नवीन लेखन...

।। श्री राम समर्थ ।। श्रीसमर्थ रामदासांचा पदसंग्रह – एक विचार

 

श्रीसमर्थांच्या वाडमयीन मुर्तीत मेरूमण्याप्रमाणे शोभणारा १०८ पदांचा “पदसंग्रह” जाणकारांना मार्गदर्शक आहे. भावना, कल्पना, ज्ञान यांचे वरदान लाभलेले प्रतिभासंपन्न महाकवी म्हणजे श्रीसमर्थ. रसांचाही रस जो “अध्यात्मा” तील ब्रह्मरस समाजाला देऊन त्यास अविनाशी आनंद व शांती देणारे त्यांचे कवित्व थोर आहे.

साहित्यातील मोठा उद्बोधक भाग म्हणजे त्यांच्या पदरचना. ह्यातून त्यांचे वाड्मयीन विशेष झळाळून उठतात. चिंतन मननास प्रेरक ठरणारा हा रचनाप्रकार लोकप्रिय आहे. श्रीसमर्थ साहित्याच्या सर्व प्रेरणा ह्यात आविर्भूत झाल्या आहेत. उत्तम काव्यगुण, प्रासंगिक रचना तर भाषेचे भूषण ठरल्या आहेत. त्यामुळे श्रीसमर्थांच्या जीवनात व कार्यात काव्यरचना ही त्यांची आधारभूत शक्ती वाटते.

“पद” या रचनाबंधातील सहजस्फूर्ती, तन्मयता मनास भावते हा रचनाप्रकार त्यांना विशेष आवडत होता. कारण “पद” या रचनाप्रकारास मराठीत प्रदीर्घ परंपरा आहे. अगदी ज्ञानदेवांच्याही पूर्वकाळापासून आढळते. भारतीय संस्कृती, भक्ती व काव्यपरंपरेत ती खोलवर रुजली आहे.

पदसंग्रहातील पदात श्रीराम, श्रीगुरु, परमार्थ, विवेक, नामस्मरण, गणपती, सरस्वती, सत्संग, कृष्ण, शंकर, अहंभाव आत्मनिवेदन इत्यादी विविध विषयांचा परामर्श त्यांनी घेतला आहे. स्फूर्ती झाली की मनात आलेले विचार तेजस्वी व ओजस्वी भाषेत पदमय वाणीने प्रगट करावयाचे हा त्यांचा दंडक होता. हवेत बाण सुटतो त्याप्रमाणे काव्य करण्यास स्फूर्ती यावी अशी त्यांनी श्रीरामचंद्रापाशी याचना केली असल्याने श्रीसमर्थ आपल्या झोळीत कागद व दौत लेखणी घेऊनच फिरत असत. “जो लेखणीसहित कागद दौत वाहे। ते सद्गुण उदंड जयात आहे।। हस्ती तयासी मिरवी फिरवी विनोदे। श्रीरामदास गुरु तो नमिला प्रमोदे।।” असे गौरवोद्गार रघुनाथपंडितांनी काढले आहेत. ज्यावेळी जशी स्फूर्ती होईल तशी काव्य, अभंग, पद वगैरे ते लिहित असत.

त्यांचे “काव्यं रसात्मकं वाक्यम्।” या न्यायाने बहुधा सर्व ग्रंथ “कविताबद्ध” आहेत. सर्व संतांप्रमाणे फारसे गद्य नाही. श्रीदासबोध ओवीबद्ध, मनोबोध श्लोकबद्ध, स्फुट काव्य अभंगबद्ध तर पद ओवी या छंदात आहेत. वृक्षांसाठी त्यांची लेखणी आग्रही नव्हती. वृक्षशास्त्र देवतेची आराधना करण्याची आराधना करण्याचा त्यांनी मुळीच प्रयत्न केला नाही. तरीही त्यांची पदे मोठे विचार भांडार आहे. प्रसंगी त्यातील तत्त्वज्ञानही साधकांना साधनेसाठी प्रेरीत करते.

