नवीन लेखन...

स्वातंत्र्यदिन आणि मोरु

 

१५ ऑगस्टला सकाळी मोरुचा बाप मोरुला उठवायला आला. “अरे मोरु ऊठ, आज स्वातंत्र्यदिन. बघ सगळीकडे कशी देशभक्तीपर गाणी लागली आहेत. चल लवकर आटपून झेंडावंदनाला जा. स्वातंत्र्यदिन आपण उत्साहाने साजरा करायला हवा.”

मोरूने शांतपणे पुन्हा चादर ओढून घेतली. बाप वैतागला. “तुम्हा लोकांना सगळे आयते मिळाले आहे ना म्हणून स्वातंत्र्यदिनाची किंमत नाही.” असे म्हणून त्याने त्याची नेहमीची टेप सुरु केली. तेव्हा काहीशा अनिच्छेनेच मोरूने पांघरूण बाजूला केले आणि म्हणाला “स्वातंत्र्य म्हणजे काय हो बाबा? आणि आपल्याला कुठले स्वातंत्र्य आहे?”

यावर मोरूच्या बापाने त्याला इंग्रजांची राजवट, गांधी-नेहरूंचा लढा वगैरे सर्व सांगायला सुरुवात केली. यावर मोरू थोड्या त्रासिकपणे म्हणाला,“ हे सर्व इतिहासाच्या पुस्तकात आहे. आपल्याला कुठले स्वातंत्र्य आहे ते सांगा.” यावर बापाने निवडणुका, लोकशाही, घटनेतील स्वातंत्र्ये वगैरे सांगायला सुरुवात केली.

मग मात्र मोरूला राहवले नाही. तो उठून बसला. त्याने बापाला थांबवले आणि म्हणाला,“मी काय म्हणतो ते तुम्हाला समजले नाही. आपल्याला कुठले स्वातंत्र्य आहे ते मी विचारले. आपल्याला म्हणजे माझ्यासारख्या मुलांनासुद्धा! आम्ही काही करायला गेलो की तुमचं आपलं हे करु नको – ते करु नको…. आम्ही काय शिकायचं, काय खेळायचं ते तुम्ही आणि आई ठरवणार. काय खायचं ते तुम्ही ठरवणार. लोकशाहीचे म्हणाल तर आजची लोकशाहीची व्याख्या मुठभर स्वत:साठी आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी लोकांवर केलेले राज्य अशी झालेली आहे.

“खरे आहे तुझे म्हणणे. पण तरीसुध्दा आपली लोकशाही जगातील एक मोठी लोकशाही आहे हे विसरू नकोस. सगळेजण त्याचे कौतुक करतात.” इती मोरूचे बाबा.

“काय कौतुक घेऊन बसलात? आम्हा पोरांचं सोडा….  निवडणुकीत चांगले उमेदवार उभे करावेत हे सांगायचे तुम्हाला स्वातंत्र्य नाही. चांगले लोकप्रतिनिधी निवडण्याचे स्वातंत्र्य नाही. नेत्यांचे सोडा, साधा आपल्या गल्लीतला नगरसेवक कसा आहे आणि त्याने पाच  वर्षात संपत्ती पाचपट कशी केली हे विचारणे दूर पण साधे बोलण्याचेही स्वातंत्र्य तुम्हाला नाही. निवडलेल्या प्रतिनिधीला परत बोलवण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला नाही.”

माझ्यासारख्या मुलांना कोणत्या कॉलेजात जायचे आणि काय शिकायचे हेही ठरवायचे स्वातंत्र्य नाही. अकरावीचं कॉलेज कॉम्प्युटर ठरवणार. बिल्डर्सनी मोकळी जागा शिल्लक ठेवायची नाही हा चंग बांधल्याने मुलांना खेळायलाही जागा नाही म्हणजेच त्यांना खेळायचे स्वातंत्र्य नाही.”

“शिक्षणाचे म्हणशील तर मी तयार होतो डोनेशन द्यायला तुझ्या आवडीच्या कोर्ससाठी पण तूच नको म्हणालास. दुसर्‍या कॉलेजात अॅडमिशन घेईन म्हणालास.” मोरूचे बाबा.

“बरोबर आहे. आपण कर्ज काढायचे आणि त्या शिक्षणसम्राटांची भर करायची. हे कशाला?

“अरे हो पण आपल्या देशाने किती प्रगती केली हे तर बघशील की नाही?” मोरूच्या बाबांनी टिपिकल राजकारणी थाटात विचारले.

“इंग्रजांच्या राजवटीत लोक काठीला सोने बांधून यात्रेला जात असं आजोबा म्हणत. आज घराबाहेर पडलेला माणूस सुखरूप घरी येईल का अशी शंका येण्यासारखी परिस्थिती मुंबई-दिल्लीसारख्या मोठ्या शहरात आहे असे म्हणतात. एकट्या-दुकट्या मुलींना रात्री रेल्वेतून जायला भिती वाटते. लेडिज डब्यात पोलिस ठेवायला लागतात. मग त्यांच्या स्वातंत्र्याचे काय? आज देशातल्या जवळजवळ ४० टक्के जनतेला दोन वेळचे अन्नही मिळत नाही. म्हणजे त्यांना जगायचे देखील स्वातंत्र्य नाही असंच ना ? ग्रामीण भागात वैद्यकीय सोयी नसल्याने आणि शहरी भागात त्या परवडण्यासारख्या नसल्याने लोकांना आजारी पडणेदेखील परवडत नाही. कुठलेही क्षेत्र घ्या आणि तिथे कुठले स्वातंत्र्य आहे ते सांगा.”

मोरूचा बाप आता खरोखरच विचारात पडला. पण मोरु विलक्षण फॉर्मात होता.

“आता आपल्या देशात खरे स्वतंत्र कोण आहे ते मी सांगतो. राजकारणी, नोकरशहा, सेलेब्रिटीज यासारखे काही ठराविक वर्ग…..  कारण त्यांना कशाचेच बंधन नाही. अशी मंडळी त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून दरवर्षी वेगवेगळ्या  उत्सवाच्या आरोळ्या ठोकतात कारण असे समारंभ अफूच्या गोळीप्रमाणे काम करतात हे त्यांना ठाऊक असते आणि त्यातच त्यांचे हित सामावलेले असते.”

मोरूचा बाप दचकला. या पोराला झालंय काय?

“मला माझ्या देशाचा अभिमान आहे म्हणुन मी झेंडावंदनाला जाईन, पण आपल्याला कुठले स्वातंत्र्य आहे हा माझा प्रश्न अजूनही शिल्लक आहे.” असे म्हणून मोरू आवरायला लागला.

आपला मुलगा इतका विचार करू शकतो म्हणजे तो अगदीच मोरू नाही हे पाहून मोरूच्या बापाला धन्य वाटले.

– निनाद अरविंद प्रधान 

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 95 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..