नवीन लेखन...

साईन ऑफ इन लॉक डाऊन

मागील वर्षी मे महिन्यात पहिले क्वारंटाईन करावे लागले होते. जकार्ता हुन मुंबई करिता वंदे भारत मिशन अंतर्गत एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला पोहचलो. जकार्ता एअरपोर्ट वर एअर इंडियाच्या फ्लाईट साठी चेक इन करून, इमिग्रेशन क्लियर व्हायला पंधरा ते वीस मिनिटे लागली होती.

जवळपास सव्वा दोनशे प्रवासी ज्यापैकी तीस जण मुंबईहून पुढे अहमदाबाद साठी जाणार होते. खरं म्हणजे जहाजावर असताना आम्हाला वंदे मिशन अंतर्गत इंडोनेशिया मधून भारतात परतण्यासाठी फ्लाईट अरेंज केल्याचे समजले. वेब साईट वर पाहिले असता दिल्ली, बंगळूरू आणि अहमदाबाद साठी फ्लाईट होत्या. त्यामुळे घरी जाता येईल की नाही याची खात्री नव्हती, कारण त्या फ्लाईट्स फक्त त्या त्या राज्यातील प्रवाशांसाठीच होत्या लॉकडाऊन मुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला बंदी होती. इंडियन एम्बसी इंडोनेशिया च्या वेबसाईटवर मुंबई करिता फ्लाईट नसल्याने नांव रजिस्टर होतं नव्हते. पण दुसऱ्या दिवशी अहमदाबादला जाणारी फ्लाईट मुंबईला स्टॉप घेऊन अहमदाबाद ला जाईल अशी माहिती वेबसाईटवर झळकली. कॅप्टन ने त्याचे आणि माझे नांव रजिस्टर केले आणि आमच्या ई – मेल आय डी वर लगेचच रिप्लाय आला की तिकिटाचे पैसे भरून बुकिंग कन्फर्म करा. सुरवातीला विश्वासच बसला नाही. पण नंतर एका व्हाट्सअप ग्रुपवर ऍड करून मेसेज आले, एम्बसी कडून तो ग्रुप बनवला गेला होता आणि त्यावर फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी लागणारे कागदपत्र व इतर माहिती असे सगळे मेसेजेस येऊ लागले.

जकार्ता हुन निघाल्यावर साडे सहा ते सात तासात मुंबईत लँड झाले आणि अर्ध्या तासात इमिग्रेशन आणि सगळे सोपस्कार पूर्ण करून आम्हाला राज्य सरकारच्या ताब्यात दिले गेले. परंतु कर्मचाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे संध्याकाळी साडे सात वाजल्यापासून ते क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या वाशीच्या हॉटेल मध्ये जायला साडे बारा वाजले. एअरपोर्ट वरून हॉटेल पर्यंत जायला एस टी बसची सोय केली होती. प्रत्येक प्रवशकडून मुंबई एअरपोर्ट ते वाशी पर्यंत 200 रुपये तिकिट घेतले. जकार्ता ते मुंबई 36000 विमानाचे तिकिट काढून आलेल्या काही लोकांना 200 रुपये बस चे तिकीट घेताना कपाळावर आठ्या पडल्या होत्या.

वाशीच्या हॉटेल मध्ये सात दिवस कॅप्टन आणि मी बाजू बाजूच्या रूम मध्ये होतो. कॅप्टन नेरुळ ला राहत होता त्याने दुसऱ्या दिवशी त्याच्या घरून चिवडा, फरसाण, काकडी, टोमॅटो, लिंबू असं चाखण्याचे सगळं सामान मागवले. ड्युटी फ्री मधून त्याने व्हिस्की आणलीच होती. एअरपोर्ट वर फक्त आमचेच फ्लाईट आले होते, सगळा शुक शुकाट होता, ड्युटी फ्री शॉप्स बंद होते, सगळा स्टॉक झाकून ठेवलेला पण अचानक एक काउंटर उघडलं आणि मग बऱ्याच प्रवाशांनी झुंबड केली.

हॉटेल मध्ये सांगितले तुमचा ब्रेक फास्ट लंच आणि डिनर रूम बाहेर अमुक अमुक वेळेत ठेवला जाईल, रूमच्या बाहेर पडायचे नाही, cctv कॅमेरे चालू आहेत. पण ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरसाठी मी कॅप्टन च्या रूम मध्ये जायचो. संध्याकाळी सात वाजता कॅप्टन पेग मारायला सुरवात करायचा. सातव्या दिवशी स्वाब टेस्ट घेतली आणि आठव्या दिवशी हातावर होम क्वारंटाईन चा शिक्का मारून सोडून दिले. त्या शिक्क्याची शाई घरी येईपर्यंत घामानेच उतरली होती.

