करावा, तितकं आपल्याला कमी कमी कळत जातं. हे आपण लक्षातच घेत नाही आणि इथेच आपलं भय वाढीला लागते. जग जितकं पचवावं – रिचवावं तितकंच नेमकं अंगी लागतं. वृद्ध हा शब्दच संस्कृत भाषेत ज्ञानी या अर्थानं आलेला आहे.

जगणं अफाट आहे ते न जगता मृत्यूच्या विचारानेच आणि कल्पनेनेच धास्तावल्याने जगणं तेवढं मागे राहतं. वय झाले की आपण सतत किरकिर करायला लागतो. डॉक्टर आणि मंदिरं यांच्या कडेच वेळ आणि पैसा खर्च करत राहतो. आपली एक तक्रार तर हीच की आपलं कुणी ऐकतच नाही. पण कबीर तर म्हणतो की मुंगीच्या पायातले पैंजणही त्या परमेश्वराला ऐकू येतात फक्त आपण विश्वास ठेवायला हवा. भारतात सल्ला देणे हे सर्वात सोपे काम आहे. आपण वय झाले की एकमेकांच्या बरोबर औषधे, डॉक्टर, घरातील कटकटी याचीच चर्चा करत राहतो. भारतीय परंपरेत वानप्रस्थाश्रम हा खूप मानाचा असतो पण आपण ते नाकारतो. आपल्या संसारातून मुक्त होत जायचे असते पण वय झाले की आपण अधिकाधिक त्यातच गुंतत जातो. आजच्या पिढीला सल्ला वगैरे नको असतो. त्यांचे कष्ट, ताणतणाव वेगळे आहेत. त्यांना थोडा धीर, विसावा आणि अवकाश हवा असतो. नेमके त्या अवकाशातच आपण लुडबुड करत राहतो.

एक वृद्ध शेतकरी झोपताना प्रार्थनेचा समारोप नेहमी,’ ‘देवा, माझं मन आरशासारखे लख्ख ठेवा म्हणजे कोणताही विचार त्यात स्वच्छ उमटेल’.. या शब्दांनी करायचा. असे आपल्याला पण जमायला हरकत नाही.

माझी आई मला स्पष्टपणे म्हणाली होती, ‘मी माझी मुलं वाढवली पण तुझ्या मुलाला वगैरे मी नाही सांभाळणार, असेन तेव्हा करेन त्याचे कोडकौतुक पण त्याचे मला बंधन नको घालूस.’ आम्ही तिच्या या निर्णयाचा, तिच्या स्वातंत्र्याचा स्वीकारच केला आणि तिला मोकळेपणे जे करायचे ते करू दिले. यामुळे आम्हाला आमच्या क्षमता संपूर्णपणे वापरण्याची संधी मिळाली. हे असे सगळीकडेच होईल असे नाही. पण आपल्याला मोकळे होता आले पाहिजे आणि ते तसे समोरच्याला स्पष्टपणे सांगता आले तर बरेच संघर्ष, ताणतणाव टाळता येतात हे मी स्वतः अनुभवले आहे. माझ्या मित्राच्या आईला गोळ्या पचायला मदत व्हावी म्हणून डॉक्टरांनी भरपूर पाणी प्यायला सांगितले, मित्र तिला पाणी पी म्हणतो तर तिला मुलाचा राग येतोय ती रागावते,करवादते म्हणते तू मला मारायला बसला आहेस, तर मित्र म्हणतो सख्खी आई आपलं ऐकायला तयार होत नाही तर इतरांनी आपले ऐकायला हवे हा आपला हट्ट व्यर्थ आहे.

