नवीन लेखन...

स्पृहा – एक व्यासंगी सेलिब्रिटी

स्पृहा या व्यक्तिमत्वाबद्दल, किंबहुना एका सेलिब्रिटी व्यक्तिमत्वाबद्दल ममत्व वाटावं आणि तिच्याबद्दल काही लिहावं असं वाटण्यामागे अगदी बेसिक कारण म्हणजे ती आमच्या(म्हणजे जिथे मी शिकलो) बालमोहन विद्यामंदिरची विद्यार्थिनी, दादर मुंबई मध्ये तिचा झालेला जन्म आणि तिसरं म्हणजे तिच्या एकूणच संपूर्ण कर्तृत्वाबद्दल असलेलं प्रेम आणि कौतुक ही त्रिसूत्री आहे. स्पृहा जोशी या ठेंगण्या व्यक्तिमत्वामध्ये सौंदर्यापेक्षा एक जबरदस्त स्मार्टनेस आहे. तिचा खळखळून हसणारा, हसताना लबाड, मस्तीखोर वाटणारा चेहरा अनेकदा आपल्याशी नातं सांधतोय असं वाटतं. तिचे डोळे नेहमीचं आधी हसतात आणि मग चेहरा. बोलणारा चेहरा ही तिची अभिनयातली ताकद आहे. अगदी कोणतेही भाव आधी तिच्या डोळ्यांत उमटतात आणि हे भावदर्शन फार थोड्या कलाकारांना जमतं. यामध्ये मी शबाना आझमी यांचं नाव आवर्जून घेईन.
स्पृहाचा अभिनय पहाताना किंवा तिचं कोणतंही सादरीकरण पहाताना आपण तिच्या अभिनयात गुंतून जातो. तिच्या अभिनयात कुठेही नाटकीपणा जाणवत नाही. मी तर म्हणेन, तिचा अभिनय खरेपणाचा, नैसर्गिकतेचा हात घट्ट पकडून आपल्यासमोर सहजपणे उलगडत जातो. कधी हसवतो, रडवतो, डोळे भरून आणतो, विचार करायला लावतो आणि ती पडद्यावर आली की आपला पूर्ण ताबा घेतो. मी तिचे मोजकेच चित्रपट, मालिका पाहिल्यायत परंतू तिची अभिनयक्षमता कळण्यासाठी ते पुरेसे आहेत.
‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मालिकेमध्ये तिने साकारलेली कुहू मला फारशी आठवत नाही, कारण त्यावेळी आम्ही सगळी चॅनल्स घेतलेली नव्हती. कधी जवळच्या कुणाकडे जाणं झालं आणि त्यावेळी ती मालिका सुरु असली तर पहाणं व्हायचं. परंतू ‘उंच माझा झोका’ या मालिकेच्या प्रसारणावेळी मात्र आमचा टीव्ही मल्टीचानल झालेला होता. त्यामुळे एक अप्रतिम मालिका पाहण्याला आम्ही मुकलो नाही. या मालिकेत स्पृहाने साकारलेल्या रमाबाई रानडे यांची व्यक्तीरेखा पडद्यावर पहाणं हा एक अविस्मरणीय आनंद होता. काही वर्षांपूर्वी माधवराव पेशव्यांच्या जीवनावर एक सुंदर मालिका आली होती. ज्यामध्ये रमाबाईंची व्यक्तीरेखा मृणाल कुलकर्णी यांनी साकारली होती. ती भूमिका पहाताना सर्वार्थाने जाणवत होतं की माधवरावांची रमा ही अगदी अशीच असेल. तशीच जाणीव ‘उंच माझा झोका ‘ मध्ये स्पृहाने साकारलेल्या रमाबाई रानडे पाहाताना पुन्हा एकदा झाली. अगदी शीर्षक गीतापासून ही मालिका रसिकप्रिय झाली.
पुढे ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ मालिका आली. आणि यामध्ये स्पृहाने रंगवलेली ईशा देशमुख ही नेहमीच सत्याची कास धरणारी, थोडीशी हेकेखोर पण कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाणारी, जाणून घेणारी, घरात आपलं एक स्थान निर्माण करणारी, आयुष्यात सगळ्यात जास्त आणि मनापासून ज्याच्यावर प्रेम केलं तो आपल्याशी खोटं वागलाय हे समजल्यावर त्यामागचं कारण न समजून घेता त्यांचा आणि त्याच्या घरी रहाणाऱ्या सगळ्यांचा अत्यंत कटू शब्दात अपमान करणारी ईशा स्पृहाने आपल्या जिवंत अभिनयातून साकार केली. याच काळात उमेश कामत सोबत आलेला तिचा ‘पेईंग घोस्ट’ हा चित्रपट फँटसी स्वरूपाचा होता. अर्थात स्पृहा तिला मिळालेली प्रत्येक व्यक्तीरेखा सर्वार्थाने शंभर टक्के निभावत असते.
