नवीन लेखन...

तर सोन्याला सुगंध येईल

गुजरातच्या माजी मुख्यमंत्री सौ आनंदीबेन पटेल यांच्या `ए मने हमेशा याद रहशे’ या गुजराती पुस्तकाचा मराठी अनुवाद (‘हे माझ्या सदैव लक्षात राहील’) केला आहे  सौ. वैजयंती गुप्ते यांनी.   या आगामी पुस्तकातील एक कथा.


शाळेमध्ये येणारा विद्यार्थी कुठल्या वातावरणातून आला आहे? त्याच्या घरची परिस्थिती कशी आहे? कुठल्या परिस्थितीमध्ये तो शिकत आहे वगैरे गोष्टींची जर शिक्षकाला माहिती असेल तरच शिक्षणामध्ये येणारे अनेक अडथळे वेळेवरच दूर होउ शकतात. अनुभवी शिक्षक ही गोष्ट समजत असतो. नवीन शिक्षक, काही अनुभवानंतरच, ह्या सगळ्या गोष्टींच्या अगदी मनापासून मुळापर्यंत जातो तेव्हाच समजतो. परंतु बरेच वेळा ह्यांत खूप उशीर झालेला असतो. ह्या उशीरामुळे होणाऱ्या त्रासाचा बळी एखादे निरागस बालक होऊ शकते. मुलांच्या कोवळ्या मनावर काही दुष्परिणाम होण्यापूर्वीच जर त्याला काळजीपूर्वक समजून घेतले तर आपले हे काम यशस्वी होऊ शकते. म्हणूनच जीवनामध्ये दुसऱ्यांच्या अनुभवांपासून देखील खूप शिकण्यासारखे असते हे लक्षात ठेवायला पाहिजे. शिक्षकाचा निष्काळजीपणा, अनुभव शून्यता किंवा सहृदयतेचा अभाव याचा कळत नकळत पण विद्यार्थ्यावर दुष्परिणाम होणार नाही ह्यासाठी जागृत राहणे तितकेच महत्वाचे आहे.

शिक्षकाचे काम आपल्या विद्यार्थ्याला समजून घेऊन मगच त्याला योग्य शिक्षण देण्याचे आहे. अशाच एका प्रसंगाचा मी शिक्षकांच्या संमेलनात, अनेक वेळा, ह्याच कारणासाठी उल्लेख करत असते. ह्या प्रसंगामध्ये एका शिक्षिकेने स्वतःच्या चुकीचा आणि पश्चातापाचा निःसंकोचपणे स्वीकार केला. त्यानंतर तिच्या शिक्षणशैलीत झालेल्या परिवर्तनाची ही हृदयद्रावक गोष्ट आहे.

ही घटना, गुजराथच्या बनासकांठा आणि महेसाणा येथील प्राथमिक शाळांमध्ये सरकारने ‘अनुपम शाळा’ प्रोजेक्टचा प्रारंभ केला त्यावेळची आहे. शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारावा, लोकांच्या सहकार्याने शाळांना आदर्श शाळा घडवाव्या ह्या हेतूने १५ मुद्दे नक्की करण्यात आले होते. त्यांच्या आधारावर शाळांमध्ये हे प्रोजेक्ट सुरु झाले. एक वर्षांनंतर ज्या शाळेने सुंदर रित्या काम पूर्ण केले होते त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून पारितोषके देण्यासाठी माझ्या अध्यक्षते खाली एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिक्षणमंत्री गावात येणार असेल तेंव्हा गावातले लोक उत्तम तयारी करतील हे स्वाभाविक आहे, परंतु इथे तर गावातल्या लोकांबरोबर शिक्षित समाज पण स्वतःचे मुद्दे मांडण्यासाठी उत्सुक होता. गावातल्या जनतेमध्ये  शिक्षणाची भूक निर्माण झाली होती. स्वतःच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे ह्यासाठी स्थानिक लोकांचा जणू सागरच लोटला होता.

शाळांना प्रोत्साहन मिळावे आणि त्याबरोबरच लोकांमध्ये शिक्षणासाठी अधिक जागृती निर्माण व्हावी यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ह्या कार्यक्रमाचे स्थळ होते, एक छोटेसे गांव फतेपुरा , ता. विजापुर, जि. महेसाणा.

आज जसे काही संपूर्ण फतेपूर गांव ह्या कार्यक्रमाला लोटले होते. आमच्या सरकारने शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी केलेल्या आयोजनाचा परिणाम लोकांच्या उत्साहाच्या रूपाने दृष्टीस पडत होता. उत्तम शिक्षण आणि जनतेचा सहकार याचा हा परिणाम होता. हजारपेक्षा पण जास्त शिक्षक तिथे उपस्थित होते. संपूर्ण वर्षभर ज्यांनी-ज्यांनी चांगले काम केले होते त्यांची प्रशंसा झाली. त्यांना जास्त प्रोत्साहन मिळावे म्हणून पारितोषके देण्यात आली.

