नवीन लेखन...

“असामान्य कामगिरीची गगनभरारी” – सुशीला साबळे

“आयुष्य आहे तर समस्या येणारच आणि समस्या डोळ्यासमोर आल्या की संघर्ष हा करावा लागतोच ! या संघर्षाच्या कठीण लढाईनंतर मिळवलेल्या यशाला अनमोलता प्राप्त होते, काहीशी खडतर वाट चोखाळून त्यातून यशाचा मार्ग शोधलेल्या सुशीला साबळे यांच्या असामान्य कर्तृत्वाला दाद द्यावी तेवढी कमीच. कचरा वेचून आपल्या आयुष्याचा प्रपंच कसाबसा चालवत असतांना मोठी स्वप्न तरी काय पाहणार? आणि पाहिलीच तरी ती सत्यात उतरणार का यावर खात्री नाही; पण “स्त्री मुक्ती संघटने” नं कचरा वेचक महिलांच्या सक्षमी करणासाठी पाऊले उचलली; सुशीला ताई साबळेंचे नेतृत्व गुण ओळखून मुंबई कचरा वेचक महिला संघटनेचे अध्यक्ष पद त्यांना देऊ केलं आणि त्यांनतर जे काही घडलं हे खुद्द सुशीला ताईंसाठी आणि समाजासाठी ही आदर्श कामगिरीकडे टाकलेलं पाऊल होतं, सुशीला ताई साबळेंचं जीवन हे सोप्प कधीच नव्हतं, पावलोपावली खअच-खळगे होते; पण त्यांचं जीवन आणि दैदिप्यमान कार्यांनं त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून दिली; सुशीला साबळेंच्या असामान्य कर्तृत्वाची ओळख….”

१९७२ ला मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला आणि अशातच सुशीला साबळेंच्या कुटुंबियांनी उदरनिर्वाहाच्या शोधात मुंबईची वाट धरली, एका अनोळखी शहरात गाडा कसा हाकायचा असा दिव्य प्रश्न त्यांच्या समोर होता, कारण अशिक्षित असल्यामुळे कामतरी काय करणार? आणि आपल्याला कोण विचारणार अशा अनेक समस्या त्यांच्यासमोर आ वाचून उभ्या होत्या; म्हणून सुशीला ताईंच्या आईने कचरा गोळा करुन दिवसाच्या शेवटी तो विकून जी काही रक्कम मिळेल त्यातून पोट भरायचे कधी मनासारखा भाव कचर्‍याला मिळाला तर समाधान नाहीतर निराशाच पदरी पडत; पण खचुन न जाता हेच काम त्यांनी सुरु ठेवले. कालांतराने स्त्री मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कचरा वेचक महिलांना एकत्र आणून त्यांना कचर्‍याचं नियोजन कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले; अर्थात त्यांच्या संपर्कामुळे अनेक महिलांना शास्त्रोक्त माहिती मिळाली कोणता कचरा कशा प्रकारे उपयोगात आणला जाऊ शकतो तसंच त्याच्या पुनर्वापरासाठी कोणती पाऊले उचलता येतील असं अनेक अंगांनी मार्गदर्शन मिळाल्यामुळे अनेक महिलांनी पुढे त्याचा प्रसार केला; सुशीलाताई सुद्धा सोसायटी, कॉलनीत आणि गल्लीत या कचर्‍याचं महत्व पटवून सांगत; मुळातच सुशीलाताईंना उत्तम संभाषण कौशल्य आणि नेतृत्व गुण तसंच सर्वांमध्ये सहज मिसळून जाण्याची शैली असल्यामुळे स्त्रीमुक्ती संघटनेच्या लोकांनी त्यांची क्षमता ओळखून त्यांना कचरा वेचक कामगारांचं मुंबई जिल्ह्यातील अध्यक्ष पद सन्मानाने देऊ केलं; पण या पदाची जबाबदारी स्वीकारल्यावर एक मोठी अडचण साबळें समोर होती ती महणजे लिहिण्या वाचण्याची. अशिक्षित असल्यामुळे व्यवहार कसे करायचे, एखादा मजकूर लिहायचा किंवा वाचायचा झाल्यास फसगत होऊ शकते अशी भिती सुद्धा मनात होती; पण दिलेल्या पदाची जबाबदारी स्वीकारत सुशीला साबळेंनी सर्वप्रथम तर लिहिण्या-वाचण्याचं प्रशिक्षण तर घेतलंच पण व्यवहार कसा करायचा या बाबी शिकून घेतल्या. मग कचरा वेचणार्‍या सर्व महिलांची रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी बॅंकेत व्यवहार करणे; अडी-अडचणींच्या प्रसंगी महिलांना मार्गदर्शन करणे, घरात जर एखादीच्या तंटे होत असतील तर ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणे अशी असंख्य कामे सुशीला साबळेंनी पार पाडल्या त्यामुळे त्यांच्या कामावर संघटनेतील बायका प्रचंड खुश झाल्या.