स्पृहाचा मला भावलेला गश्मीर महाजनी सोबतचा चित्रपट ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही.’ या चित्रपटात सुद्धा तिने साकारलेली नायिका केतकी ही व्यक्तीरेखा खूप वेगळी होती. स्वतःच्या विचारांनी जगणारी, नात्यांचा मान ठेवणारी पण त्या नात्यांना आपल्यावर लादून न घेणारी, कोणतीही गोष्ट स्वतःला पटल्याशिवाय न करणारी, इतरांना बरं वाटेल म्हणून आपण त्यांना अपेक्षित आहे तसं वागत रहायचं हा फंडा अजिबात न पटणारी, आपल्याशी प्रेम विवाह केलेला आपला नवरा कधीच स्वतःला वाटत असतं ते घडघडून बोलत नाही, घरच्यांच्या भूमिकेखाली दबत रहातो हे अजिबात न आवडणारी आणि लौकिकार्थाने सुखी असलेल्या आपल्या संसारात नेहमी काहीतरी miss करत रहाणारी केतकी. स्पृहाने ती व्यक्तीरेखा भूमिकेतील विविध कंगोऱ्यांसहीत, नेमक्या भावांसहित नेमकेपणाने उभी केली.
‘होम स्वीट होम’ चित्रपटातली देविका ही अगदी आजच्या पिढीतली मुलगी तिने सादर केली. देविका धम्माल, मस्ती आवडणारी आणि ती मनापासून करावीशी वाटणारी आहे. ती फुडी आहे. मुख्य म्हणजे पौगंडावस्थेत आहे. आपल्या मामा मामीकडे राहात असल्यामुळे तिची बिनधास्त वावरण्यासाठी होणारी कुचंबणा. तरी त्यातूनही कुणी घरी नसताना आपल्या मित्रांना घरी बोलावून तिने केलेली धमाल स्पृहाने मस्तच दाखवलीय. ती मस्तीत वहात जातानाच चटकन भानावर येणारीही आहे. मुख्य भूमिकेत नसूनही आणि तिच्या समोर दिग्गज कलाकार असूनही देविका आपल्या लक्षात रहाते इतकंच नव्हे तर भावून जाते. यानंतर मला तिची आवडलेली भूमिका म्हणजे zee टीव्हीवर झालेली ‘प्रेम हे ‘ मालिकेतल्या journey या भागातली श्वेता. प्रेमकथांवर बांधलेल्या या मालिकेतला माझ्या आठवणीप्रमाणे हा दुसराच भाग होता. मुंबई गोवा प्रवासात घडणारी ही प्रेमकहाणी. यामधली श्वेता ही उच्चपदस्थ, आपल्या ऑफिसच्या कामासाठी जाताना वाटेत शांतपणे आपलं काम करायला मिळेल या हेतूने स्वतंत्र टॅक्सी करून गोव्याला निघालेली. आयुष्यात आलेल्या कटू अनुभवांमुळे ती थोडी अबोल, एकलकोंडी आणि थोडी तिरसट झालीय. तिने स्वतःला आपल्या कामात बुडवून घेतलंय. ती सतत आपल्या तत्वाना आपण चिकटून असल्याचा दावा करत रहाते. आपल्या तत्वाना तिने उगीचच एव्हढं मोठं केलंय की त्यापायी ती बारीकसारीक गोष्टीतही समोरच्याला दुखावत रहाते. अशा या श्वेताच्या प्रवासात एक सुखवस्तू घरातला खुशालचेंडू, जीवनाकडे आनंदाने पहाणारा, मन मानेल तसं जगणारा, डोक्यात येईल ते भिडभाड न ठेवता धाडकन बोलून टाकणारा एक युवक येतो. सुरवातीला त्याच्या माकडचाळ्यांना कंटाळालेली श्वेता नकळत त्याच्या बडबडीत गुंतून कधी त्याच्या जवळ येते हे तिलाच कळत नाही. या कथेचा दुसरा भाग मात्र मनापासून इच्छा असूनही मला पाहायला मिळाला नव्हता. तर अशी ही श्वेता साकारताना स्पृहाने आपल्या अभिनयातून दाखवलेला बदल पहाणं हा एक मनमुराद आनंद होता. अगदी मनापासून सांगायचं तर स्पृहा तिची प्रत्येक भूमिका अक्षरशः जगत असते. तिच्या चेहऱ्यावरचे सहजगत्या बदलत जाणारे सूक्ष्म भाव पहाणं खूपच आनंदादायी असतं. मात्र तिने हिंदी माध्यमातून तसंच स्टेजवरून (नाटक )केलेले परफॉर्मन्स पहाण्याचा योग मला आलेला नाही याची खंत आहे.