सात दिवस हॉटेल मध्ये बंद राहिल्यावर दुसरं क्वारंटाईन घरी आल्यावर सुरु झाले. वाशीहुन घरी जायला कार बुक केली होती, मी आज येतोय असं कोणालाच सांगू नको असं आईला सांगितलं होतं.जवळपास साडेपाच महिन्यांनी घरी गेलो होतो, मुलगी दारात आली आणि मला बघून बुचकळ्यांत पडली, तीन वर्षाच्या मुलाला पण मला बघून काय करू आणि काय नको असं होऊन गेले होते. पण सगळ्यांशी चार हात लांब राहून सरळ वरच्या मजल्यावर असलेल्या बेडरूम मध्ये जाऊन दाराला आतून कडी लावून स्वतःला कोंडून घेतलं. माझा मुलगा, मुलगी आणि भावाची मुलगी पहिल्या दिवशी कितीतरी वेळा येऊन दरवाजा वाजवत होती. पण त्यांना मग दरवाजा पासून लांब जायला सांगून दोन चार मिनिटात बंडल मारून घालवून देत होतो. प्रिया जेवण सुद्धा वरच्या रूम मध्ये आणून देत होती. घरात सुद्धा त्यावेळेस सात दिवस क्वारंटाईन पाळले कारण तेव्हा भीतीच तशी पसरली होती.

तिसरे क्वारंटाईन इंडोनेशियात जकार्ता मध्ये झाले. साडे पाच महिने झाल्यावर पुन्हा जहाज जॉईन करण्यासाठी जकार्ता ला पाठवण्यात आले. जहाजावर जाण्यापूर्वी तिथल्या नियमानुसार मेडिकल करायची होती, सुरवातीला ऑफिस कडून कळवलं की मेडिकल झाल्यावर पाच दिवसानी जहाजावर पाठवण्यात येईल. पण तिथे गेल्यावर दुसऱ्या दिवशी कळाले की इंडोनेशियन गव्हर्नमेंट चे पाच दिवस आहे पण, जहाज ज्या कंपनीकडे आहे त्यांच्या नियमानुसार परदेशी कर्मचाऱ्यांना चौदा दिवसाचे क्वारंटाईन आहे. जकार्ता मधील ग्रँड मरक्यूअर या फोर स्टार हॉटेल मध्ये मी एकटाच होतो पण तिथे एक होते, रोज संध्याकाळी मी बाहेर पडायचो त्याला कारण पण तसंच होते, तेवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये मिळणारे जेवण माझ्याच्याने खाल्ले जात नव्हते, हॉटेल पासून पंधरा मिनिटाच्या अंतरावर इंडियन रेस्टॉरंट होते, तिथं जाऊन मी जेवायचो आणि दुसऱ्या दिवसाच्या लंच साठी पार्सल आणून फ्रिज मध्ये ठेवायचो. जेवणाच्या तासभर अगोदर पार्सल चा डब्बा फ्रिजबाहेर काढायचो आणि पाच मिनिटं अगोदर वॉश बेसिन मध्ये गरम पाणी तुंबवून त्यात तो प्लास्टिक डब्बा गरम करायचो. हॉटेल कडून रूम बाहेर ठेवलेल्या लंच बॉक्स मध्ये भात असायचा, त्याचसोबत मी जाताना कोल्हापुरी ठेच्याची आणि प्रवीण लोणच्याची पाकिटं नेली होती, जवळच्या एका मॉल मधून एक किलोभर दह्याचा एक डब्बा आणून फ्रिज मध्ये ठेवला होता. चौदा दिवस कसेबसे एकदाचे ढकलले.

रोज बाहेर पडताना चौदाव्या दिवशी हॉटेल वाले अडवणार तर नाहीत ना, क्वारंटाईन चे नियम तोडल्याप्रकरणी कारवाई झाली आणि बॉस ला कळलं तर काही धडगत नव्हती. सुरवातीला दोन चार दिवस असलेली भिती हळूहळू कमी झाली मग जेवणासह मॉल मध्ये पण जाऊन फेरफटका मारायला लागलो. दहा दिवस झाल्यावर इंडोनेशियातील दुसऱ्या एका जहाजावर जाण्यासाठी चीफ इंजिनियर आला, तो माझ्या चांगल्या ओळखीचा होता, त्याच्या सोबत संध्याकाळी सात वाजता बाहेर पडलो आणि रात्री दोन वाजता परत हॉटेल वर आलो. जकार्ता मध्ये त्याच्या सोसायटीत राहणारा कॉलेज मित्र काम करत होता, तिथले त्याचे आणखीन चार भारतीय मित्र असा एक गेट टुगेदर प्रोग्राम अरेंज केला होता. तिथं त्यांनीच जेवण वगैरे बनवून ठेवले होते. त्यांचे ठरल्याप्रमाणे पिण्याचा प्रोग्राम सुरु होता, त्यांच्यात एक सरदार मित्र होता, सरदार पिऊन टल्ली झाला आणि मी दारू पीत नाही म्हणून मला दारूची महती पटवून देऊ लागला. मला बोलला तू खोटं सांगतोस जहाजावर काम करतो म्हणून, दारू शिवाय जहाजावर कसा जगतोस वगैरे वगैरे. त्याचा तर जहाजांवर सगळ्याच कंपन्यानी लागू केलेली झिरो अल्कोहोल पॉलिसी वर विश्वासच बसत नव्हता.