उत्तम कांबळेंनी आपल्या आत्मचरित्रात एके ठिकाणी लिहिले आहे की लहानपणी आम्हाला आईने हे शिकवले होते की भरपूर पाणी प्यायल्याने भूक मारता येते. यांची आई जेव्हा म्हातारपणी यांच्या कडे मुंबईला रहायला येते आणि गोळ्यांचा निचरा व्हावा म्हणून डॉक्टर तिला भरपूर पाणी प्यायला सांगतात, तेव्हा ही वेगळ्याच कारणाने चिडते तिला वाटते आपण जो उपाय मुलांच्या भुकेवर लहानपणी केला तोच उपाय आता मुलगा आपल्यावर करतोय की काय? आपण या दोन्ही टोकावर न जाता आपले म्हातारपण स्वीकारायला हवे. आपण आपले वय मान्यच करत नाही.

न पूछ कौन है, क्यों राह में लाचार बैठे हैं
मुसाफिर हैं,सफर करने की तमन्ना हार बैठे हैं।

असे आपल्या बाबत होऊ नये यासाठी सतत बदलत राहणे, काळाच्या बरोबर चालणे महत्त्वाचे. याबरोबर आपल्यालाच आपण मोठे करत जायचे, समृध्द करत न्यायचे.मनाची समृध्दता येण्यासाठी फार काही वेगळे करावे लागत नाही. फक्त येणार्या क्षणाला सामोरे जाताना निर्मळ पणे सामोरे जायला हवे. समोरच्याचे कौतुक करावे गेला बाजार आजपर्यंत ज्यांना दुखावले त्यांची मनापासून माफी मागून टाकावी, सगळा निचरा होताक्षणी भय कमी कमी होत जाते. शेवटी मरणाचे दुःख का तर काही गोष्टी करायच्या राहिल्या, काही सांगायच्या राहिल्या आणि वेळ तर फार कमी उरला आहे. देवदास मधला दिलीपकुमार आर्तपणे टांगेवाल्याला विचारतो, ‘और कितना समय लगेगा भैय्या, मेरे पास वक्त बहोत कम है…’ हे जे आहे ना ते आपल्याला पण लागू पडते. आपल्याकडे पण वेळ खूप कमी आहे. राग,रुसवे,द्वेष, तिरस्कार यात वेळ घालवण्यापेक्षा प्रेम करावे, भोवताली बरीच धडपडणारी माणसं आहेत त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. अहो एवढेच कशाला,आपल्याला ज्या सखीने आयुष्यभर सांभाळलेले असते तिला साधे धन्यवाद पण आपण दिलेले नसतात.

खुशवंत सिंग या सगळ्या अवस्थेला फार निर्मळपणे सामोरे गेले होते. ते म्हणायचे, ‘आपल्या तक्षसणाईच्या कहाण्या सांगून आजुबाजूच्या लोकांना छळू नये. त्यांना एकदा ‘हिंदुस्थान टाईम्स’च्या संपादकांनी विचारले की, ‘तुमचा निवृत्त होण्याचा काही विचार आहे की नाही?’ त्यावेळी ते 69 वर्षांचे होते. तर खुशवंत सिंग म्हणतात, ‘मी स्मशानात गेल्यावरच निवृत्त होणार..’

एक शायर म्हणून गेला आहे

जवानी जाती रही, और हमें
पता न चला

इसी को ढुंढ रहे है, कमर

झुकाए हुए..।

आपण आपल्या मृत्यूसाठी सतत तयार रहायला हवे, तो शाश्वत आहे.त्यावर फार विचार करू नये. आत्महत्या करणारे किंवा फाशी दिली जाणार्या गुन्हेगारांव्यतिरिक्त कुणालाही आपल्या मरणाची नक्की तारीख माहीत नसते.गालिब म्हणून गेला आहे की जीवन आपल्या वेगाने पुढे पुढे सरकत जाते. ते कधी कुठे थांबणार याचा कुणाला कधीच अंदाज नसतो.  न आपल्या हाती लगाम आहे न पायात रकिब। पण याचे सतत स्मरण असायला हवे की मरणाशी गाठ अपरिहार्य आहे. मरणानंतर आपले काय होते हे कुणालाच माहिती नसल्याने त्या संपूर्ण प्रक्रियेचे भय आपल्या मनात ठसलेले असते. ओशो म्हणतो जे लोक मरणाला घाबरतात ते प्रेम करायला पण घाबरतात. कारण प्रेम म्हणजेच मृत्यू, समर्पण. गालिब एका गझलेत म्हणतो ते मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा चक्क निःशब्दच झालो होतो.

