नवीन लेखन...

ठाण्याची रंगपरंपरा

आज महाराष्ट्राच्या सह-सांस्कृतिक राजधानीचा मान मिरवणाऱया ठाणे शहराचा साधारणत सातव्या शतकापासून लिखित इतिहास आढळतो. या इतिहासात डोकावल्यावर लक्षात येते की, इतिहासकाळात ठाणे हे वैभवाच्या शिखरावर असलेलं, भरभराटीस आलेलं, व्यापारी उलाढालींचे आणि राजकीय हालचालींचे केंद्र असलेलं संपन्न नगर होतं.

नाटकाच्या संदर्भातील पहिली नोंद मिळते ती रावबहादूर भास्कर दामोदर पाळंदे यांच्या संदर्भातील. ऑफिशिएटिंग मराठी ट्रान्सलेटर म्हणून सरकार दरबारी काम पाहिलेले पाळंदे साहित्यिक होते.  ‘गीत सुधा’ आणि ‘रत्नमाला’ हे ग्रंथ त्यांनी लिहिले होते. मुख्य म्हणजे ‘विक्रमोर्वशिय’ या संस्कृत नाटकाचे त्यांनी मराठीत गद्य पद्यात्मक भाषांतर केले होते.  तिथून ठाण्याची नाट्यपरंपरा उगम पावली, असं म्हणता येईल. त्यानंतर सन १८९० मध्ये ठाण्याचे नाटककार (त्याकाळच्या पद्धतीनुसार संगीत आणि ऐतिहासिक नाटकांची रचना करणारे) आत्माराम मोरेश्वर पाठारे (१८६८ ते १९३१) यांच्या कुशल लेखणीतून ‘संगीत संभाजी’ हे नाटक रंगभूमीवर अवतरले. या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये १ नोव्हेंबर १८९० रोजी नरहरबुवा कोल्हापूरकर यांच्या चित्तचक्षू चमत्कारिक कोल्हापूरकर नाटक मंडळीने केला. मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात या नाटकाचे त्या काळात शेकडो प्रयोग झाले.  इतकेच नव्हे तर या नाटकाच्या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या काढाव्या लागल्या.

या पारतंत्र्याच्या काळात देशभक्तीच्या विचारांनी आणि कृतींनी सगळं वातावरण भारलेलं होतं. त्याचे पडसाद रंगभूमीवरदेखील उमटले. ठाण्यातील गोपाळ गोविंद सोमण यांनी सन १९०९ मध्ये ‘बंधविमोचन’ नावाचे नाटक लिहिले.  सोमण हे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर ऑफिसमध्ये कारकून होते.  सोमणांचे ‘बंधविमोचन’ हे नाटक लोकमान्य टिळकांवर आहे असे सरकारला वाटले आणि महाराष्ट्राच्या १२ जिह्यांमध्ये या नाटकाचे प्रयोग सरकारी परवानगीशिवाय होऊ शकणार नाहीत, असा आदेश काढण्यात आला. यानंतरच्या काळात ठाण्यातील विविध संस्थांची कलापथके, मेळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत होते.

ठाणे शहरात खुल्या नाट्यगृहात पहिले नाटक सादर झाल्याची नोंद सन १९५० सालातली आहे. ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे तेव्हा पहिल्यांदा २० मे आणि २१ मे रोजी मो. ह. विद्यालयाच्या पटांगणावर स्टेज बांधून ‘अर्ध्या वाटेवर’ – लेखक ह. वि. देसाई आणि ‘फास’ – लेखक प्रा. अनंत काणेकर हे नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आले.  याच काळात सन्मित्रकार स. पां. जोशी यांची नाट्यलेखनासाठी लेखणी सरसावलेली होती. त्यांनी लिहिलेल्या ‘संदेश’ या चार अंकी संगीत नाटकाचा प्रयोग कलामंदिर संस्थेनं १५ जून १९५२ रोजी अच्युत बळवंत कोल्हटकर पुण्यतिथीनिमित्त दादरच्या छबिलदास हायस्कूलच्या हॉलमध्ये सादर केला. या नाटकाच्या छापील जाहिरातीनुसार याचे तिकीट दर – वर्गणी होती विद्यार्थ्यांना आठ आणे, तर प्रौढांना एक रुपया.  १९५४ साली शासनाने राज्य नाट्य स्पर्धा सुरू केल्या, तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नसल्याने या स्पर्धेचे नाव ‘मुंबई राज्य नाट्यस्पर्धा’ असे होते. पहिल्या वर्षीपासून या स्पर्धांचे एक केंद्र ठाणे होते.  पहिल्या वर्षी मो. ह. विद्यालयात ठाणे केंद्राची फेरी झाली. १९५४ सालीच वि. रा. परांजपे आणि अन्य नाट्यप्रेमींनी मिळून ‘नाट्यमन्वंतर’ नावाची नाट्यसंस्था ठाण्यात स्थापन केली.  जिल्हा वाचनालयाच्या मदतीसाठी सन १९५५ मध्ये १५ मे रोजी ‘भाऊबंदकी’ सादर झाले. तर १९ मे रोजी भाऊबंदकीमध्ये ठाण्याच्या दत्तोपंत आंग्रेंनी चोख अदाकारीने प्रेक्षकांची दाद घेतली.  १९५६ ठाणे शहरातून राज्य नाट्य स्पर्धेचे सर्वात पहिल्यांदा पारितोषिक मिळवण्याचा मान वि. रा. परांजपे यांना लाभला.