साधारणपणे लोकांचा असा समज असतो की जिथे मंत्री महोदय भाषण करणार असतील तिथे दुसऱ्यांना बोलण्याची संधी मिळत नाही, परंतु इथे असे नव्हते. शिक्षक वर्षभर त्यांनी केलेली कामगिरी आणि त्यांचा अनुभव यावर स्वतःच अभिप्राय देणार होते, स्वतःचे अनुभव अगदी मोकळ्या मानाने प्रस्तुत करणार होते.

शिक्षक स्वतः केलेली यशस्वी कामगिरी संपूर्ण समाजासमोर मांडणार होते. दूर दूरच्या ठिकाणांवरून ह्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी पूर्ण उत्साहात शिक्षक वर्ग आला होता. बनासकाठा जिल्ह्यातील अगदी टोकाची एक छोटी शाळा म्हणजे वाव गावाची शाळा.

तिथे विद्यासहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या छोट्याश्या दिसणाऱ्या सोनलने स्वतःची गोष्ट माईक समोर येऊन सर्व उपस्थितांसमोर सांगितली. ते तिच्या शब्दात जाणून घेऊ.

“मी, दोन वर्षांपूर्वी शाळेमध्ये विद्यासहाय्यक म्हणून भरती झाले. नोकरी मिळाल्याचा उत्साह होता. काम करण्याची तयारी होती. ऑर्डर घेऊन प्राचार्यांना जाऊन भेटले. प्राचार्यांनी मला पाचवी इयत्तेचा वर्ग घ्यायला सांगितला. दुसऱ्या दिवशी हजेरी पत्रक घेऊन वर्गात गेले. हजेरी घेण्यास सुरुवात केली. उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी ‘हां बेहेन’ म्हणत उपस्थिती नोंदवत होते. पण जेंव्हा मी बावीस नंबर पुकारला तेव्हा कोणीपण ‘हां बेहेन’ म्हणाले नाही. मी वर्गात चौफेर नजर फिरविली.

मी परत म्हणाले, “बावीस नंबर”, काही उत्तर नाही. मी हजेरी पत्रकात नाव बघितले. नंतर नाव पुकारले , तरी कोणी उत्तर दिले नाही. मी पुढची हजेरी पूर्ण केली आणि माझे शिकविण्याचे काम चालू केले.

जवळ-पास, एक दीड तासानंतर १२:०० ते १२:३० च्या दरम्यान एक छोटी मुलगी धावत धावत आली. धापा टाकत-टाकत ती दरवाज्याजवळ उभी राहिली. तिने अस्ताव्यस्त कपडे घातले होते, डोक्याचे केस मोकळेच होते, हातामध्ये अगदी मळकट दप्तर होते. तिच्या पायात चप्पल पण नव्हती…..! मी तिच्याकडे एकटक बघत होते. एकतर उशिरा आली होती, दुसरे तिचे अस्ताव्यस्त कपडे. शाळेत तर वेळेवर यायलाच हवे. कुठलाही विद्यार्थी वाटेल तेव्हा येईल असे थोडेच चालते .

“बेहेन, मी आत येवू?” ती म्हणाली.
मी नाही म्हणाले .
ती चुपचाप बाहेर उभी राहिली. थोडी रडली पण खरी. नंतर मधली सुट्टी झाली आणि ती घरी निघून गेली.
दुसऱ्या दिवशी पण ह्याच घटनेची पुनरावृत्ती झाली.
परत मी आत येण्यास नको म्हणाले .

अशा प्रकारे जवळ-जवळ एका आठवड्यापेक्षा देखील जास्त काळ हा घटनाक्रम चालूच होता. ती उशिरा यायची . माझी परवानगी मागायची आणि मी नाही म्हणायची. ती थोडा वेळ थांबायची, वर्गात येण्यास मना केले म्हणून रडायची, मधली सुट्टी होईपर्यंत थांबायची आणि नंतर निघून जायची.

त्यांनतर, एके दिवशी मी हजेरी घेत होते, तेव्हा बावीस नंबरवाली मुलगी वर्गात उपस्थित होती. हजेरी घेऊन झाल्यावर मी तिला उभे राहण्यास सांगितले .
“आजपर्यंत वेळेवर का येत नव्हतीस?” – मी विचारले.
ती तशीच उभी राहिली, ती काहीही बोलली नाही. बस चुपचाप उभी राहिली.
“इतके दिवस कुठे जात होतीस? शिकायचे आहे की नाही?” असे मी विचारल्यावर तर ती रडायला लागली, हुंदके द्यायला लागली. मी घाबरले आणि तिच्या जवळ गेले. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. पाणी मागवले आणि तिला पाणी पिण्यासाठी दिले . थोड्यावेळाने ती शांत झाली. मग हळुवारपणे तिला विचारले….काय झाले होते ….परंतु ती काहीच बोलली नाही. तशीच चुपचाप उभी राहिली. तिचे डोळे पाण्याने डबडबलेले दिसले.

