नवीन लेखन...

सोशल प्रोजेक्ट

बारा वर्षांचा राजन मराठी पाचवीच्या वर्गात होता. मधल्या सुट्टीत तो इतर मुलांसोबत डबा खाण्याऐवजी शाळेच्या मैदानात जाऊन विशाल वडाच्या सावलीत अर्धा तास बसत असे. घंटा होण्यापूर्वी पोटभर पाणी पिऊन पुन्हा वर्गात येऊन सगळ्यांमध्ये मिसळून जात असे.

त्याचे मित्र अजय , विशाल, आनंद त्याला नेहमी आग्रह करायचे की,” तू डबा तर आणत नाहीस पण आमच्यातला थोडा थोडा खाल्ला तरी चालेल. आम्हाला जास्त भूक लागते म्हणून आमच्या आई आम्हाला एक एक चपाती जास्त देत जाईल.” राजन कोणाचेच ऐकायचा नाही. “घरातून निघताना आई गरमागरम भाकऱ्या करून देते, त्या खाऊनच निघतो म्हणून मला भूक लागत नाही” असे कारण तो नेहमी देत असे.

राजनचे मित्र काही फार श्रीमंत नव्हते पण त्यांची घरची परिस्थिती खाऊन पिऊन सुखी अशा कुटुंबातील होती. राजन हा रस्त्याच्या कामांवर रोजंदारीवर काम करणाऱ्या स्थलांतरित कुटुंबातील होता. त्याला दोन मोठ्या बहिणी आणि एक लहान भाऊ होता. मोठ्या बहिणी शाळेत जात होत्या पण पाचवीत असतानाच गरीब श्रीमंत या दरीमुळे त्यांना शाळेत जाणे नकोसं वाटायला लागले.
इतर मुलींचे स्वच्छ आणि नीटनेटके कपडे, त्यांचे राहणीमान , खाणेपिणे त्यांच्या बालमनाला टोचू लागले. त्यांची शिक्षणं अर्धवट ठेवून त्या दोघींना राजनच्या आई बाबांनी गावाकडे आजी आणि आजोबा जवळ सोबतीला पाठवले होते.

त्याच्या आई बाबांना मोठ्या मुली आणि त्यांच्या पाठीवरची दोन्ही मुलं शिकावी असे मनोमन वाटायचे पण आजच्या दिवसात काम मिळाले नाही तर संध्याकाळी काय खावे असा प्रश्न त्यांना पडायचा. खाणे तरी काय असायचे त्यांचे, सगळ्यात स्वस्तातले तांदूळ आणि दुकानात खाली पडलेली ज्वारी किंवा बाजरी स्वस्तात घेऊन त्यांच्या भाकरी बनवायच्या.

भाजी वाल्याकडून रात्री उशिरा सगळ्या लोकांनी निवडून शिल्लक राहिलेला न संपलेला भाजीपाला नाहीतर कोंबडीवाल्याकडून कोंबड्यांचे पाय, डोकं आणि टाकाऊ म्हणून वेगळं काढलेले मांस. राजन याचमुळे शाळेत कधीच डबा नेत नसे, त्याला वाटायचे “आपल्या डब्यातील पदार्थ बघून किंवा एखाद्याने चाखले तर त्यांना काय वाटेल, त्यापेक्षा तो डबाच नको.” तो मित्रांना सांगायचा की,” घरून निघताना भाकरी खाऊन निघतो” पण घरातून निघताना भाकरीच काय पण बिन दुधाचा चहा सुद्धा त्याच्या नशिबी नसायचा.
राजनला त्याच्या गरिबी विषयी आणि परिस्थितीबद्दल जाणीव होती. आई आणि बाबांचे कष्ट तो शाळेला सुट्टी असेल त्या दिवशी त्यांच्यासोबत कामावर जाऊन बघत असे. राजनला निदान शाळेत तरी घातले होते पण रस्त्याच्या कामावर असलेल्या इतर रोजंदारी करणाऱ्या कामगारांची मुलं शाळेत जात नव्हती. थोडी मोठी झाली की ती सुद्धा तिथेच काम करायला लागायची.
बहुतेक सर्व कामगारांना दारूचे व्यसन होते त्यामुळे त्यांच्या मुलांना शाळाच काय धड खायला सुद्धा मिळत नसे.

राजन हे सर्व लहानपणापासून बघत आला असल्याने त्याला त्याच्या आई बाबांबद्दल खुप आदर होता. एक दिवशी अजय आणि आनंद कोंबडी वाल्याकडून कोंबडी घ्यायला गेले होते, नेमका त्याच दिवशी त्यांना राजन तिथं प्लॅस्टिकच्या ड्रम मधुन कोंबड्यांचे पाय आणि डोकी गोळा करताना दिसला. कोंबडी वाला राजनला सांगत होता, “पोरा आज तुला उशीर झाला तूझ्या अगोदर दोघं जण तंगड्या आणि डोकी घेऊन गेलीत.”