हळुहळु सुशीला साबळेंच्या कर्तृत्वाचा आलेख उंचावत गेला कारण बचतगट, कचर्‍यातील वैज्ञानिक महत्व, अशा विषयांवर भाषणं देऊन ती किती उपयोगाची आहेत? तसंच महिलांना यातून मिळणार्‍या रोजगाराच्या संधी काय आहेत? हे शास्त्रोक्त रित्या समजवल्यामुळे सुशीलाताईंकडे अनेकांनी आशेने पाहिले; मुळाक्षर ही न ओळखता येणार्‍या स्त्रीला या गोष्टी कशा जमू शकतात याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत त्यांना कौतुकाची थाप पण दिली.

सन २०१० साली कोपन हेगन येथे आयोजित केलेल्या “जागतिक हवामानाबद्दल” या परिषदेत सुशीला साबळेंनी कचर्‍यामुळे उद्भभवणार्‍या विविध समस्या व ग्लोबल वॉर्मिंग वर होणारा थेट परिणाम या विषयावर भाषण दिले, हे भाषण देताना सुशीलाताई मराठीतून बोलल्या; त्यांनी मांडलेल्या काही मुद्यांमुळे अनेक तज्ञ्ज मंडळी देखील आवाक झाली होती; तसंच मुंबईतून प्रतिनिधी करणार्‍या त्या एकमेव महिला होत्या, याशिवाय साऊथ अफ्रिका, ब्राझील, चीन या देशात झालेल्या पर्यावरण विषयक परिषदेत सुद्धा सुशील साबळेंनी कचर्‍यांतून उद्भवणार्‍या विविध समस्यांची अनेक मतं ठामपणे मांडली, भारतात तर सुशीलाताईंनी या विषयावर विविध व्याख्याने देखील दिलेली आहेत, त्यामुळे कचर्‍याचं व्यवस्थापन कसे करायचे अशा विषयावर त्यांना भेटायला दूरदूर हून या विषयाचे अभ्यासक येत असतात.

सुशीलाताई साबळेंनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले असले तरी त्यांच्या पाठी त्यांचा मुलगा अरुण, आई आणि भाऊने अगदी भक्कम पाठिंबा दिल्याचं सांगतात, तसंच आपण जरी अशिक्षित असलो तरी आपलं शिक्षणाचं अधूरं स्वप्न मुलाने पूर्ण करावे अशी इच्छा होती, जी त्यांच्या मुलाने अगदी सार्थ ठरवली, आज सुशीला साबळेंच्या मुलाने मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण करुन एका नामांकित कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहे, आणि त्याच्या यशाचं सारं श्रेय तो आपल्या आईला देतो.

सुशिलाताईंच्या कार्याची दखल अनेक सामाजिक तसंच राष्ट्रीय स्तरावरील संघटनांनी घेतली असून त्यांना सामाजिक तसंच राष्ट्रीय स्तरावरील संघटनांनी घेतली असून त्यांना “रोटरी क्लब ऑफ ठाणे” चा पुरस्कार, सह्याद्री वाहिनीचा “हिरकणी” पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे.

आज मागे वळून पाहताना तुम्हाला काय वाटतं? या प्रश्नावर सुशीलाताई उत्तरतात की खरंतर मी महिलांसाठी काहीतरी करु शकत असल्याचा मला खुप आनंद होत आहे मी महिलांसाठी काही करु शकत असल्याचा, मला आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय ख्याती प्राप्त होईल अशी कल्पना पण कधीच बाळगली नव्हती, पण या समाजासाठी काहीतरी चांगलं करावं ज्यामुळे स्वत:सह माझ्यासारखं काम करणार्‍या माहिलांचा आदर होऊ शकेल असा विचार व इच्छा नक्कीच ठेवून होते, त्यासाठी मला स्त्री मुक्ती संघटनेच्या वतीने सहकार्य मिळाल्याबद्दल त्यांचे देखील मी आभारी असल्याचं त्या सांगतात.

कचरा वेचून त्यातून कसा बसा उदरनिर्वाह करायचा, वेळप्रसंगी कधी अर्धपोटी रहायचे, पण तरीही जगण्याची इच्छाशक्ती कधी सोडायची नाही उलट येणार्‍या कठीण प्रसंगांना तोंड देऊन पुढे जात रहायचे, असा मनोदय बाळगलेल्या सुशीलाताईंचं कार्य “राखेतून भरारी घेणार्‍या फिनिक्स पक्षासारखेच” आहे, त्यांचे कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आणि महत्वाकांक्षा निर्माण करणारं आहे एवढे मात्र नक्की.

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..