परत ती पाणी प्यायली. नंतर ती बोलू लागली:
‘बेहेन, माझा सात महिन्याचा छोटा आंधळा भाऊ होता. त्याला सांभाळण्यासाठी मी घरी राहत होते. माझे आईवडील मजुरी करतात. मी भावाला सांभाळत असे. दुपारी माझी आई आली की त्याला सांभाळायची आणि मी शाळेत येत असे. म्हणून रोज उशिरा येत होते. पण बेन काल…………” तिचा आवाज भरून आला आणि ती परत रडायला लागली.
‘काय झाले काल?’ मी उत्सुकतेने विचाले.
बेहेन काल, माझा भाऊ देवाघरी निघून गेला, आता तो या जगात नाही म्हणून मी शाळेत वेळेवर आले..!..!!

…आणि ती छोटीशी मुलगी हुंदके देत रडू लागली. मी तर तिची कहाणी ऐकून आवाक झाले. दहा एक वर्षाची गरीब घरांतील मुलगी घर सांभाळते, छोट्या भावाला सांभाळते आणि शिक्षणाची ओढ म्हणू शाळेत पण येते…!

त्या मुलीची कहाणी ऐकून मला माझीच लाज वाटली. मी तिला विचारले की ती शाळेत उशिरा का येते?, परंतु ते जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला नाही. मी शिक्षक झाले. परंतु सामाजिक जवाबदारी विसरून गेले. काय माझ्यातील ‘माणुसकी’ मरून गेली आहे?

अरे! मी एका मुलीबद्दलची मातृभावना पण विसरून गेले?

ती कुठल्या कारणास्तव उशिरा येते ह्याचे उत्तर मला पहिल्या दिवशीच जाणून घेण्याची खरे तर गरज होती.

कदाचित मी तिला काही मदत करू शकले असते. तिच्या घरी पण जाऊ शकले असते. तिला वर्गात घेऊ शकले असते. तिला वर्गात प्रवेश न देऊन मी तिला खूप दुःख पोहोचवले होते. माझ्या आयुष्यातील ही घटना मी कधीही विसरू शकणार नाही. ह्या घटने नंतर माझ्या स्वभावात आणि मुलांबरोबरील वर्तणुकीमध्ये खूप बदल झाला आहे. आता प्रत्येक मुलाबद्दल मला खूप प्रेम वाटते. गरजवंत मुलांना मदत करते. गावांतील वडील माणसांना भेटून त्यांच्या सहकार्याने आमची शाळा सर्वोत्तम बनविण्याचे शक्य ते सगळेच प्रयत्न करते. आता मी तिच्यासारख्या मुलींसाठी जास्तीत-जास्त वेळ देत असते. शाळेमध्ये एक हजारपेक्षा

जास्त झाडे लावून शाळेला हिरवीगार बनविली आहे.” इतके बलून सोनलने स्वतःची कहाणी पूर्ण केली.

सोनलने स्वतःची कहाणी पूर्ण केली खरी. पण तिच्या कहाणीमुळे तिथे सभेत उपस्थित असलेले सर्व लोक विचारात पडले. शिक्षकांसाठी तर ही खूपच महत्वाची गोष्ट होती. आपल्या शाळेत येणाऱ्या मुलांची सामाजिक स्थिती, तसेच घरच्या परिस्थितीची सुरुवातीलाच माहिती करून घेणे आवश्यक आहे.

इथे शिक्षकांच्या विचारांना नवीन दिशा मिळते. समाजामध्ये तर अशी अनेक मुले असतील की जी अगदी विषम परिस्थिती मध्ये शिक्षण मिळविण्यास उत्सुक असतील, आणि तरी कुठेतरी आपल्याच उदासीनतेमुळे ती शिक्षणापासून वंचित राहत असतील. आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्यां बरोबरच बाल मन तसेच बाल वर्तन पण समजून घेणे जरुरी आहे. जर समाजाबद्दलची संवेदनशीलता आपल्या वागण्यात आली तरच सोन्याला पण सुगंध येईल.

शिक्षकाची नोकरी करणे सोपे आहे. अवघड आहे ते हृदयापासून शिक्षक बनणे.

— सौ आनंदीबेन पटेल
माजी मुख्यमंत्री, गुजरात

— अनुवाद  – सौ. वैजयंती गुप्ते , गांधीनगर, गुजरात

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..