राजन चे बाहेर लक्ष नव्हते, अजय आणि आनंदने एकमेकांकडे बघितले आणि एकमेकांना इशारे करून ते दुकानातून माघारी फिरले.
आपला मित्र राजन डबा का आणत नाही याची कल्पना अजय आणि आनंदला आली. त्यांनी राजनला किंवा शाळेत याबद्दल कोणाला सांगायचे नाही असे ठरवले.

‘आपला मित्र गरीब आहे’ हे अजय आणि आनंदला माहिती होते पण तो एव्हढा गरीब आहे की दोन वेळचे जेवण पण त्याला चांगले मिळू नये याबद्दल त्यांना खूप वाईट वाटले. आपल्या मित्रासाठी काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटायला लागले. त्या दोघांनी विशालला सुद्धा सांगितले की, “आपण राजन साठी काहितरी करू या!” पण नक्की काय करायचे हे त्यांना सुचत नव्हते.
शाळेत विज्ञानाचा तास सुरू होता, सरांनी कंपोस्ट खत कसे बनवायचे आणि त्याच्यापासून कोणते कोणते फायदे आहेत हे त्यादिवशी शिकवले होते.

त्याच संध्याकाळी विशालच्या घरी त्याच्या बाबांनी दारासमोर लावलेल्या गुलाबाच्या आणि चाफ्याच्या झाडांना घालण्यासाठी कपोस्ट खताचे पाकीट आणले होते. विशाल चे बाबा त्याच्या आईला म्हणाले, “किलोभर कंपोस्ट साठी वीस रुपये घेतात हल्ली, दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे.” विशाल ने दुसऱ्या दिवशी राजन, अजय आणि आनंद यांना कालची घटना सांगितली.

“आपण आता कंपोस्ट तयार करू या आणि त्याची विक्री करून जे पैसे मिळवता येतील का ते पाहू या.” सगळ्यांना विशालची ही कल्पना आवडली. अजय ने असे सुचवले की कंपोस्ट जिथे मिळते तिथे ते कुठून येते आणि जर आपल्याकडून त्यांना विकायचे झाले तर ते कितीला विकत घेऊ शकतील याची माहिती काढू या. त्याप्रमाणे त्यांनी गावाजवळील दोन्ही नर्सरी मध्ये जाऊन त्यांच्याकडून महिन्याला किती कंपोस्ट खताची विक्री होते, नर्सरी वाल्यांना किती रुपयांना ते मिळतं याची माहिती काढली.

आनंद ने एक शंका काढली की, “कंपोस्ट खतासाठी लागणारी माती आणि टाकाऊ जैविक कचरा कुठून आणि कसा गोळा करायचा आणि हे कंपोस्ट खत बनवायचे तरी कुठे , त्यासाठी जागा कोण देणार?’ त्या सर्वांनी मिळून त्यांची ही कल्पना आणि जागेचा तसेच मातीचा प्रश्न त्यांच्या विज्ञानाच्या सरांकडे मांडला. सरांनी त्यांच्या या कल्पने मागचा नेमका उद्देश काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांना विचारले, तुम्ही एवढा खटाटोप कशासाठी चालवला आहे.राजनला पण माहिती नव्हते की हे कंपोस्ट चे प्रकरण नेमकं कशासाठी करतोय.अजय ,आनंद आणि विशाल तिघांनी एकमेकांकडे पाहिले आणि आता आपल्या या प्रोजेक्टचा उद्देश सांगण्याची वेळ आलीय असा इशारा करून सांगायला सुरुवात केली. ते सांगू लागले, “सर आमचा हा मित्र परिस्थितीने फार गरीब आहे, त्याला मदत मिळावी म्हणुन आम्ही कंपोस्ट खत बनवून त्याची विक्री करणार आहोत त्यातून जो नफा मिळेल तो सर्व राजनला देणार आहोत.
आम्हाला जमेल तेवढी मदत आणि श्रमदान आम्ही करायला तयार आहोत.”

राजनला हे सर्व ऐकून आश्चर्याचा धक्का बसला त्याचे मित्र त्याच्यासाठी एवढा विचार करतात आणि त्यांच्या सर्वांच्या मनाची एवढी तयारी झालीय हे बघून त्याला गहिवरून आले. विज्ञानाच्या शिक्षकांना त्यांच्या या विद्यार्थ्यांचे कौतुक वाटले. मुलांनी असा प्रोजेक्ट राबविणेसाठी काही मदत होईल का?यासाठी त्यांनी गावातील सरपंचांना संपर्क केला. सरपंच स्वतः एक शेतकरी होते, त्यांना मुलांची ही कल्पना आणि त्यामागील उद्देश ऐकून खुप आनंद झाला. त्यांनी सरांना सांगितले की, “त्या मुलांना माझ्याकडे पाठवून द्या मी बघतो काय करायचे ते.”