प्रदसंग्रहाच्या प्रारंभी श्रीसमर्थानी नृत्यगणेशाला वंदन करून त्याची कृपा संपादन केली आहे. देवांचा सेनापती असलेल्या श्रीगणरायाचे नृत्य हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे एक अविभाज्य अंग गणपती ज्ञानस्वरुप, विश्वव्यापी शुद्ध जाणीव तोच ईश्वर. त्याच्या अधिष्ठानातूनच मनुष्य ज्ञानाकडे वाटचाल करतो. “रंगी नाचे देव मोरया । अंदु वाकि पाई घागरिया ।” विविधालंकारांनी नटलेला श्रीगणेश पायातील पैजणांचा मधुर नादमय ध्वनीने लीलयेने साभिनय नृत्यलीला सादर करीत आहे. हा एक आनंद – सुखसोहळाच । शरीराने स्थूल असूनही चपळपणात तो सर्वश्रेष्ठ ओह. अशा नृत्य कलेचा आदर्श ठेवूनच सगुण-निर्गुण विश्वव्यापक मोरयाला भक्तांनी हृदयी अनुभवावे.

तर दुसऱ्या पदात “गणपती गणराज धुंडिराज” अशी सुरवात करून ओंकार हे गणेशाचे रुप आहे. ओंकार म्हणजेच वेदारंभी झालेला अदिम आणि अनाहत परमेश्वरी नाद असून गणेश हे त्याचे साक्षात स्वरुप मानले आहे. त्याच्या कृपेने इच्छित कार्य सिद्धीस जाते अशी सनातन धारणा आहे. आजही जनमानसात हाच भाव आहे.

श्रीसमर्थांची रामोपासना । व्यापक आहे. सर्वत्र रामत्त्वाचे दर्शन झाले असे वर्णन पदात करतात. रामभक्तीची ओढ व्यक्त करताना रामाविण सारे व्यर्थ्य असे सांगतात “जैसे ते गंगाजल। तैसे गुण निर्मल।” अशा समर्पक उपमेतून लोककल्याणासाठी रामोपासना करावी असा निर्वाळा देतात. तसेच भारतभ्रमण तीर्थयात्रा करुन मातोश्रीस भेटतात तेंव्हा “तेचि भूत गे माय।” हे पद रचतात. “राम सकल जन पाळी। भक्ताला सांभाळी । जन्ममरण दुःख टाळी ।” असे तारक रघुवीर माझे कुलदैवत हे अभिमानाने सांगून “जे जन होती रत। ते सकळही तरत।।” असा निर्वाळा अनुभवाअंती देतात. “आठवे मनी सदा राम चिंतनी।” म्हणून सावळ्या राममूर्तीचे अलंकार वैभव सांगतात. अशा कुळदैवतास मी सदैव न्याहाळतो हा नेम सांगतात. भक्ती करताना “दीनबंधू रे । राम दयासिंधू रे ।” तसेच “योगिरंजन | चापभंजन। जनजापति विश्वमोहनं । अरिकुळोतक भयनिवारणं।” अशा विशेषणातून रामरायाचे मनोभावे वर्णन करतात. “चरण पंकजं देहि मे लयं ।” अशी आर्जवही करतात. “सरळ कुरळ नयन कमळदळश्याम सुकोमल साजे । झळक इंद्रनीळ तळपे रत्नकिळ मुनिजन ध्यानी विराळे।।” म्हणत लावण्यसुंदर राम भक्तांसाठी साकारतात. अनेक अक्षरांच्य पुनरावृत्तीतून सहजपणे अनुप्रास अलंकार साधातात. त्यातील लयबद्धता, गोडवा भक्तांना रामोपासनेस प्रेरणा देतो. तर कधी पदातून रामावरील भरवसा, रामभेटीने संदेह सुटला, मीपणाचे मूळ तुटून आनंदसुख प्राप्त झाले, तर गुणग्रामा रामच तेहतीस कोटी देवांना सोडविणारा ठरला, जीवांचा आधार ही रामच अशाप्रकारे अनेक पदातून अखंडपणे श्रीराम शब्दरेखा चित्रातून साकारतात. त्यातून समर्थांची रामाकार वृत्ती, रामभक्तीची ओढ आपलीही भक्ती उन्नत करते. “नवमी करा नवमी करा।” म्हणत “राम प्रगटे भेद हा तुटे। अभेद ऊमटे तोची नवमी।” अशी आत्मनिवेदन भक्तीची ओढ लावतात. आपल्या बोटात धरुन आत्मारामापर्यंत सहजपणे होऊन जातात. “आम्ही ध्यानी भेटिची सिराणी (जोडी) ।” सांगत निर्धार केल्यास रघुवीर नक्कीच भेटेल अशी ग्वाही देतात. अशा पदांमधून मनुष्याचे। जीवाचे प्राप्तव्य काय, साधकाने काय करावे, अंती अध्यात्म कसे साधावे हा विचार मांडला आहे.

