नवीन लेखन...

तळा ‘गाळातले ‘

मध्यंतरी आमच्या सोसायटीची सांडपाणी वाहून नेणारी ड्रेनेज व्यवस्था तुंबली. त्यातच पावसाळ्याचे दिवस होते. पावसाचं पाणी, गटार भरून वहाणाऱ्या सांडपाण्यात मिसळून दुर्गंधी आणि डासांचा फैलाव वाढू लागला. सोसायटीच्या केरकचरा, सफाई करणाऱ्याला विचारलं, त्याने असमर्थता दर्शवली, पण दुसऱ्या दिवशी दोन माणसांना या कामासाठी तो घेऊन आला आणि म्हणाला, “हे करून देतील काम”.

काळया वर्णाचे, उघडे, किरकोळ शरीरयष्टी, चेहरा भकास, त्यांच्याकडे पाहून अनेक दिवसांचे उपाशी आहेत अशी जाणीव होत होती. संपूर्ण त्वचा वाळल्यासारखी शुष्क झालेली.

त्यांना विचारलं,
“हे जमेल का काम ?”
दोघांनी आमच्या झाडूवाल्याकडे पाहिलं. तोच उत्तरला,
“साहेब हेच काम करतात दोघे. करतील ते”.
म्हटलं, “किती पैसे घेणार कामाचे” ?
तर म्हणाले, “चार हजार.”

बहुधा आमच्या झाडूवाल्याने त्यांना पढवून आणलं असावं, कारण प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी दोघांची नजर त्याच्याकडे जात होती. घासाघीस करून त्यांना अडीज हजारवर आणलं, आणि काम ताबडतोब सुरू करायला सांगितलं. सलाम करून दोघं वळले आणि थोड्याच वेळात एक लांबलचक बांबूची काठी घेऊन हजर झाले. आम्ही काही मेंबर खालीच होतो.
सगळ्या गटाराची झाकणं उघडली तर ती, काळया गडद पाण्याने गच्च भरलेली होती. दुर्गंधी सुटली सगळीकडे. सर्वप्रथम सोबत आणलेली लवचिक लांब काठी गटाराच्या आत सारून, मागे पुढे करून आणि अडकलेला कचरा पुढे ढकलून निचरा करण्याचा त्यांनी बराच प्रयत्न केला. परंतु फारसा फरक पडला नाही. अखेर एकमेकात बोलून, दोघांनी निर्णय घेतला. एकाने कमरेखाली घसरणारी आणि गुडघ्यापर्यंत दुमडलेली पँट उतरवली , आणि आतल्या फाटक्या चड्डीवर तो गटारात उतरायला सिद्ध झाला. तो जसा आत उतरू लागला तसं त्याच्या कामाचं वास्तव स्वरूप, त्या अस्वच्छ कामात, आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालुनीया असं मनाशी म्हणत आणि पोटासाठी त्या काळयाभोर गलिच्छ भोगाना शब्दशः अंगावर, नाकातोंडात घेत त्यांनी स्वीकारलेलं सत्य जाणवत असतानाच, हे सुद्धा अगदी आतून जाणवलं,
तुका म्हणे एथे पाहिजे जातीचे, येरा गबाळाचे काम नाही.

छातीपर्यंत तो माणूस त्या गाळात उभा होता. जणू त्या काळया रंगासोबत मिसळून गेला होता तो. तळा गाळातला हेच आपल्या कामातून सिद्ध करत होता तो. सोबतच्या बांबूने त्याने गाळ स्वच्छ करायला सुरवात केली. जवळजवळ अर्धा पाऊण तास त्या काळया पाण्यात उभा राहून तो झगडत होता. त्याच्या प्रयत्नांना यश येऊ लागलं आणि हळुहळु गाळाचा निचरा होऊ लागला. काळं पाणीही ओसरू लागलं. एव्हाना छातीपर्यंत बुडालेल्या त्याचा पोट आणि कंबरेचा भाग दिसू लागला. आम्हीही सुटकेचा निःश्वास सोडला. सहकाऱ्याचा हात पकडुन तो बाहेर आला. चिखल, सांडपाणी, घाणीने भरलेला तो, काम पार पडल्याच्या समाधानात आमच्यासमोर उभा होता. स्वच्छ होण्यासाठी त्याला आंघोळीची गरज होती. आभाळ भरून आलं होतं, आणि पुढच्याच क्षणी पावसाची एक जोरदार सर उतरली. आम्ही छत्र्या उघडल्या, तो मात्र मनमुराद त्या वर्षावात चिंब भिजत, शरीरावर चिकटलेल्या गाळातून पूर्वरुपात येत होता. गेले दोन तीन तास आपलं संपूर्ण शरीर घाणीत उतरवून त्या दोघांनी आमची ड्रेनेज व्यवस्था स्वच्छ करून दिली होती. भुकेलं पोट आणि कोसळणारा पाऊस यामुळे उघड्या अंगाने कुडकुडत त्याने आपले कपडे चढवले.

या गाळ साठण्याला जबाबदार कोण ? खरं तर आपणच. कपड्याचे बोळे, केसांचा गुंता, भांड्यांच्या पावडरचा जमलेला गठ्ठा आणि अजून बरंच काही या साचण्याला कारणीभूत होतं. कोणाला विचारणार ? आणि कोणाला सांगणार ? इतकी साधी जाणीव आपल्याला होत नाही, आपण समजून घेत नाही, मग या तळा ‘गाळातल्या माणसांना त्याच गाळात उतरावं लागतं पोटासाठी. अखेर ती ही माणसच आहेत. त्यांनाही अशा कामाची शिसारी, उबग, घाण वाटत नसेल का ? माणसाला पोटाची रिकामी खळगी भरण्यासाठी, काय काय करावं लागतं, हे भरल्या पोटी आपल्या नाही लक्षात येत .
कामापूर्वी पैशाची केलेली घासाघीस आठवून, खरंच खूप अपराधी वाटू लागलं. ठरलेल्या मजुरीत अजून पाचशे रुपये घालून त्यांच्या हातावर ठेवले. वॉचमनला सांगून चहा, वडापाव आणून दोघांना खायला दिला. चहा तोंडाला लावत आणि खाण्याची पुडी बहुधा लेकरासाठी गुंडाळून घेत, कमरेखाली उतरणारी पँट सावरत, झिजून तळ फाटलेल्या चपला घासत, उघडे, तळा ‘गाळातले ‘ ते दोघं सोसायटीच्या आवारातून बाहेर जात होते. त्याच्या पाउलांवर अजूनही चिखल दाटलेला होता, जणू आपली ओळख त्यांना विसरू देत नव्हता की काय कोण जाणे. पोट तसच खपाटीला गेलेलं होतं, फक्त चेहऱ्यावर आजचा दिवस सरल्याचा किंचितसा आनंद होता.

खरंच कुठून कुठून येऊन या मुंबापुरीत वसतात ही माणसं पोटासाठी.
पोट लागले पाठीशी ,
हिंडविते देशोदेशी.

प्रासादिक म्हणे

– प्रसाद कुळकर्णी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..