१९५६ साली ठाण्यातल्या सगळ्या रंगकर्मींनी एकत्र येऊन मोठया प्रमाणावर उत्साहाने रंगभूमी दिन साजरा केला. ५ ते ८ नोव्हेंबर असे तीन दिवस हा सोहळा चालला होता. या रंगभूमी उत्सवाचे उद्घाटन नाटककार, समीक्षक माधव मनोहर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी स्थानिक साहित्यिक आणि जिल्हा प्रसिद्धी अधिकारी बाळासाहेब सामंत यांनी लिहिलेल्या ‘युवराज’ या संपूर्ण नाटकाचा पहिला प्रयोग झाला. फार्सिकल ढंगाच्या नाटकात वि. रा. परांजपे, पेठे, सौ. लिमये यांनी भूमिका केल्या होत्या. त्यानंतर या उत्सवात ‘न पटणारी स्त्री’, ‘फरारी’,  ‘येथे नवरा पाहिजे’, ‘घुबड’, ‘देवाचे घर’, ‘हिऱयांची कुडी’, ‘तू माहेरी गेल्यावर’ या एकांकिका झाल्या. श्याम फडके, प. त्रिं. सहस्रबुद्धे इ. लेखकांनी त्या लिहिल्या होत्या.  या रंगभूमी उत्सवाचे फलित म्हणजे ठाणे मराठी नाट्यसंघाची स्थापना. त्यामुळे ठाणे शहरातील कार्यरत नाट्यसंस्था या संघाशी संलग्न झाल्या आणि ठाण्यातील नाट्यचळवळीला नवा जोम आला.

१९५७ साली सन १८५७च्या स्वातंत्र्य समराची शताब्दी साजरी करण्यात आली. यावेळी आर्य क्रीडा मंडळाच्या हॉलमध्ये १५ ऑगस्ट रोजी समारोह साजरा करण्यात आला.  या सोहळ्यात ठाणे मराठी नाट्यसंघाच्या विद्यमाने, हनुमान व्यायामशाळेच्या नवजीवन कला पथकाने कै. नानासाहेब दामले लिखित ‘संगीत तुटलेली तारका’ या झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित नाटकाचा प्रयोग सादर केला.  या प्रयोगात सुलभा लागू यांनी राणीची मुख्य भूमिका केली, तर सुमन घांगुर्डे, इंदुमती जोशी, शशिकला साठे, उल्हास प्रधान, मनोहर देशपांडे, ताम्हाणे, घांगुर्डे, बिर्जे यांनी अन्य भूमिका केल्या होत्या.  १९६० साली ठाण्यात भरलेल्या ४२व्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने स्थानिक कलाकारांनी ‘भावबंधन’ सादर केले, तर पुण्याच्या प्रोग्रेसिव्ह ड्रमॅटिक असोसिएशनने ‘जगन्नाथाचा रथ’ आणि पुण्याच्या संध्या थिएटर्सने ‘संगीत द्रौपदी’ हे नाट्यप्रयोग सादर केले. यावेळी ‘वेणी संहार’ या संस्कृत नाटकाचा काही भाग सादर करण्यात आला.

१९६० साली ११ सप्टेंबर रोजी टेंबी नाक्यावरील यशवंत भुवन येथे सभा होऊन ठाणे मराठी नाट्यसंघाचे रूपांतर मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेत करण्यात आले. तेव्हा ठाणे शाखेचे ५५ सभासद होते. नाट्य परिषदेच्या मुख्य शाखेचे चिटणीस गो. म. वाटवे यांनी यानिमित्ताने ठाणेकरांचे अभिनंदन करणारे पत्र पाठवले होते.  यावेळी वि. म. ऊर्फ मामा जोशी यांनी ठाणे जिह्यातील नाट्यकलोपासकांची सूची तयार करण्याची सूचना मांडली आणि त्यासाठी एक फॉर्म तयार करण्यात आला.

यावेळी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचे निवडण्यात आलेले कार्यकारी मंडळ असे होते ः अध्यक्ष- ग. बा. वालावलकर, कार्याध्यक्ष – स. पां. जोशी, उपाध्यक्ष – प्रा. ज. के. रानडे, चिटणीस – विजयकुमार शिर्के, प्रभाकर साठे, अशोक साठे आणि सभासद – वि. रा. परांजपे, वि. म. जोशी, यशवंत पालवणकर, नी. गो. पंडितराव, कुमार चंदा रणदिवे.

याशिवाय ठाणे जिह्यातील अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, वसई, पालघर इ. ठिकाणचा एकेक प्रतिनिधी कार्यकारी मंडळात सभासद म्हणून घ्यावा असे ठरले.  यावेळी ठाणे नगरपालिकेतर्फे होणार असलेले संकल्पित राणी लक्ष्मी बंदिस्त नाट्यगृह लवकर पूर्ण व्हावे म्हणून संस्थेकडून प्रयत्न करण्याचे ठरले. तसेच रंगभूमी दिनानिमित्त ५ नोव्हेंबर १९६० रोजी ठाणे मराठी नाट्यसंघातर्फे ‘करीन ती पूर्व’ या नाटकाचा प्रयोग यशवंत पालवणकरांच्या दिग्दर्शनाखाली सादर करण्यात येईल असेही ठरविण्यात आले. मात्र कालांतराने एकत्र आलेले रंगकर्मी विखुरले आणि या शाखेचे कामकाज संथावले. नाट्य परिषद ठाणे शाखेला नवी ऊर्जा मिळाली ती ठाण्यात १९७८ साली राम गणेश गडकरी या बंदिस्त वातानुकूलित नाट्यगृह निर्माण झाल्यावर. तोपर्यंत ठाण्यातील हौशी आणि प्रायोगिक संस्थांनी ठाण्याची रंगयात्रा अव्याहत सुरू ठेवली होती.

(साभार – ठाणे रंगयात्रा २०१६)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..