एकूण आयुष्य थोडे, त्यात यातायात फार, त्यात वृद्धापकाळ कठीण. म्हणून असार असलेला संसार सफल कसा होईल, सार कसे साधेल, भवसागर कसा तरुन जाता येईल त्यासाठी या छोटेखानी पदातून आचाराचा आदर्श घालून दिला आहे. म्हणून पदातील प्रत्येक विचार आचार आणि उपासना वेदांना धरुन आहे, हे पदांचे मूल्य वाढले आहे. म्हणून त्यांचे जीवन ही सत्ययुगाची नांदीच म्हणावी लागेल.

“पतितपावन रे नाम तुझे । नाम सार त्रिभूवनी या पदात ईश्वर स्मरणाचे प्रमुख साधन नाम हेच आहे. नामस्मरणात अपरंपार महत्त्व आहे. हा त्यांचा संकल्पानुभव, प्रत्येकाने नियमाने नाम कंठी असू द्यावे. या योगे आपत्ती भक्तांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचत नाहीत किंवा आपत्ती लीलेने सोसण्याचे धैर्य प्राप्त होते.’ वेधु लागो रे छंदु लागो रे । भजन तुझे मन मागो रे ।, भजन तुझे मन मागो रे । भक्तिभावे उद्धरावे रे । संसाराचे दु:ख विसरावे सरावे रे । । तुझ्या गुणे रे काय उणे रे । भजन घडावे पूर्व पुण्य रे ।।” हेच खरे.

असार तो संसार संसार म्हणजे जन्ममृत्याचा विषय संसारदु:खासारखे दुःख नाही. सुखाचा विसर म्हणजे जन्म याचा बहुजनसमाजाला पडलेला विसर पाहून प्रापंचिकांना म्हणतात, “संसार हा दो दिसाचा। याचा भरवसा कैसा । चालती तोचिवरी । पुढे कोण कोणाचा।।” संसाराची नश्वरता सांगत सासंग, सद्वासना, रामरायाची सेवा हा मनुष्याचा पूर्वीपासून चालत आलेला अनमोल ठेवा आहे. तो जपावा, वाढवावा, टिकवावा. “असत्याचा संग खोटा। सारासार विचारणा । येथे असावी धारणा । देह दुर्लभ आहे। लागवेग करुनिया । हित आपुले पाहे ।।” असे दुर्लभ नरदेहाचे महत्व कळकळीने संगतात संसारातील खरे सुख आत्मज्ञान होण्यातच आहे. त्यासाठी वासना निर्बिज करणे हे जीवनाचे ध्येय व्हावे. “गुंतो नको प्रपंच विचारी । वाया कासया शिणसी संसारी।।” कारण तंवरी रे तंवरी वैराग्याचे ठाण । तंवरी रे तवरी सदसता भक्तीची ।। तंवरी रे तंवरी शब्दज्ञान बोध । तंवरी रे तंवरी हे सकळाही बाधक ।। जव तो रघुनायक न करी कृपा।।” अशी रामभक्तीचा शिकवणी श्रीसमर्थ घेतात. हे पद आद्य यमक अलंकाराचे उत्तम उदाहरण आहे.

जर संसार स्वार्थाच्याच पायावर उभारलेला आहे तर स्वार्थत्याग करुन तो विरक्तवृत्तीने करणेच श्रेयस्कर ठरते. ऐहिक विषयाचा उपभोग घेणे ह्याचेच नाव संसार. त्यात स्वार्थाशिवाय दुसरे काहीच नाही. तसेच स्वार्थ आणि ब्रह्मज्ञानाचा नेहमी ३६ चा आकडा. मनुष्याच्या सर्व सुखाचे आदिस्थान जो संसार म्हणजे “मी” आणि “माझे” ह्याचा जप अनुभव घ्यायचा तो “नको नको” ही संसाराची यातायात. संसाराचा वीट आला असा मनाने गिरविणे ह्याचेच नाव “ब्रह्मज्ञान”.

