नवीन लेखन...

सुख आले माझ्या दारी

अमेरिकेत महिनाभर मुलीकडे वास्तव्याला होतो. अमेरिका दर्शन घडविण्यासाठी मुलीने दहा दिवसांची सुट्टी घेतली होती. बरीचशी भटकंती झाल्यावर आता फक्त वीकेन्डला फिरु बाकी आम्ही घरीच बसतो असा सल्ला मुलीला दिला आणि घरच्या घरी आराम सुरु झाला. वेळ घालविण्यासाठी मुलीने मराठी आणि हिंदी चित्रपटांच्या, गाण्यांच्या व्हीसीडी तैनात ठेवल्या होत्या. त्याचा आनंद लुटणं सुरुच केलं. घरी कंटाळा आला की पाय मोकळे करायला खाली उतरु लागलो. मुलीच्या घराच्या समोरच एक लहान मुलांचं हॉस्पिटल होतं. त्या हॉस्पिटलच्या अंगणात बाक असायचे. त्या बाकावर बसून येणाऱ्या जाणाऱ्या पेशंटसना न्याहाळण्यात वेळ मजेत जायचा. अमेरिकेत युरोपियन्स, आफ्रिकन, चायनीज, जापनीज, आशियाई अशा विविध वंशाचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. बाकावर बसल्याबसल्या या मंडळींचे बोलण्यचालण्याचे तपशील टिपण्यात विरंगुळा मिळाला.

घरी ईमेल तपासत असतानाच एक दिवस भारतातील खास करुन मुंबईतील हालचाली जाणून घेण्यासाठी गुगलवर महाराष्ट्र टाइम्सचा अंक उलगडला आणि एक नवीनच चाळा हाती आला. गुगलवर सर्व वर्तमानपत्र सज्ज असतात हे माहीत होतं. मात्र मुंबईत कधी गुगलवर वर्तमानपत्र वाचण्याचा प्रसंग अनुभवला नव्हता. इथे परदेशात, परक्या खंडात घरबसल्या मुंबईच्या घरी बसून वर्तमानपत्र वाचल्याचा प्रत्यय येत होता. मुंबईतील दिवसभराच्या घडामोडी, विविध राज्यातील घटना इतकंच काय पण खुद्द अमेरिकेतील आणि अन्य देशांतील ठळक बातम्या विनायास हाताशी आल्या. त्यानंतर सकाळी उठल्यउठल्या मांडीवर लॅपटॉप घेऊन बसू लागलो. गुगलला नवा भिडू मिळाला. मला गुगलचा नाद लागला. महाराष्ट्र टाइम्समधील पहिलं पान, देश विदेश, संपादकीय वाचल्यावर हसा लेको ची फोडणी रुचकर वाटू लागली. परदेशात संताबंता वरचेवर भेटू लागले. मैफल मुंबईहूनही अधिक आवडीने वाचू लागलो. महाराष्ट्र टाइम्स प्रमाणेच लोकसत्ताही साथीला आला. राज्य, प्रादेशिक, विविध, व्यापार उद्योग, अग्रलेख, विशेष लेख व्यक्तिवेध, याही सदरांचा परिपाठ सुरु केला. मुंबई वृत्तांत, लोकरंग, चतुरंग या पुरवण्यांचं वाचन दीनचर्येचा भाग बनून गेला. दर शुक्रवारी प्रसिद्ध होणारा लोकप्रभा, गुगलवरही उपलब्ध असतो हे समजल्यावर सुखद आश्चर्याचा धक्काच बसला. संपूर्ण लोकप्रभा एक पैसाही खर्च न करता गुगलवर वाचता येतो? हे सर्व कसं परवडतं या मंडळींना? वाचनाचा आनंद उपभोगत असताना मनात शंकांचंही मोहोळ घोंघावू लागलं. अमेरिकेतही मुंबईतील वर्तमानपत्रे आणि नियतकालिके सहजरित्या उपलब्ध असतात हा दिलासा तिथल्या वास्तव्यात मोठा आधार देऊन गेला.