शेवटी एकदाचे चौदा दिवस झाले आणि जहाजावर पहिल्यांदा चीफ इंजिनियर म्हणून जॉईन झालो.

चीफ इंजिनियर म्हणून तीन महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट असताना पुन्हा यावर्षी लॉक डाऊन मुळे रिलिव्हर यायला उशिर झाला.चौदा दिवस हॉटेल मध्ये आणि चार महिने जहाजावर झाल्यावर, मला दोन एप्रिलच्या बोट ने घरी जायचंच आहे म्हणून कंपनीला कळवलं, रिलिव्हर जकार्ता मध्ये आलासुद्धा पण जहाजावर एक इंडोनेशियन चीफ इंजिनियर सुद्धा असल्यामुळे मला दोन एप्रिल ला सोडण्यात आले. तीन एप्रिलला जकार्ता मधील हॉटेल मधून स्वाब टेस्ट साठी एजंट घेऊन गेला आणि पुन्हा तासाभरात हॉटेलवर सोडून गेला. रात्री नऊ वाजता जकार्ता मध्ये चेक आऊट केले आणि रात्री बारा चाळीस च्या जकार्ता ते दुबई आणि दुबईहून दुपारी एक च्या दुबई ते मुंबई एमिरेट्स ने प्रवास करून मुंबईत पोहचलो.

हॉटेल क्वारंटाईन असेल की नाही याबाबत सुस्पष्ट माहिती अशी कुठेच नसल्याने तसेच एअर सुविधा या भारत सरकारच्या अँप वर क्वारंटाईन एग्झ्मंशन बद्दल माहिती भरून घेतली होती. योगायोगाने आई आणि मुलगी मुंबईत आले होते, विमान लँड होईपर्यंत ते गाडी घेऊन एअरपोर्टला पोचले सुद्धा. पण बाहेर पडल्यावर हॉटेल क्वारंटाईन करावंच लागेल असं समजलं, हॉटेल ला बेस्ट बस मधूच सोडण्यात येणार होते. त्यामुळे आईला गाडी बस च्या रस्त्यात एका सिग्नल वर थांबवून ठेवायला सांगितली. जेव्हा बस सिग्नल ला पोचली तेव्हा ड्रायवर गाडी घेऊन बस च्या मागे मागे मला नेण्यात येणाऱ्या हॉटेल पर्यंत आला. मुलीला मला बघून आणि मला तिला बघून जो आनंद झाला त्याचे वर्णन शब्दांत करता येणार नाही. बस मधून उतरल्यावर मुलीला आणि आईला लांबूनच बघितले. दुसऱ्या दिवशी प्रिया आणि मुलगा दोघेही येणार आहेत त्यांना सुद्धा हॉटेल च्या खिडकीतून लांबूनच बघून घरी परत पाठवावे लागणार आहे.
मुंबईत चौथ्या क्वारंटाईनला हॉटेल मध्ये सुरुवात झाली. चौथे क्वारंटाईन सात दिवस होणार आहे, ज्यामध्ये हॉटेलच काय पण रूम बाहेर सुद्धा जाता येणे शक्य नाही. त्यानंतर घरी गेल्यावर आणखीन सात दिवसासाठी पाचवे क्वारंटाईन होईल.

मागील अकरा महिन्यांच्या कालावधीत एक रॅपिड टेस्ट, चार स्वाब टेस्ट झाल्या आहेत, आता मुंबईतून घरी जाण्यापूर्वी पाचवी स्वाब टेस्ट सुद्धा होईल. एक महिन्यापेक्षा जास्त दिवस हॉटेल मध्ये आणि पंधरा दिवस घरामध्ये.

जहाजावरुन परत आल्यावर हॉटेल, ट्रान्सपोर्ट आणि स्वाब टेस्ट चा खर्च कंपनी देते. जॉईन करण्यापूर्वी क्वारंटाईन मध्ये स्टॅन्ड बाय वेजेस म्हणून बेसिक सॅलरी सुद्धा मिळाली.

लॉकडाऊन परवडलं कारण घरच्यांसोबत तरी राहता येतं, पण क्वारंटाईन मध्ये ना घर ना काम निव्वळ बंद खोलीत कोंडून.

जहाजावर तीन चार महिने काढल्यावर जरी क्वारंटाईन करायला कितीही दिवस लागले तरी जहाजावरुन परत निघताना जो अतुलनीय आनंद असतो त्याच्याबद्दल वर्णन करता येणे शक्यच नाही.

— प्रथम रामदास म्हात्रे.

मरीन इंजिनियर,

B. E. (Mech), DME, DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 184 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..