छत्रपती शिवाजी महाराज श्रीसमर्थांच्या आज्ञेप्रमाणे साधन करत. कोणत्याही ऐहिक विषयाच्या ठिकाणी त्यांची वासना नव्हती. पण श्रीतुळजाभवानीने दिलेल्या भवानी तलवार ह्या हत्यारात मात्र ती शिल्लक होती. म्हणूनच भवानी तलवार त्यांनी श्रीसमर्थांपुढे ठेवून नमस्कार केला व त्यांची आज्ञा घेतली.

ही भवानी तलवार श्रीसमर्थ नेहमी आपल्या उशाशी बाळगीत. श्रीसमर्थांचा स्वाभाव विनोदी. एके दिवशी शिष्यांची मौज करावी असे त्यांच्या मनात आले. दुसऱ्या दिवशी सर्व शिष्य उठण्यापूर्वी प्रातःकाली श्रीसमर्थ उठले नित्यकर्म झाल्यावर केस मोकळे सोडले कपाळी मळवट भरला, हातात भवानी तलवार घेऊन वेड्यपिशासारखे खोलीच्या बाहेर आहे. सर्वांच्या अंगावर धावले. कल्याणास म्हणाले, “मारतो”,“तोडतो”. कल्याणाने सारे जाणले. विनंती करुनही समर्थ रुप पालटेना. नंतर कल्याणाने विनंती केल्यावर श्रीसमर्थ मठात आले. येता येता “पळा पळा ब्रह्मपिसा येतो जवळी । रामनामे हाक देऊनी डोई खांजोळी ।।” अशी पदरचना केली. शिष्यांची परीक्षा बघीतली आणि त्यांना साधनपरत्वे आत्मानात्म विचार करुन आत्मा आत्म्यात लीन करावा असा शुद्धीसाठीचा उपदेश सर्वाना केला.

परमार्थ लाभ सद्गुरु कृपेशिवाय होत नाही. “सद्गुरुवीण मोक्ष पावावा। हे कल्पांती न घडे।।” येथे श्रीसमर्थांचा सद्गुरुंवरील हृढ विश्वास दिसून येतो त्या लाभाचा परिणाम एका पदात सांगताना ते म्हणतात, “बाई मी हो मी हो जाहली खरी। खरी गुरुदास ।। सच्चरणी विश्वास।।” असे म्हणतात. तर दुसऱ्या पदात आता तरि जाय जाय । धरि सद्गुरुचे पाय । कृपा करील गुरु माय माय माय । रामदास म्हणे नामस्मरणे भिक्षा मागुनि खाय खाय खाय।।” अशी शरणागतीही स्वीकारतात. ब्रह्मज्ञानाचा उपदेश करुन जीवशिवैक्य करणारा तो सद्गुरु. महावाक्याचे रहस्य प्रतीतीला आणून देईल तो सद्गुरु. तसेच सद्गुरु आत्मनिवेदन दृढ होण्यासाठी भजन करावे व अखंड समाधान पावावे असे सांगतात. याचे नाव आत्मज्ञान असे सोपीकरण साधकांना सांगतात.

“नित्यानित्य विवेक करावा । बहुजना उद्धरी।।” यथे देहात्मविचार मांडतात. “सारासारविचार न येता। भवपुरी।। किंवा अरे नरा, सारासार विचार कसा? ” ह्याचे उत्तर देताना “क्षीर नीर एक हंस निवडता । काय केले वायसा (कावला) ।।” असा उदाहरणासहित विवेक सांधकांच्या गळी उतरवतात. तसेच आत्मा कोण? “अनात्म कैसा। परपार उतरी।।” ह्यातून श्रीसमर्थ अध्यात्माचे अधिकारी होण्यासाठी जीवनात विवेक झाला म्हणजे अनित्य गोष्टिंविषयी वैराग्य उत्पन्न केले पाहीजे सांगून साधकाचे विवेक – वैराग्य जागृत केरण्याचे महत्वाचे कार्य करतात. हीच जीवनाची वास्तवता सांगत पारमार्थिक व व्यावहारिक शिकवण एकत्रपणे देतात.

