नवीन लेखन...

सिंधुदुर्ग – दहावी बारावीत अव्वल पण उच्चशिक्षणाच्या सोयी?

मालवणच्या आशिष झाट्येने NEET मध्ये राज्यात प्रथम क्रमांक आणि देशात एकोणिसावा क्रमांक पटकावल्याची बातमी मनाला उभारी देऊन गेली. AIIMS दिल्ली सारख्या भारतातील सर्वोत्तम कॉलेज मध्ये शिकण्याचा पर्याय आता त्याच्यापुढे आहे. केईम किंवा AIIMS ची निवड मी करेन असे त्याने टाइम्स ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. आशिष ने सिंधुदुर्गाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये एक नवीन बेंचमार्क निर्माण केलाय.

तीस वर्षांपूर्वी आमची पिढी ज्या वेळी शाळा-कॉलेजात होती त्यावेळी  लातूर पॅटर्न महाराष्ट्रात खूप फेमस होता. त्यावेळी सिंधुदुर्गाचा अंतर्भाव हा मुंबई बोर्डात केला जायचा. मुंबई बोर्डामध्ये मुंबईच्या पार्ले टिळक, बालमोहन या शाळांचा दबदबा होता तर महाराष्ट्रातून पहिला येणार सन्मान हा लातूर पॅटर्न मधील मुलांना मिळायचा. सिंधुदुर्गाचा निकाल हा जेमतेम पन्नास टक्क्यांच्या आसपास असायचा. दहावीचा निकाल बारावीच्या मनाने त्यातल्या त्यात बरा असायचा पण बारावीला विद्यार्थ्यांची धूळधाण उडायची. बारावीत नव्वद टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा बारावीला ७०-७५ टक्क्यांवर समाधान मानायला लागायचे.

अर्थात या गोष्टीला नक्कीच काही अपवाद असतील पण त्याकाळी सिंधुदुर्गात राहून बारावी पर्यंत शिक्षण घेतलेले बरेचसे जण माझ्याशी सहमत असतील. हे असे का होते याचे कोडे मला त्यावेळी पडायचे. त्यावेळी  सिंधुदुर्गात व्यावसायिक शिक्षणाच्या सोयी नसल्यात जमा होत्या.  लगतच्या कोल्हापूर जिल्ह्यात १९८३ पासून कितीतरी खाजगी इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजे होती  त्यावेळी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत एकही कॉलेज नव्हते! ( सिंधुदुर्गात ॲलोपॅथी मेडिकल कॉलेज सुरू व्हायला २०२० उजडायला लागले) खरे तर कोकणची  पार्श्वभूमी लाभलेल्या विचारवंत खेळाडू, शास्त्रज्ञ, कलाकार, लेखक अशा  यांची कमी नाही. अनेक क्षेत्रांत कोकणपुत्रानी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे हे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे इथे प्रतिभेची कमतरता कधीच नव्हती. पुण्या-मुंबई सारखे सोडा पण कोल्हापूर जिल्ह्याच्या निम्म्याने जरी शैक्षणिक सोयी आपल्याकडे असते तर आपल्याकडचे चित्र आज नक्कीच वेगळे असते. जसे भारतातले टॅलेंट अमेरिकेमध्ये जाऊन मानमरातब कमावते झाले तसेच आमच्या कोकणचेही तसेच होत राहिले.  इथले टॅलेंट पुण्या मुंबईची एकमेव वाट पकडत आले.  पण जसे अमेरिकेला जाणे प्रत्येकालाच शक्य होत नसते तसे इथल्या कित्येक प्रतिभावंतांना सोयी अभावी  कोकणच्या  बाहेर जाणे शक्य झाले नसेल!

१९९२ नंतर सिंधुदुर्ग जिल्हा कोल्हापूर बोर्डाशी जोडण्यात आला त्यावेळी चित्र हळूहळू पालटायला लागले. कुठेतरी मरगळ झटकली गेली आणि काही विद्यार्थी बोर्डामध्ये चमकायला लागले.  निकालांमध्ये थोडीशी सुधारणा झाली आणि नेमके याच गोष्टींनी संजीवनी सारखे काम केले. विद्यार्थ्यांना नवीन प्रेरणा मिळाली, शिक्षकांना हुरूप आला. नवीन नवीन बेंचमार्क सेट व्हायला लागले आणि कोकण विभागीय बोर्ड स्थापन झाल्यानंतर तर सिंधुदुर्ग जिल्हा निकालांच्या बाबतीत नेहमीच राज्यात अग्रेसर राहिला आहे. बारावीच्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यानं सलग नवव्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक राखला आहे. कोकणासाठी जसे स्वतंत्र बोर्ड तयार केले तसे स्वतंत्र विद्यापीठाची मागणी पण झाली आहे. एकंदर शैक्षणिक धोरण आणि येणारा खर्च लक्षात घेता राज्यात एका स्वतंत्र विद्यापीठाची मागणी नजीकच्या काळात कितपत मान्य होईल याची शंका आहे पण आज आपल्या सुधारलेल्या माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक स्तराला न्याय देऊ शकेल अशी उच्चशिक्षण देणारी व्यवस्था सिंधुदुर्गात व रत्नागिरीत असण्याची गरज आहे. एक शासकीय अभियांत्रिकी आणि मेडिकल कॉलेज च्या प्रतीक्षेत सिंधुदुर्ग अजूनही आहे.

विद्यार्थांनी, शिक्षकांनी, शाळांनी आपली गुणवत्ता गेली वर्षानुवर्षे सिद्ध करून दाखविली आहे आता जर आपल्याला त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर गुणवत्तापूर्ण उच्चशिक्षणाच्या काही चांगल्या संस्था जिल्ह्यात निर्माण होणे आवश्यक आहे. शेजारचे कर्नाटक किनाऱ्यावरच्या जिल्ह्यांना शैक्षणिक आणि स्टार्टअप च्या माध्यमातून पुढे नेते आहे.  मंगलोर-उडुपीच्या धर्तीवर सिंधुदुर्ग -रत्नागिरी शैक्षणिक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विकसित होऊ शकतात.

विकासासाठी कॅलिफोर्निया बनायची आणि फक्त पर्यटनावर अवलंबून रहायची पण गरज नाही! वेळ आहे ती जी ‘बुध्दीमत्ता’  या प्रदेशात उपलब्ध आहे त्याला आणखी विकसित करणारी व्यवस्था निर्माण करण्याची.

— श्रीस्वासम 

Avatar
About श्रीस्वासम 10 Articles
अभियांत्रिकी शिक्षणाच्या आणि करिअर मार्गदर्शनाच्या क्षेत्रात गेल्या एकवीस वर्षांपासून कार्यरत. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी विविध अभ्यासक्रमांची आखणी व अभियांत्रिकीशी संबंधीत दोन पुस्तकांचे लेखन. शालेय जीवनापासून मराठी साहित्यामध्ये विशेष रुची. कविता, प्रवासवर्णन, द्वीपदी, आठवणी यांच्या माध्यमातून होणारे मराठी लेखन हे मुख्यत्वेकरून जीवनानुभवांवर आधारीत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..