नवीन लेखन...

सुरेश भट यांच्या गाजलेल्या मराठी गझल

तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?
अजुनही विझल्या न गगनी , तारकांच्या दीपमाला
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?
सांग, ह्या कोजागरीच्या , चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?
बघ तुला पुसतोच आहे , पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा , गंध तू लुटलास का रे ?
उसळती हुदयात माझ्या , अमृताच्या धुंद लाटा
तू किनार्‍यासारखा पण , कोरडा उरलास का रे ?
(सुरेश भट)


मालवून टाक दीप , चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात , लाभला निवांत संग
त्या तिथे फुलाफुलात , पेंगते अजून रात
हाय तू करू नकोस , एवढयात स्वप्नभंग
दूर दूर तारकांत , बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून , एक एक रूपरंग
गार गार या हवेत , घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक , एकवार अंतरंग
ते तुला कसे कळेल , कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच , एकटा जळे पतंग
काय हा तुझाच श्वास , दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल , चांदण्यावरी तरंग
(सुरेश भट)


आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली
मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली
उरले जराजरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली
अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्‍याचा..
गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ?
(सुरेश भट)


सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या , तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की , अजुन ही चांद रात आहे
कळे ना मी पाहते कुणाला , कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे , तुझे हसू आरशात आहे
सख्या तुला भेटतील माझे , तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा , अबोल हा पारिजात आहे
उगीच स्वप्नांत सावल्यांची , कशास केलीस आर्जवे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला , तुझ्याच जे अंतरात आहे
(सुरेश भट)


केव्हातरी पहाटे , उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे , हरवून रात गेली
कळले मला न केव्हा , सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा , निसटून रात गेली
सांगू तरी कसे मी , वय कोवळे उन्हाचे ?
उसवून श्वास माझा ,
स्मरल्या मला न तेव्हा , माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची , सुचवून रात गेली !
(सुरेश भट)


रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?
सांगती ‘तात्पर्य’ माझे सारख्या खोट्या दिशा :
‘चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !’
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
(सुरेश भट)


मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे
लागुनि थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे
तापल्या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे
रे तुला बाहूत माझ्या रुपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे तू मला बिलगून जावे
(सुरेश भट)


भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले !
ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले !
लोक भेटायास आले काढत्या पायांसवे
अन्‌ अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले !
गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले !
एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले;
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले !

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..