परमार्थात निर्गुणात्म ज्ञानाकरिता वैराग्या प्रमाणेच विवेकाची आवश्यकता आहे. तशी भक्तियोगातही परमेश्वर प्राप्तीकरिताही ती आहेच. मग विवेकाला विसरुन आपण कष्टी का व्हावे असा प्रश्न साधकाने मानाला विचारावा.

आळस हे करंट्या लोकांचे लक्षण. त्यास परमार्थ साधत नाही. निद्रा अधिक येते. सद्बुद्धी शून्याकार होते. त्यामुळे आयुष्याचा नाश होतो. “घटका गेली पळे गेली । तास वाजे घणाणा। आयुष्याचा नाश होतो। राम का रे म्हणा ना।।” कारण “आळस खोटा रे बापा आळस खोटा रे।।” या पदातून आळसाचा आत्यंतीक तिरस्कार केला आहे. आळस करंट्या लोकांचे लक्षण. आळसामुळे दिवस, मानवी जीवन, अमूल्य संधी फुकट जातात. कर्म करणे, श्रम करणे हे खरे जीवन. याउलट प्रयत्नाने तो परमार्थाचा साधक होतो. समाजातील प्रत्येक व्यक्ती आशी उत्तमपुरुष लक्षणाची व्हावी ही तळमळ व्यक्त होते. अखंड सावधानता भाग्यवान करते. पुरता यत्न नाही तेथे सुख- संतोष कसा मिळेल?

भगवान श्रीशंकर नटेश्वराचे वर्णन करताना श्रीसमर्थ म्हणतात, रंगी नाचतो त्रिपुरारी लीला नाटकधारी ।। ” या पदात वर्णन करताना निसर्गातील झुळझुळझुळझुळ शिरी गंगाजळ – जलौधाचा ध्वनी तसेच हळहळहळहळ कंठी हलाहल – विषप्राशनाची दाहकता तर झणझणझणझण वाकी चरणी – नृत्यातील घुंगुर नाद नृत्यातील चपळता आणि टिंमिटिमिटिमिटिमि मृदुंग गंभीर अशी वाद्यांची साथ, हरहर हरहर शंकर असे त्रिपुरारी नृत्याचे नादमधुर वर्णन वाचताना भक्तही नृत्याराधनात गुंग होतात. तसेच सीतास्वयंवर सोहळयाचेही असेच नादमय वर्णन करुन पदातून हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवता येतो. “प्रगट निरंजन प्रगट निरंजन प्रगट निरंजन आहे ।” या पदांत मी तू पणाचा शोध नि बोध प्रचितीने आपल आपण घ्यावा.

त्यांच्या मते शक्तीपण बलवान होण्याचा आदर्श म्हणजे हनुमान “मारुति सख्या बलभीमारे। अंजनीचे वचनांजन लेऊनि दाखविशी बलसीमारे।।” असे संबोधून हनुमंताच्या असामान्य कर्तृत्वाच्या गाथेचे स्मरण ठेवावयास प्रवृत्त केले. वीर हनुमंत साकारताना “भीम उभा। पाहता सुंदर शोभा। लांचावे मन लोभा ।। हुंकारे भुभुःकार । काळ म्हणे अरे बारे ।।” अशाप्रकारे मारुतीरायाचा शौर्य, पराक्रम, बुद्धिमत्ता, उत्तम गुणांचा आदर्श समोर ठेवला आहे.