‘सूर नवा ध्यास नवा’ या रिऍलिटी शॊची सूत्रसंचालिका म्हणून ती अक्षरशः भावून गेली. सूत्रसंचालन कसं करावं, त्यामध्ये किती इन्व्हॉल्व्ह व्हावं, कार्यक्रमाची सगळी सूत्र आपल्या हाती कशी ठेवावी तसंच सूत्रसंचालकाने’ किंवा ‘लीकेने’ प्रेक्षक हे, स्पर्धकांची किंवा गायकांची गाणी ऐकण्यासाठी उत्सुक असतात हे कायम लक्षात ठेवून आपल्या बोलण्याला किती लगाम घालावा याचा वस्तुपाठच तिने आपल्या सहजसुंदर निवेदनातून समोर ठेवला. बालगायकांच्या झालेला सु.न.ध्या.न. पर्वात तर सगळ्या बालस्पर्धकाना आणि हर्षद नावाच्या अविस्मरणीय, अशा गोड कलाकाराला सांभाळताना तिने केलेली कसरत निव्वळ अप्रतिम. स्पर्धक आणि परीक्षक यामधला दुवा सांधण्याचं काम स्पृहाने शंभर टक्के यशस्वी करून दाखवलं. यापूर्वी मी लहान मुलांच्या, संगीतातील रिऍलिटी शोचं इतकं सुंदर सूत्रसंचालन पल्लवी जोशीने केलेलंच पाहिलं होतं. सूत्रसंचालकाचा म्हणून एक चेहरा आणि आवाज असतो. अभिनेता म्हणून अगदी नंबर वन असलेला कलाकार सूत्रसंचालक म्हणून यशस्वी ठरेलंच असं अजिबात नाही. कारण काही गोष्टी सूत्रसंचालकामध्ये उपजत असाव्या लागतात, उदा.बोलण्यातला उत्स्फूर्तपणा, भाषेची तयारी, तत्परता, बोलका चेहरा, आवाज इ. . स्पृहाने मध्यंतरी युट्युब चॅनलवरून विसुभाऊ बापटांची मुलाखत दोन भागात घेतली होती. मुलाखत घेणाऱ्याने फक्त नेमकं तेव्हढंच बोलून किंवा विचारून मुलाखत देणाऱ्यांना जास्तीत जास्त बोलू द्यायचं असतं हे तत्व तिला पूर्णपणे कळलेलं आहे यात शंकाच नाही. युट्युबच्या माध्यमातून तिचे काव्यवाचन, विविध क्षेत्रातील व्यक्तींशी सुसंवाद असे अनेक कार्यक्रम सुरु असतात. स्पृहा ही एक संवेदनशील कवयत्री तर आहेच पण तिचं कवितांचं सादरीकरणही फार सुंदर असतं.
तर अशी ही स्पृहा जोशी. एक तरल सिने-टेलिव्हिजन-नाट्य अभिनेत्री, सुहास्य सूत्रसंचालिका, एक चांगली मुलाखतकार, वेगळा विचार करणारी संवेदनशील कवयत्री, एक सजग व्यक्ती, एक सेलिब्रिटी तरीही आपल्यातली वाटणारी तारका आणि माझ्या मोजक्या आवडत्या कलाकार व्यक्तिमत्वातील एक व्यक्तिमत्व.
आपल्या ‘इच्छा’, ‘आकांक्षा’ विस्तारून सतत सकारात्मकतेने जीवनाकडे पहाणारी, ‘स्पृहा ‘.
‘सुर नवाच्या’ दुसऱ्या पर्वावेळी स्पृहावर मी एक छोटीशी कविता केली होती,
‘सूर नवाचं’ वाजतं शीर्षक गीत ,
समोर येतं, प्रसन्न चेहऱ्यावरचं स्मित.
म्हणतेस तीनदा, साऱ्यांना नमस्कार,
ऐकून वाटतं, एपिसोड छानच होणार.
मिश्किल डोळे बोलत असतात,
सहजसुंदर संवाद साधतात.
तुझं सगळंच ठरलेलं असतं,
देहबोलीतून सतत जाणवत रहातं.
साऱ्या स्क्रीनवर भरून जातेस,
गायक परिक्षकांमधला दुवा सांधतेस.
आवाज सुंदर नेमकं परीक्षण,
तरीही मात्र, तू लक्षात रहातेस.
प्रासादिक म्हणे
— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..