आनंद, विशाल, अजय आणि राजन सगळेजण दुसऱ्या दिवशी सरपंचांना भेटायला गेले. सरपंचांनी चौघांना सांगितले, “तुम्हाला गावांतील तळ्याजवळ जे मोकळे मैदान आहे तिथं जेवढी जागा वापरायची आहे तेव्हढी वापरा आणि जेवढी माती घ्यायची तेव्हढी घ्या पण त्यापासून जे कंपोस्ट तयार होईल त्याची सर्व विक्री तुम्ही ग्रामपंचायतलाच करायची. फक्त तुम्हाला स्वतःला काम करता येणार नाही कारण तुमचे वय चौदा वर्षांच्या खाली आहे. पण यामध्ये कोणाचे आईवडील काम करायला तयार असतील तर मी ग्रामपंचायत कडून रोजगार हमी योजनेतून महिनाभर त्यांना काम देऊ शकेन. राजन चे आई वडील मेहनती होतेच ते सुद्धा रस्त्याची रोजंदारी वरील कामं सोडून कंपोस्ट प्रोजेक्ट वर काम करू लागले.

त्याचसोबत सरपंचांनी रासायनिक खते वापरण्यापेक्षा तुम्ही बनवलेले कंपोस्ट खत शेतकऱ्यांना मी तुमच्याकडून खरेदी केलेल्या भावातच देईन.” असं आश्वासन देऊन त्याची अंमल बजावणी देखील केली. बारा वर्षांच्या चार मुलांचा हा स्तुत्य उपक्रम गावाच्या सरपंचांच्या मदतीने सुरू झाला. सरपंचांनी गावातील ओला आणि जैविक कचरा विभागून आणि गोळा करून तो कंपोस्ट प्रोजेक्ट पर्यंत पोचविण्याचे आवाहन गावकऱ्यांना केले. बारा वर्षांच्या मुलांना जे सुचले होते त्याची संपूर्ण गावातच नाही तर तालुक्यात चर्चा होऊ लागली. हळू हळू कंपोस्टला मागणी वाढू लागली. शेतकरी सुद्धा महागड्या आणि हानिकारक रासायनिक खतांचा वापर कमी करून कंपोस्ट साठी मागणी करू लागले.

पुढल्या चार महिन्यातच राजनच्या घरी चांगले अन्नधान्य आणि भाजीपाला घेण्याची ऐपत झाली. त्याच्या आईबाबांनी राजनच्या दोन्ही बहिणींना पुन्हा बोलावून घेतले आणि त्यांना पुन्हा शाळेत पाठवायला सुरुवात केली. एका दिवशी राजन शाळेत डबा घेऊन गेला, आनंद,अजय आणि विशाल यांच्या समोर त्याने डबा उघडला. त्याचे डोळे पाण्याने भरले होते, अजय,आनंद आणि विशाल त्याच्या पाठीवर हाताने थोपटून शालेय जीवनात एक प्रोजेक्ट यशस्वी केल्याबद्दल मनातून सुखावले होते.

बारा तेरा वर्षांच्या मुलांमध्ये आपल्या मित्रविषयी असलेला जिव्हाळा, आपुलकी, त्याची परस्थिती जाणून त्याला हिणवण्यापेक्षा त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी चाललेली धडपड. गावातील सरपंचांनी अशा समाजोपयोगी कामासाठी तसेच रासायनिक खतांना दूर सारून जैविक शेती साठी बारा वर्षांच्या मुलांना दिलेला पाठिंबा आणि सहकार्य हे सहसा कुठेही बघायला मिळणार नाही. हल्ली शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे प्रोजेक्ट करायला सांगितले जातात. दहा ते पंधरा वर्षांच्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट मधुन काय साध्य करायचे किंवा कशासाठी करायचा याची जाणच नसते. शाळेतून सांगितला म्हणून वेळेत करायचा आणि आमच्या मुलांना प्रोजेक्ट मध्ये जास्तीत जास्त मार्क मिळावेत म्हणून मुलांच्या ऐवजी त्यांचे पालकच जास्त धावपळ करताना दिसतात. मुलांना पालक काय शिकवतात किंवा शाळेसोबतच घरातून होणारे संस्कार किती आणि कसे महत्वाचे असतात. प्रकल्प हा मुलांना प्रोत्साहन देवुन त्यांच्यात सामजिक भान यावे सोबतच मुलं अनुभव संपन्न व्हावीत म्हणून दिलेला असतो मुलांच्या मनात निर्मळ भावना रुजवणे
मैत्री, सारख्या भावनेत पैसा किंवा सामजिक स्थान महत्त्वाचे नसते.

अजय ,आनंद, विशाल आणि राजन यांच्या सारखी मैत्री किंवा आपुलकी हल्ली दिसत नाही. दिसते ती चढाओढ, मत्सर आणि मोठेपणा. विद्यार्थी दशेत मुलांचे सामाजिक भान, कुतूहल आणि नवीन काहीतरी करण्याची आणि जिज्ञासू वृत्ती हरवत चाललेली दिसून येत आहे.

प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनिअर
B.E.(mech), DIM, DME.
कोन, भिवंडी,ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 185 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..