जान तुम पर निसार करता हूं
मैं नहीं जानता दुआ क्या है…

तर मरणाचे भय न बाळगता आपली निरवानिरव वेळेतच करून टाकावी, कसलाही मोह मागे उरला नाही पाहिजे असेच निरिच्छपणे जगावे.

कविवर्य ज. के. उपाध्ये मरणाला टेकले होते. आपल्या कडे मयताचे कपडे घरी न आणण्याची पध्दत आहे त्या अनुसार त्यांना पंचा घालून जमिनीवर झोपवलेले होते. भोवताली सगळे त्यांच्या जाण्याची वाट बघत बसलेले. इतक्यात वार्याने त्यांच्या कंबरेला गुंडाळलेला पंचा हवेनं उडाला.बाजूला बसलेल्या शिष्याने चटकन त्यांचा पंचा सावरायचा प्रयत्न केला तर त्याही अवस्थेत उपाध्ये म्हणतात, ‘असु दे रे तो पंचा, असे म्हणतात की नंगे से खुदा भी डरता है, बघू दे बापड्याला तेवढाच डरला तर डरेल..बापुडा…’ असे मिश्कीलपणे मरणाला सामोरे जाण्यासाठी तसे समृध्द आयुष्य मात्र

जगायला हवे.

(ज्ञानेश्वरी- अध्याय दहावा, ओवी 147) ज्ञानेश्वर माउली म्हणतात,

आजि आयुष्या उजवण जाहली।
माझिया दैवा दशा उदयली।
जे वाक्यकृपा लाधली, दैविकेनि मुखें ॥ 147 ॥

आयुष्याची सफलता झाली. आतला बाहेरचा अंधार आता मिटला आहे. उजवणीची, बोळवणीची वेळ आली आहे. उजवण साफल्यानंतर होते. उजवण करावी, व्हावी असं आयुष्य देखील असायला हवं.

थोर लेखक, कवी, शास्त्रज्ञ, समाजसेवक, उद्योजक, अशा महान व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्याची उजवण झाली असं म्हणता येईल. रोजच्या देवपूजेला महापूजा नाही म्हणता येणार. ग्रंथ म्हणजे जरी पुस्तक. तरी शालेय पुस्तकाला ग्रंथ नाही म्हणता येत. तसंच आपणा सर्वसामान्य जगण्याला जीवन म्हणणे हास्यास्पद ठरेल. दुर्धर रोगांनी, इस्पितळात खितपत मृत्यूची वाट पहाणं अनेकांच्या नशिबी येतं. ते देखील मृत्यूला आळवत असतात. जगण्याचा वीट आल्यानं, श्वास घेणं नकोसं झाल्यानं ही आळवणी करणं वेगळं आणि सफल जीवनानंतर, कार्य संपल्याची जाणीव झाल्यानंतरून आळवणी वेगळी. ज्ञानेश्वरांनी 21 व्या वर्षी संजीवन समाधी घेतली आणि विश्वाचीच माउली झाले. याच अर्थाने आपले बाकीबा म्हणजे बा.भ.बोरकर लिहितात

सुखोत्सवें असा जीव अनावर
पिंजर्याचे दार उघडावे
संधिप्रकाशांत अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी

आयुष्याची इतिकर्तव्यता झाली आहे. आता या पिंजर्यातला देह परमेश्वराला भेटायला आतुर झाला आहे.मला घेऊन जा तेही अजून संधिप्रकाश आहे तोवरच माझी लोचने मिटावी अशी पण इच्छा ते व्यक्त करतात.

आपुले मरण पाहिले म्या डोळा । तो जाला सोहळा अनुपम्य । असे तुकोबा पण म्हणून गेले आहेत.

असे भाग्य, असे मरण सर्वांना लाभो.

आमेन!

–गणेश मनोहर कुलकर्णी

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..