नवीन लेखन...

बालरंगभूमीच्या जन्मदात्या सुधा करमरकर

जन्म. १० मे १९३४ मुंबईत.

सुधा सुधाकर करमरकर यांचे घराणे मूळचे गोव्याचे. सुधा करमरकर यांचे वडील दि.के. उर्फ तात्या आमोणकर साहित्य संघ नाट्यसंस्थेशी संलग्न असल्यामुळे संघाच्या नाटकात छोट्या-मोठ्या भूमिका त्यांना कराव्या लागत. त्या काळात नटवर्य केशवराव दाते, नानासाहेब फाटक, मास्टर दत्ताराम, दुर्गाबाई खोटे अशा नाटय़क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन सुधा करमरकरांना मिळाले. त्यांतच, तात्या आमोणकरांनी आपल्या सुधा आणि ललिता या दोन्ही मुलींना गायन आणि नाट्य शिकायला पाठवले होते. सुधा करमरकर यांना त्या काळात पार्श्वनाथ आळतेकरांच्या कला अकादमीमध्ये दाखल केले गेले, आणि त्यानंतर नृत्यशिक्षक पार्वतीकुमार यांच्या हाताखाली नृत्यशिक्षण घ्यायला लावले. वयाच्या अठराव्या वर्षी त्या भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यप्रकारात प्रवीण झाल्या होत्या. त्याचे फलित त्यांना ताबडतोबच मिळाले. मो. ग.रांगणेकरांच्या ‘रंभा’ या पुनर्जन्मावर आधारित नव्या नाटकात त्यांना नृत्यकुशलनायिकेची, रंभेचीच भूमिका मिळाली, आणि त्यांची ती भूमिका गाजली.

वडील साहित्य संघात असल्यामुळे संघाच्या नाटकात छोट्या-मोठ्या भूमिका त्यांना कराव्या लागत. सुधा करमरकर यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी प्राप्त केल्यानंतर, दामू केंकरे यांनी त्यांना मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्‌समध्ये (त्यांच्या नाटकातून काम करण्यासाठी) दाखल करून घेतले. त्यावेळी भारतीय विद्याभवनच्या आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत दामू केंकरे दिग्दर्शित ‘उद्याचा संसार’ हे नाटक सादर केले गेले. त्या स्पर्धेत, सर्व नाटकांमधून निवड होऊन सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक सुधा करमरकरांना मिळाले. अधिकचे नाट्यशिक्षण घेण्यासाठी सुधा करमरकर परदेशात गेल्या. त्यांनी अमेरिकेत जाऊन ‘बालरंगभूमी’ या संकल्पनेचा अभ्यास केला. तिथे त्यांनी मुलांची नाटके पाहिली, आणि तिथूनच त्यांनी भारतात परत गेल्यावर काय करायचे ते ठरवून टाकले. शतकाहून अधिक वर्षाची परंपरा सांगणाऱ्या मराठी रंगभूमीला मुलांचे वावडेच होते .नानासाहेब शिरगोपीकर मुलांना घेऊन ‘गोकुळचा चोर’ नाटक करत असत. दामूअण्णा जोशीही मुलांना घेऊन नाटके करीत असत. अशा नाटकांचा उद्देश मुलांना सर्व भूमिका करायला मिळाव्यात एवढाच असे.

मुलांचे एक वेगळे विश्व असते, त्यांची वेगळी कल्पनासृष्टी असते, त्यांची मानसिकताही वेगळेच रंग प्रकट करणारी असते हे काही माहीतच नव्हते. या वेगळेपणाची भूक भागेल असे प्रौढ नाटकापेक्षा सर्वस्वी वेगळे असलेले नाटक मराठी रंगभूमीवर नव्हतेच. त्यामुळेच शाळेतल्या समारंभातदेखील मुले दाढी, मिशा लावून किंवा कोट पॅन्ट घालून मोठय़ांचीच नाटके करीत असत. त्यांतील संवादांचा अर्थ मुलांना कळो ना कळो. संवाद हातवारे करून धडाधड म्हणायचे आणि आपापल्या भूमिका वठवायच्या, हेच त्यावेळचे बालनाट्य होते.

सुधाताई मायदेशी परतल्या आणि सगळी परिस्थितीच बदलली. त्यांनी साहित्य संघाच्या सहकार्याने ‘बालरंगभूमी-लिट्ल थिएटर’ सुरू केले. बालनाट्य हे लहान मुलांच्या करमणुकीसाठी असून ते वास्तव असावे म्हणून सुधाताईंनी रत्नाकर मतकरी आणि इतरही काही नाटककारांकडून नाटके लिहून घेतली. ती शाळांच्या हॉलमध्येच नव्हे, तर व्यावसायिक नाट्यगृहांतही सादर केली. यांतून मुलांची भरपूर करमणूक तर झालीच पण मुलांचे नाटक कसे असावे, याचा धडा सुधाताईंनी संबंधितांना घालून दिला.

सुधा करमरकरांनी मुंबईतील आपल्या वडिलांच्याच साहित्य संघ या नाट्यसंस्थेच्या साह्याने ‘मधुमंजिरी’ हे मराठी रंगभूमीवरील खरेखुरे पहिले बालनाट्य सादर केले. रत्नाकर मतकरी यांनी ते लिहिले होते. सुधा करमरकर या नाटकाच्या केवळ दिग्दर्शिकाच नव्हत्या तर त्या नाटकात त्यांनी चेटकिणीची अफलातून भूमिकाही केली होती. १९५९ साली रंगमंचावर आलेल्या ‘मधुमंजिरी’ या पहिल्या बालनाट्याने रंगभूमीवरील एका नव्या प्रवाहाचीच मुहूर्तमेढ केली.

सुधा करमरकर यांचे ५ फेब्रुवारी २०१८ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4231 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..