नवीन लेखन...

इतिकर्तव्यता

सामुहिक हक्कांचे आणि हितांचे रक्षण करण्यासाठी देश आहे, देशाचे हित जपण्यासाठी राजकीय पक्ष आहेत आणि राजकीय पक्ष टिकविण्यासाठी राजकीय नेते आहेत. सामुहिक हितांचे रक्षण हे ध्येय आहे, नेते पक्ष आणि देश हि त्याची साधने आहेत. अंतिम साध्यावर प्रेम करणे यातच आपले कर्तव्य आणि हित सामावलेले आहे.मनातील वाईट भावना आणि वाईट विचारांपासून स्वतःच्या बुद्धीला आणि निर्णयशक्तीला मुक्त ठेवण्यासाठी आणि चांगले जीवनदायी विचार मनामध्ये रुजविण्यासाठी परमेश्वराची संकल्पना आहे.जीवनदायी विचार रुजविण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी गुरू आहेत आणि देवाची निर्मळ प्रतिमा मनामध्ये उभी करण्यासाठी धर्म आहेत.

धर्म, गुरू, मुल्ला, मौलवी, संन्यासी हि सर्वजण फक्त साधनं आहेत. सहजीवनातून आनंद मिळविणे, आयुष्यात समाधानाच्या बागा फुलविणे, मुलाबाळांबरोबर सुखाची कारंजी फुलविणे हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. जोडीदार आणि कुटुंबिय हि फक्त साधने आहेत. ज्या प्रमाणे पातेलं डाव विळी सुरी हि सर्व साधनं आहेत आणि त्यात शिजणारं अन्न हे अंतिम सत्य आहे, त्याच प्रमाणे सामुहिक हिताचे आणि हक्कांचे रक्षण होणे तसेच मनामध्ये जीवनदायी विचार येणे आणि आयुषयात आनंद समाधान आणि सुखाने युक्त अशा बागा फुलविणे हे आयुष्याचे अंतिम सत्य आहे, बाकी सर्व साधनं आहेत.
स्वयंपाकाची साधनं स्वच्छ असणे, सोयिस्कर असणे आणि सहजपणे उपलब्ध असणे जसे आवश्यक असते त्याचप्रमाणे आयुष्य सुखी करणारी साधनं सुद्धा विश्वासपूर्ण आणि आनंददायी असणे आवश्यक असते. स्वयंपाकाच्या साधनांचा निर्जंतुक ठेवणे जसे महत्वाचे असते त्याचप्रमाणे आयुष्याची साधनं भिती स्वार्थ असूया गुलामी इत्यादी भावनांपासून मुक्त ठेवणे आवश्यक असते. आयुष्यातील साधनांमध्ये फक्त एकच फरक असतो, आपणही एक साधनच असतो आणि आपणच साधकही असतो. योग्य त्या ठिकाणी आपली योग्य ती भूमिका निभावून नेऊन सामुहिक प्रयत्नांनी सर्वांच्या आयुष्यात आनंदाच्या बागा फुलविणे हे समुहजीवनाचे खरे इप्सित आहे.

आजकाल आपण अनेकदा आपले साध्य विसरून जातो आणि फक्त साधनांवर प्रेम करीत राहतो आणि स्वतःच स्वतःच्या आयुष्यात दुःखाचे निखारे पेटवतो.
सामुहिक हितांचे निर्णय त्याज्य ठरवून नेत्यांवर प्रेम करतो, राजकीय पक्षांवर प्रेम करतो आणि आपल्या साध्याला सपशेल तिलांजली देतो. स्वतःची प्रगती समाधान, मनातील वाईट विचारांना तिलांजली देणे आणि बुद्धिनिष्ठ होणे, परमेश्वर भेटीचे हे साध्य विसरून जातो आणि मुल्ला मौलवी गुरू संन्यासी आणि धार्मिक स्वार्थाला बळी पडतो, आपण आपले साध्य सोडून देतो आणि साधनांवर प्रेम करीत बसतो, आयुष्य हे भितीचे, स्वार्थाचे असूयेचे, रागाचे निबिड अरण्य करतो आणि त्यामध्ये दिशाहीन होऊन भरकटत राहतो.

संसारात आपण आपल्या सामुहिक आनंद सुख आणि समाधानाचा विचार न करता फक्त जोडीदाराच्या आणि मुलाबाळांच्या सुखाचा विचार करतो आणि सगळ्यांनाच अपराधिपणाच्या भावनेत गुंतविण्यातच समाधान मानतो, तर काहीजण फक्त स्वतःच्या सुखाचा स्वार्थाचा विचार करून बाकी सर्वजण तुच्छ मानतात. असे करून ते आपल्या आयुष्यातील आनंदाच्या बागा उध्वस्त करतात, सुखाची कारंजी फोडून टाकतात आणि समाधानाची झाडे उपटून टाकतात, आपल्या बरोबर सर्व कुटुंबियांचे आयुष्य उजाड करतात.

आपण आपल्या अंतिम ध्येयावर प्रेम न करता साधनांवरच प्रेम करीत बसतो आणि आपले आयुष्य उजाड करतो. आपले अंतिम ध्येय, अंतिम उद्दिष्ट्य निश्चित करणे आणि त्यासाठी झटत राहणे हे प्रत्येकाचे इतिकर्तव्य आहे. साधनांवर वृथा प्रेम करून, साधनांची वृथा भक्ती करून, साधनांचे वृथा अभिमान बाळगून आपण आपल्या आयुष्यात हिंसेला जन्म दिला आहे. साधनांचा योग्य आदर राखून निगराणी करून साध्यावर लक्ष केंद्रित करणे हि खरी अहिंसा आहे.

अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च:। याचा खरा अर्थ आपल्या इतिकर्तव्यता पूर्ती मधूनच उलगडत जातो. आपल्या ध्येयाला जेवढे महत्व आहे त्यासाठी साधन असलेल्या व्यक्तींच्या ध्येयपूर्तीलाही तेवढेच महत्व आपण देणे आवश्यक आहे. आपल्या साधनांची ध्येये कमी लेखणे हि सुद्धा हिंसा आहे आणि आपले ध्येय कमी लेखणे हि तर परम् हिंसा आहे.

साधनांची दुरुस्ती करणे, निगराणी करणे, त्यात योग्य ते बदल करून घेणे आणि अयोग्य साधने बदलणे हे आपले मूलभूत हक्क आहेत. आपणही एक साधनच असल्याने आपल्यातील वाईट आणि चुकीच्या गोष्टी प्रयत्नपूर्वक काढून टाकून आपण आपल्यामध्येही सुयोग्य बदल घडवून इतरांच्या आयुष्यात आनंद निर्मितीतील महत्वाचा घटक बनणे तितकेच महत्वाचे आहे.

— विनय भालेराव.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..