मनाला अल्हाद देऊन रंजन करणे हा पदांचा उद्देश नाही. तर सदुपदेशाने लोकांना काव्यनिष्ठ करणे, परमार्थ करण्यास भाग पाडणे, संसारातील मिथ्यत्व जाणवे, भक्तिमार्ग ज्ञानमार्ग बहुजनांना शिकवून प्रपंच, व्यवहार, चातुर्य शिकविणे अशी उत्तुंगता पदात आढळते श्रीसमर्थांच्या उत्कट भावनांचा जोरदार उद्गम म्हणजे ही पद शब्दयोजना समर्पक आणि चित्तवेधक आहे. रचना आत्मनिवेदनात्मक आत्मविष्कारात्मक आहे. या रचना म्हणजे भक्ती, चिंतन, विचार, विवेक, प्रबोधन, जनकल्याण, जनसंघटन या प्रेरणांचा एकत्रित बांधलेला गुच्छच आहे. सहजता, अखंड चालणा हा त्यांचा प्रतिभेचा धर्म. क्रियावान कवी प्रत्ययास येतो. उदंड आत्मविश्वास साकारताना अध्यात्मविद्या सोपी असून परमेश्वर जवळच आहे असे श्रीसमर्थ सातत्याने सांगतात. पद वाडमयातून त्यांचे व्यक्तित्व समोर उभे राहते. पदांद्वारे श्रीसमर्थ कधी आपल्याशी प्रत्यक्ष बोलतात तर कधी स्वमत व्यक्त करतात असे वाटते.

समाज सुखी करण्यासाठी त्यात अडकायचे नाही तर बृहत्तर सुखाकडे जायचे अशी सोपानपरंपरा सांगतात. श्रीसमर्थांच्या जीवनाला व्यापून असणारी प्रबळ प्रेरणा म्हणजे रामोपासना. सत्वगुणांचा उत्कर्ष असलेली देवता मर्यादापुरुषोत्तम राम व हनुमंतासारख्या दास्यभक्तीला परमोत्कर्ष अशा अतुल पराक्रमी देवतेची जोड दिली. या दोन देवता श्रीसमर्थांच्या प्रतिभेला प्रभावित करत्या झाल्या. रामराज्य हे सर्वांच्या कल्याणाचे राज्य व्हावे, न्यायाधिष्ठित व्हावे, अन्याय निवारण्याचे व्हावे अशी त्यांची उत्कट इच्छा होती. आजही कोदंडधारी राम व राक्षसाच्या छातीवर पाय देऊन दुष्टांवर हात उगारणारा हनुमंत प्रिय वाटतो. या पदरचना स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून चिरंतन मानवी भावभावनांना कवेत घेणारे श्रीसमर्थ कविश्रेष्ठ ठरतात. त्यांच्या प्रतिभेला पंचमहाभूतांचे आकर्षण आहे. विशेषतः वायू अधिक लाडका कारण हनुमंत वायुपुत्र ना ! प्रगट निरंजन, घटका गेली पळे गेली, राघव पुण्यपरायण अशा अनेक पदांची “गीते” झाली आहेत. राष्ट्रपुरुष श्रीसमर्थ पदसंग्रहात जनसामान्यांना मनाच्या उन्नत पातळीवर नेताना आर्जवी, भावस्पर्शी होतात.

बहुजनसमाजाला नीतिविचार सांगतात. तसेच नीतीमूल्यांचे वैचारीक, सामुहिक जीवनात स्वरुप, महत्व, याविषयी नेमके दिग्दर्शन करतात. शिष्य, साधक, महंत अशा साऱ्यांनाच आचरणाचा आदर्श उभा करतात. येथे अध्यात्मनिष्ठेबरोबरच संपन्न जीवननिष्ठाही महत्वाची वाटते. यातून आस्था महत्वाची वाटते. आस्थेतही एक खास वळण प्राप्त झाले आहे. आस्थेला दारिद्र्य, दु:ख, दैन्य, करंटेपण, औदासिन्य नको होते.

या पदसंग्रहातील अनेक विचार, उदंड भावना, तीव्र निरिक्षण चौफेर व व्यापक होते हे जाणवून श्रीसमर्था वरील श्रद्धा दृढ होते. प्रतिक्षणी नित्य नवी रचना करण्यासाठी त्यांना सरस्वती सिद्धच होती. श्रीसमर्थाच्या अंतःकरणातील आत्मारामाची भक्ती आपल्या अंतर्यामी त्वरीत यावी अशी प्रार्थना करून लेखणीस विराम देते.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

सौ. उषा कळमकर, डोंबिवली
९९२०२८४१४५

सौजन्य: गुरुतत्व 
वर्ष २ रे, अंक ११ वा, (अंक २३) ठाणे,
मार्च – २०१९ पाने, ४८ं, किंमत रुपये २५/-

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..