वर्तमानपत्रांची भूक भागल्यावर वळलो गाण्यांकडे. गुगलवर हिंदी साँगज फीड केल्यावर एक अनोखा नजराणा सामोरा आला. इथे अॅक्ट्रर, अॅक्ट्रेस, म्युझिक डायरेक्टर, लिरिस्ट, सिंगर अशी शिस्तबद्ध वर्गवारी उपलब्ध होती. ती सुद्धा आल्फाबेटीकल क्रमानुसार. म्हणजे अमिताभ बच्चन म्हंटला की त्याच्या बहुतेक चित्रपटांतील गाणी समोर हजर. आपण आपल्या आवडीचं गाणं निवडलं की ते गाणं सुरु! अमिताभ बच्चन, राजकपूर, देवआनंद, धर्मेंद्र. जीतेंद्र असा म्हणाल तो अभिनेता, नूतन, वहिदा रेहमान, आशा पारेख, वैजयंतीमाला अशी म्हणाल ती अभिनेत्री, नौशाद, खय्याम, एस.डी.बर्मन, आर.डी.बर्मन असे म्हणाल ते संगीत दिग्दर्शक आणि लता मंगेशकर पासून साधना सरगम पर्यंत आणि मुकेश पासून सुरेश वाडकरपर्यंत सर्व गायकांची गाणी केव्हाही ऐकण्याची सोय सहजरित्या उपलब्ध आहे हे उमजल्यावर स्वर्ग अक्षरशः दोन बोटांवर येऊन ठेपला. कॉलेजात असताना कॉलेल जवळच्या इराण्याने त्याच्या हॉटेलात एक ज्यूक बॉक्स बसवला होता. चार आण्याचं नाणं टाकलं की त्या ज्यूक बॉक्समधून आपल्याला हवी ती कॅसेट निवडता येत असे व ती ऐकत मजेत वेळ घालवता येत असे. गुगलच्या गुगलच्या सोयीने बॉक्सच्या ज्यूक दसपट विरंगुळा हाताशी आला. हिंदी साँगजनंतर मराठी साँगज चा क्रम लावला. मुख्य म्हणजे ही गाणी ऐकत असतानाच इमेल तपासण्यासारखी कामेही आपल्याला कॉम्प्युटरवर उरकता येतात याचा साक्षात्कार सुखाची परमावधी म्हणजे काय याचा प्रत्यय देऊन गेला. हे सर्व विश्व निर्माण करणाऱ्या तंत्रज्ञानाना मी मनोमन हात जोडले. आजची पिढी किती भाग्यवान हा विचारतरंग मनात सहजरित्या उसळून आला.

करमणूकीचा आनंद लुटल्यावर मी विविध स्वरुपाची माहिती मिळविण्यासाठीही गुगलकडे धावू लागलो. विविध देशातील नेते, पर्यटनस्थळे, संस्था तुम्ही म्हणाल ती माहिती गुगलवर उपलब्ध असते. थोडक्यात आपल्याला जे काही हवंय ते सर्वच्या सर्व घरबसल्या कॉम्प्युटरवर उपलब्ध! प्रश्न फक्त थोडाफार सराव करण्याचा आणि कॉम्प्युटरसंबंधी काही प्राथमिक धडे गिरविण्याचा. कॉम्प्युटरचा अगदी जुजबी वापर आकलनात आला तरी काम फत्ते होऊन जातं. एकदा लळा लागला की देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी, अशी अवस्था होऊन जाते. काय बघू आणि काय नको असा संभ्रम पडतो. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने आपण अक्षरशः अंचबित होऊन जातो. देशदेशातील अंतर लुप्त होतं. इमेलवर जगाच्या पाठीवर कुठेही संपर्क साधता येतो. स्काईपवर जीवलगांशी गप्पा मारता येतात. एका अनोख्या विश्वात आपण हरवून जातो.

आजची युवा पिढी आश्चर्याची बरसात घडविणाऱ्या कॉम्प्युटरच्या साथीने स्वतःची करिअर घडविण्यात दंग असते. आधीच्या पिढीनेही आता कॉम्प्युटरची कास धरणं अपरिहार्य बनलं आहे. रोज अगदी नित्यनियमाने दोनतीन तास कॉम्प्युटरवर घालविण्याचं व्रत अंगिकारलं की जीवनाला नवा अर्थ मिळून जातो. सुख आले माझ्या दारी या ओळी आपल्या ओठांवर उमटतात. अमेरिकेतील वास्तव्यात हा नवा अनुभव मला गाठीशी बांधता आला. अल्लाऊद्दीनचा जादूचा दिवा हाती लागल्याच्या आनंदात मी भारतात परतलो.

– सुनील रेगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..